
मुलांबरोबर स्पेशल/खास संवाद साधताना
मीटिंगमध्ये असा संवाद सुरू असताना मुले बोलकी होऊन सांगायला लागतात. कोणती मुले काम करत नाहीत, सकाळी व्यायामाकरता उठत नाहीत, रात्री झोपत नाहीत, सारखा लाईट लावतात, पंखा बंद करतात किंवा मारामारी करतात. तसेच कोणती मुले सारखी भांडतात, बल्ब कोणी फोडला, कोण रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसतात, असे अनेक मुद्दे पुढे येतात. या मुलांबरोबर झालेल्या चर्चेचा फायदा मला व्यवस्थापक व काळजीवाहकांशी संवाद साधताना होतो. या मुद्द्यांवर चर्चा करून उपाययोजना करता येते.
मुलांशी संवाद साधताना फार काही वेगळे करावे लागत नाही, पण आपले पद, शिक्षण, समाजातील स्थान बाजूला ठेवून प्रांजळपणे त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. एकदा का तुमची त्यांच्याशी नाळ जुळली व त्यांना तुमच्या चांगुलपणाबद्दल विश्वास आला, खात्री पटली की ते मोकळेपणाने तुमच्याशी बोलायला लागतात. अदितीबरोबर पहिल्यापासूनच आदराचे व प्रेमाचे नाते प्रस्थापित केल्यामुळे, तिला समजून घ्यायला, तिची बौद्धिक क्षमता समजून घ्यायला मला मदत झाली. तिच्या आवडीनिवडी जपायला व हळुवारपणे तिच्या प्रगतीकरता प्रयत्न करता आले. तिच्या आहेत त्या क्षमता कशा वापरता येतील व अजून क्षमता कशा वाढतील या दृष्टीने विचार करता आला, प्रयत्न करता आले. तिनेही याला सकारात्मक प्रतिसाद दिला. अदितीच्या पालनपोषणाच्या अनुभवामुळे इतर मुलांशी संवाद साधणे सोपे गेले.
रोज मुलांशी संवाद, मी संस्थेत प्रवेश केल्यापासूनच सुरू होतो. मुले रोजच स्वागत असे करतात, जसे काही खूप दिवसांनी भेटत आहोत. मग एखादा मुलगा वा मुलगी सांगते तुमचा ड्रेस छान आहे, तर एखादा बोलता येत नसलेला मुलगा हाताने खुण करुन कानातले छान आहे असे सांगेल. तर एखादा अजून धीट मुलगा किंवा मुलगी म्हणते मॅडम आज छान दिसताय. एकूण काय तर दिवस छान सुरू होतो. काहीतरी वेगळे केले असेल, म्हणजे साडी नेसून गेले असेल तर अदिती जवळ येऊन म्हणते ‘छान दिसते’. अशा स्वागताने कुठेतरी आपलेही मन सुखावतेच. मुलांची एकमेकांशी भांडणे, काळजीवाहक वा सर रागावले असतील तर त्यांचेही रिपोर्टिंग लगेचच होते.
संध्याकाळी मुलांबरोबर फिरायला जाताना व दर गुरुवारच्या मीटिंगमध्ये त्यांच्याशी छान संवाद साधता येतो. संध्याकाळी मुलांबरोबर फिरायला गेल्यावर नैसर्गिक वातावरणात खूप मनमोकळ्या गप्पा होतात.
आठवड्याच्या मीटिंगमध्ये मात्र मुलांशी व्यवस्थित संवाद साधता येतो. मी प्रत्येक मुलाचे नाव घेऊनच त्याच्याशी संवाद साधते. यामुळे प्रत्येक मुलगा भावना व्यक्त करायला शिकतो. या मीटिंगला फक्त मी व मुलेच असतात. त्यामुळे मुले खूप मोकळेपणाने बोलतात. या गप्पांमधून घरामध्ये काळजीवाहक यांच्याशी कसा वागतो, यापासून घरामधील संडासाचे फ्लश नीट चालतात ना, रात्री डासांकरता मॅट लावली जाते ना, उन्हाळा सुरू झालाय पंखे लावताय ना, वा थंडी सुरु झालीय दोन चादरी घेताय ना, या व अशा अनेक गोष्टी बोलता येतात. घरातील काय काय कामे करता? रविवारी घराची साफसफाई करताय ना. तर रात्री कोणी त्रास देत नाही ना? रात्री कोणालाही तुमचे कपडे काढू द्यायचे नाहीत इथपर्यंत संवाद साधते. मुलांच्या सुरक्षिततेसाठी या गोष्टी त्यांना माहिती असणे फार गरजेचे आहे. तसेच संस्थेतून एकटे बाहेर जाऊ नका, कारण तुम्हाला घरचा पत्ता सापडणार नाही, मग तुम्ही कुठेतरी हरवाल व तुमचे खूप हाल होतील. तुम्हाला भूक लागली तर जेवायला कोण देणार? अशा सूचना व समुपदेशन बोलण्याच्या ओघात देत असते. कारण काही मुलांना संस्थेतून बाहेर जायचे असते व आम्ही कितीही लक्ष ठेवले तरी नजर चुकवून मुले जाऊ शकतात. मुलांनी असे करू नये म्हणून त्यांच्याशी वरचेवर हे बोलावे लागते. मुलांना असे कधी करावेसे वाटेल, याची अटकळ बांधता येत नाही. त्यांची एकमेकांमधील भांडणे, काही कारणाने काळजीवाहकांशी झालेला वाद यामुळे राग आल्यामुळेही काही मुले बाहेर जायला बघतात. एखादया मुलाला तंबाखू खायची सवय असेल वा सिगारेट प्यायची सवय असेल, तरी संस्थेबाहेर जाऊन रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाकडे वा जवळच्या कंपनीमधील पहारेकऱ्याकडे मागतात.

मुलांना तुम्ही इथे नवक्षितिजमध्ये का आहात याबद्दल पण त्यांना समजेल या भाषेत पण सकारात्मकता ठेवून सतत सांगत असते. समजावताना साधारणपणे हे मुद्दे असतात की, तुम्हाला घरी एकट्याला कंटाळा येणार, दिवसभर काय करणार? आई-बाबांना काम असते व तुम्ही आता मोठे झाला आहात. मोठी मुले-मुली सारखे आई बाबांच्या मागे मागे करतात का? इथे तुम्हाला मित्रमैत्रिणी मिळतात. त्यांच्या बरोबर तुम्ही राहाता, व्यायाम करता, कार्यशाळेत काम करता, फिरायला जाता, सिनेमा बघता, गप्पा मारता, ट्रेकला जाता, अशी सगळी मजा करता की नाही? ही मजा घरी करता येत नाही व आईबाबा पण आता म्हातारे होत चाललेत. मग त्यांना त्रास नको ना द्यायला? म्हणून फक्त सुट्टीतच घरी जायचे व सुट्टी संपली की लगेच कार्यशाळेत कामावर हजर राहायचे. नाहीतर तुमची रजा लागेल. मुलांना तुम्ही मोठे आहात व तुम्ही जबाबदारीने काम केले पाहिजे, ही जाणीव सतत देत रहावी लागते. याचा फायदा मुले रोजची कामे म्हणजे घर स्वच्छता, जेवण आणणे-नेणे, टेबल स्वच्छता, भांडी जागेवर ठेवणे अशी कामे खूप जबाबदारीने व आनंदाने करतात. कार्यशाळेत रोज का जायचे, व्यायाम का करायचा, जेवण प्रमाणात का खायचे, यावर पण मुलांशी चर्चा होते.
एखाद्याच्या आजोबा-आजी वा आई-वडील यांचा मृत्यू झाला असेल तर, मृत्यू म्हणजे काय हे त्यांना समजावून सांगते. हे सांगताना मरण पावलेली व्यक्ती परत दिसत नाही. अशाप्रकारे त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी संवाद साधते. घरातील कोणी व्यक्ती मृत झाली असेल, तर हे सत्य लपवून न ठेवता त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून द्यावी. यामुळे मुलांच्या मनात संभ्रम रहात नाही. अदितीबरोबर मी कायम याप्रकारे संवाद साधलाय व आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे मुले सत्य परिस्थिती स्वीकारतात. आई-वडिलांचा मृत्यू झाला असेल तर, आम्ही आहोत तू काळजी करू नकोस, हा विश्वास मी मुलांना लगेचच देते. यामुळे मुलांना भावनिक सुरक्षितता मिळून मानसिक ताण वाढत नाही.

मुलांना मीटिंगमध्ये आठवड्यामध्ये काय घडलंय हे सांगायची खूप उत्सुकता असते. कोण कोण स्वयंसेवक भेटायला आले होते, त्यांच्याबरोबर काय खेळ खेळले, कुठले पथनाट्य केले, कुठल्या गाण्यावर डान्स केला, ट्रेकला कशी मजा आली, ट्रेकला जाताना वाटेत खाल्लेला वडापाव, चहा व सरबत कसे आवडले या सगळ्याचे रिपोर्टिंग होते. याचबरोबर एखादा मुलगा वा मुलगी रूममध्ये पूर्वी काम करत नसेल व आता काम करायला लागले असतील तर हेही मुले कौतुकाने जरूर सांगतात. आठवड्यात बघितलेले सिनेमे, जेवणामध्ये आवडलेला एखादा पदार्थ, काय खावेसे वाटतंय, साजरे झालेले वाढदिवस, सगळंच भरभरून सांगायचे असते. घरी भावा-बहिणीचे लग्न तसेच नवीन बाळाचे आगमन हे सर्व खूप आनंदाने सांगत असतात. एखादा मुलगा मीटिंगमध्ये विचारतो, ‘मॅडम लग्नाला खूप खर्च असतो का हो?’ मी म्हटलं, ‘का रे विचारतोस?’ तर अगदी उत्साहाने म्हणतो कसा, ‘मला अनुष्का शर्माशी लग्न करायचय.’ अशावेळी उत्तर देताना आपलीच विकेट पडते. संस्थेच्या आवारात फिरताना एखादा मुलगा वा मुलगी जवळ येतात व हळूच म्हणतात, ‘मॅडम तुम्हाला एक सांगायचय पण मीटिंगमध्ये सांगतो.’ असे मुलांनी म्हटले की मला खूप मजा वाटते व समाधानही. मुलांना व्यक्त होण्यासाठी आठवड्याची मीटिंग हे हक्काचे ठिकाण वाटते. मुलांना मायेचे संरक्षण दिले, म्हणजे हळूहळू ते त्यांच्या कोषातून बाहेर येऊन जीवनाचा आनंद घ्यायला शिकतात.
हल्ली सेल्फ अॅडव्होकसीच्या बऱ्याच कार्यशाळा विशेष मुलांसाठी घेऊन त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून द्यावी यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. आमच्याकडे अशी एक कार्यशाळा झाली होती. मला असे जाणवले की, यासाठी विशेष मुलांच्या लहानपणापासून प्रयत्न होणे आवश्यक आहे. मुलांना दडपण न येता भावना व्यक्त करता येतील असे वातावरण घरामध्ये पाहिजे. काय हवे काय नको हे व्यक्त करायला शिकवणे व ‘फ्री वील’ मला हे करावेसे वाटत नाही, तर त्या भावनेचा आदर आपण ठेवायला शिकले पाहिजे. नवक्षितिजमध्ये दर बुधवार व रविवारी सिनेमा असतो. राज, प्रतीक अशा काही मुलांना सिनेमा बघायला आवडत नाही. ही मुले बागेत फिरणे वा सायकल चालवणे असे काहीतरी करत असतात. येथे अदितीने घेतलेला एक निर्णय नमूद करायला पाहिजे. अदितीला स्पर्धेमध्ये भाग घ्यायला व स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवायला आवडते. स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाले नाही तर नाराज होऊन ती दंगा पण करते. आता पहिल्यापेक्षा प्रमाण बरंच कमी झाले आहे. पर्वती चढणे स्पर्धेमध्ये अदिती पहिल्यापासून भाग घेत होती. तिला आतापर्यंत बक्षीस मिळाले नव्हते. अदिती पर्वती खूप सावकाश चढायची, पण जिद्दीने स्पर्धा पूर्ण करायची. २०१४ साली आश्चर्य म्हणजे तीही स्पर्धा तिसऱ्या क्रमांकाने जिंकली. पण आमच्या लक्षात आले की ती खूप दमली आहे. अर्थात बक्षीस मिळाले म्हणून ती खुश होती. पुढच्या वर्षी पर्वती स्पर्धा जवळ आल्यावर आम्ही भाग घेणाऱ्या मुलांची नावे काढत होतो, तर अदितीने सांगितले तिला भाग घ्यायचा नाही. माझ्यासकट सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. मी नीट विचारल्यावर सांगितले, ‘खूप दम लागतो. मला भाग घ्यायचा नाही.’ स्वतःची क्षमता नाही हे ओळखून, बक्षीस मिळूनसुद्धा तिने स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नाही असे ठरवले. आम्ही तिला अजिबात आग्रह केला नाही. तिच्या निर्णयाचा आदर ठेवला. काही मुलांना रंगपंचमीला रंग खेळायला आवडत नाही. ते आधीपासून सांगत असतात मुलांना सांगा रंग टाकू नका; सुरुवातीला मुले ऐकायची नाहीत व रंग टाकायचीच. त्यांना वरचेवर सांगितले एखाद्याला जर एखादी गोष्ट करायला आवडत नसेल, तर त्याच्यावर जबरदस्ती करायची नाही. जबरदस्ती करून आपण त्या माणसाला नाराज करतो. हळूहळू मुलांना हे पटायला लागलंय व मुले लक्षात ठेवून या मुलांच्या अंगावर रंग टाकत नाहीत. विशेष मुलांच्या या आवडीनिवडींचा तसेच काही निर्णयांचा आदर आपण करायला पाहिजे व तसे करण्याचा प्रयत्न नवक्षितिजमध्ये आम्ही जरूर करतो.
एखादा मुलगा सांगतो, मॅडम हा मुलगा त्या मुलीला ‘आय लाव यू’ म्हणाला. मुली मीटिंगमध्ये सांगतात मॅडम अमुक एक मुलगा सारखा आमच्याकडे बघतो, वा डान्स करताना त्याने हाताला हात लावला. त्याला रागवा. एखादा मुलगा मुलगी एकमेकांशी जास्त सलगीने वागायला लागतात. मुलगा सारखा गाणी म्हणत तिच्या घरासमोरून जात असतो. वाचून उडालात. पण ही पण तरुण मुले-मुलीच आहेत ना. त्यांनाही भावना आहेतच. मला खूप बरे वाटते अशा घडणाऱ्या घटना मुले व्यक्त करतात. त्यांनी हे व्यक्त केल्यामुळे आम्ही जरूर पडेल तशी त्याची दखल घेऊ शकतो.

मुलांची एकमेकांशी भांडणे होतच असतात. मुलांची भांडणे सोडवून एकमेकाला सॉरी म्हणायला लावून परत मैत्रीपण करून द्यावी लागते. तुम्ही एकमेकांशी चांगले वागायला पाहिजे, कारण तुम्ही मित्र वा मैत्रिणी आहात हे वरचेवर त्यांच्या मनावर बिंबवावे लागते. तुम्ही न भांडता एकमेकांशी प्रेमाने बोललात, तर तुम्हाला इथे राहायला अजून मजा येईल हेही अधूनमधून सांगावेच लागते. आश्चर्य महणजे ते आपल्यापेक्षा फारच लवकर व सहज समोरच्या माणसाला माफ करू शकतात. आपण त्यांच्याकडून हे अगदी शिकवण्यासारखे आहे. असो... काळजीवाहकांशी, सरांशी नीट वागावे ते तुम्हाला छान आयुष्य देण्याकरता इथे आहेत. स्वयंपाकाच्या मावशींना जेवण आवडले की सांगावे, ‘थँक्यू’ म्हणावे म्हणजे त्यांना बरे वाटेल. असे वरचेवर सांगितल्यामुळे या सगळ्यांबद्दल सकारात्मक प्रतिमा त्यांच्या मनात तयार होते. मुलांचे सर्व सहकाऱ्यांशी संबंध चांगले व्हायला व सहकाऱ्यांना मुलांचे सहकार्य मिळायला फायदा होतो. विशेषतः काळजीवाहकांशी यांचे संबंध चांगले राहावेत, म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते.
विशेष मुलांबरोबर संवाद साधताना आपल्या लक्षात येते की, आपल्याला वाटते त्यापेक्षा त्यांना खूप जास्त समजत असते. आपण ते समजून घ्यायला कमी पडतो. त्यांना प्रेमाची भाषा जेवढी छान समजते, तेवढीच त्यांना अवहेलनेची भाषाही समजते. मला पहिल्यापासूनच आर्थिक दुर्बल, अपंग व्यक्ती व प्राण्यांशी वागताना, आदराने व प्रेमानेच वागवेसे वाटते. या भावनेमुळे मुलांशी संवाद साधणे मला सोपे जाते. अर्थात काही विशेष मुलांना व इतर काही व्यक्तींना पण आदर व प्रेमाची भाषा कळतच नाही, अशावेळी त्यांना समजेल अशा भाषेत समजवावे लागते.
मी त्यांना जरूर तेव्हा कडक शब्दात रागावते. पण थोडयावेळाने प्रेमाने असे करायचे नाही म्हणून समजावते. म्हणजे त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना राहात नाही. अपराधीपणाची भावना राहिली तर वर्तणूक समस्या वाढणार. आपली चूक झाली आहे आणि आपण परत असे करू नये, हे त्यांच्यापर्यंत नीट पोहोचणे जरुरीचे असते. नवक्षितिजच्या आवारामध्ये फिरताना मी, कोणी मुलगा-मुलगी जवळून गेली तर काय जेवण झाले का? कसा आहेस? हे साधे प्रश्न विचारते. पण हे संवाद त्यांना त्यांच्या अस्तित्वाची कोणीतरी दखल घेतंय, ही जाणीव करून देण्यास पुरेसे असतात. एखादया मुलाने लांबून हाका मारल्या, तरी आवर्जून थांबते. मग ते विचारणार माझे जेवण झाले का? किंवा काल त्यांनी काय केले हे सांगणार.
मुले खूप क्षमाशील असतात. आपल्या अनेक चुका ते पोटात घालतात. त्यांच्या जागी आपण आपल्याला ठेवून बघावे म्हणजे त्यांची कुचंबणा व अपमानाची आपल्याला जाणीव होईल. आपण जे वागतो, चांगले वा वाईट, त्याची नोंद विशेष मुलांच्या मनावर होतच असते. या नोंदी जास्तीत जास्त चांगल्या कशा होतील याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. तात्विक, आध्यात्मिक विचार, संवेदनशीलता, सर्जनशीलता व सामाजिक भान या सर्व गोष्टींचा मेळ घालून आपल्याला हे करायचे आहे.