
२०. विदेशामधील संस्थांना भेट
या देशांना भेट दिल्यामुळे आपले सरकार, समाजकल्याण खात्यातील कर्मचारी, सामान्य लोक, हितचिंतक व विशेष मुलांबरोबर काम करणारे कर्मचारी, स्वयंसेवक व मुख्य म्हणजे संस्थाचालक या सर्वांनीच या मुलांना चांगले आयुष्य देण्याकरता अजून संवेदनशीलतेने काम करण्याची जरूर आहे, याची जाणीव झाली. तसेच मदत करताना दयेची भावनाही नसावी. चांगले, आनंदी व सकारात्मक आयुष्य जगणे, हा विशेष व्यक्तींचा हक्क आहे. त्यांना असे आयुष्य मिळवून देणे, हे आपले कर्तव्य आहे. अशी भावना आपण ठेवली, तर आपल्या देशातील विशेष व्यक्तींच्या आयुष्याचा स्तर उंचावायला वेळ लागणार नाही. पण यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन वैयक्तिक फायद्या-तोट्याचा विचार सोडून निःस्वार्थी भावनेने काम करणे फार गरजेचे आहे.
२००७ साली मारुंजीला निवासी कार्यशाळा सुरू झाली. २००९ पासून मला असे वाटू लागले की, इतर देशातील मतिमंदाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना भेट द्यावी. त्या संस्थांमध्ये कसे काम चालते ते बघावे, त्यांच्या कामाची पद्धत बघून यावी. आमच्या विश्वस्तांच्या मीटिंगमध्ये मी हे मत मांडले व सर्वांनाच हे पटले. त्यानंतर नवक्षितिजची विश्वस्त असलेली कनका व मी बरेच दिवस युरोपमधील जर्मनी व इंग्लंड या देशांमधील अशा संस्था शोधून त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करत होतो. २०१० साली इंग्लंडमधील ग्लासगो या शहरातील ‘क्रॉसफील्ड’ ही संस्था थोडीशी फी आकारून आम्हाला मदत करायला तयार झाली. या संस्थेने ग्लासगोच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक निवासी संस्था व विशेष शाळांशी संपर्क साधून, माझ्या अपॉइंटमेंट ठरवून ठेवल्या. त्यावर्षी इंग्लंडमध्ये गेल्या साठ वर्षांतील नीचांकी तापमान असलेला हिवाळा होता. अनेक वर्षात झाली नाही एवढी बर्फवृष्टी इंग्लंडमध्ये होत होती. ही फार मोठी अडचण वाटली नाही व मी व्हिसा मिळण्यासाठी अर्ज केला. मला इंग्लंडचा व्हिसा सहज मिळाला. व्हिसा देणाऱ्या बाईने मला आश्चर्याने विचारले की, इतकी थंड हवा असताना तू इंग्लंडला का चालली आहेस? मग तिला माझे जाण्याचे प्रयोजन सांगितले व मी हिमालयात अनेक वेळा ट्रेकिंगसाठी गेलेली आहे त्यामुळे मला थंड हवेची सवय आहे, हे ऐकून हसतच तिने मला शुभेच्छा दिल्या व इंग्लंडचा व्हिसा माझ्या ताब्यात दिला. जर्मनीला जायचा प्रोग्रॅम अनिश्चित होता. मी इंग्लंडमध्ये असताना जर सर्व जमून आले तर जर्मनीला जाऊन काही संस्था बघाव्यात, असा विचार करून मी इंग्लंडला जायचे ठरवले.
इंग्लंडमधील ‘मँचेस्टर’ या शहरामध्ये गुजराथी कुटुंबामध्ये माझी राहायची सोय झाली होती. मी एकटी पहिल्यांदाच परदेशवारी करत होते. थोडासा ताण होता पण मस्तपण वाटत होते. मॅचेस्टरच्या विमानतळावर मला घ्यायला फाल्गुनी शहा आली होती. विमानतळापासून तिचे घर अगदीच जवळ म्हणजे वीस मिनिटांच्या अंतरावर होते. विमानतळ ते घरापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा भरपूर बर्फ साचलेला दिसत होता. गाडीमध्ये हिटर असल्यामुळे थंडी जाणवत नव्हती. फाल्गुनीच्या घराबाहेरपण भरपूर बर्फ साचलेला दिसत होता. गाडीतून उतरून घरात जाईपर्यंत थंडीने हुडहुडी भरली व माझ्या डोळ्यांसमोर व्हिसा देणारी बाई आली. मी शनिवार, रविवार यांच्याकडे राहून सोमवारी सकाळी ग्लॉसगोला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसले. ट्रेन स्वच्छ होती व त्यामानाने गर्दी नव्हती. या ट्रेनमध्ये प्रत्येक स्टेशनवर चाकरमाने शिस्तीत चढत व उतरत होते. काही कॉलेजमध्ये शिकणारी मुले-मुलीपण ट्रेनमध्ये दिसत होती. ट्रेनमधून बाहेरचा नवीन प्रदेश बघत प्रवास पटकन संपला. मला प्रवासात खिडकीतून बाहेर दिसणारी शेती, जंगले, पक्षी, प्राणी व माणसेपण बघायला फार आवडते. काही छान दिसलेली दृश्ये नंतर आठवून डोळ्यांसमोर आली की, फार मजा येते. हा प्रवास चार तासांचा होता. प्रत्येक स्टेशनचे नाव स्क्रिनवर येत होते व बाजूच्या माणसाला मी विचारून ठेवले होते की, कुठल्या स्टेशननंतर ग्लॉसगो येते. त्यामुळे ते स्टेशन येऊन गेल्यावर मी तयारीतच बसले होते. बरं, माझ्याकडे फार सामान नव्हते फक्त एक रकसॅक होती.
मला स्टेशनवर घ्यायला ‘क्रॉसफील्ड’ तर्फे अॅनी ही मध्यमवयीन महिला येणार होती. हे छोटेखानी रेल्वे स्टेशन होते. ग्लॉसगोच्या उपनगरामध्ये मला उतरायचे होते. येथे उतरल्यावर एक प्रसंग घडला. मी स्टेशनवर उतरून स्टेशनच्या बाहेर आले, अॅनी तोपर्यंत आलेली नव्हती. एक तरुण मुलगा मला सारखा एक पाऊंड देच म्हणून मागे लागला. या नवख्या देशात मला काय करावे कळत नव्हते. मी त्याला नो नो, गो गो करत होते. तेवढ्यात अॅनी आली व मला हुश्श झाले. अॅनीने त्या मुलाच्या वागण्याबद्दल माझी क्षमा मागितली. तिने सांगितले ही व्यसनाच्या आधीन झालेली मुले असतात. व्यसनासाठी पैसे नसतात, त्याकरता ते भीक मागत असतात. अॅनी मला त्यांच्या ऑफिसकडे घेऊन गेली. या छोट्याशा ऑफिसमध्ये मला या संस्थेची डायरेक्टर इसाबेला भेटली. हिच्याबरोबर आम्ही इमेलद्वारे संपर्कात होतो. तिने मला एकदा नखशिखांत न्याहाळले, कारण ती जेवढी टिपटॉप होती त्या मानाने मी स्पोर्टशूज घालून व पाठीवर सॅक घेऊन साध्या कपड्यात होते. तिचा रोख बघून मी तिला सांगितले, आता काही दिवस मला बरेच चालायला लागणार आहे, बराच प्रवास करायचाय व रोज नवीन लोकांना भेटणार आहे. म्हणून मी ठरवलंय अगदी सोयीस्कर सुटसुटीत वाटतील असेच कपडे व बूट घालायचे. हे ऐकून ती ओशाळली व म्हणाली, ‘हो हो! अर्थातच हे बरोबरच आहे.’
आम्ही कॉफी घेत असताना इसाबेलाने पुढील पाच दिवसांचा पूर्ण कार्यक्रम मला सांगितला. मी तिच्या ऑफिसवरच सामान ठेवले. मी व अॅनी तिच्या गाडीतून जवळच असलेल्या संस्था बघायला निघालो. पहिली संस्था रस्किनमिल कॉलेज. १०० एकरामध्ये पसरलेली ही संस्था आहे. इथे निवासी व दिवसभराकरता येणारे सगळे मिळून ९५ विशेष मित्रमैत्रिणी होते. १६ ते १९ वर्ष या वयोगटांतील मुले इथे राहात होती. यांना पुढील कायम स्वरूपी पुनर्वसनासाठी तयार केले जात होते. हे वय फार महत्त्वाचे असते. येथे या मुलांना जास्तीत जास्त स्वावलंबी बनवायचा प्रयत्न केला जातो. त्यांनी स्वतःचे मत मांडायला शिकावे व काही धोक्यांपासून स्वतःची काळजी कशी घ्यावी, हे पण शिकवले जाते. या संस्थेला कॉलेज याच करता म्हटलंय, कारण इथे येऊन मुले अनेक नवीन गोष्टी शिकतात. त्याचा फायदा त्यांना भविष्यामधील पुनर्वसनासाठी होतो. त्यांची ही संकल्पना ऐकून मला खूप छान वाटले. कारण नवक्षितिजमध्ये आलेल्या पालकांना मी हेच सांगत असते की, नवक्षितिजमध्ये मुला-मुलींनी प्रवेश घेणे म्हणजे कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासारखे आहे. नवक्षितिजमध्ये आल्यावर ते अनेक नवीन गोष्टी शिकणार आहेत. आपण सर्वजणच ज्याच्यामागे धावत असतो, तो आयुष्याचा आनंद ते घ्यायला शिकतील. त्यामुळे या पुनर्वसनाकडे सकारात्मकतेने बघा म्हणजे तुम्हाला हा निर्णय योग्य वेळी घेतला, याचे मोठे समाधान मिळेल.
रस्किनमिल कॉलेजमध्ये ठिकठिकाणी पाण्याचे छोटे छोटे धबधबे बनवले होते. वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजासोबत मुले वेगवेगळ्या कार्यशाळेत जात होती. पॉटरी, क्राफ्ट, फ्रेममेकिंग अशा प्रकारच्या कार्यशाळा होत्या व एक व्यक्ती पाच ते सहा मुलांकडून काम करून घेत होती. या कार्यशाळा घेणाऱ्या व्यक्ती फारशा शिकलेल्या वाटत नव्हत्या. पॉटरी मेकिंगसारखे छोटे-मोठे कोर्सेस घेऊन वा त्या विषयातील अनुभवामुळे विशेष मुलांची कार्यशाळा हाताळताना दिसत होत्या. अर्थात, हे काम विशेष शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सुरु होते. आपल्याकडेही याप्रकारेच काम चालते. येथे मुलांच्या मदतीने चालवलेले कँटीन होते. त्याच कँटीनमध्ये विशेष मुलीने आणून दिलेले सँडवीच खाऊन आम्ही दुपारचे जेवण घेतले. तिला धन्यवाद देऊन आम्ही दुसरी संस्था बघायला निघालो.
‘पॅरेडाईज’ नावाची संस्था गावाबाहेर होती. ही १८ वर्षांपुढील मुलांची निवासी संस्था होती. येथे निवासी, २७ मुलांसाठी २३ एकर जागा होती. या एवढ्या मोठ्या जागा सामाजिक संस्थांना धनिकांनी दान केलेल्या होत्या. मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले. आम्ही नवक्षितिजसाठी दोनच एकर जागा मागतोय, तरी आपल्या देशात आम्हाला कोणी ती देत नाही. हा विरोधाभास प्रकर्षाने जाणवला. आम्हाला या संस्थेत पोहोचायला उशीर झाला होता. त्यामुळे कार्यशाळा बंद झाली होती. मुले निवासस्थानाकडे गेली होती. ऑफिसमधील समन्वयकाशी अॅनी बोलल्यावर आम्हाला निवासस्थानाकडे जायला परवानगी मिळाली. तिकडे जाण्याआधी मी अॅनीला म्हटलं, ‘यांचे कार्यशाळेचे टाईमटेबल बघायला मिळेल का?’ येथे असलेल्या तरुणीने जराही काचकूच न करता मला टाईमटेबल तर बघायला दिलेच, पण ते ठेवून घेतले तरी चालेल असे सांगितले. मी आनंदाने ते पर्समध्ये टाकले. तिला धन्यवाद देऊन आम्ही मुलांच्या निवासस्थानाकडे गेलो. आम्ही जे निवासस्थान बघितले ते जमिनीपासून एक मजला खाली होते. इथे जेवण बनवायला स्वतंत्र स्वयंपाकीण होती. येथील वेगळेपण असे वाटले की, काळजीवाहकांच्या कामाच्या वेळा शिफ्टमध्ये होत्या. मला येथील निवासस्थान फार अंधारे व कोंदट वाटले.
येथून आम्ही गावामध्ये स्वतंत्र बंगल्यामध्ये राहाणाऱ्या विशेष मित्रमैत्रीणींना भेटायला गेलो. तेथे सहाजण राहात होते व शिफ्टमध्ये हाऊसमदर व हाऊसफादर या घराची जबाबदारी घेत होते. इथे राहाणारी मुले जवळच्या भाजी किंवा किराणामाल अशा दुकानांमध्ये कामासाठी जात होती. हा एक प्रयोग म्हणून त्यांनी नुकताच सुरु केला होता. त्यामुळे तो यशस्वीपणे राबवू शकणार की नाही, याबद्दल अजूनही ते साशंक होते. मला स्वतःला हा प्रयोग चांगला वाटला पण यासाठी सर्व बाजूने म्हणजे संस्थाचालक, मुलांचे पालक, आजूबाजूला राहाणारा समाज, मुले कामावर जातील तेथील मालक कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय, संवेदनशीलता व प्रगल्भता पाहिजे, तरच असे प्रयोग यशस्वी होतील. मला वाटते की, भारतामधील सध्याची परिस्थिती अजून अशा प्रयोगांसाठी तयार नाही. इथे थोडावेळ थांबून आम्ही क्रॉसफील्डच्या ऑफिसकडे आलो. आम्हाला बराच उशीर झाल्यामुळे ऑफिसमध्ये कोणीच नव्हते.
मी ऑफिसमध्ये ठेवलेली सॅक घेतली व अॅना मला ‘बी अँड बी’ (ब्रेड अँड ब्रेकफास्ट) मध्य सोडायला आली. ही जागा पण संस्थेपासून फार लांब नव्हती. संध्याकाळ झाल्यामुळे रस्ते निर्मनुष्य होते. एका छोट्याशा बंगल्यापाशी आम्ही थांबलो. अॅनीने आत येऊन माझी बी अँड बीच्या मालक व मालकिणीशी ओळख करून दिली. मला उद्या सकाळी ऑफिसमध्ये भेटू असे सांगून ती गेली. मला बघून मालकाला फार बरे वाटले, कारण तो पारशी होता व अनेक वर्षे भारतामध्ये राहिलेला होता. त्यांची बायको ब्रिटिश होती. दोघेही बरेच वयस्कर दिसत होते व साधारण परिस्थितीला आर्थिक हातभार लावण्यासाठी बी अँड बी छोट्या प्रमाणात चालवत होते. येतानाच रात्रीच्या जेवणासाठी म्हणून बरोबर आणलेले सँडवीच खाल्ले व दुसऱ्या दिवशी भेट द्यायला जायचं आहे ती संस्था कशी असेल, असा विचार करत झोपेच्या आधीन झाले.
सकाळी आजोबांनी माझ्यासाठी पॉरिज म्हणजे मीठ घातलेला दलिया व ब्रेड जॅमचा नाष्टा बनवला. भारताबद्दल गप्पा मारत मी नाष्टा संपवला व चालत चालत क्रॉसफील्डच्या ऑफिसकडे निघाले. मस्त थंडी होती. चालायला फार छान वाटत होते. मी जरा लवकरच निघाले होते. रस्त्यात अनेक लोकांना पत्ता विचारत रमतगमत मी ऑफिसला पोहोचले. मला असे नवीन ठिकाणी चालायला फार आवडते. आज इसाबेलाने तिचा नवरा व तिची असिस्टंट रिनी यांच्याशी माझी ओळख करून दिली. रिनी खूपच सुंदर होती. तिने करून दिलेला ग्रीन टी पीत असतानाच अॅनी आली.
आज माझ्यासाठी टॅक्सी बोलावलेली होती, कारण आज ज्या संस्थेला मी भेट देणार होते ती संस्था ग्लॉसगो या शहरापासून लांब म्हणजे साधारण वीस किलोमीटरवर होती. मी तिथे पोहोचले तर या संस्थेची डायरेक्टर माझी वाटच बघत होती. तिच्या ऑफिसमध्ये आम्ही थोडावेळ बोललो. तिने ऑफिसमधील सर्वांशी माझी ओळख करून दिली व मला माझ्यासाठी ठरवलेला प्रोग्रॅम सांगितला. सर्वप्रथम सर्व सहकाऱ्यांसमोर नवक्षितिजबद्दल माहिती सांगायची होती. डायरेक्टरने तिची सहाय्यक असलेल्या तरुणीला सर्व संस्था दाखवायला व सहकाऱ्यांशी ओळख करून द्यायला माझ्याबरोबर पाठविले.
जवळजवळ पंधरा ते वीस लोक एका हॉलमध्ये माझी वाट बघत थांबलेलेच होते. मी त्यांना नवक्षितिजमधील दिनक्रम, ट्रेकिंग, पथनाट्य, ट्रॅफिक अवेअरनेस कार्यक्रम, पर्वती चढणे स्पर्धा यांच्याबद्दल माहिती सांगितली. मख्ख चेहऱ्याने सगळ्यांनी ते ऐकून घेतले. कोणाला काहीही प्रश्न नव्हते वा कोणाला काहीही अधिक समजून घेण्याची उत्सुकता नव्हती. एकतर डायरेक्टर बाईने त्यांच्यावर हे लादले असेल वा ही भारतातून आलेली संस्थाचालक आम्हाला काय नवीन सांगणार आहे, असे वाटले असेल किंवा मी फारच रटाळ पद्धतीने त्यांना नवक्षितिजची माहिती सांगितली असेल. असो... हाही एक अनुभव. यानंतर लगेचच आम्ही चहापानासाठी एका हॉलमध्ये गेलो. तेथे मघाशी माझ्या भाषणाला असणारे सर्वजण होते व संस्थेमधील विशेष मुले पण होती. सगळे मजेत चहा-बिस्किटे खात होते. मघाशी काहीही प्रश्न न विचारणारी मंडळी आता उत्सुकतेने अनेक प्रश्न विचारत होती. मी विचारलेल्या प्रश्नांचीही व्यवस्थित उत्तरे त्यांनी मला दिली. त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे चहापानाची वेळ प्रश्नोत्तरांची असावी.
नंतर त्या तरुणीने मला संस्थेमधील इतर विभाग दाखवायला नेले. मला सर्वप्रथम पॉटरी विभागात नेले. तिथे चार-पाच मुले एका शिक्षिकेबरोबर वेगवेगळे मातीचे आकार करण्यात मग्न होती. मी गेल्यावर ते सर्वजण मला त्यांनी केलेल्या वस्तू दाखवायला लागले. मला नवक्षितिजच्या मुलांची आठवण झाली. त्यांनी बनविलेल्या वस्तू संस्थेला भेट द्यायला आलेल्या लोकांना दाखवायची त्यांच्यात चढाओढ चालू असते. खरंतर आपले प्रत्येकाचे तसेच असते. आपण केलेल्या कामाचे वा सादरीकरणाचे कौतुक व्हावे, असे आपल्या प्रत्येकाला वाटत असते. यानंतर मी कॉम्प्युटर विभागात गेले. तेथे दोन-तीन मुले कॉम्प्युटर शिकत होती. त्यांना शिकवणारी शिक्षिका मला सांगू लागली की, ते कशा पद्धतीने या मुलांना शिकवतात. ती सांगत होती, वर्षभराच्या कार्यक्रमांचे फोटोंचे फोल्डर मुलांकडूनच बनवून घेतात व प्रत्येक मुलगा स्वतःच्या फोटोचा फोल्डर बनवतो. हे करताना मुलांना मजा येते. वर्षाच्या शेवटी हे फोटो पालकांना देतात. मला प्रत्येक विभागात भेट देताना ओळखीचे चेहरे दिसत होते. आता ते खूप व्यवस्थित, सविस्तरपणे त्यांचे काम कसे चालते हे मला सांगत होते. मी स्पीच थेरपी युनिटला बराच वेळ थांबले. ही टिपिकल स्पीच थेरपी नव्हती. तर ही टीचर मुलांना चित्र दाखवून वा काल दिवसभरात काय केले? असे प्रश्न विचारून बोलते करायचा प्रयत्न करत होती. क्लास संपल्यावर मी तिला उत्सुकतेने काही माहिती विचारत होते. तिने त्याची उत्तरे दिलीच, पण लगेच ती वापरत असलेल्या पद्धतीचे काही डॉक्युमेंट तत्परतेने मला दिले. अजून एक छान गोष्ट मला बघायला मिळाली. त्यांनी पक्षी निरीक्षण करण्यासाठी एक खोली तयार केली होती. ज्याची एक भिंत काचेची होती. मुले येथे येऊन पक्षीनिरीक्षण करतात. कुठले पक्षी बघितले याची नोंद ठेवतात. यामुळे मुले निसर्गाशी जोडली जातात. मुलांची निरीक्षण क्षमता व एकाग्रता वाढायला याने फायदा होतो, असे त्यांच्या लक्षात येत होते. यानंतर कॅनिंग सेंटर बघितले. दुपारचे जेवण मुलांच्याच एका घरात जाऊन घेतले. जेवताना मी कुठून आले आहे हे मुलांना सांगायचा प्रयत्न काळजीवाहक करत होती. जेवण मजेत झाले. जेवणामध्ये उकडलेल्या भाज्या, ब्रेड, जॅम, चीज व सॅलॅड होते. जेवणानंतर मी ऑफिसमध्ये जाऊन डायरेक्टरला भेटले. बरोबर आणलेली भेट वस्तू दिली, मनापासून तिला धन्यवाद दिले व टॅक्सीमध्ये बसून परत क्रॉसफील्डच्या ऑफिसकडे निघाले. मी या संस्थेमध्ये बराच वेळ होते. येथील डायरेक्टरने माझी ही भेट छान प्लॅन केली होती. मला सर्वच संस्थांना भेट देऊन एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, ती म्हणजे फारसा आडपडदा न ठेवता त्यांच्या संस्थेमधील कार्यक्रम ते मला सांगत होते. त्या सगळ्यांना खूप आश्चर्य वाटत होते की, भारतातील संस्थाचालक इतक्या लांब फक्त संस्था बघण्यासाठी आली आहे.
दुसऱ्या दिवशी मी ग्लॉसगोपासून लांब चाळीस किलोमीटर असलेल्या कँपहिल व्हिलेज संचलित, ग्रँज व्हिलेजमध्ये दोन दिवस राहाण्यासाठी जाणार होते. तेथून जवळच असलेल्या एका हॉस्पिटलपर्यंत मला रिनी घेऊन जाणार होती. तेथे मला ग्रँज व्हिलेजची एक हाऊसमदर भेटणार होती व तीच मला पुढे ग्रँज व्हिलेजमध्ये घेऊन जाणार, असे ठरले. अॅनी मला बी अँड बी मध्ये पोहोचवायला आली. दोन दिवसांत आमची चांगली मैत्री झाली. दुसऱ्या दिवशी इतक्या सकाळी ती क्रॉसफील्डच्या ऑफिसमध्ये मला भेटणार नव्हती. ही आमची शेवटचीच भेट होती. म्हणून मी कारमधून उतरतानाच, भारतातून आणलेला स्कार्फ तिला भेट म्हणून दिला. तिला मनापासून धन्यवाद देऊन मी तिचा निरोप घेतला.
सकाळी दोन दिवसांपुरतेच थोडे सामान घेऊन मी चालत चालत क्रॉसफील्डच्या ऑफिसमध्ये आले. तेथून रिनी आणि मी लगेचच चालतच निघालो, कारण ते हॉस्पिटल चालत पंधरा मिनिटांच्या अंतरावरच होते. चालता चालता तिच्याशी गप्पा मारताना कळले की, तिला पियानोवादक म्हणून करिअर करायचे आहे. पियानो शिकायच्या क्लाससाठी पैसे हवेत म्हणून ती ही नोकरी करत होती. आम्ही तेथे पोहोचल्यावर मला प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची मध्यमवयीन ज्युली भेटली. ज्युली मला ग्रँज व्हिलेजला घेऊन जाणार होती. माझी व ज्युलीची भेट झाल्यावर रिनी माझा निरोप घेऊन गेली. ज्युलीबरोबर कारमध्ये बसून प्रवास व सुरु झाल्या. ती मला रस्त्यात दिसणाऱ्या इमारती, नद्या व ग्रँज व्हिलेज याबद्दल माहिती देत होती. ही संस्था कँपहिल व्हिलेज (Camphill village) संचलित होती. या संस्थेच्या वीसहून जास्त देशांमध्ये शाखा आहेत. नॉर्थ युरोप, अमेरिका व साऊथ अफ्रिका या देशांमध्ये या संस्थेच्या जास्त संख्येने शाखा आहेत. कँपहिल व्हिलेज संस्थेची स्थापना डॉ.कार्ल कोनिंग (Dr. Karl Konig) या ऑस्ट्रियन सद्गृहस्थाने १९३९ या साली स्कॉटलंड या देशात केली. विशेष व्यक्तींसाठी अतिशय संवेदनशीलतेने चालविलेल्या या संस्था आहेत. पंधरा मिनिटेच प्रवास झाला असेल, मला शेखरचा फोन आला की अण्णा म्हणजे माझे वडील त्याच दिवशी सकाळी वारले. मी क्षणभर सुन्न झाले, कारण मी येताना त्यांना भेटून आले होते. वय बरेच होते. पण इतक्यात जातील असे वाटले नव्हते. तरीही मी या संस्थांना भेट द्यायचे ठरविले. मला निर्णय घ्यायचा होता, परत फिरायचे का पुढे जायचे. मी भारतात पोचेपर्यंत अंत्यसंस्कार थांबवणे बरोबर नव्हते. म्हणजे मी लगेच गेले तरी अण्णांचे अंत्यदर्शन मला होणार नव्हते. मग लगेच जायचे का दहाव्याला जायचे हा निर्णय मला फोन सुरू असतानाच घ्यायचा होता. मी पुढे जायचे ठरवले व जर्मनीला जायचा बेत रद्द केला, कारण तेथे जाऊन अपॉइंटमेंट घ्यायच्या होत्या. नक्की कार्यक्रम ठरलेला नव्हता. ग्रँज व्हिलेजची भेट झाल्यावर शनिवार, रविवार मिळेल त्या विमानाने भारतात जायचे असे ठरवले. यामुळे मला दहाव्याला उपस्थित राहाता येणार होते. फोन संपल्यावर ज्युलीला याबद्दल काहीच सांगायचे नाही असा निर्णय मी घेतला, कारण एकतर ती मला नुकतीच भेटली होती. मी संस्थेचे काम समजून घ्यायला चालले होते. मला असे वाटले, हिला जर मी, माझे वडील गेले आहेत, याकरता मला फोन आला होता हे सांगितले, तर ती व ग्रँज व्हिलेजमधील सगळेजण माझ्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतील. माझी जास्तच काळजी घेतील व मला कोणीच नीट काही सांगणार नाही. मी ज्या उद्देशाकरता एवढे पैसे व वेळ खर्चून आले होते, तो उद्देश सफल झाला नसता. मला ते होऊ द्यायचे नव्हते. फोन बंद झाल्यावर मी प्रयत्नपूर्वक भावनांवर नियंत्रण ठेवून गप्पा पुढे सुरू ठेवल्या. साधारण तासाभराने आम्ही ग्रँज व्हिलेजमध्ये पोहोचलो. शहरापासून थोडीशी दूर ही संस्था होती.
माझी राहायची व्यवस्था ज्या घरात ठरवली होती, त्या घरापाशी ज्युलीने परत भेटूयात असे आश्वासन देऊन, कारमधून उतरवले. घराबाहेर भरपूर बर्फ पडलेला होता. हे एक स्वतंत्र घर होते. तळमजल्यावर मुलांच्या राहायच्या खोल्या, हॉल, डायनिंग हॉल, किचन, टॉयलेट्स, वॉशिंग मशीन व कपडे वाळत टाकायला एक खोली होती. या घराची हाऊसमदर व फादर एक हंगेरियन जोडपे होते. या घराची हाऊसमदर व या संस्थेची डायरेक्टर जेनी एक महिन्याकरता बाहेर गावी गेली होती, म्हणून बदली ड्युटी हे जोडपे करत होते. माझा ईमेलद्वारे जेनीशी संपर्क झाला होता. त्यामुळे ती इथे नसणार हे मला माहीत होते. आम्ही दोघी एकमेकींना भेटायला उत्सुक होतो. पण तो योग जमून आला नाही. दोन दिवसांसाठी जेनीच्या खोलीमध्ये माझी व्यवस्था केली होती. ही रुम दुसऱ्या मजल्यावर होती. या घरामध्ये तळमजला व पहिला मजला धरून सात विशेष मित्रमैत्रिणी राहात होते. मी तेथे पोहोचले तेव्हा सर्वजण कार्यशाळेसाठी गेलेले होते. मी खोलीमध्ये सामान ठेवून खाली आले. हाऊसमदर मॅगी हॉलमध्येच एका विशेष मैत्रिणीबरोबर बसलेली होती. मॅगीला मी ग्रँज व्हिलेजच्या कामाबद्दल विचारत होते. ती पण नवक्षितिजच्या कामाविषयी व विशेषतः भारतामध्ये सामाजिक संस्थांना सरकार किती मदत करते, याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होती. आमच्या गप्पा सुरूच होत्या, इतक्यात लॉरा आली. लॉरा बॉर्डरलाईनची विशेष विशेष मुलगी होती. मॅगीने लॉराशी माझी ओळख करून दिली. मला संस्था दाखवायची जबाबदारी लॉराकडे दिली होती. मी तिच्याबरोबर संस्था बघायला निघाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर बर्फ पडलेला होता. त्यामुळे हवेमध्ये खूप गारवा होता. लॉराचे नाक सतत गळत होते व ते स्वच्छ करायची तत्परता ती दाखवत नव्हती. पहिल्यांदा आम्ही पॉटरी युनिटला गेलो. येथे सर्व संस्थांमध्ये पॉटरी युनिट बघायला मिळाले. या विभागाचे मुख्य एक मध्यमवयीन गृहस्थ होते. इथे चार पाच मुले त्यांच्याबरोबर मातीचे फ्लॉवरपॉट व वेगवेगळ्या आकाराची भांडी बनवत होती. यानंतर आम्ही सुतारकाम विभागात गेलो. तेथे बरीच यंत्रसामग्री होती. या विभागाचे प्रमुख त्याच्यावर काम करत होते. बरीचशी मुले एका टेबलाभोवती बसली होती व काही मुले तयार झालेल्या फ्रेम्स, प्राणी अशा लाकडी वस्तूंना रफ पेपरने घासून चांगली चमक आणत होते. बाकी मुले नुसती बसून होती. हेही भारतासारख्या देशात कार्यशाळेत दिसते, तसेच दृश्य होते. कारण सर्व विशेष मुले काम करतातच असे नाही. यासाठी आळस, बुद्ध्यांकच कमी असणे, तसेच मानसिक अस्थैर्य यासारखे काहीही कारण असू शकते. तेथे एक डाऊन सिंड्रोमचा मुलगा होता. तो धीट व बोलका होता. तो मला त्या विभागातील सर्व गोष्टी फिरून दाखवत होता. नंतर त्याने अर्धवट बनविलेल्या वस्तू खूप प्रेमाने मला दिल्या. मी पण त्या वस्तू अनेक वर्ष सांभाळून ठेवल्या होत्या.
आता दुपार झाली होती व सगळ्यांची जेवणाची वेळ झाली होती. मी पण माझ्या घरात जेवायला आले. जेवायला ब्रेड, जॅम, सॉस, राईसफ्लेक्स असेच काहीसे होते व या बरोबर कॉफी होती. मी घरामध्ये आल्यावर बघितले, मुले आपले ठरलेले काम शिस्तीत करत होती. एकाने डिश मांडल्या, दुसऱ्याने खाण्याचे पदार्थ आणून ठेवले. प्रार्थना म्हणून आम्ही जेवायला सुरुवात केली. जेवताना टेबलाच्या दोन टोकाला दोघे, असे हंगेरियन जोडपे बसले होते. त्यांनी मला सांगितले, आम्ही पती-पत्नी असलो तरी मुलांसमोर कसे वागायचे याची नियमावली आहे. आम्हाला त्या नियमानुसार वागावे लागते. जेवण झाल्यावर ठरल्याप्रमाणे एका मुलाने भांडी आत नेऊन ठेवली. दुसऱ्याने टेबल आवरले, तर तिसऱ्याने भांडी घासून जागेवर ठेवली. या मुलांचे काम शिस्तीत चाललेले बघून मला असे वाटले की, हे आपण पण नवक्षितिजमध्ये करू शकतो. आमचे जेवण होऊन बसलो होतो. एवढ्यात सकाळी मला संस्था दाखवायला आलेली लॉरा परत आली. राहिलेली संस्था दाखवायला मला घेऊन गेली. ती आता मला मेंढ्या व गायी ठेवल्या होत्या त्या गोठ्यात घेऊन गेली. तिथे एक विशेष मित्र त्यांना चारा घालत होता. लॉराने खूप प्रेमाने मला सांगितले, हा तिचा मित्र आहे व ती त्याच्याबरोबर राहाते. मला हे नवीनच होते. मी ‘अरे वा! गुड’ असे म्हणून वेळ मारून नेली व आम्ही पुढे निघालो. या विभागात खूप डुकरे दिसत होती. हे डुक्कर पैदास करायचे केंद्र होते. या संस्थेसाठी लागणारी डुकरे ठेवून जास्तीची डुकरे हे विकत होते. हे बघून झाल्यावर आम्ही शेती प्रकल्पाकडे गेलो.
सध्या थंडी जास्त असल्यामुळे शेतात फारसे काही नव्हते. पण अनेक प्रकारच्या भाज्या, मका अशा प्रकारची पिके या शेती प्रकल्पात ते घेत होते. या सर्व विभागात काम करणारे कर्मचारी जवळच्या गावातून दिवसभरासाठी येथे येत होते. येथे मी बराच वेळ होते. कारण हा माझ्या आवडीचा विषय होता व येथील कर्मचारी मला शेतीमध्ये फिरुन सर्व दाखवत होता. येथे काही विशेष मित्रमैत्रिणी तयार झालेला माल नीट ठेवायला मदत करत होते. यानंतर आम्ही घरी आलो. लॉराला ती व तिचा मित्र राहात असलेले घर मला दाखवायचे होते. मी गेले तर चालेल का? असे हाऊसमदर मॅगीला विचारून मी लॉराचे घर बघायला गेले. घरामध्ये सगळीकडे अस्ताव्यस्त सामान व कपडे पडलेले होते. हे दोघेजण घरामध्ये चहा-कॉफी करत असत व जेवायला दुसऱ्या घरात जात होते. महिन्यातून एकदा डायरेक्टर यांच्या घराला भेट द्यायची. कारण ही मुले प्रौढ आहेत, त्यांची प्रायव्हसी जपायला पाहिजे म्हणून महिन्यातून एकदाच भेट ठरवलेली होती. इकडचे कायदे याबाबतीत कडक आहेत. मुलांची नखे कापणे, आंघोळ घालणे ही कामे याकरता नेमून दिलेले कर्मचारी करत होते. या कर्मचाऱ्यांशिवाय इतर कोणाला हे काम करायची परवानगी नसते. काही कारणाने हा कर्मचारी आला नाही व अशावेळी विशेष मित्र-मैत्रीण नख कापून दे वा आंघोळीला मदत कर, असा हट्ट धरून बसली तरीही इतर कर्मचाऱ्यांना हे करता येत नाही. या कडक कायद्याद्दल तेथे काम करणारे थोडीशी नाराजी व्यक्त करत होते. आपल्याकडे याबाबत काहीच कायदे झालेले नाहीत.
येथील घरांमधील मुले शिस्तीत काम करताना दिसत होती. प्रत्येकजण आपल्याला नेमून दिलेले काम व्यवस्थित करत होता. साधारणपणे एका घरात सहा-सात मुले होती. यांच्या बरोबर काळजीवाहक स्त्री हाऊसमदर वा पतीपत्नी. हाऊसमदर व फादर असेल तर ते त्यांच्या कुटुंबासह राहात होते. घरातील सगळी कामे, घरासाठी लागणाऱ्या वस्तू व खाद्यपदार्थ यांची खरेदी हेच करताना दिसत होते. या सर्वांचा नाष्टा व जेवण एकत्रच असायचे. यांची स्वतःची मुले जवळच्या शाळेत जात होती. कार्यशाळेमध्ये घरातील कर्मचाऱ्यांचा सहभाग नव्हता. मला येथील वातावरण छान वाटले. पण आता यांना मुलांबरोबर घरात राहाण्यासाठी कर्मचारी मिळताना अडचणी यायला लागल्या आहेत, असे मला एका हाऊसमदरने सांगितले.
संध्याकाळी जेवण झाल्यानंतर संस्थेमध्येच स्वयंसेवकांसाठी तासाभराची कार्यशाळा होती. मी पण त्यामध्ये सहभाग घेतला. जवळच्या अनेक संस्थांमधील स्वयंसेवक यासाठी आले होते. विशेषतः स्वयंसेवक कसा असावा व त्यांची वागायची पद्धत विशेष व्यक्तींबरोबर कशी असावी, हा या कार्यशाळेचा विषय होता. इतर देशातल्या तरुण स्वयंसेवकांबरोबर कार्यशाळा करायचा अनुभव वेगळाच होता. कार्यशाळेच्या सुरुवातीला स्वयंसेवक बुजलेले होते. कार्यशाळा संपता संपता एक एक जण मोकळेपणाने सहभाग घेऊ लागले, आपली मते मांडू लागले. आपल्या देशामध्येही कुठल्याही कार्यशाळेत अशीच परिस्थिती असते. मी परत येईपर्यंत सामसूम झालेली होती. मी माझ्या दुसऱ्या मजल्यावरच्या निवासस्थानावर झोपायला गेले. आता मात्र एकांतामध्ये अण्णा गेले आहेत ही भावना तीव्रतेने जाणवली, मनसोक्त रडून घेतले. अण्णांचे व माझे नाते मुलगी व वडील यापलीकडे मैत्रीचे होते. मी त्यांची चेष्टा करायची व काही चुकले तर सांगायची. माझे आई-वडील दोघांनीही आम्हा मुलांवर अतोनात प्रेम केले. त्यांना आमच्याबद्दल आदर, प्रेम आहे, हे ते त्यांच्या कृतीतून सहजतेने जाणवू देत होते. यशाप्रमाणेच अपयशात पण ते आमच्याबरोबर असायचे. अनेक महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेमध्ये आमचा सहभाग असायचा. मी असेच मित्रत्वाचे व आदर, प्रेमाचे नाते नुपूर व अदिती बरोबर ठेवायला पहिल्यापासून प्रयत्न केला. नुपूरला अगदी लहान असल्यापासून महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले. अगदी अदितीलाही निर्णय घेता यावा, काय हवे नको ते सांगता यावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. याचा फायदा असा झाला की आयुष्यात काय हवे, काय नको, याबद्दल दोघींच्या विचारांमध्ये खूप सुस्पष्टता आली. अर्थात दोघींची बौद्धिक पातळी वेगळी असली, तरी त्यांच्या बौद्धिक व भावनिक परिघामध्ये त्या योग्य निर्णय घेऊ शकतात.
अण्णा खूप गरीब परिस्थितीतून जिद्दीने शिकून डॉक्टर झाले. ते पैसे कमवण्यासाठी लग्नाच्या वरातीसमोर बँड वाजवतात अशा बँडमध्ये होते. त्यांचे सर्व शिक्षण पुण्यात झाले, पण आधी सरकारी नोकरीसाठी चाकण जवळचे पिंपळगाव व नंतर प्रायव्हेट प्रॅक्टिससाठी खेड-राजगुरुजवळ ‘वाडा’ या खेडेगावामध्ये नंतरचे आयुष्य गेले. त्यामुळे माझेही कॉलेज जीवनाआधीचे आयुष्य या खेडेगावामध्येच गेले. असे अनेक विचार डोक्यात चालू असतानाच झोप लागून गेली, ती सकाळी घंटीच्या आवाजानेच जाग आली. सकाळचे सात वाजले होते.
तोंड धुवून खाली आले तर प्रार्थना चालू होती. प्रार्थना संपल्यावर सर्व मुले हाऊसमदर व फादर बरोबर आपापल्या कामाला लागले. घरातून बाहेर बघितले तर जमीन, झाडे, बागेमध्ये ठेवलेले बेंचेस सर्व बर्फाने अच्छादलेले होते. म्हणजे रात्रभर भरपूर बर्फवृष्टी झालेली दिसत होती. इथे घरामध्ये हीटर असल्यामुळे बाहेरील थंडी घरात जाणवतच नाही. थोडयाच वेळात नाष्टा, चहा, कॉफी बरोबर मांडली गेली .या लोकांचे बरे असते.नाष्ट्यासाठी ताजा पदार्थ बनवायचा नसतो. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेले चीज, क्रीम, ज्युसचे पॅकेट काढले व कपाटातून ब्रेड, सिरियल्स, जॅम टेबलावर काढून ठेवले की नाष्टा तयार. ताजा पदार्थ फक्त गरम चहा व कॉफी. थोड्या शांततेतच नाष्टा पार पडला. एक मुलगी खूप जास्त जॅम लावून ब्रेड खत होती व तिचे वजनपण खूप जास्त होते. पण हाऊसमदर काही बोलू शकत नव्हती कारण एकतर ती बदली हाऊसमदर होती व ही सर्व मुले विशेष असली तरी प्रौढ होती. नाष्टा झाल्यावर सर्व मुले कार्यशाळेत गेली. फक्त एक महिला गेली नव्हती. मी व मॅगी गप्पा मारत बसलो होतो, कारण मला राहिलेली संस्था दाखवणारी लॉरा अजून आली नव्हती. मॅगीला मी विचारले की, ही महिला कार्यशाळेत का नाही गेली तर तिने मला सांगितले की ही ६५ वर्षाची आहे. त्यामुळे ती आता रिटायर झाली आहे. ती आता आराम करते. कार्यशाळेत कामासाठी जात नाही. मला खूप आश्चर्य व त्याचबरोबर छान वाटले. विशेष व्यक्तींचे आयुष्य चांगले जावे, त्यांच्या आयुष्याचा स्तर चांगला असावा यासाठी या देशामधील सरकार व इतर लोकसुद्धा खूप जागरुक आहेत. आपल्या देशात याबाबतीत बरेच काम करणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्र, निवारा याशिवाय या विशेष व्यक्तींच्या इतर अनेक गरजा असतात. या गरजा भागवून त्यांना चांगले आयुष्य देण्याचा प्रयत्न करताना होणारे संस्थांचे खर्च हितचिंतकांनी वायफळ वा अनावश्यक समजू नयेत.
आमच्या गप्पा चालू असताना ही ६५ वर्षांची विशेष महिला म्हणत होती की, वॅक्सिंग व थ्रेडींगला जायचे आहे, अपॉईंटमेंट घ्यायला पाहिजे. मला हे ऐकताना असे वाटले, अरे खरच सुंदर दिसणे ही काय फक्त बुद्धी चांगली असलेल्या लोकांचीच मक्तेदारी आहे का? प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसावेसे वाटते व सुंदर दिसावेसे वाटणे हे प्रसन्न मनाचेच लक्षण नाही का? आमचे बोलणे सुरु असताना लॉरा आलीच. आज ती मला वेताच्या बास्केट बनतात त्या विभागात घेऊन गेली. या विभागाकडे चालत जाताना भुरभुर बर्फ पडतच होता. हा विभाग बघणारी मध्यमवयीन महिला इलझे खूप प्रेमाने मला सर्व विभाग फिरवून दाखवत होती. मी येथे जवळजवळ तासभर होते. अनेक मुले त्यांनी केलेल्या वस्तू मला कौतुकाने दाखवत होती. इलझेने मला विचारले की, ती जवळच्या गावातील एका संस्थेमध्ये जाणार आहे, जर मला येथे जायचे असेल तर ती मला न्यायला व परत सोडायला तयार आहे. मी इतकी चांगली संधी सोडणार नव्हतेच. दुपारी तीन वाजता ती मला मी राहत असलेल्या घरापाशी भेटणार व तेथून आम्ही पुढे संस्था बघायला जायचे, असे ठरले. खुशीतच मी तेथून बाहेर पडले. लॉराने मला तेथून जवळच पण बंद असलेले ब्रेड व केक पेस्ट्री तयार करायचे युनिट दाखवले. हे युनिट बघणारा माणूस गावाला गेला होता. म्हणजे सगळ्या संस्थांमध्ये अशा अडचणी येतातच तर! तेथून आम्ही ग्रँज व्हिलेजच्या ऑफिसमध्ये गेलो. प्रशस्त मोठ्या जागेत व अगदी कॉर्पोरेट ऑफिसेस असतात, तसे हे ऑफिस होते. तेथे असलेल्या जनसंपर्क अधिकारी स्त्रीने मला या प्रकल्पाची माहिती दिली. नंतर मी डायरेक्टर यांना भेटायला गेले. त्यांनी मी कुठून आले, इथे राहायला कसे वाटले अशी चौकशी केली. त्याचबरोबर या प्रकल्पाला मिळणारे सरकारी अनुदान व हितचिंतकांची मदत याबद्दल व्यवस्थित सांगितले. ही भेट थोड्यावेळच पण चांगली झाली. काही वृद्ध लोक येथे छोटी मोठी कामे करताना दिसत होते. या संस्थेत बनणाऱ्या वस्तू येथे शोकेसमध्ये व्यवस्थित मांडलेल्या होत्या. संस्थेला भेट देणारे काही लोक त्या वस्तू विकत घेताना दिसत होते. जनसंपर्क अधिकारी स्त्रीने मला सांगितले की, नाताळच्या वेळी संस्थेमध्ये मोठे प्रदर्शन लावले जाते. वर्षभर बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी प्रदर्शनात मांडल्या जातात. त्या काळात जवळच्या गावातील अनेक लोक येऊन या वस्तू खरेदी करून या मुलांना प्रोत्साहन देतात.
येथील भेट होईपर्यंत एक वाजायला आला होता. लॉराने मला ज्युली, हाऊसमदर असलेल्या घरापाशी नेऊन सोडले. घरात शिरल्याबरोबर ताज्या शिजलेल्या अन्नाचा मस्त वास आला. ज्युलीने माझे सुहास्य वदनाने स्वागत करून, तिचा नवरा व त्या घरात राहाणाऱ्या विशेष मित्रमैत्रिणींची ओळख करून दिली. या घरातील वातावरण छान आनंदी वाटत होते. ज्युली व तिचा नवरा प्रेमाने या मुलांची काळजी घेताना दिसत होते. जेवण छानच झाले. भाताचा काहीतरी एक प्रकार, एक मिक्स भाजी, सूप, सॅलॅड, ब्रेड चीज व स्वादिष्ट पेस्ट्री असा मस्त बेत होता. हे सर्व करण्याकरता तिने घेतलेले कष्ट व तिचे प्रेम यामुळे जेवण अजूनच स्वादिष्ट लागले. सर्व मुलांशी बोलत बोलत जेवण छान झाले.
जेवण झाल्यावर तिच्याशी गप्पा मारताना ती सांगत होती की, मी ज्या जेनीच्या घरात रहात होते तेथे बदली काम करणारी मॅगी कशी आळशीपणाने ताजा स्वयंपाक करत नाही. त्यामुळे मुले कशी जेनी यायची वाट बघत आहेत. असो. सगळीकडे अशा प्रकारच्या गप्पा होतात व सर्व प्रकारची माणसे बघायला मिळतात, हे जाणवले. अशा वेगवेगळ्या देशातील लोकांशी मैत्री केल्यामुळे आपल्यामध्ये चातुर्य येते तसेच आपली माणूस आहे तसा स्वीकारायची क्षमतापण वाढते, हे नक्की. आपले गाव, आपला देश सोडून आपण बाहेर पडतो, तेव्हा आपल्या जाणिवेची क्षितिज विस्तारतात. म्हणून म्हणतात ना ‘केल्याने देशाटन पंडितमैत्री सभेत संचार शास्त्रग्रंथ विलोकून मनुजा चातुर्य येतसे फार’. थोडावेळ गप्पा मारून तिला भेट वस्तू व धन्यवाद देऊन मी जवळच असलेल्या माझ्या घरी आले. थोड्या वेळातच इलझे मला घ्यायला आली. साधारण वीस मिनिटे प्रवास करून आम्ही जवळच्या छोट्या शहरामध्ये पोहोचलो. रस्त्यावर तुरळक रहदारी दिसत होती. रस्त्यावरून चालणारी माणसे संख्येने अगदीच कमी होती. भर वस्तीत रस्त्याला लागूनच ही संस्था होती. येथे लोकरीचे स्वेटर व स्कार्फ बनत होते. दोघीजणी मिळून ही कार्यशाळा व ऑफिस सांभाळत होत्या. इथे एक विशेष घटना घडली. म्हणजे, मला येथे एक पाकिस्तानी महिला भेटली जी महिनाभर अनुभव घेण्यासाठी या संस्थेत येऊन राहिली होती. ती इंग्लंडमध्ये स्थायिक झालेली होती. आमच्यामध्ये फारशा गप्पा झाल्या नाहीत. कारण ती पण मुलांबरोबर निवासी संस्थेत जायला निघाली. इथे काम करणाऱ्या स्त्रियांना फार गंमत वाटली की, भारत व पाकिस्तान या देशांतील दोन महिला आमच्या कार्यशाळेत भेटल्या. आम्हीपण थोड्या वेळात निघालोच. हिवाळा असल्यामुळे चार-साडेचार पासूनच अंधारायला लागत असे. इलझेशी गप्पा मारता मारता ग्रँज व्हिलेज कधी आले कळलेच नाही.
घरामध्ये मॅगी व तिचा नवरा अॅडी होता. मी फ्रेश होऊन त्यांच्याशी गप्पा मारायला खाली आले. या घरामधील माझा हा शेवटचा दिवस होता. उद्या नाष्टा करून मी ग्लॉसगोला जायला निघणार होते. खाली आले तर या घरातील एक बॉर्डरलाईनचा विशेष मुलगा जवळच्या शहरामध्ये पबमध्ये जाण्यासाठी निघाला होता व टॅक्सी यायला वेळ होता तेवढ्यात मस्त सिगारेट ओढत होता. मला नवक्षितिजमधील मुलाची आठवण झाली. तो मुलगा वयाने जास्त म्हणजे ५५ वयाचा होता. याच्या बहिणींनी सांगितले होते की, रात्री जेवण झाल्यावर याला एक सिगारेट लागते व ती ओढायची कृपया त्याला परवानगी द्या. आम्ही त्याला परवानगी दिली होती. तो काही महिनेच आमच्याकडे होता. असो... तो मुलगा गेल्यावर मॅगीच्या नवऱ्याने सांगितले की, या मुलाला दिवसातून ठरावीक सिगारेटस् ओढायला व आठवड्यातून एकदा बाहेर जायला परवानगी आहे. ठरलेले टॅक्सीवाले येऊन जातात व परत आणून सोडतात. सुरुवातीला अशा मुलांबरोबर हाऊसफादर वा एखादा स्वयंसेवक जातो व पबचा मालक व कर्मचाऱ्यांना पूर्ण कल्पना देतो. हा व्यवस्थित जाऊन येऊ शकतो, हा अंदाज आल्यावर त्याला एकट्याला जाऊ दिले जाते. या घरात प्रत्येक मुला-मुलीला स्वतंत्र खोली होती. मॅगीचे निरीक्षण असे होते की, या घरातील एक मुलगा व एक मुलगी एकमेकांना आवडतात. ते सर्वांना सांगतात पण की, आम्ही मित्रमैत्रीण आहोत पण एकमेकाचा हात धरणे वा पाठीवरून प्रेमाने हात फिरवणे या पलीकडे यांची मजल जात नाही. याबाबतीत आपल्या देशापेक्षा इथे वेगळे वातावरण आहे. आपल्याकडे विशेष मित्रमैत्रिणींना एकमेकांचे हात धरायला वा विशेष स्त्री-पुरुषांना मैत्री करता येईल, असे मोकळे वातावरण नाही. याकरता अनेक स्तरावर जनजागृती करणे गरजेचे आहे. इंग्लंडचे सरकार विशेष मूल जन्माला आल्यापासून त्याचा सर्व खर्च उचलते. त्यामुळे आर्थिक ताण पालकांवर पडत नाही.
आज बरीच दमणूक झाली होती पण गादीवर पाठ टेकल्या टेकल्या परत अण्णा या जगात नाहीत याची तीव्रतेने जाणीव झाली. परत मनसोक्त रडून घेतले. पण एक बरे वाटत होते की, ते आजारी असताना मी वरचेवर त्यांना भेटायला जात होते. त्यांच्याबरोबर वेळ घालवत होते. त्यांचे आवडते चॉकलेट त्यांच्यासाठी नेत होते. वयाच्या पंच्याहत्तर वर्षानंतर त्यांनी प्रॅक्टिस करणे बंद केले व ते पुण्यात बांधलेल्या स्वतःच्या बंगल्यामध्ये राहायला आले. आई २०१२ साली गेल्यावर ते फार एकटे पडले होते. आई म्हणजे जगाशी जोडलेली त्यांची नाळ होती. तीच तुटल्यावर ते सैरभैर झाले होते. क्रिकेट व रेडिओ हे दोन त्यांचे आवडते छंद. आई गेल्यावर तर क्रिकेट मॅचेस टी.व्ही.वर बघणे हा त्यांचा पूर्णवेळचा उद्योग होता. माझ्याकडे राहायला आल्यावर त्यांच्याशी आईबद्दल तसेच गावाकडच्या गप्पा व्हायच्या. पण ते खरे खुलायचे क्रिकेटच्या गप्पा मारायला लागल्यावर. याबाबतीत त्यांचे व शेखरचे फार जमायचे. त्यांना संगीताची फार आवड होती. आम्ही लहान असताना ते गोष्टी सांगायचे. अण्णा गोष्ट फार रंगवून सांगायचे. तीच गोष्ट परत परत ऐकताना तेवढीच मजा वाटायची. आमचे लहानपणाचे दिवस फार रम्य होते. गावामध्ये डॉक्टरांची बायको डॉक्टरीणबाई म्हणून आईला खूप मान होता. ती घरातील कामवाली बाई असो वा गावाला भेट द्यायला आलेले मंत्री असो, सगळ्यांशी आदराने वागायची. ते बघून माझ्या मनावर कळत नकळत संस्कार झाले. पद, शिक्षण, जात, आर्थिक, सामाजिक प्रतिष्ठा न बघता सगळ्यांशी आदराने बोलायची सवय लावली. दुर्बल घटकांशी मला जास्त आदराने, प्रेमाने वागावेसे वाटते. पूर्वी म्हणजे मी पंचेचाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या खेड्याबद्दल सांगत आहे. आमच्या गावात तेली, मुस्लिम, महार, मांग, चांभार, सोनार ब्राम्हण, खाटीक, शिंपी या सगळ्यांच्या जातीनुसार स्वतंत्र गल्ल्या असायच्या. माझी सर्व जातीतील मुलींशी मैत्री होती. माझी सहावी-सातवीत असताना लक्ष्मी नावाची मैत्रीण होती. मी तिच्या झोपडीमध्ये जाऊन मातीच्या मटक्यात शिजवलेली हरभऱ्याची उसळ व भाकरी खाल्लेली आठवते. तिचे वडील ओट्यावर मेलेल्या म्हशीचे कातडे सोलत बसलेले असायचे. कधी कधी केरसुणी करताना दिसायचे. तसेच चांभार, महार या मैत्रिणींकडे मी नेहमी जात असे. मला आईने कधीही जाऊ नको. असे म्हटलेले आठवत नाही. माझ्या लक्ष्मी या मैत्रिणीचे अक्षर अगदी मोत्यासारखे होते. परिस्थितीमुळे तिने सातवीनंतर शिक्षण सोडले. माझ्या बरोबरच्या अनेक हुशार मुली केवळ संधी मिळाली नाही म्हणून पुढे शिकू शकल्या नाहीत. बहुतेकींची अकरावीनंतर लग्ने झाली. मला वाटते खेड्यामध्ये आता बऱ्याच प्रमाणात ही परिस्थिती बदललेली आहे.
सकाळी घंटेच्या आवाजाने जाग आली. सामान रात्रीच भरुन ठेवले होते. नाष्ट्याला येताना सामान घेऊनच खाली आले. नाष्टा झाल्यावर सर्व मुले कार्यशाळेत गेली. कार्यशाळेत जायच्या आधी त्यांनी माझा निरोप घेतला. निघताना मॅगी व अॅडीला भेटवस्तू दिल्या. भारतात यायचे निमंत्रण व मनापासून धन्यवाद देऊन मी कारमध्ये बसले. मी काल संध्याकाळी संस्था बघायला गेले होते, त्याच शहरात अॅडीने मला बसस्टॉपवर सोडले. मला येथून एका गावात जायचे होते. तेथून ग्लासगोला जाणारी बस घ्यायची होती. थोड्या वेळातच बस आली. मी बसमध्ये चढले व सीटवर जाऊन बसले. माझ्या लक्षात आले की मी काहीतरी गडबड केली आहे. मी इकडे तिकडे बघत होते. मला एका आजोबांनी सांगितले की, बसमध्ये चढतानाच ड्रायव्हरकडून तिकीट घेऊन मग बसमध्ये बसायचे. मग मी पुढे जाऊन ड्रायव्हरकडून तिकीट घेतले व जागेवर बसायला येत असताना ड्रायव्हरसकट सर्वजण हसत होते. मी पण त्यांच्या हसण्यात सहभागी झाले. बसमध्ये सर्वजण छोट्या गावातील लोक होते. त्यामुळे त्यांच्या हसण्यातसुद्धा कशी गंमत झाली, असा निरागस भाव होता. बस बरीच फिरुन जिथून ग्लॉसगोची बस घ्यायची होती, त्या गावात आली. बस प्रवासामध्ये बाहेर दिसणारी छोटी छोटी खेडी, जंगले, त्यामधील वेगळ्या प्रकारची झाडे, फुले व वाहणाऱ्या नद्या बघत प्रवास छान झाला. फार वेळ वाट बघावी लागली नाही. लवकरच ग्लॉसगोला जाणारी बस लागली. याचे तिकीट मात्र स्टेशनवरच काढायचे होते. ग्लॉसगोला उतरल्यावर ठरल्याप्रमाणे प्रथम क्रॉसफील्डच्या ऑफिसवर गेले. तेथे इसाबेला होतीच. तिला ग्रँज व्हिलेजचा सर्व वृतांत सांगितला. माझे संस्थांशी भेटीचे नियोजन छान केल्याबद्दल तिचे मनापासून आभार मानले. आणलेली भेटवस्तू तिला दिली व ईमेलवर संपर्कात राहायचे हे ठरवून, मी तेथून बी अँड बी ला जाण्यासाठी चालत निघाले. इसाबेला व तिच्या सहकाऱ्यांनी सर्व नियोजन छान केल्यामुळेच मला या ट्रिपमधील सर्वच समृद्ध करणारे अनुभव मिळाले होते.
मी रूमवर येऊन थोडा आराम केला. सर्व सामान घेतले व खाली येऊन पारशी आजोबा व इंग्लिश आजीचे आभार मानून, चालत चालतच स्टेशनवर आले. मला फार वेळ ट्रेनची वाट पाहावी लागली नाही. मी संध्याकाळी मँचेस्टरला पोहोचले. मला घ्यायला फाल्गुनी आली होती. तिला अण्णा गेलेले कळाले होते व त्याचे तिला फारच वाईट वाटत होते. मी शुक्रवारी रात्री मँचेस्टरला पोहोचले. माझे भारतात जायचे तिकीट शनिवार दुपारचे होते. तिच्या घरच्यांनी पण माझी छान काळजी घेतली. या सर्वांमुळेच माझा इंग्लंडचा संस्था बघायचा दौरा यशस्वी झाला होता.
या दौऱ्यामुळे मला मुलांना रोजच्या घरातील कामामध्ये सहभागी करून सिस्टिम कशी बसवता येईल, हे कळाले. विशेष मुलांना या देशामध्ये किती आदराने वागवले जाते व त्यांचा सन्मान व आवडीनिवडी जपण्यासाठी कसा प्रयत्न केला जातो, हे लक्षात आले. नवक्षितिजमध्ये आम्ही मुलांचे अनुभवविश्व समृद्ध करून त्यांना आनंदी आयुष्य द्यायचा प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे करतच होतो. या देशातील संस्थांना भेट दिल्यामुळे नवक्षितिजचे काम योग्य दिशेने चालले आहे, याचे समाधान वाटले व काम अजून चांगले होण्यासाठी काय सुधारणा करता येतील, हेही समजले.
२०१३मध्ये नुपूरकडे अमेरिकेला जायचा योग आला. योग अशा करता की एक-दोनदा अमेरिकेतील संस्थांची निमंत्रणपत्रे असतानासुद्धा व्हिसा न मिळाल्यामुळे जाता आले नव्हते. यावेळी नुपूरला भेटायला म्हणूनच जायचे ठरवले होते, त्यामुळे संस्थांना भेटीचे काहीही नियोजन केले नव्हते. पण अमेरिकेमध्ये आठ दिवस राहून झाल्यावर मी नुपूरला म्हटले, जवळ काही संस्था असतील तर मला बघायला आवडतील. संस्था शोधताना फिलाडेल्फियातील डॉ. ग्लेन डोमान यांची संस्था नुपूर रहात होती तिथून जवळच आहे, असे लक्षात आले. न्यू जर्सी व फिलाडेल्फिया या दोन राज्यांच्या बॉर्डरला असलेल्या वुरहीस या गावात नुपूर राहात होती. बॅनक्रॉफ्ट ही संस्थातर नुपूरच्या अगदी घराजवळच होती. आम्ही या दोन संस्था बघायचे ठरवले व त्यांना ईमेल पाठवून भेटायची वेळ मागून घेतली. ईमेलमध्ये नवक्षितिजची माहिती, वेबसाईट व यू ट्युबची लिंकही पाठवून दिली. डॉ. ग्लेन डोमान यांचे ‘हाऊ टू टीच युअर ब्रेन इनज्युअर्ड चाईल्ड’ हे पुस्तक वापरून मी अदितीला शिकवले होते. अदिती लहान असताना मी यांच्या संस्थेला भेट देऊन विशेष मुलांना शिकवायच्या अजून काही पद्धती असतील, तर त्या शिकून घ्याव्यात असे ठरवले होते. पण काही कारणाने ते जमल नाही. यावेळी फिलाडेल्फियाच्या इतक्या जवळ आल्यावर मला ही संस्था बघायची संधी सोडायची नव्हती.
आश्चर्य म्हणजे बॅनक्रॉफ्ट संस्थेतून लगेचच ईमेलला उत्तर आले व त्यांनी मला भेटायची वेळ दिली. बॅनक्रॉफ्ट ही १८८३ मध्ये अमेरिकेत स्थापन झालेली विशेष मुलांसाठी काम करणारी पहिली संस्था आहे. या संस्थेच्या अमेरिकेत अनेक शाखा आहेत. मी व नुपूर खूप उत्साहाने बॅनक्रॉफ्ट या संस्थेमध्ये ठरलेल्या वेळी गेलो. रिसेप्शनमध्ये आम्ही आल्याचे कळवले व त्यांना माझे व्हिजिटिंग कार्ड दिले. लगेचच ते मला मीटिंग जेथे होणार होती, त्या ठिकाणी घेऊन गेले. या मीटिंगसाठी व्हाईस प्रेसिडेंट कॅरेन, एक्सिक्युटिव डायरेक्टर क्लेअर, चीफ डेव्हलेपमेंट ऑफिसर मिच्चेल व डायरेक्टर ऑफ कम्युनिकेशन्स सीन अशा संस्थेतील महत्त्वाच्या व्यक्ती हजर होत्या. ईमेलवरून पाठवलेली नवक्षितिजची वेबसाईट व यू ट्यूब त्यांनी बघितलेली होती. इतकी जुनी संस्था असूनसुद्धा त्यांना नवक्षितिजच्या ट्रेकिंग, ट्रॅफिक अॅवेअरनेस व एक्सचेंज प्रोग्रॅमबद्दल खूप उत्सुकता होती व त्याबद्दल त्यांना अजून समजून घ्यायचे होते. अमेरिकेमध्ये असे काही वेगळे कार्यक्रम देताना जाचक कायदेशीर बाबींमुळे अवघड होते, असे सांगितले. एक्सचेंज प्रोग्रॅम प्रत्यक्षात आणणे त्यांना अवघड वाटले, कारण इथे संस्थांमध्ये फारसा संवाद नव्हता व तो सुरु करण्याबाबत सर्व संस्थाचालकांमध्ये उदासीनता होती. त्यांच्याकडे नव्यानेच सुरु झालेला प्रोग्रॅम म्हणजे विशेष मुलाला स्वतंत्र फ्लॅट देऊन स्वावलंबी राहायला शिकवायचे. यामध्ये येणाऱ्या अडचणी याबद्दल पण त्यांनी मोकळेपणाने चर्चा केली. विशेष मुला-मुलींचे सहजीवन यावर चर्चा झाली. या तरुण मुला-मुलींना सहजीवन देणे त्यांनाही अवघड जात होते, हे ऐकून मला काहीसे आश्चर्य वाटले. कारण या देशामध्ये लैंगिक शिक्षण, वयाच्या बारा-तेरा या वयातच चालू करतात. अर्थात देश बदलला तरी मतिमंदत्वामुळे येणाऱ्या समस्या सगळीकडे सारख्याच असणार. नवक्षितिजला फंडिंग कसे मिळते याबद्दल व अशा अनेक चर्चा झाल्या. अगदी मोकळेपणाने त्यांच्या समोरच्या अडचणींची पण चर्चा झाली. अमेरिकन सरकार विशेष व्यक्तींच्या संस्थांना चांगली मदत करते. त्यामुळे आर्थिक प्रश्न त्यांना फारसा भेडसावत नाही. परंतु थोडी मदत हितचिंतकांकडून घ्यावीच लागते. यासाठी मिच्चेल ही भारतीय वंशाची चीफ डेव्हलेपमेंट ऑफिसर त्यांना मदत करत होती. जवळजवळ एक तास आम्ही चर्चा केली. यानंतर सर्व इन्स्टिट्यूट मला व्यवस्थित दाखवली. येथे प्रौढ विशेष व्यक्तींसाठी कार्यशाळा होती. येथील भेट झाल्यावर, आम्हाला त्यांनी पाच स्वमग्न विशेष मुले राहात असलेले एक घर दाखवायला नेले.
हे घर भर वस्तीत होते व घराला कंपाऊंड नव्हते. पहारेकरीपण नव्हता. मला नवक्षितिजमध्ये घेत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेची आठवण झाली. (नवक्षितिजमध्ये दिवसा व रात्रीसाठी स्वतंत्र पहारेकरी व अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवलेले आहेत.) आम्ही येथे पोहोचलो तेव्हा तेथे एक हाऊसमदर होती. या घरातील सर्व मुले कार्यशाळेत गेलेली होती. प्रत्येक मुलाला एक स्वतंत्र खोली होती. स्वयंपाकघर, जेवणाची खोली, हॉल व बाहेर बसायला व्हरांडा असा हा दुमजली बंगलाच होता. मुले रोज नाष्टा करून, दुपारचे जेवण बरोबर घेऊन कार्यशाळेत जात होती. हाऊसमदर सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत असायची. मुलांचे रात्रीचे जेवण तयार करून ही घरी जात असे. रात्री हाऊसफादर यायचा व तो सकाळी नाष्ट्यापर्यंत जबाबदारी घेत असे. येथील काही मुलांना वर्तणूक समस्या व फीट येणे या आजारांसाठी औषधे चालू होती. या औषधांची जबाबदारी एका औषध कंपनीने घेतलेली होती. दिवसभराच्या औषधाची वेळ व रोजच्या दिवसाच्या नियोजनाप्रमाणे त्या त्या मुलाचे नाव टाकून, वेगवेगळे पॅक करून, दर महिन्याला ही औषधे, औषध कंपनी संस्थेमध्ये आणून देत होती. किती ही छान सोय! नकळत माझ्या डोळ्यांसमोर भारतातल्या औषध कंपन्या व मुलांच्या औषधांवर खर्च करणारे पालक येऊन गेले. विशेष मुलांसाठी माफकदरात औषधे मिळत नाहीत व औषध कंपन्याही मदत करत नाहीत. काही औषध कंपन्यांनी पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे. विशेष मुलांसाठी काही आरोग्य विमा योजना सुरू झाल्या आहेत, ही सुखावणारी सुरुवात आहे. बराच वेळ आम्ही किचन व डायनिंग हॉलमध्ये उभे राहून गप्पा मारल्या. येथेही अगदी मोकळेपणाने गप्पा झाल्या. मुलांच्या ओरडण्याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना होत नाही का, असे विचारल्यावर तिने सांगितले हे घर आधी वेगळ्या ठिकाणी होते. पण मुलांच्या आवाजाचा त्रास होत आहे अशी वारंवार तक्रार आजूबाजूला राहाणाऱ्या रहिवाश्यांनी केल्यामुळे, ती जागा सोडून मुलांना या घरात हलवावे लागले. मुले कधी कधी न सांगता बाहेर जातात. अशावेळी मुलगा सापडेपर्यंत खूप मानसिक ताणाला सामोरे जावे लागते. माझ्या मनात आले अरे देवा सगळीकडेच या समस्या! पण इकडे पोलिस स्टेशनवर या विशेष मुलांचा फोटो दिलेला असतो व मतिमंद, स्वमग्न वा अंध या भागामध्ये राहात आहे, अशी पाटी मुले राहात असलेल्या गल्लीच्या सुरुवातीलाच लावलेली असते. त्यामुळे अशी व्यक्ती हरवली तरी सापडायला सोपे जाते, कारण पोलिसांपासून सामान्य लोकांपर्यंत सगळ्यांना अशा व्यक्तींबद्दल माहिती असते. विशेष व्यक्तींबद्दल अशी प्रगल्भता सरकार व सामान्य लोक अशा सर्व स्तरावर वरचेवर अनुभवाला येत होती. या सर्वांच्या सहकार्यामुळे विशेष मुलांबरोबर काम करणाऱ्या संस्थांना अडचणींवर मात करणे त्या मानाने सोपे जाते. या संस्थेला भेट देण्याचा हा समृद्ध अनुभव आम्ही आटोपता घेतला व घरच्या रस्त्याला लागलो.
फिलाडेल्फिया मधील डॉ. ग्लेन डोमान यांच्या संस्थेकडून ईमेलला काहीच प्रतिसाद आला नव्हता. मी नुपूरला म्हटले, ‘आपण तेथे जाऊया. कोणी भेटले नाही तरी चालेल, पण मला या संस्थेला भेट द्यायलाच पाहिजे.’ मी नुपूरकडे थोडासा हट्टच केला. डॉ. ग्लेन डोमान यांच्या पुस्तकामुळे अदिती लहान असताना, तिला शिकवताना एक सकारात्मक दिशा मिळाली होती. ती लहान असताना अशी दिशा मिळाल्यामुळे दोघींच्या आयुष्याचा तो अवघड काळ खूप सुखकर होऊन गेला. त्या उपकाराची फेड म्हणून त्यांच्या संस्थेला भेट देऊन, तेथे नतमस्तक होणे ही माझी आंतरिक गरज होती. तर एक दिवशी सकाळी नाष्टा झाल्यावर आम्ही फिलाडेल्फियाला जायला निघालो. फिलाडेल्फियाला मी व नुपूर आधी आलो होतो. दिवसभर पायी भटकून आम्ही अनेक ठिकाणे बघितली होती. डॉ. ग्लेन डोमान यांची संस्था फिलाडेल्फियाच्या जवळच्या एका गावात होती. जीपीस यंत्रणा असल्यामुळे नुपूरला हा पत्ता शोधणे सोपे गेले. एका गल्लीपाशी डॉ. ग्लेन डोमान यांच्या संस्थेचा बोर्ड दिसला. तो नुसता बोर्ड बघून पण मला खूप भरुन आले. आम्ही संस्थेच्या आवारात प्रवेश केला. संस्थेमध्ये एकदम शांत वातावरण होते. आम्ही ऑफिसमध्ये गेलो व भारतातून आलो आहोत व भेटण्याची वेळ घेतलेली नाही, पण संस्था बघायची इच्छा आहे, असे सांगितले. त्यांनी आम्हाला तेथेच जवळ बसलेल्या एका वृद्ध महिलेकडे रजिस्टरमध्ये भेट नोंद करायला सांगितले. आम्ही त्या वृद्ध महिलेकडे गेलो. जवळ गेल्यावर बघितले तर हिच्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये प्लॅस्टिकच्या नळ्या होत्या व जवळच ऑक्सिजन सिलेंडर ठेवलेला होता. एवढे बरे नसताना ही स्त्री इथे विनामुल्य सेवा देत होती. मी अमेरिकेमध्ये अनेक वृद्ध लोक खूप स्वावलंबी व अर्थपूर्ण जीवन जगताना बघितले. तर या वृद्ध महिलेने मला विचारले ‘तुम्ही रशियन आहात का?’ मला कळेना हिला कुठल्या अँगलने आम्ही रशिया देशातून आलेले आहोत, असे वाटले असेल? पण हळूहळू माझ्या असे लक्षात आले की, अमेरिकन सामान्य माणसाला अमेरिकेबाहेर काय चाललय याच्याशी फारसे देणे घेणे नसते. त्यामुळे कुठल्या देशातील माणसे कशी दिसतात याबद्दल ते अनभिज्ञ असणे साहजिक होते. रजिस्टरमध्ये नोंद झाल्यावर आम्ही जिन्याने वर जाऊन तेथील डायरेक्टर असलेल्या महिलेला भेटलो. ही पण वयस्कर महिलाच होती. त्यांना भेट देण्यामागची आमची भूमिका सांगितली. त्यांना ते सर्व ऐकून आश्चर्य वाटले. नंतर हातातील काम बाजूला ठेवून सर्व संस्था दाखवायला ती स्वतः आमच्याबरोबर आली. त्याचवर्षी वयाच्या ९०व्या वर्षी डॉ. ग्लेन डोमान यांचे निधन झाले होते. त्यांचे ऑफिस, ते लेक्चर द्यायचे ते सभागृह, तसेच आता चालू असलेली विशेष मुलांची शाळा. सर्व परिसर त्यांनी आत्मीयतेने दाखविला. अर्थात, आम्हाला चालू असलेल्या वर्गात जाता आले नाही, कारण आम्ही अगदी अचानक गेलेलो होतो. व असे अचानक विशेष मुलांच्या वर्गात जाणे आम्हालाही प्रशस्त वाटत नव्हते. डॉ. ग्लेन-डोमान यांनी विशेष मुलांना शिकवण्यासाठी तयार केलेली शिक्षणपद्धती अनेक देशांत शिकवली जाते. आता त्यांची मुलगी संस्थेचे काम पाहाते.
आम्ही डॉ. ग्लेन डोमान यांच्या ऑफिसबाहेरील त्यांच्या पूर्णाकृती फोटोजवळ उभे राहून फोटो काढून घेतले. डायरेक्टरचे आभार मानून आम्ही समाधानी मनाने बाहेर पडलो. इतके अचानक जाऊनसुद्धा आम्हाला सर्व परिसर बघायला मिळाला व मुख्य म्हणजे डॉ. ग्लेन डोमान या विलक्षण माणसाने चालू केलेल्या संस्थेमध्ये जाऊन मला नतमस्तक व्हायची संधी मिळाली होती. त्यामुळे मी फार खुश झाले.
विदेशी संस्थांना भेट देऊन त्या देशांमध्ये सिस्टिममध्ये काम कसे चालते, हे बघायची संधी मला मिळाली. तसेच सिस्टिममध्ये काम करण्याचा अतिरेक झाल्यामुळे तेथील विशेष मुलांबरोबर काम करणाऱ्या लोकांची होणारी कुचंबनाही बघायला मिळाली. मला स्वतःला संस्थेमध्ये सिस्टिम चांगली कार्यान्वित असावी असे वाटते. याकरता वर्षानुवर्षे प्रयत्न करून नवक्षितिजमध्ये सिस्टिम चांगल्या बसवायचा प्रयत्न केला आहे यामुळे आमचे जे विशेष मुलांना आनंदी व सकारात्मक आयुष्य द्यायचे ध्येय आहे, ते प्रत्यक्षात आणणे शक्य होतंय. यापुढे जाऊन मला असेही म्हणावेसे वाटते की, सिस्टिमचा अतिरेक होता कामा नये. त्यामुळे कामातील आनंद व विशेष मुलांबरोबर काम करताना लागणारी संवेदनशीलता व सहनशीलता जाऊ नये. नवक्षितिजमध्ये सिस्टिममध्ये काम करताना, विशेष मुलांबरोबर काम करताना लागणारी संवेदनशीलता व सहनशीलता जाणार नाही, याची पुरेपूर काळजी आम्ही घेतो.
या देशातील सामान्य लोक, सरकार, विशेष मुलांबरोबर काम करणारे स्वयंसेवक, कर्मचारी व संस्थाचालक यांची भूमिका खूपच सकारात्मक वाटली. विशेष व्यक्तींचा आदर कसा ठेवता येईल? यांना जास्तीत जास्त स्वावलंबी व आनंदी आयुष्य कसे देता येईल? याकरता तसेच, यांचे रोजचे आयुष्य सुरळीतपणे जगता यावे म्हणून सर्व थरातून प्रयत्न झालेले दिसतात. आपल्या देशाला इथपर्यंत मजल मारायला सर्वच स्तरांवर बरेच काम करणे गरजेचे आहे, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.