
२१.दुसरे युनिट सुरू – २०१३
रोजच्या दिनक्रमात काही अडचणी येत होत्या. मुलांची दाढी करायला, न्हावी इतक्या लांब यायला तयार नसायचा. त्यामुळे दर आठवड्याला मुलांना मारुंजीला आणून परत कुसगावला सोडावे लागायचे. सुरुवातीला भाजी, दूध मारुंजीहून पाठवत होतो; परंतु ते त्रासदायक होऊ लागले. कुसगावच्या शेतामधील भाजी थोडे दिवस पुरली, पण आपल्या शेतात तयार झालेली आहे म्हणून एकाच प्रकारची भाजी मुलांना वरचेवर खाऊ घालायची, हे आम्हाला पटत नव्हते. भाजी व दूध नियमित मिळणे सुरु होण्यास काही काळ जावाच लागला. रोज लागणारा किराणा माल मात्र आम्ही मारुंजीवरूनच देत होतो. मुले आजारी पडली तर तीन-चार किलोमीटरवर असणाऱ्या कासारसाई गावात नेले जायचे. हळूहळू कुसगावचे सर्वदृष्टीने काम चांगले सुरु झाले. कुसगावला जायला बरीचशी मुले उत्सुक असायची कारण तेथील मोकळे वातावरण मुलांना आवडायचे. हा थोडे दिवसाकरता असणारा बदल त्यांना आवडायचा.
२०१० पासून मारुंजीची घडी नीट बघत आहे, असे लक्षात आले. या बरोबरच प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांची प्रतीक्षा यादी वाढत होती. अजून विशेष मुलांपर्यंत पोहोचायचे असेल, तर दुसरी शाखा सुरू करणे गरजेचे होते. कारण मारुंजीमध्ये जास्तीत जास्त मुलांना प्रवेश देऊन नवक्षितिजमध्ये गर्दी करून येथे राहाणाऱ्या मुलांच्या आयुष्याचा स्तर खालावायचा नव्हता. एकदा माझ्या मनात याविषयी खात्री पटल्यावर, हा विषय अदितीच्या बाबांशी बोलले. त्यांनाही हे पटले. मग याविषयावर विश्वस्तांच्या मीटिंगमध्ये चर्चा झाली व सर्व विश्वस्तांनी ठरवले की, जमीन विकत घेऊयात. दोन वर्षे अॅमनोरामध्ये श्री. अनिरुद्ध देशपांडे यांच्या मदतीने केलेल्या फंड रेजिंग प्रोग्रॅम मधून व इतर हितचिंतकांनी दिलेल्या देणगीतून काही जमा झालेली रक्कम होती. ही रक्कम जागा विकत घेण्याकरता वापरायची यावर सर्व विश्वस्तांचे एकमत झाले. जागा विकत घ्यायचे नक्की झाल्यावर जागेचा शोध सुरु झाला. शक्यतो मारुंजीच्या जवळच जागा घेतली, तर मला येणे जाणे सोपे पडेल व इतरही सर्व दृष्टीने सोयीचे होईल म्हणून मारुंजीपासून १० कि.मी. परिसरात जागा बघणे सुरू केले. एका हितचिंतकांकडून कुसगाव येथील जागेबद्दल समजले. ही दोन एकर जागा मारुंजी पासून आठच कि.मी. वर होती. जागेचे क्लिअर टायटल नव्हते, पण हितचिंतकाच्या ओळखीचेच लोक असल्यामुळे काही रक्कम देऊन साठे खत करून जागेचे बांधकाम सुरू करता येईल, असे वकिलांमार्फत लिहून घेतले. बाकीचे पैसे टायटल क्लिअर झाल्यावर द्यायचे असे ठरले व व्यवहार पूर्ण झाला. २०१३ साली जागा ताब्यात आल्यावर आम्ही सर्व विश्वस्त व माझे सहकारी खुश झाले.
२०१३ साली तात्पुरती शेड बांधून दुसरी शाखा सुरू केली. मारुंजीला सुरू असलेला दिनक्रम तिकडेपण सुरु झाला. यामध्ये सकाळी उठल्यावर गाणी लावण्यापासून व्यायाम, कार्यशाळा, खेळ, फिरायला जाणे याचा समावेश होता. जेवणाच्या महिन्याच्या वेळापत्रकाप्रमाणे ठरलेले पदार्थ केले जात होते. जेवणाच्या वेळा पण त्याच ठेवल्या. कार्यशाळा व सकाळचा व्यायाम विशेष शिक्षक घेत होते व दुसरा सहकारी काळजीवाहक म्हणून काम बघत होता. या दोघांच्या बायका स्वयंपाक करणे, स्वयंपाकाची भांडी घासणे, कपडे धुणे, केर काढणे व इतर स्वच्छता करणे ही कामे करायच्या. इथे कार्यशाळेमध्ये शेती प्रकल्प ठेवला. कारण दोन एकर जागा होती व शेजारीच शेती असलेल्या हितचिंतकाकडून पाण्याची सोय होत होती. हळूहळू दिनक्रम व्यवस्थित सुरू होऊ लागला. छोट्या मोठ्या अडचणी येत होत्या, पण त्या शक्यतो तिथे राहाणारे सहकारी सोडवत होते. किंबहुना त्या त्यांनीच सोडवाव्यात याबाबत मी आग्रही होते व असते. कारण यातूनच त्यांना आत्मविश्वास येणार असतो. नाहीतर छोट्या छोट्या अडचणींवर पण विचार करून मार्ग काढायची सवय होत नाही, तसेच निर्णयक्षमताही वाढीस लागत नाही व याचा परिणाम म्हणून आत्मविश्वास वाढत नाही. अर्थात मी दर आठवड्याला जात होते. उपव्यवस्थापक महेंद्र सूर्यवंशी आठवड्यातून दोनदा चक्कर मारत होते. तिथे रहाणाऱ्यांना एकटे वाटू नये, याची खबरदारी आम्ही घेत होतो. माझ्या दर आठवड्याच्या भेटीमध्ये सहकारी तसेच मुलांबरोबरची मीटिंग होत होती. यामध्ये सहकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांच्या असणाऱ्या मागण्या याबाबत चर्चा व्हायची. मुलांबरोबर संवाद साधताना मुलांची मानसिकता समजायला मदत व्हायची. या भेटीमध्ये आजूबाजूला राहणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर पण बोलणे होत होते. यातूनच त्यांची संस्थेबद्दल सकारात्मक भावना तयार व्हायला मदत होऊ लागली.
शेतीमध्ये पीक काय घ्यावे याविषयी चर्चा करताना, भाज्या लावाव्यात असे ठरले. त्यासाठी आधी शेत नांगरून घेण्यासाठी ट्रॅक्टर शोधणे आले. तो बराच शोध घेतल्यावर मिळाला. नांगरून झाल्यावर कोबी, फ्लॉवर, वाटाणा, वांगी, भेंडी यांची रोपे आणायची ठरली. ती कुठे मिळतील याचा शोध घेण्यात दोन-तीन दिवस गेले. संदीपसर, ज्ञानेश्वर व मुलांनी मिळून रोपे लावून घेतली. थोड्याच दिवसांमध्ये शेत हिरवेगार दिसू लागले. शेतीमध्ये सेंद्रिय खतच वापरले. माझ्या प्रत्येक भेटीमध्ये रोपे मोठी झालेली दिसत होती. आता काही रोपांना फुलेपण आली. सर्वजण फार कौतुकाने शेतीमधील भाज्या दाखवत. फ्लॉवर, कोबीचे छोटे गड्डे दिसू लागले. बघता बघता दोन-तीन महिन्यांत भाज्या काढणीला आल्या. आपल्या शेतातील पिकांचा हा वाढीचा प्रवास बघणे हा सुखद अनुभव होता. शेतकरी आपल्या शेतीवर एवढे प्रेम का करत असेल, हे मला या अनुभवाने जाणवले. दर आठवड्याला मारुंजीला भाजी येऊ लागली. कुसगावला राहात असलेली मुले व सहकारी हे पण स्वतः पिकवलेली भाजी खात होते. मी व महेंद्रसर आठवड्याच्या मीटिंगसाठी कुसगावला गेलो की, येताना ही भाजी घेऊन यायचो. कुसगावचे माझे सहकारी फार प्रेमाने व अभिमानाने या भाज्या आमच्याबरोबर द्यायचे. आपल्या शेतात पिकलेल्या भाज्या शिजवून मुलांना खाऊ घालताना आमच्या स्वयंपाकघरातील सहकाऱ्यांनापण खूप छान वाटायचे. मुले तर खुशच व्हायची. आवारात भेटले तरी सांगणार, ‘मॅडम, आज आपल्या कुसगावच्या शेतातील भाजी खाल्ली.’ विश्वस्तांकडे पण भाज्यांचा वानवळा पोहोचवला. या भाज्या काढून झाल्यावर हरभरा व मका लावला. हरभरा व मक्याची कणसे पण मुलांनी मनसोक्त खाल्ली.
भाज्या काढल्यावर शेतामध्ये काय लावायचे, असा विचार सुरु झाला. हा खूप पावसाचा, मावळ भाग असल्यामुळे येथे भात लावावा असे ठरले. बाजूचाच एक शेतकरी शेती संदर्भात मार्गदर्शन करत असे. त्याचेही म्हणणे असे पडले की, भात लावावा. उन्हाळा संपत आला होता. त्यामुळे पावसापूर्वी शेत नांगरून तयार ठेवले. चांगला पाऊस पडल्यावर शेतामध्ये चांगला सैल चिखल तयार झाल्यावर, इंद्रायणी या जातीच्या तांदुळाची रोपे शेतामध्ये लावली. मी पण काही रोपे लावली. सैल चिखलामध्ये रोपे नुसती ओळीत खोचत जायची असतात. वाड्याला राहात असताना पावसाळ्याच्या दिवसात एस.टी.तून जाता येताना भात लावणीचे दृश्य लहानपणापासून बघितलेले होते. पण प्रत्यक्षात भात लावायचा अनुभव कधी घेतला नव्हता. प्रत्यक्षात हा अनुभव घेताना फार मस्त वाटले. भाताची रोपे लावायला मारुंजीचे बागकाम करणारे सहकारीपण आले होते. सर्वांच्या मदतीमुळे भात लागवड लवकर उरकली. भाताला लोंब्या आल्यावर त्याचा वास सर्व परिसरात पसरला होता. भाताचे पीक चांगले येईल असा अंदाज होता. पाऊसपण ठीक पडत होता. बघता बघता भात काढणी जवळ आली. भात काढणीच्या वेळीपण मारुंजीचे सहकारी मदतीला आले. मी पण भात काढणीचा अनुभव घेतला. कोयत्याने सपकन भाताचे रोप कापायचे असते. हे काळजीपूर्वक करावे लागते, कारण जरा दुर्लक्ष झाले तर धारदार कोयत्याने हाताला कापायची भीती. काढलेली भाताची रोपे योग्य जागी ठेवायला मुलांनी मदत केली. भाताच्या लोंब्या चांगल्या वाळल्यावर गिरणीत नेऊन तांदूळ सडून आणला. तो ६०० किलो भरला. सगळ्यांनाच आपल्या शेतातल्या तांदुळाचा भात खायला फार मजा आली. विश्वस्तांकडे एक एक किलो तांदूळ नमुना म्हणून पोहोचवला. त्यांनाही नवक्षितिजच्या शेतातील तांदूळ बघून मस्त वाटले. माझा व माझ्या सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे पुढच्या वर्षी जास्त जागेमध्ये भाज्या व भात लावायचे ठरवले. पण बेभरवशी भरपूर पावसामुळे व आमची जागेची निवड चुकल्यामुळे या जास्त जागेत लावलेल्या भाज्या व भाताची बरीचशी रोपे वाहून गेली. ज्यांचे सर्व जीवन शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असते अशा शेतकऱ्यांना किती हतबल वाटत असेल, याचा पुरेपूर अनुभव आम्हाला आला. राहिलेले थोडे पीक पण जास्त पावसामुळे चांगले आले नाही. यावर्षी भात काढणीला आमच्या मदतीला मारुंजीला राहत असलेले दोन जर्मन स्वयंसेवक तोबीयाज व इलियाज होते. त्यांना पण भात काढणी हा अनुभव नवा होता. यावर्षी फक्त २०० किलो भात झाला. असो... हा ही एक अनुभव.




बाजूचे काही शेतकरी छोट्या मोठ्या कुरापती काढून त्रास देत होते. कुसगावचे सहकारी बऱ्याचदा हे माझ्यापर्यंत येऊ देत नव्हते. पण शेजारी जास्तच त्रास द्यायला लागले तर मी त्या शेतकऱ्यांना भेटून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत होते. बाजूचा एक शेतकरी मनोरुग्ण असून दारुडापण होता. तो जाता येता कुसगावच्या सहकाऱ्यांना व आमच्या गाड्यांना अडवायचा, घाणघाण शिव्या द्यायचा. हळूहळू हे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे येथे राहाणारे सहकारी व मुले वैतागली होती.
कुसगाव जागेचे क्लिअर टायटल होत नव्हते. नवक्षितिजच्या नावावर जागा होत नव्हती. म्हणून आम्ही दुसरी जागा शोधत होतो. मावळ तालुक्यात जागांचे भाव खूप जास्त व क्लिअर टायटलच्या जागाच मिळेनात. शेवटी इतर ठिकाणी जागा बघायला सुरुवात केली. भोर व शिरवळ तालुक्यात बऱ्याच जागा बघितल्या. शिरवळपासून ९ किलोमीटर, असवली या गावातील जागा सर्व विश्वस्तांना आवडली. ही तीन एकर जागा नवक्षितिजच्या दुसऱ्या शाखेसाठी २०१५ मध्ये नक्की झाली. २०१६ साली खरेदी व्यवहार पूर्ण झाला व नवक्षितिजच्या नावाने ही जागा झाली. मी, सर्व विश्वस्त व सर्व सहकारी खुश झाले. योगायोग म्हणजे ही जागा, माझ्या अनेक उन्हाळ्याच्या सुट्ट्या मजेत गेल्या त्या माझ्या आजोळच्या वडगाव या गावापासून अगदी जवळ आहे.


नवक्षितिजची दुसरी शाखा कुसगावमध्ये पावणेदोन वर्षे होती. या अनुभवामुळे दुसरे युनिट आपण यशस्वीपणे चालवू शकतो, हा विश्वास मला व माझ्या सहकाऱ्यांना आला. मला नवक्षितिजमध्ये सिस्टिम चांगल्या बसल्या आहेत याची खात्री पटली व रिप्लिकेबल मॉडेल करता येऊ शकते, याचा विश्वास आला. विशेष शिक्षक संदीप मव्हाळे यांची पत्नी साधना व काळजीवाहक ज्ञानेश्वर, त्यांची पत्नी गंगा तसेच सहव्यवस्थापक महेंद्रसर यांच्या सहकार्यामुळे व कार्यक्षमतेमुळे दुसऱ्या शाखेची घडी नीट बसू शकली.
असवलीची जागा मिळाल्यावर कुसगाव येथील युनिट असवलीला हलवले. सध्या नवक्षितिजची दुसरी शाखा असवली मध्ये तात्पुरत्या शेडमध्येच सुरु झालेली आहे. येथे ९ मुले व कुसगावच्या आधीच्या ४ सहकाऱ्यांबरोबरच संतोष व राणी हे पती-पत्नी राहात आहेत. मोठा फरक असा आहे की, तीन एकर जागा नवक्षितिजच्या नावावर झालेली आहे. हितचिंतकांच्या मदतीने साठ मुले राहू शकतील अशी सुसज्ज निवासी कार्यशाळा लवकरच येथे सुरु होईल, याची आम्हा सर्वांना खात्री आहे.