
२२. नवक्षितिजच्या मीटिंग्ज
या सगळ्या मीटिंग्ज वेगवेगळ्या लोकांबरोबर असल्या, तरी त्यांचा उद्देश एकच आहे, ते म्हणजे सर्वांशी सुसंवाद साधणे व व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवून विश्वासाचे नाते तयार करणे. यामुळे विशेष मुलांना आनंदी आयुष्य देणे व कुटुंबीयांचा मानसिक ताण कमी करणे या नवक्षितिजच्या उद्दिष्टाकडची वाटचाल त्यामानाने सुलभ व आनंददायी होते.
मीटिंग या एकमेकांशी सुसंवाद व पारदर्शकता ठेवण्याचे फार महत्त्वाचे काम बजावतात. हे असले की, आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी इतरांचे जे सहकार्य व मार्गदर्शन लागते, ते मिळणे सोपे होते. त्यामुळे नवक्षितिज सुरू झाल्यापासूनच मी नियमित मीटिंग घेण्यास प्राधान्य दिले. २००७ सालानंतर निवासी वसतिगृह मारुंजीला सुरु झाल्यावर नवीन विश्वस्त जोडले गेल्यानंतर विश्वस्ताच्या मीटिंग्ज जास्त सकारात्मक व्हायला लागल्या. नवक्षितिजच्या वाटचालीत वेगवेगळ्या टप्प्यावर डॉ. आनंद दीक्षित, सुनील कुलकर्णी, अॅड. सुजाता कुलकर्णी, कनका कदंबी, अॅड. सुदेश हाडके, चंद्रशेखर पोतनीस हे विश्वस्त म्हणून कार्यरत झाले. या प्रत्येकाच्या येण्यामुळे नवक्षितिजचे काम अजून चांगले व्हायला मदत झाली.
विश्वस्तांबरोबर मीटिंग –
विश्वस्तांचा एकमेकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी मीटिंगच्या निमित्ताने नियमित भेट होणे फार आवश्यक आहे. नवक्षितिजच्या विश्वस्तांची मीटिंग महिन्यातून एकदा होतेच व एखाद्या महत्त्वाच्या विषयाची चर्चा करून निर्णय घ्यायचा असेल, तर जास्त वेळा मीटिंग्ज होतात. मीटिंगच्या सुरुवातीला महिन्याभरात नवक्षितिजमध्ये ज्या घडामोडी घडल्या असतील, त्याबद्दल सर्व विश्वस्तांना सांगितले जाते. यामध्ये मुलांशी निगडित गोष्टी, मुलांबरोबर केलेले विविध कार्यक्रम, मुलांबरोबर काम करताना आम्हा सर्वांना येणाऱ्या अडचणी तसेच काही सहकाऱ्यांचे सोडून जाणे, काही नवे सहकारी जोडले जाणे, काही कारणाने सहकाऱ्यांना काढून टाकले असेल तर ती घटना काय होती? याबद्दल चर्चा होते. सध्या संस्थेला कुठे कुठे मदतीची आवश्यकता आहे व संस्थेची आर्थिक स्थिती काय आहे, याबद्दल सविस्तर चर्चा होते. संस्थेमध्ये काय चालले आहे याची व्यवस्थित माहिती सर्व विश्वस्तांना असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्यक्ष रोज काम न करणारे विश्वस्त यांना संस्थेमध्ये घडणाऱ्या चांगल्या घटनांबरोबरच जर काही अप्रिय घटना घडली असेल, तर त्याची माहिती असणे गरजेचे असते. यातूनच विश्वस्तांमध्ये विश्वासाचे नाते तयार होते व पारदर्शक वातावरण तयार होते. या घटनांवर चर्चा होते व अप्रिय घटना परत घडू नयेत म्हणून काय उपाययोजना करावी, याबद्दल चर्चेतून मार्ग निघतो.
मी नशीबवान आहे. कारण इतर विश्वस्त माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. त्यामुळे नवक्षितिजमध्ये माझ्या सहकाऱ्यांबरोबर काम करताना, येथे सिस्टिम बसवताना व पालकांशी संवाद साधताना मला माझे निर्णय घ्यायची मोकळीक असते. नवे सहकारी घेणे व नियमबाह्य वागलेल्या सहकाऱ्यांना काढताना निर्णय घेणे सोपे जाते. मला वाटते अशी निर्णय घ्यायची मुभा प्रत्यक्ष काम करणाऱ्या विश्वस्ताला प्रत्येक संस्थेत मिळायला पाहिजे. कारण या व्यक्तीलाच प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती असते. पण त्याचप्रमाणे प्रत्यक्ष काम करणाऱ्या विश्वस्ताने इतर विश्वस्तांशी वरचेवर संवास साधणे फार जरुरीचे आहे. संस्थेच्या प्रत्यक्ष काम करणाऱ्या विश्वस्ताची मला सगळे कळते, ही भूमिका नसावी. कारण प्रत्यक्ष काम करताना निर्णय घ्यायची मोकळीक दिली असली, तरी संस्था चालवताना याशिवाय अनेक विषयांमध्ये मार्गदर्शनाची जरूर असते. मी स्वतः महत्त्वाचे निर्णय घेताना विश्वस्तांचे मार्गदर्शन घेतेच. असे निर्णय घेणे तातडीचे असेल, तर तशी तातडीची मीटिंग बोलावते व विश्वस्तांना अगदीच वेळ नसेल तर प्रत्येकाशी फोनवर बोलून मगच निर्णय घेतला जातो. त्यांच्याशी चर्चा होऊन जो निर्णय होईल, तो निर्णय मी बदलत नाही. यामुळे इतर विश्वस्तांनी दिलेल्या मताचा व त्यांनी दिलेल्या बहुमूल्य वेळेचा आदर राखला जातो. मला जर एखादे नवीन युनिट वा उपक्रम चालू करायचा असेल आणि जर आमच्या मीटिंगमध्ये इतरांना बहुमताने ती वेळ असे करण्यास योग्य वाटत नसेल, तर मी त्यांच्या मताला मान देऊन योग्य वेळ यायची वाट बघते.
मला स्वतः नवक्षितिजमधील विश्वस्तांच्या मीटिंगमधून काम करण्याची ऊर्जा मिळते. हे सगळे आपल्या सोबत आहेत, त्यांचा आपल्यावर विश्वास आहे, त्यांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे या भावनेमुळे नवीन उपक्रम करायचे बळ मला मिळते.
सहकाऱ्यांबरोबरचा संवाद -
नवक्षितिजमधील सर्व सहकाऱ्यांबरोबर आठवड्यातून एक मीटिंग नक्की असते. दिवेकर मावशी, व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, समन्वयक व जनसंपर्क अधिकाऱ्यांशी जरुरीप्रमाणे जास्त वेळा पण मीटिंग घ्यावी लागते. या मीटिंगचा मुख्य उद्देश प्रत्येक सहकाऱ्याशी संवाद साधणे, त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी समजून घेणे, एखाद्या सहकाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण येत नाही ना यावर कोअर ग्रुपच्या सहकाऱ्यांशी चर्चा करणे, त्यावर सर्वांनी मिळून मार्ग काढणे असा आहे.
या मीटिंगचे स्वरूप काळानुसार बदलत गेले. सहकारी वाढत गेले, तसे त्यांना एकमेकांबरोबर काम करताना येणाऱ्या अडीअडचणी वाढू लागल्या. जशी मुलांची व सहकाऱ्यांची संख्या वाढू लागली, तसे शिस्तीत व सिस्टिममध्ये काम करणे गरजेचे होऊन बसले. कारण त्याशिवाय मुलांच्या दिनक्रमाची घडी नीट बसत नव्हती. प्रत्येक सहकाऱ्याची भूमिका व जबाबदारीचे लिखित कागद त्यांना नवक्षितिजमध्ये रुजू होतानाच देऊ लागलो. समन्वयक, उपव्यवस्थापक, कार्यशाळा व्यवस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून सर्व विभागाच्या सहकाऱ्यांच्या रोजच्या कामाचा अहवाल आठवड्यातून एकदा माझ्याकडे यायला पाहिजे, असा आदेश काढला.
काळजीवाहक समन्वयक इंगळे व मुलींची समन्वयक आशा यांच्याकडे प्रत्येक काळजीवाहकांकडून मुलांबद्दल रोजचा अहवाल येतो. सध्या काळजीवाहकपण मुलांचे आजार, वर्तणूक समस्या व एकंदर मानसिक स्थितीबद्दल अहवाल देतात. काळजीवाहक समन्वयकाकडून हा अहवाल ही जबाबदारी असलेल्या सहव्यवस्थापक महेंद्रसरांकडे जातो. असेच अहवाल त्या त्या विभागानुसार म्हणजे मुलींची समन्वयक आशा, मुलांचा समन्वयक इंगळे, सहव्यवस्थापक महेंद्रसर, कार्यशाळा व्यवस्थापक मुंडेसर, जनसंपर्क अधिकारी रामेश्वर व व्यवस्थापक वायाळसर यांचे अहवाल माझ्याकडे येतात. हे अहवाल लिहिणे काळजीवाहक व बागकाम करणारा सहकारी यांना अवघड जायचे, कारण शिक्षण कमी व लिहायची सवय सुटलेली. पण त्यांना जमेल तसे लिहा चुका झाल्या तर होऊ देत, असे प्रोत्साहित केल्यावर हळूहळू अपेक्षेपेक्षा चांगले व सविस्तर अहवाल येऊ लागले. या सर्व अहवालांचे वाचन करून मी प्रथम व्यवस्थापक, मुला-मुलींचे समन्वयक, जनसंपर्क अधिकारी व कार्यशाळा व्यवस्थापक व दिवेकर मावशींशी चर्चा करते. या पद्धतीमुळे संस्थेमधील प्रत्येक विभागात काम कसे चालले आहे याची माहिती कोअर ग्रुपला होते. या मीटिंगमध्ये कोण सहकारी चांगले काम करतो व कोण चांगले काम करत नाही, काळजीवाहकांचे मुलांशी वागणे व्यवस्थित आहे ना? याबद्दल चर्चा होते. जो सहकारी चांगले काम करत नाही त्यावर काय उपाययोजना करायची, हे ठरते. एखाद्या सहकाऱ्याला काम जास्त पडत नाही ना? तसे असेल तर ते काम कोणाला देता येईल, हे ठरवले जाते. कारण कुठल्याही सहकाऱ्यावर अन्याय होऊ नये व त्यांच्या मनामध्ये आपल्यावर अन्याय होतोय ही भावना येऊ नये, म्हणून खूप जागरुक राहावे लागते. समन्वयक व व्यवस्थापकांनी पण नेहमी याविषयी दक्ष असावे, अशी सूचना मी वरचेवर देत असते. एखादा कटू निर्णय घेताना, एखाद्या सहकाऱ्याला शिस्तभंगाबाबत काढायचे असेल व त्यामुळे नवीन सहकारी मिळेपर्यंत येणाऱ्या अडचणींमधून मार्ग कसा काढता येईल, हे ही सहकाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून ठरवता येते.
बाकी सर्व सहकाऱ्यांबरोबर मीटिंग यांनतर असते. कोअर ग्रुपची मीटिंग आधी झाल्यामुळे इतर सहकाऱ्यांशी संवाद साधताना माझ्या मनात विचारांची स्पष्टता असते. सुरुवातीला काही वर्षे मीटिंगमध्ये फक्त काम करताना येणाऱ्या अडचणी, त्या कशाप्रकारे सोडवता येतील व पुढील आठवड्यामध्ये होणारे कार्यक्रम यावर चर्चा व्हायची. मला जाणवायला लागले की, हे खूप एकसुरी होत चाललंय मग त्यामध्ये थोडे थोडे बदल करत गेले. मीटिंगच्या सुरुवातीला प्रार्थना व्हायची, आता आनापान सती ध्यान १० मिनिट सर्वजण करतात. यानंतर प्रत्येकाने आठवड्यामध्ये काय छान घडले हे सांगायचे. यानंतर काम करताना येणाऱ्या अडचणी, विशेषतः काळजीवाहकांना मुलांबरोबर काम करताना येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा होऊन, त्यातून मार्ग काढला जातो. यामुळे काळजीवाहकाला मानसिक बळ मिळते व त्याचा तणाव कमी व्हायला मदत होते. सर्व सहकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी नीट पार पाडावी व चांगले काम केल्यामुळे स्वतःला मिळणारा आनंद कसा घ्यावा, याबद्दल समुपदेशन वरचेवर चालूच असते. मीटिंग सहसा हसतखेळत होतात पण एखाद्या वेळेस परत परत सांगूनसुद्धा एखादी चूक होत असेल व त्यामुळे मुलांना त्रास होत असेल, तर मात्र मी सर्वांनाच चांगले फैलावर घेते. पण हे फैलावर घेणे थोडावेळ असते. मीटिंग संपताना परत वातावरण चांगले होईल, याची मी काळजी घेते. एखाद्या सहकाऱ्याला त्याच्या चुकांबद्दल बोलायचे असेल, तर मग मात्र माझ्या ऑफिसमध्ये बोलावून, त्याच्याशी व त्या विभागाच्या प्रमुखाबरोबर चर्चा करून मगच त्याला समज देते, समजावून सांगते. सर्वांसमोर बोलून त्याचा अपमान करणे कटाक्षाने टाळते. कारण प्रत्येकाला आत्मसन्मान असतो आणि आपण प्रत्येकाने तो जपला पाहिजे. ती व्यक्ती कुठल्याही पदावर काम करत असली, तरी सर्वांसमोर त्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाला धक्का बसेल असे आपले वागणे नसावे व माझ्याकडून असे होऊ नये, याची काळजी मी सतत घेत असते.
माझा एखादा निर्णय चुकला वा एखाद्या सहकाऱ्याला मी वाजवीपेक्षा जास्त रागावले असेन तर या मीटिंगमध्ये ते अवश्य सांगते. यामुळे सहकाऱ्यांना मॅडम पण चुकतात व चुकले तरी सर्वांसमोर मान्य करतात, हे समजते. अशा वातावरणामुळे माझ्या सहकाऱ्यांची निर्णय घेतानाची भीती निघून जाते व त्यांची निर्णयक्षमता वाढीस लागते. कधीकधी मीटिंगमध्ये असाही विषय मी चर्चेसाठी ठेवते की, तुम्हाला कोणाला असे वाटते का, घेतलेला एखादा निर्णय चुकला वा त्यांची मुलांशी, सहकाऱ्यांशी वागताना चूक झाली. या चर्चेची सुरुवात मी माझ्यापासून करते. याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. अनेक सहकारी पुढे येऊन प्रामाणिकपणे सांगतात की माझा हा निर्णय चुकला, मुलांशी, सहकाऱ्यांशी वागताना मी उगीचच चिडलो/चिडले किंवा जरूर नसताना आक्रमक झालो/झाले. हेही सांगायला विसरत नाहीत की, पुढच्यावेळी मी ही चूक करणार नाही किंवा अशी परिस्थिती वेगळ्या प्रकारे हाताळेन. या अशा खुलेपणाने चर्चा झाल्यामुळे मी व सहकाऱ्यांमध्ये सामंजस्याचे वातावरण राहाते. याचा परिणाम म्हणून सहकारी आपले काम आत्मीयतेने व आपुलकीने करायला लागतात.
या मीटिंगचा फायदा सहकाऱ्यांमध्ये चांगली मूल्ये पेरून त्यांची विचारांची प्रगल्भता, संवेदनशीलता वाढवण्यासाठी होतो. वाचनाची आवड निर्माण करणे, ध्यानाचे महत्त्व पटवून देऊन ध्यान शिबिरांना पाठवणे, यासाठी होतो. (सध्या मारुंजीला दर शुक्रवारी सकाळी १० दिवसांचे विपश्यना ध्यान शिबीर पूर्ण केलेले माझे सहकारी व मी एक तासाचे ध्यान करतो.) त्यांच्यासाठी संघभावना वाढीस लागावी, संवाद व सामाजिक कौशल्य वाढावे, स्वतःच्या कामातून आनंद कसा घ्यावा, तणावरहित कसे राहावे अशा प्रकारच्या अनेक कार्यशाळांचे आयोजन करणे चालूच असते. नवक्षितिजमधील माझे सहकारी खूप वेगवेगळ्या स्तरामधून व वेगवेगळी शैक्षणिक पात्रता घेऊन आलेले असतात. त्यामुळे ते प्रगल्भ, संवेदनशील झाले तरच विशेष मुलांना आनंदी व छान आयुष्य द्यावे, असे त्यांना स्वतःहून वाटणार आहे. अशी भावना आल्यामुळे माझ्या सहकाऱ्यांचा स्वतःबद्दलचा आदर वाढणार आहे. मला सांगायला आनंद होतोय की, माझ्या सहकाऱ्यांमध्ये ही प्रगल्भता, संवेदनशीलता वाढताना मी अनुभवतेय व यामुळे मला खूप समाधानी वाटतंय. त्यांच्या बरोबरच्या या प्रवासामध्ये माझीही प्रगल्भता व संवेदनशीलता वाढते आहे.
विशेष मुलांबरोबरची विशेष मीटिंग –
मुलांबरोबर स्पेशल संवाद साधताना या भागामध्ये विशेष मुलांबरोबरच्या मीटिंगबद्दल सविस्तर लिहिलेले आहे.
काळजीवाहक साहाय्यकांबरोबर संवाद –
प्रत्येक घरातील त्यातल्यात्यात बरी समज असलेली मुले काळजीवाहकाचा साहाय्यक म्हणून निवडली आहेत. त्यांच्याबरोबर महिन्यातून एकदा मीटिंग असते. अनेक जबाबदाऱ्यांची या साहाय्यकांना जाणीव करून देतो. या साहाय्यकांनी घरातील फॅन, टी.व्ही, रेडिओ यासारखी उपकरणे बिघडली तसेच संडासचा फ्लश नीट चालत नसेल वा कुठल्या संडास, बाथरुम, बेसीनच्या नळाला पाणी गळती असेल ते काळजीवाहक दादा/ताईच्या लक्षात आणून द्यायचे. त्यांच्या घरातील एखादा मुलगा आजारी असेल व त्याला डायनिंग हॉलपर्यंत जाता येत नसेल, तर त्याला घरामध्ये जेवण आणून देणे, घरामधील मुलांची भांडणे तसेच मुलांनी चांगले केलेले काम अशा अनेक गोष्टी काळजीवाहकांच्या लक्षात आणून द्यायला सांगतो. ज्यांना लिहिता येते अशा साहाय्यकांना वह्या दिलेल्या आहेत. यामध्ये त्यांना याच्या नोंदी ठेवायला सांगतो.
काळजीवाहक साहाय्यक म्हणून निवडलेली मुले बॉर्डरलाईनची असतात. या मुलांना आपण मतिमंद मुलांपेक्षा वेगळे आहोत, अशी भावना असते. आपल्याला इतर मुलांपेक्षा जास्त समजते, हेही त्यांना नक्की माहिती असते. या मुलांना इतर मुलांवर दादागिरी करायला आवडते. हीच मुले काळजीवाहकाला सहकार्यही करत नाहीत. यांच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ उडालेला असतो. यांच्या भावनांना सकारात्मक कामाला लावले, तर या मुलांमधील नकारात्मकता कमी होईल व त्यांना आहेत त्या क्षमता वापरायला संधी मिळेल, असे वाटले.
प्रत्येक मीटिंगला मुले मस्त वह्या घेऊन येतात व त्यातील नोंदी वाचून दाखवतात. प्रत्येकजण आपल्या घरातील अडचणी व चांगल्या गोष्टी जमेल तसे सांगतात. या मुलांना या गोष्टीची सतत जाणीव करून द्यायला लागते की, साहाय्यक म्हणून तुमचे काम काळजीवाहकाला व मुलांना मदत करणे हे आहे. असे लक्षात आले की, मनुष्य स्वभावाप्रमाणे काही साहाय्यक मुलांना व काळजीवाहकाला मदत करायला लागले, तसे यांची दादागिरीपण वाढू लागली. अशा साहाय्यकांना समज द्यावी लागते की, जर तुमच्या वागण्याची तक्रार माझ्याकडे आली, तर तुमचे पद काढून घेण्यात येईल. इतर माणसांसारखेच पद जायची भीती यांना पण असते. त्यामुळे ते दादागिरी कमी करून नीट वागायला लागतात.
या मुलांना काळजीवाहक साहाय्यक म्हणून निवडल्याचा व यांच्याबरोबरच्या मीटिंगमध्ये झालेल्या संवादाचा चांगला परिणाम दिसतोय. मुलांचे काळजीवाहकांबरोबरचे नाते सुधारलंय. काळजीवाहकांची सुट्टी असते तेव्हा बदली काळजीवाहकाला हे साहाय्यक चांगली मदत करतात. या मुलांना घरातील सर्व कामे जबाबदारी घेऊन करायला आवडायला लागले आहे व याचा सार्थ अभिमान त्यांच्या वागण्यामध्ये दिसतो. या मुलांमधील दुसऱ्याला मदत करणे, घरातील मुलांची काळजी घेणे. ही भावना वाढीस लागलीय. या सर्वांना घरातील बिग ब्रदर वा बिग सिस्टर अशी भावना आली आहे (मुलांची ही भावना अशीच राहू दे म्हणून काळजीवाहकांना समुपदेशन करावे लागते.) ही भावना त्यांच्या मानसिकतेसाठी व नवक्षितिजमधील वातावरण चांगले ठेवण्यासाठी, उपयोगी पडत आहे.
पालकांबरोबर संवाद –
पालकांबरोबर एकत्र संवाद साधण्यासाठी मीटिंग्ज फार आवश्यक असतात. नवक्षितिजमध्ये सध्या काय चालू आहे? मुलांबरोबर होणारे उपक्रम, येथील दिनक्रम, तसेच प्रत्यक्षात काम करताना येणाऱ्या अडचणी याबद्दल त्यांना वेळोवेळी सविस्तर माहिती असणे गरजेचे असते. कारण झालेले उपक्रम मुले सुसंबद्धपणे सांगू शकत नाहीत, त्यामुळे पालकांच्या मनामध्ये संदिग्धता असते. त्यांच्या बऱ्याच शंका व काळज्या असतात. त्याचे निराकरण करून पालकांना तणावरहित राहाता यावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो व ते या मीटिंगमुळे आम्हाला साध्य करता येते. बऱ्याचदा पालकांच्या मुलांकडून व संस्थेकडून अवास्तव अपेक्षा असतात. अशावेळी पालकांना त्यांच्या अपेक्षा व सत्य परिस्थिती याची स्पष्ट जाणीव वेळोवेळी करून द्यावी लागते. हे सत्य जेवढ्या लवकर ते स्वीकारतील, तेवढ्या लवकर सर्वांचे आयुष्य आनंदी व्हायला मदत होते.
माझ्या सहकाऱ्यांचे विशेषतः काळजीवाहकांच्या कामाचे महत्त्व पालकांना वरचेवर पटवून द्यावे लागते. सहकाऱ्यांशी प्रेमाने व आदराने वागाल तर तसेच आदर व प्रेम तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवणे माझ्या सहकाऱ्यांना सोपे जाईल. असे सांगावे लागते. पालकांना या पुनर्वसनाकडे अपराधी भावनेने न बघता सकारात्मक दृष्टीने बघण्याचे वरचेवर समुपदेशन करावे लागते. मला मनापासून असे वाटते की, मुलांना नवक्षितिजमध्ये ठेवल्यावर पालकांनी मुलांची काळजी न करता आमच्यावर विश्वास ठेवून मजेत घरी राहावे. मी तर वरचेवर सांगते, मुले येथे भरपूर मजा करत असतात तुम्हीपण मस्त मजेत आयुष्य जागा, तरच नवक्षितिज ज्या उद्दिष्टाने काढले, ते उद्दिष्ट पूर्ण होईल. अदितीला नवक्षितिजमध्ये ठेवून आम्ही दोघेही निश्चित आयुष्य जगत आहोत.
वार्षिक ट्रेक वा ट्रिपसाठी स्वतंत्र मीटिंग बोलवावी लागते. कारण सर्वच मुले ट्रिपला येऊ शकत नाहीत. या मीटिंगमध्ये ट्रेक वा ट्रिपचा पूर्ण कार्यक्रम सांगितला जातो. तसेच मुलांबरोबर कपडे काय द्यायचे? खाऊ काय द्यायचा? ट्रिपच्या खर्चाचा अंदाज यावर चर्चा होते. पालकांच्या काही शंका असतात. त्याचे निराकरण या मीटिंगमधून होते. पूर्वी यासाठी जास्त मीटिंग घ्याव्या लागायच्या. पण आता पालकांना पण वार्षिक ट्रेक वा ट्रिप अंगवळणी पडले आहेत. त्यामुळे एकच मीटिंग पुरेशी असते.
याशिवाय एखाद्या मुला-मुलीची वर्तणूक समस्या वाढली असेल वा क्षमता असून काम करत नसेल, तर अशावेळी त्या मुलाच्या पालकाला बोलावून त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जातो.
मी परिस्थितीनुसार पालक व संस्थासंचालक या दोन्ही भूमिकांतून पालकांशी संवाद साधत असते. यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे जाते.
भावंडांबरोबर संवाद –
विशेष मुलांच्या काही ठरावीक भावंडांबरोबरच आमचा संपर्क होता. अनेक भावंडांशी आमचा अजिबात संपर्क नव्हता. माझ्या असे लक्षात आले की, कधी कधी विशेष मुलांचे पालक स्वतःभोवती एक नकारात्मक भावनांची भिंत उभी करतात. आपल्या पाल्याबद्दल अनाठायी अपेक्षा ठेवतात व कितीही समजावले तरी फायदा होत नाही. यामुळे स्वतः नाखुश राहतात. ही नाराजी विशेष मुलांपर्यंत पोहोचवून त्यालाही दुःखी करतात. अशावेळी त्यांच्यापर्यंत आमचे विचार पोहोचवणे अवघड जाते. आम्हाला मुलांबरोबर काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आई-वडिलांनंतर या भावंडांवरच विशेष भावा-बहिणीची जबाबदारी येणार असते. पण बऱ्याचदा आई-वडील हयात असेपर्यंत विशेष भावंडांच्या आयुष्यात काय चाललंय, याची पूर्ण कल्पना या भावंडांना नसते. हा सर्व विचार करून वर्षातून एकदा फक्त भावंडांबरोबर मीटिंग सुरू केली. या मीटिंगमध्ये त्यांना नवक्षितिजच्या वर्षभरातील घडामोडींची माहिती सांगितली जाते. मुलांनी साजरे केलेले सण तसेच केलेले ट्रेक्स्, नवक्षितिजने आयोजित केलेल्या स्पर्धा यांचे व्हिडीओ दाखवले जातात. पुनर्वसन करताना येणाऱ्या अडचणींबद्दल स्पष्ट कल्पना दिली जाते. एखाद्या मुलाला विशेष समस्या असेल व याविषयी आई-वडिलांशी संवाद साधताना अडचण येत असेल, तर त्या भावंडांबरोबर मीटिंग नंतर वेगळा संवाद साधला जातो. भावंडे कुठे मदत करू शकतील, याविषयी चर्चा होते. यावेळी मुले व भावंडे एकत्र संगीत खुर्ची सारखे खेळ खेळतात. मुले भावंडांसमोर पथनाट्य, डान्स खूप अभिमानाने सादर करतात.
याचा चांगला परिणाम दिसून येतोय. सख्खी भावंड नसलेल्या मुलांची आते, मामे, चुलत, मावस भावंडे तर काही मुलांच्या वहिन्या व मेव्हणेसुद्धा मीटिंगमध्ये सहभागी होतात. आता तर काही भावंडे स्वतःहून पुढाकार घेऊन मदतीस पुढे येत आहेत. तर काही भावंडांमधील एक-दोनजण या मीटिंगची जबाबदारी घेऊन भावंडांशी संपर्क साधतात व त्या दिवशीचा कार्यक्रम ठरवतात. हा कार्यक्रम साधारण दोन तासांचा असतो.
मला या मीटिंगसाठी भावंडांचा अजून जास्त प्रतिसाद अपेक्षित आहे. भावंडे कमी यायची काही कारणेही आहेत. काहींची भावंडे परदेशात असतात तर काहींची पुण्यापासून लांब राहात असतात. या मीटिंगचा मुख्य उद्देश त्यांच्या मनामध्ये विशेष भावंडाच्या पुनर्वसनाबद्दल स्पष्टता व सकारात्मकता असावी, हाच आहे. माझा विशेष भाऊ व बहीण चांगले आयुष्य जगत आहेत, हे त्यांनी याची डोळा पाहिल्यामुळे, त्यांची अपराधीपणाची भावना जाते व त्यांचा मानसिक ताण कमी होऊन ते पण आपले आयुष्य आनंदाने घालवू शकतात.
पालक व भावंडांची मीटिंग –
२०१६ पासून आम्ही पालक व भावंडे यांचा एक कोअर ग्रुप तयार केला आहे. यांच्या बरोबर दर तीन महिन्याने एकदा मीटिंग असते. याचा उद्देश हाच की, पालक व भावंडांना नवक्षितिजचे धोरण, उद्देश व कार्यप्रणालीची व्यवस्थित माहिती व्हावी. मुलांबरोबर काम करताना येणाऱ्या अडचणींवर त्यांच्याशी खुली चर्चा करून, त्यातून योग्य तो मार्ग काढता यावा. याबरोबरच सध्या नवक्षितिजमध्ये काय चालले आहे? कुठे मदत हवीय? भविष्यातील योजना यावर चर्चा करता येते. यामुळे विश्वासाचे नाते तयार होते. हे विश्वासाचे नाते अडीअडचणीच्या वेळी फार महत्त्वाची भूमिका बजावते. या भूमिकेतूनच पालक व भावंडांशी संवाद साधला जातो.