
२३. स्वयंसेवक व हितचिंतक
स्वयंसेवकांची मदत घ्यायची हा अनुभव माझ्यासाठी खूप नवा होता. मी, नुपूर व अदिती लहान असताना येरवडा येथील फुलेनगरच्या बालग्राममध्ये व सर्व अपंगांसाठी चालविलेल्या सरकारी वसतिगृहात काही काळ जात असे. डॉक्टरीपेशा बाजूला ठेवून तेथे असलेल्या मुलांचे खेळ घ्यायला, त्यांना श्लोक शिकवायला या वसतिगृहात जात असे. तसेच आठवड्यातून एकदा बालग्राममध्ये डॉक्टर म्हणून रुग्ण तपासायलाही जात असे. पण आता मी नवक्षितिजमध्ये वेगळ्या भूमिकेत होते. स्वयंसेवकांचा सहभाग कुठे व कधी घेऊ शकतो, याबद्दल विचार करून निर्णय घ्यायचा होता. सुरुवातीला त्यांना काम सांगायला वा त्यांच्याकडून काम करून घ्यायला मला संकोच वाटायचा; पण हळूहळू ती भीड चेपली.
हितचिंतकांच्या बाबतीत नवक्षितिज खूप नशीबवान आहे. निवासी कार्यशाळा सुरु केल्यावर अगदी सुरुवातीला वापरलेली ताटे, वाट्यासारखी भांडी, जुन्या, गाद्या, पडदे चादरी, कॉट्स तसेच वापरलेले चांगल्या अवस्थेतील पंखे, फ्रिज, मायक्रोवेव, टी.व्ही. देणारे अनेक हितचिंतक मिळाले. तेव्हा त्याचे मोल खूप मोठे होते.
स्वयंसेवक या शब्दाशी खऱ्या अर्थाने संबंध नवक्षितिज सुरु झाल्यावर व तोही मारुंजीला निवासी कार्यशाळा सुरु केल्यावर आला. स्वयंसेवक हे स्वयंसेवी संस्थांचे अविभाज्य घटक असतात. स्वयंसेवकांना स्वतःला वाटते त्यापेक्षासुद्धा कितीतरी अधिक महत्त्वाची भूमिका, ते पार पाडत असतात. संस्था सुरु केली, त्या संस्था चालकांना, तेथे काम करणाऱ्या सहकाऱ्यांना व लाभार्थींना मानसिक बळ व उभारी देण्याचे काम ते करत असतात. स्वयंसेवकांच्या सहभागाने आपण करत असलेले काम योग्य दिशेने चालले आहे, हा विश्वास संस्था चालकांना येतो.
स्वयंसेवकांमध्येपण प्रामाणिकपणे काम करणारे असतात. तसेच कॉलेजने वा कंपनीने पाठवले म्हणून नाईलाजाने काम करणारे असे प्रकार आहेतच. कर्वे इन्स्टिट्यूट व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी एम.एस.डब्ल्यु. व आय.आय.ई.बी.एम. व इंदिरा इन्स्टिट्यूटचे एम.बी.ए. कॉलेजचे विद्यार्थी एक महिना, पंधरा दिवस वा आठ दिवस प्रत्यक्ष कामासाठी येतात. आम्हाला जिथे मदत हवीय, तिथे मदत करायची त्यांची तयारी असते. यातील बऱ्याच जणांना मतिमंदत्वाबद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे एक तासभर त्यांना हा विषय समजावण्यात जातो. त्यांना नवक्षितिजची फिल्म दाखवून व संस्थेचा फेरफटका मारून नवक्षितिजच्या कामाची ओळख करून दिली जाते. एम.एस.डब्ल्यू.चे विद्यार्थी ज्या मुलांना जास्त मदत लागते व ज्यांना वर्तणूक समस्या जास्त आहेत, अशा एक-दोन मुलांबरोबर काम करतात. यामुळे त्या मुलाला, चांगली भावना तयार व्हायला मदत होते कारण रोज एकाच मुलाला एवढा वेळ देणे माझ्या सहकाऱ्यांना अवघड असते. हे विद्यार्थी विशेष मित्रमैत्रिणींच्या पालकांच्या घरी भेट देऊन आम्हाला जी माहिती हवी असते, याचा तयार फॉर्म नेऊन, यामध्ये सर्व माहिती भरुन आणून देतात. आमच्याकडून पालकांच्या घरी जायच्या राहिलेल्या भेटी यांच्यामुळे पूर्ण होतात.
एम.बी.ए.चे विद्यार्थी नवक्षितिजच्या कार्यशाळेत बनणाऱ्या वस्तूंचे मार्केटिंग करू शकतील, असे वाटत होते. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. एकतर त्यांना तसा वेळ कमी मिळतो व मार्केटिंग करता लागणारे जास्त प्रयत्न करायची त्यांची तयारी नसते. हे मात्र नक्की की, ज्या एम.बी.ए. कॉलेजमधील विद्यार्थी नवक्षितिजमध्ये फील्डवर्क करतात त्यांच्या कॉलेजमध्ये नवक्षितिजच्या स्टॉलवरील वस्तूंची विक्री खूप चांगली होते. हे स्वयंसेवकांचे ग्रुप कार्यशाळेमध्ये वस्तू बनवायला मदत करतात. आय.आय.ई.बी.एम. कॉलेजचा ग्रुप कधीकधी वर्धापनदिन कार्यक्रमासाठी मदत करतो. अगदी मुलांचे कार्यक्रम बसवण्यापासून स्टेजसंबंधी सर्व तयारी व प्रत्यक्षात सादरीकरणाला मदत करतात. स्वतःही एखादा डान्स वा गाणे सादर करतात. यांच्या सहभागामुळे वर्धापनदिन खूप उत्साहात साजरा होतो.
के.पी.आय.टी. सारख्या काही आयटी कंपन्यांमध्ये त्यांच्या इंडक्शन प्रक्रियेमध्येच नवक्षितिजची भेट ठेवलेली आहे. त्यामुळे महिन्यातून एकदा ८० ते १०० या संख्येने हे आय.टी. कर्मचारी येतात व साधारणतः दोन तास नवक्षितिजमध्ये असतात. या दोन तासात ते नवक्षितिज परिसर व नवक्षितिजची फिल्म बघतात. त्यांना नवक्षितिजच्या कामाबद्दल पीपीटीद्वारे सांगितले जाते. अनेक वर्ष मी हे सादरीकरण करत असे. आता मात्र कार्यशाळा व्यवस्थापक वा जनसंपर्क अधिकारी हे करतात. हे होईपर्यंत मुलांची चुळबूळ सुरू झालेली असते, कारण त्यांना त्यांच्यासमोर नाट्य, डान्स व गाण्याचे सादरीकरण करायचे असते. यानंतर वेळ असेल तर क्रिकेट, व्हॉली बॉल व संगीत खुर्ची हे खेळ खेळायचे असतात. सर्वसाधारणपणे असे या कार्यक्रमांचे स्वरूप असते. विशेष मित्रमैत्रिणींना अशा भेटी फार आवडतात. मला असे वाटते, मुलांना या निमित्ताने नवीन लोक भेटतात, ते आवर्जून आम्हाला भेटायला आले आहेत, याचा आनंद वेगळाच असतो. अशा भेट देणाऱ्या ग्रुपसमोर केलेल्या सादरीकरणानंतर ज्या टाळ्या मिळतात, त्यामुळे मुलांचा आत्मसन्मान वाढायला मदत होते. आम्ही अशा भेटींना नेहमी प्रोत्साहन देतो. या भेटींचा आणखी एक फायदा होतो. या स्वयंसेवकांमधील काहीजण स्वतःचा किंवा मित्रमैत्रिणींचा वाढदिवस संस्थेत साजरा करून संस्थेशी जोडले जातात.
ज्या आय.टी. कंपन्यांमधील कर्मचारी नवक्षितिजला भेट देऊन प्रत्यक्ष काम बघून जातात, तसेच ज्या आय.टी. कंपनीमधील कर्मचारी आमच्या ट्रेकिंग, पथनाट्य व पर्वती चढणे अशा कार्यक्रमाचे स्वयंसेवक म्हणून येतात, अशा कंपन्यांकडून मदत जास्त मिळते. कारण त्यांना नवक्षितिजच्या कामाचे स्वरूप कळून अशा कामाचे महत्त्व पटलेले असते. दर महिन्याच्या ट्रेकिंगसाठी मिळणारे आय.टी.च्या स्वयंसेवकांच्या मदतीचे मोल फार मोठे आहे, कारण ट्रेकिंग करताना काही अवघड ठिकाणी सुरक्षितपणे चढण्या व उतरण्यासाठी प्रत्येक मित्रमैत्रिणीला मदत लागते. अशा वेळी या स्वयंसेवकांमुळे पडझड न होता सुरक्षित ट्रेकिंग होते. फायझर व्ही व कॅपजेमिनी कंपनीचे स्वयंसेवक अनेक वर्षे नियमितपणे आमच्याबरोबर ट्रेकिंगसाठी येत आहेत. अनेक आय.टी. व इतर क्षेत्रातल्या कंपन्यांमधील स्वयंसेवक सी.एस.आर. अंतर्गत नवक्षितिजमध्ये स्वयंसेवक म्हणून येतात.
याशिवाय येणारे भारतीय स्वयंसेवक फार कमी. एखाद्या शाळेच्या उत्साही व संवेदनशील मॅडम विद्यार्थ्यांना नवक्षितिजमध्ये आणतात व मित्रमैत्रिणींबरोबर काही उपक्रम करतात. गेली दोन वर्षे इंदिरा शाळेतील एक उत्साही मॅडम तर नववीतल्या मुलांना ओल्या भेळीची तयारी आणायला सांगतात. ही मुले ओली भेळ नवक्षितिजमध्ये बनवतात व लॉनवर विशेष मित्रमैत्रिणींबरोबर एकत्र बसून ओली भेळ खातात. स्टेपिंग स्टोन शाळेचे विद्यार्थीपण अधूनमधून भेटीला येत असतात. एका शाळेमधील मुले तर दिवाळीच्या आधी मुलांबरोबर कार्यशाळेमध्ये मदतीसाठी येत होती. नंतर या मुलांनी कार्यशाळेतील वस्तू नेऊन एका आय.टी. कंपनीमध्ये स्टॉल लावला होता. या अशा भेटींमुळे या शाळेमधील मुलांची समाजामधील दुर्लक्षित मतिमंद या घटकांशी ओळख होते. यामुळे त्यांची संवेदनशीलता वाढायला नक्कीच मदत होते.
गेल्या सात-आठ वर्षांपासून अनेक विदेशी स्वयंसेवक फ्रेंड्स ऑफ वॉल्डरोफ, आयसेक व प्लॅनेट अर्जन्स या संस्थांकडून नवक्षितिजमध्ये येतात. यातील बरेचजण प्रामाणिकपणे, सिन्सिअरली काम करणारे असतात. चायना, हाँगकाँग, कोस्टारिका, इजिप्त, फ्रान्स, इटली, ब्राझील येथील स्वयंसेवक दीड-दोन महिन्यांकरता येतात व खूप काम करून जातात. जिथे मदत लागेल तिथे त्यांची काम करायची तयारी असते. फ्रान्सहून आलेली सॅन्ड्रा ही स्वयंसेवक दहाच दिवस होती. पण ती माझ्या सहकाऱ्यांना डॉक्युमेंटेशन कसे करावे याबद्दल खूप छान शिकवून गेली. त्यामुळे आता पूर्ण डेस्क टॉप फोल्डरने न भरता विषयानुसार डॉक्युमेंट्स डी किंवा ई ड्राईव्हमध्ये असतात. याचा फायदा असा झाला की, हवे ते डॉक्युमेंट पटकन सापडते. २०१७ साली फ्रान्सहून ईस्माईल अली नावाचा स्वयंसेवक जनसंपर्क कसा असावा याबद्दल माझ्या सहकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन गेला. यांच्यामुळे अनेक नवीन गोष्टी समजल्या. नवक्षितिजच्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला अशा कार्यशाळांचा चांगलाच फायदा होतो.
अर्थात, विदेशी स्वयंसेवकांमध्येही काही अपवाद होतेच. इटलीचा एक स्वयंसेवक बोलायला फार गोड पण खूप कामचुकार. त्याला भारतातल्या थोड्या दिवसांच्या वास्तव्यात बरेच काही करायचे होते. इंग्लिश बोलायच्या क्लासला जायचे होते, रात्री पार्ट्या करायच्या होत्या, भारत बघायचा होता व स्वयंसेवक म्हणून काम पण करायचे होते. हे सगळे करायचे असल्यामुळे त्याला संस्थेमध्ये मारुंजीला न राहता शहरात राहायचे होते. त्याने एक सेकंड हँड स्कूटर घेतली होती. तो दुपारी कधीतरी संस्थेमध्ये पोहोचायचा. सगळ्यांना हाय, हॅलो करून थोडेसे काम करायचा. लगेच परत जायची चुळबूळ सुरु व्हायची. असाच जर्मनीचा स्वयंसेवक हा तर दहा महिन्यांसाठी आला होता व हा पठ्ठ्या कोणाशी संवादच साधायचा नाही. थोडेसे उद्धटपणाकडे झुकलेले वागणे असायचे. त्यामुळे तो कोणालाच आवडत नव्हता. रात्रभर लॅपटॉपशी खेळत बसायचा. सकाळी डोळे चोळतच मुलांचा व्यायाम घ्यायचा व दिवसभर डुलक्या घेत मुलांबरोबर कार्यशाळेत थांबायचा, वा काहीतरी कारण सांगून रुममध्ये झोपायचा. हा जेवण पण संस्थेत घ्यायचा नाही. बिस्किट्स, सिरिअलस व वडापाव असेच काहीतरी दिवसभर खायचा. हा एकमात्र अपवाद सोडला, तर इतर जर्मनीहून येणारे स्वयंसेवक नवक्षितिजमधील जेवण कुरकूर न करता आनंदाने घेतात व त्यांच्या या अॅडजस्टमेंटचे मला फार कौतुक वाटते. असो... या स्वयंसेवकावर अमेरिकन संस्कृतीचा प्रभाव होता. त्यामुळे हॉलीवूड फिल्मस्, पॉप म्युझिक त्याला फार आवडायचे व फ... ने सुरु होणारी शिवी त्याच्या संभाषणात अनेकदा यायची. एकदा त्याला सक्त ताकीद दिली की, माझ्यासमोर व संस्थेमध्ये इतरांशी बोलताना सुद्धा तू ही शिवी वापरायची नाहीस. याच्याबरोबर आलेला दुसरा ईलियाझ वागायला इतका गोड होता व सांगेल ते काम करून तो आम्हाला मदत करत होता. यानंतर दोन जर्मन मुली लोटे व जॅकलीन स्वयंसेवक म्हणून आल्या. यापैकी लोटे समजून व सिन्सिअरली काम करत होती. जॅकलीनला सारखे चॅलेंजिंग काम हवे असायचे, तरी आमच्यापरीने आम्ही तिला अनेक चॅलेंजिंग कामे दिली व तिला समजून पण सांगितले की, कार्यशाळेमध्ये विशेष मित्रमैत्रिणींकडून शांतपणे व धीर ठेवून वस्तू बनवून घेणे हे पण एक चॅलेंजच आहे. अशी वस्तू बनवता आल्यावर त्यांना जो आनंद होतो, तो खूप महत्त्वाचा असतो व हा आनंद तू त्यांना देऊ शकतेस व नवक्षितिजचे तेच ध्येय आहे. पण तिला तेवढा धीर व समजूतदारपणा नव्हता. त्यामुळे ती सात महिन्यांतच परत गेली. प्रत्येक स्वयंसेवक हा वेगळी मानसिकता घेऊन आलेला असतो. यानंतर आलेल्या जर्मन स्वयंसेवक मुली लॉरा व मारी यांनी तर खूपच चांगली मदत केली. यामधील लॉरा दिवेकर मावशींकडून मराठी शिकून घेऊन बऱ्यापैकी मराठीमध्ये सर्वांशी संवाद साधत होती. तिचे जर्मन अॅक्सेंटमधील मराठी ऐकताना फार मजा वाटायची. सध्या लीन व अॅना या दोन जर्मन स्वयंसेवक एक वर्षाकरता आल्या आहेत. नवक्षितिजमध्ये दीर्घकाळ वास्तव्य करणाऱ्या स्वयंसेवकांमुळे आम्हाला रोजच्या दिनक्रमात चांगलीच मदत होते. काळजीवाहकांची बदली ड्युटी करणे, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लावलेल्या स्टॉलवर मदतीसाठी जाणे, तसेच संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये यांची मदत होते. इतर देशांमधून आलेल्या स्वयंसेवकांमुळे माझ्या सहकाऱ्यांची वेगळ्या जगाशी ओळख होते. स्वयंसेवकांना असे चांगले मन लावून काम करताना बघून, माझ्या सहकाऱ्यांना अजून चांगले काम करायला प्रेरणा मिळते.
आता मला स्वयंसेवकांकडून कशाप्रकारे काम करून घ्यावे, हे कळायला लागले आहे. यामुळे त्यांना काम केल्याचे समाधान मिळतेच व माझे सहकारी व विशेष मित्रमैत्रिणींना त्यांच्या सेवेचा जास्तीत जास्त फायदा मिळतोय.
वेबसाईट बघून भारतातील काही तरुण, तरुणी खूप उत्साहात फोन करून मदत करायची इच्छा व्यक्त करतात व काहीजण तर भेटायला येण्यासाठी वेळ मागून घेतात, पण बरेच जण भेटायला येतच नाहीत. यायला जमत नाही म्हणून फोन करून कळवायचा शिष्टाचार पण पाळत नाहीत. एखादा स्वयंसेवक पोहोचतो. एक- दोनदा मुलांबरोबर काही अॅक्टिव्हिटी वा ऑफिसमध्ये काम करतो; पण नंतर न सांगता गायब होतो. त्यामुळे स्वयंसेवकांवर अवलंबून राहाता येत नाही. कमिटमेंट व सिन्सिरिटीमध्ये आपले स्वयंसेवक फार कमी पडतात. याला अपवाद म्हणून गेली दोन वर्ष दोन भारतीय स्वयंसेवक आकाश आगरवाल व कुंदन कुमार नियमितपणे दर रविवारी येतात व मुलांना कॉम्प्युटर गेम शिकवतात. मुले या दादांवर अगदी खुश आहेत.
भारतातील शाळांमधील मुलांना नवक्षितिजसारख्या संस्थांची भेट वार्षिक अभ्यासक्रमातच ठेवावी. अशा सामाजिक संस्थांना भेट दिल्यामुळे समाजामधील अशा घटकांबद्दल त्यांना लहान वयातच समजेल. त्यामुळे त्यांची संवेदनशीलता तर वाढेलच, पण मुख्यतः भावनिक समजूतदारपणा वाढेल. याचा सकारात्मक फायदा मुलांना वैयक्तिक आयुष्य जगताना होईल. २०१६ साली आमच्याकडे पाचवीतला दुर्वांकूर हा मुलगा दहा दिवस शाळेतल्या मुलांना मदत करण्यासाठी आला होता. त्याने इतक्या समजूतदारपणे व धीराने काम केले की, मला त्याचे व त्याच्यापेक्षा त्याच्या आई-वडिलांचे खूप कौतुक वाटले. अशा काही उदाहरणांमुळे आपल्याकडील स्वयंसेवेबद्दलचे चित्र बदलेल अशी आशा वाटते.
हितचिंतक –
आम्हाला पहिल्यापासूनच अनेक हितचिंतक मिळाले. आपण काहीतरी नवे काम चालू करताना, हितचिंतक आपल्याला पाठिंबा देतात ही भावना, हा विश्वास खूप मानसिक बळ देणारा असतो.
सुरुवातीच्या काळात सुनील वनारसे या उद्योजकाने असाच आमच्यावर विश्वास दाखवला. त्यांनी त्यावेळी भरीव मदत केल्यामुळेच आमचा विशेष मुलांबरोबर काम करण्याचा उत्साह वाढला. यानंतर सिटी ग्रुप कॉर्पोरेशनचे संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी अनेक वर्षे फंड रेजिंग प्रोग्रॅम अॅमॅनोरामध्ये घेतल्यामुळे, आम्ही असवलीची तीन एकर जागा विकत घेऊ शकलो. दर महिन्याला अनेक लाख कमी पडणारे बजेट असूनसुद्धा यांच्या मदतीमुळे संस्थेची आर्थिक घडी बरोबर बसायला मदत झाली. (अॅमॅनोरामध्ये केलेल्या फंड रेजिंग प्रोग्रॅममध्ये आम्ही फारच कमी मदत करतो. जास्तीत जास्त प्रयत्न श्री. देशपांडे स्वतः व त्यांचे सहकारी यांचेच असतात) यांची अजूनही मदत होतच असते. सध्या विवेक कुलकर्णी हे सिटी ग्रुप कॉर्पोरेशनच्या सी.एस.आर. विभागाचे काम पाहातात. त्यांच्यामुळेही अनेक नवीन हितचिंतक नवक्षितिजशी जोडले गेले आहेत. अनिरुद्ध देशपांडे यांच्यामुळेच प्रसिद्ध नट सचिन खेडेकर व प्रसिद्ध नट व दिग्दर्शक महेश मांजरेकर हे नवक्षितिजशी जोडले गेले. या दोघांनी कोण होईल करोडपतीसारख्या प्रसिद्ध टी.व्ही. कार्यक्रमांमध्ये जिंकलेली रक्कम नवक्षितिजला देणगी म्हणून दिलेली आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीतर्फे दुबईला झालेल्या एका मिफ्ताच्या बक्षिस समारंभामध्ये नवक्षितिजला मोठी देणगी मांजरेकरांमुळेच मिळाली. नवक्षितिजच्या वतीने त्यांनी ती रक्कम स्वीकारली. हे बघून डोळ्यांमध्ये आनंदाने पाणी जमा नाही झाले तरच आश्चर्य. गौरी नाईकनवरेने सुरुवातीला इमारती नूतनीकरण व प्लॅस्टिक मोल्डिंग मशीन करता केलेली मदत अशीच फार मोलाची आहे. पूर्वी मारुंजीला वीज अनेकदा जायची. त्यामुळे मुलांबरोबर सगळ्यांनीच गैरसोय व्हायची. म्हणून सुरुवातीला प्रत्येक घर, कार्यालय व कार्यशाळेमध्ये इन्व्हर्टर बसवले होते. नंतर इन्व्हर्टरचा एकंदर खर्च व मेटेनन्स परवडेना. सर्वानुमते जनरेटर घ्यावा असे ठरले. जनरेटरसाठी Beurckhardt Compression या जर्मन कंपनीने मदत केली, त्यामुळे आता वीज गेली तरी गैरसोय होत नाही. एका आर्थिक दुर्बल मुलाची वार्षिक फी अनेक वर्षापासून ‘ग्राइंड मास्टर मशीन’ या कंपनीमार्फत समीर केळकर (ही औरंगाबादची कंपनी त्याचीच आहे) व तसेच अजून एका मुलाची फी वैयक्तिकरित्या मकरंद दाते देत आहेत. वैयक्तिक वार्षिक मदत देणारे, दर महिन्याला मदत देणारेही काही हितचिंतक आहेत. काही निमित्ताने वस्तू स्वरूप देणगी देणारे हितचिंतक आहेत. आमची निवासी संस्था असल्यामुळे फ्रिज, टी.व्ही., टेपरेकॉर्डर, वॉशिंग मशीनपासून डोअर मॅटस्, डस्टबीन, नॅपकिन्स, पडदे अशा एक ना अनेक वस्तू आम्हाला सतत लागतच असतात. अनेक वर्षांपासून सुधा शर्मा संध्याकाळच्या नाष्ट्यासाठी लागणारे खाकरा, खारी, टोस्ट, फरसाण सारखे पदार्थ देतात.
२००९ नंतर आय.टी. कंपन्यांकडून थोडी थोडी मदत मिळायला सुरुवात झाली. के.पी.आय.टी., कॅपजेमिनी या कंपन्यांनी सुरुवातीला मदत केली. नंतर एमक्युअर, प्राज, फायझर व्ही, निटॉर, जिओमॅट्रिक्स, टाटा मोटर्स या कंपन्यांनी मदत सुरू केली. २०१५ सालापासून फ्लेक्सट्रॉनिक्स ही कंपनी भरीव मदत करत आहे. २०१७ साली बजाज फिनसर व संघवी मुव्हर्स यांनी भरीव मदत केली. हरी ओम काका त्यांना जमेल तशी मदत करत असतात. मेरीटेच कंपनीचे संचालक अभय खानापुरे अनेक वर्षे दर महिन्याला आर्थिक मदत करतात. नचिकेत भटकर मल्टिव्हर्सिटी या त्यांच्या कंपनी अंतर्गत मदत करतात. नितीन पटेल व जयराज आणि कंपनी यांच्याकडून दर महिन्याला काही प्रमाणात किरणाची मदत होते.
२०१२पासुन गांधीभवन रोटरी क्लबकडून भरीव मदत मिळायला सुरुवात झाली. मोटार सायकल, टाटा सुमो गाडी तसेच २८ जण बसू शकतील अशी दिवसभरच्या शाळा, कार्यशाळा व स्वमग्न कार्यशाळेसाठी लागणारी बस व अजूनही लागेल तशी मदत या रोटरी क्लबकडून मिळत असते. २०१७ साली अभय गाडगीळ, पुणे जिल्हा रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झाले. त्यांनी नवक्षितिजला भेट देऊन रोटरी क्लब तर्फे मारुंजी व असवली या दोन्ही ठिकाणी भरीव मदत द्यायचे आश्वासन दिले आहे. याची सुरुवात मारुंजी युनिटसाठी टाटा मॅजिक एक्सप्रेस ही आठ आसनी गाडी देऊन केली. यासाठी लक्ष्मी रोड रोटरी व पुणे रोटरी क्लबने मदत केली. अनेक वर्षे डॉ. सुचेता साठे वार्षिक ट्रेक वा सहलीसाठी तीन आर्थिक दुर्बल विशेष मित्रमैत्रिणींना आर्थिक साहाय्य करत आहेत. याशिवाय नवक्षितिजमधील सर्व निवासी मुलांच्या दातांची तपासणी व उपचार विनामूल्य करत आहेत.
२००७ सालापासून म्हणजे जलसंपदा विभागाच्या मारुंजी येथील वसाहतीमध्ये निवासी कार्यशाळा सुरू केल्यापासून, या विभागातील अधिकारी व इतर कर्मचारी यांचे वेळोवेळी सहकार्य मिळत आहे. त्यांनी त्यांच्या अधिकारकक्षेच्या पलीकडे जाऊन खूप संवेदनशीलतेने व सदभावनेने मदत केली आहे व पुढेही करतील असा आम्हाला विश्वास आहे.
या सर्व स्वयंसेवक व हितचिंतकांच्या मदतीने नवक्षितिजचे काम सुरळीतपणे चालायला मदत होते. यांच्या मदतीमुळे जास्तीत जास्त विशेष व्यक्तींपर्यंत पोहोचायचा प्रयत्न आम्ही करू शकतो. अजूनही अनेक स्वयंसेवक व हितचिंतक आहेत. त्या प्रत्येकाचे नाव पुस्तकात लिहिणे शक्य नाही. अशा सर्व सहृदयी लोकांच्या मदतीमुळेच आमच्यासारख्या संस्था पूर्ण क्षमतेने व्यवस्थित काम करू शकतात. सर्वसाधारण लोकांना सामाजिक संस्था म्हणजे अनाथ व आर्थिक दुर्बल घटकांसाठीच काम करणाऱ्या असतात, असा पक्का समज असतो. त्यामुळे त्यांची मजल जुने कपडे, जुनी खेळणी व खाण्याचे पदार्थ यापुढे जातच नाही.
बऱ्याच जणांना मुलांना खायला देऊन, अन्नदान करून पुण्य कमवायचे असते. आधी फोन करून ठरवले तर व्यवस्थित नियोजन करून मुलांच्या खाण्याच्या वेळेनुसार काय आणायचे ते सांगता येते. वेळ वगैरे ठरवली तरी हे मुलांच्या खायच्या वेळेत येतीलच असे नव्हे. शेवटी आम्ही गेल्या काही वर्षापासून बाहेरून आणलेले अन्नपदार्थ घेणे बंद केले. मुलांच्या आरोग्यासाठी पण असे पदार्थ खाणे चांगले नाही. हल्ली आम्ही फळे आणायला सांगतो वा एखादा पदार्थ द्यायची फारच इच्छा असेल, तर आमच्या जवळील विश्वासातल्या श्रावणी हॉटेलमध्ये त्यांना ऑर्डर द्यायला सांगतो. मला वाटते अन्नदान करून पुण्य कमावणे या विचारसरणीतून बाहेर पडून, संस्थेला कशाची गरज आहे हे विचारून, त्याप्रमाणे मदत करावी. म्हणजे लाभार्थींना त्याचा फायदा होऊन त्यांचे जीवनमान सुधारेल. काही व्यक्तींना मुलांच्या हातातच पदार्थ द्यायचा असतो व त्यांना लगेच खायला लावायचा असतो. ‘मुलांची ही खायची वेळ नाही. कार्यशाळेत मुलांना खायचे पदार्थ द्यायचे नाहीत.’ असे व्यवस्थापक वा समन्वयक यांनी सांगितले, तरी ते ऐकत नाहीत. त्यांना सांगायला गेले की ‘आणलेला पदार्थ वा फळे ऑफिसमध्ये जमा करून पावती घ्या, मुलांच्या खाण्याच्या वेळेला मुलांना आम्ही ते देऊ’ तर अशावेळी ते ऐकायच्या मनःस्थितीत नसतात. आम्ही खूप लांबून आलो आहोत. माझ्या आईची, वडिलांची वा नवऱ्याची आजच जयंती वा पुण्यतिथी आहे, म्हणून आताच आमच्यासमोर मुलांना खायला द्या, कारण आम्हाला थांबायला वेळ नाही असे म्हणतात. अशा वेळी त्यांना आवरणे अवघड जाते.
काही हितचिंतक आम्हाला हवे ते सामान स्व-खर्चाने नवक्षितिजमध्ये पोहोचवतात. पण काही हितचिंतक आम्हाला हव्या असलेल्या सामानाबरोबरच घरात नको असलेले सगळेच सामान आमच्याकडे आणून टाकतात, एकदा एका हितचिंतकाने लाकडी दिवाण दिला. त्याला ढेकूण होते. दर महिन्याला पेस्ट कंट्रोल करत असूनही ढेकूण कसे झाले, हेच कळत नव्हते. या दिवाणामुळे ढेकूण झाले आहेत, हे कळायला बराच वेळ लागला. या ढेकणांचा नायनाट करताना सगळ्यांना खूप मनस्ताप, त्रास व अनेक हजार रुपये खर्च करावे लागले. तसेच इलेक्ट्रॉनिकच्या जुन्या वस्तू थोडे दिवस नीट चालतात; पण त्या वस्तू बिघडल्या की दुरुस्तीचा खर्च आम्हाला परवडत नाही. या सर्व अनुभवांतून शहाणे होत आम्ही हल्ली जुने सामान घेणे शक्यतो टाळतो.
आमच्या नशिबाने अनेक सहृदयी व संवेदनशील स्वयंसेवक व हितचिंतक नवक्षितिजशी जोडले गेलेले आहेत. या सर्वांच्या आमच्यावरील प्रेमामुळे, त्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आम्हाला काम करायला उत्साह येतो व यांच्यामधील सकारात्मक ऊर्जेने विशेष मुलांचे आयुष्यपण उजळून निघते.