
२६. भविष्यातील योजना
भविष्यातील योजनांचा विचार करताना या वर्षामध्ये असवलीमध्ये पक्क्या घरांचे बांधकाम सुरु करणे, हा विचार प्रामुख्याने पुढे येतो. यासाठी अनेक पातळ्यांवर मदत लागणार आहे. ती मदत मिळविण्यासाठी हितचिंतकांना भेटणे हे महत्त्वाचे काम या वर्षात करायचे आहे. जसे बांधकाम होत राहील त्याप्रमाणे मुलांना प्रवेश देणे, त्या प्रमाणात मुलांच्या मदतीकरता सहकारी वाढवणे व हे करताना सगळ्यात महत्त्वाचे, मारुंजीसारखीच सिस्टिम इथे बसेल याची काळजी घेणे. मला खात्री आहे असवली घराची चांगली सिस्टिम लवकर बसेल कारण आम्ही कुसगावचे घर जवळजवळ दोन वर्षे यशस्वीपणे चालविले होते.
लहान मुलांच्या पालकांशी संवाद साधायचा आहे. विशेष मुलाला वाढवताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा, त्यांना जास्तीत जास्त प्रेम देऊन सुरक्षित भावना देऊन स्वावलंबी कसे बनवावे, फाजील लाड न करता त्यांना शिस्त कशी लावावी व सर्वात महत्त्वाचे त्यांच्या भविष्याचे नियोजन कसे करता येईल? व ते का करणे गरजेचे आहे? या व याशिवाय अनेक विषयांवर पालकांशी चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन करायची इच्छा आहे. अन्य पालकांना, कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना नवनव्या कल्पना राबवून बघण्यास प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्याबरोबर संवाद वाढवायचा आहे. यामुळे अनेक पालकांचे आयुष्य सुसह्य होईल व विशेष मुलांनाही चांगले आयुष्य मिळू शकेल.
एक्सचेंज प्रोग्रॅमसाठी जास्त संस्थांमार्फत पोहोचायचे आहे. या प्रोग्रॅमचे महत्त्व त्यांना पटवून द्यायचे आहे. १४ वर्षांवरील विशेष मुलांसाठी असलेली ‘हॉलिडे होम’ ही संकल्पना जास्त पालकांपर्यंत पोहोचवायची आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणली तर मुलांच्या भविष्यातील पुनर्वसनाला कसा फायदा होतो, हे पालकांना समजावून द्यायचे आहे. पालकांना नवक्षितिजसारखी निवासी कार्यशाळा काढण्यासाठी प्रोत्साहित करून मार्गदर्शन करायचे आहे. मी अदितीच्या बाबतीत हे केलेले असल्यामुळे माझा या संकल्पनेवर विश्वास आहे.
काळजीवाहकांसाठी सुरु केलेल्या कोर्ससाठी जास्त संस्थांनी कर्मचारी पाठवावेत, यासाठी प्रयत्न करायचा आहे. मुलांच्या निवासी कार्यशाळा चालवताना अनेक स्तरावर अडचणींचा सामना संस्थाचालकांना करावा लागतो. नियमित भेटल्यामुळे संस्थाचालकांमधील सुसंवाद वाढेल व एकमेकांना अडचणीच्यावेळी मदत करायची भावना वाढीला लागेल. यासाठी निवासी कार्यशाळेच्या संस्थाचालकांनी नियमित भेटावे, याकरता प्रयत्न करून याचे महत्त्व त्यांना पटवून द्यायचे आहे.
इंग्लिशमध्ये असलेली कार्यप्रणाली मार्गदर्शिकेचे (ऑपरेशन मॅन्युअल) मराठी भाषांतर छापून, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. कार्यप्रणाली मार्गदर्शिकेचा वापर कसा करावा? याबाबतीत इतर संस्थांतील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही कार्यशाळा घ्यायच्या आहेत.
शाळेचा विस्तार करायचा आहे. शाळा व स्वमग्न मुलांसाठीची कार्यशाळा, याची घडी अजून नीट बसवायची आहे. निवासी कार्यशाळेच्या सिस्टिम अजून व्यवस्थित बसवायच्या आहेत. नवक्षितिजचे फंड रेजिंगचे काम सातत्याने व कार्यक्षमतेने होण्यासाठी, या क्षेत्रातील तज्ज्ञाची मदत घ्यायची आहे.
या सगळ्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेकांची मदत लागणार आहे. आतापर्यंत जसे तुमचे संवेदनशील सहकार्य मिळाले तसेच पुढेही मिळेल, याची मला खात्री आहे.