
१.अदिती व नवक्षितिजचा जन्म
अदिती नवव्या वर्षापासून दामले आजींकडे लॉ कॉलेज रोडला गाण्याच्या क्लासला जाऊ लागली. अजूनही ती फारशी बोलत नव्हती. या क्लासला पाठवण्याचा उद्देश हाच होता कि,गाणे कानावरून गेले तर तिला शब्द उच्चारायला मदत होईल. जेन म्हणून एकजण डान्सचा क्लास हडपसरमध्ये रामटेकडी भागात घेत, असे कळले. मग मी व अदितीचे बाबा जेनला भेटायला गेलो. तिला अदितीबद्दल पूर्ण कल्पना दिली व क्लासला प्रवेश देशील का? असे विचारले. ती लगेच तयार झाली. या क्लासमुळे अदितीला नॉर्मल मुलांबरोबर समाजात मिसळायची संधी मिळणार होती व डान्समुळे शारीरिक हालचाली नियंत्रित होण्यास मदत होईल, असे वाटले. हे दोन्ही क्लास घरापासून लांब होते, पण अदितीचे बाबा आठवड्यातून एकदा न कंटाळता नियमितपणे पाच-सहा वर्षे तरी तिला घेऊन जात होते. हे सर्व करताना आपण अदिती करता जे जे करणे शक्य आहे, ते आपण करतोय याचे समाधान आम्हाला होते. आईबाबा आपल्यावर खूप प्रेम करतात ही भावना तिच्यापर्यंत पोहोचणे मला फार गरजेचे वाटत होते. कारण विशेष मुले भावनिकदृष्टयासुद्धा खूप कमजोर असतात. तिला सुरक्षिततेची भावना देणे मला फार गरजेचे वाटत होते, कारण त्याचा फायदा तिच्यामध्ये सुधारणा, प्रगती होण्यामध्ये होणार होता. हे सर्व करताना ती नॉर्मल होईल असे वाटत नव्हते, पण तिच्यामध्ये आहेत त्या क्षमतातरी पूर्ण बाहेर याव्यात, असे नक्की वाटायचे.
हिमालायामधील मनाली जवळील सोलंगनाला व्हॅलीमध्ये अदितीला पॅरॅग्लायडिंग करताना बघून डोळे अतिआनंदाने पाणावले. अदितीपण खूप धाडसीपणाने हा अनुभव घ्यायला उत्सुक होती. मला याचे अप्रूप वाटत होते. त्याचे कारणही तसेच होते. कारण अदिती हि आमची विशेष मुलगी आहे. मन एकदम भूतकाळाकडे धाव घेऊ लागले. ४ नोव्हेंबर १९८७ हा अदितीचा जन्मदिवस. अदिती ‘ब्लू बेबी’ म्हणूनच जन्माला आली. म्हणजे अदितीला जन्माच्या वेळेला प्राणवायू कमी पडला, तिच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला. त्यामुळे ती जन्मल्यानंतर लगेच रडली नाही. तेव्हाच माझ्या मातृहृदयात शंकेची पाल चुकचुकली. ती बरेच दिवस इनक्युबेटरमध्ये होती. दुध न पिणे व सारखे रडणे चालूच असायचे. अदितीला जन्मानंतर एकोणिसाव्या दिवशी काय झाले होते, हे शेवटपर्यंत कळलेच नाही. अदिती सलग अठ्ठेचाळीस तास रडली व अठ्ठेचाळीस तासांनंतर स्वतःहूनच रडायची थांबली. वाढीचे टप्पे नेहमीच्या मानाने मागेच होते. आतापर्यंत अनेक बालरोगतज्ज्ञांना दाखवून झाले होते. प्रत्येकजण म्हणायचे, अशक्त आहे त्यामुळे वाढीचे टप्पे मागे आहेत, ताकद आली कि होईल सुधारणा. दीड वर्षांनंतर मात्र पुण्यामधील केइएम हॉस्पिटलच्या टीडीएच सेंटरला घेऊन गेलो. तिथे सर्व अपंग मुलांची तपासणी व थेरपीजची सोय आहे व अपंग मुलांच्या पालकांना मार्गदर्शन मिळते. अपंग मुलांच्या विकासासाठी खूप चांगले काम येथे चालते. तिथे रक्त-लघवी तपासण्या झाल्या. ते सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. मग बुद्ध्यांक काढायचा प्रयत्न केला व यामध्ये बुद्ध्यांक कमी आहे याच्यावर शिक्कामोर्तब झाले. येथूनच आयुष्याला एकदम वेगळे वळण मिळाले.
ऑक्युपेश्नल थेरपी, स्पीच थेरपी, हँड आय कोऑर्डीनेशन चांगले व्हावे, मेंदूला स्टिम्युलेशन मिळावे यादृष्टीने खेळ व व्यायाम घेणे (ब्रेन जिम) सुरु झाले. टीडीएच सेंटरमधील भारती पाटील मॅडम खूप चांगले मार्गदर्शन करत होत्या. दिवसातून दोन ते तीन वेळा हे व्यायाम घ्यायचे होते. या बरोबरच अॅक्युप्रेशर व आयुर्वेदिक औषधे होतीच. वैद्य नानल यांनी सांगितलेल्या आयुर्वेदिक तेलाने दिवसातून दोन वेळा मसाज सुरूच होता. उजव्या व डाव्या मेंदूचा समन्वय चांगला व्हावा, म्हणून ब्रेनजिमचे व्यायाम दिवसातून दोन वेळा सुरूच होते. हे सर्व करता करता दिवस कधी सुरु व्हायचा व कधी संपायचा हे कळायचेच नाही. कोणाकडून तरी असे समजले की, ग्लेन डोमान म्हणून अमेरिकन डॉक्टर आहेत यांची अमेरिकेत फिलाडेलाफिया येथे इन्स्टिटयूट आहे. त्यांचे पुस्तक ‘हाऊ टू टीच युअर ब्रेन डॅमेजड् चाइल्ड’ पुण्यामध्येच मिळू शकेल. हे कळल्यावर फार आनंद झाला. अदितीच्या बाबाने, शेखरने ते कुठूनतरी मिळवले. या पुस्तकातील मार्गदर्शनाप्रमाणे गणित व भाषा अदितीस शिकवणे सुरु केले.
रोज दुपारी हि कार्डस् दाखवून अभ्यास घेणे सुरु असायचे. याशिवाय समाजामध्ये मिसळायची सवय व्हावी, म्हणून अडीच वर्षांपासूनच तिला पाळणाघरात ठेवायला लागलो. घरी अदितीस सांभाळणाऱ्या मावशी होत्याच, परंतु इतर मुलांचे बघून अजून काही गोष्टी शिकेल असे वाटल्याने, घराजवळच असलेल्या घरगुती पाळणाघर चालवणाऱ्या पाटणकरताईंकडे सकाळी थोडावेळ सोडायला लागलो. मी सकाळी दवाखान्यात जाताना सोडून जायची व येताना घरी घेऊन येत असे. अदितीस भरपूर वेळ देता यावा, म्हणून मी कमी वेळ प्रॅक्टिस करत असे. अदितीस तोपर्यंत चालता येत नव्हते, फक्त उभे राहता येत होते. मी तिला दोन पायांच्यामध्ये उभी करून कसरत करत स्कुटरवरून घेऊन जात असे. पाटणकर ताई तिचे फार प्रेमाने करायच्या. त्यांच्या घरचे लोक व आजूबाजूला राहाणारे लोकसुद्धा अदितीशी फार प्रेमाने वागायचे, तिच्याशी खेळायचे. तोपर्यंत अदितीस शी, शूचे नियंत्रण नव्हते. अदिती लहान असतानासुद्धा दिसायची फार गोड व जात्याच मिस्किल, खोडकर स्वभाव. त्यामुळे तिचे अस्तित्व सर्वांनाच सुखकर वाटायचे. त्या काळात आमच्या शेजारी चांदेकर कुटुंबीय राहात होते. त्यांच्यामुळे अदितीचे लहानपण फार सुखद गेले. अदिती त्यांच्याकडे खूप वेळ असायची. त्यांच्या मुली व काका, काकू तिच्याशी खूप प्रेमाने वागायचे. यामुळे आम्हालापण छान वाटायचे. अदितीला त्यांनी असे प्रेमाने स्वीकारणे त्यावेळच्या आमच्या मानसिकतेसाठी फार उत्साहवर्धक होते. चांदेकर काकूंना तर अदिती आईच म्हणायची.
माझे सासू-सासरे पण अदितीवर खूप प्रेम करत होते. खरं म्हणजे आमचे सर्वच नातेवाईक माझे दोन्ही भाऊ, वहिन्या, नणंद व इतर नातेवाईक यांचे भरपूर प्रेम तिला मिळाले. मला येथे म्हणावेसे वाटते की, आईवडिलांचे विशेष मुलांशी वागणे, त्यांचे त्याला मनापासून स्वीकारणे यावर इतरांचे विशेष मुलांशी वागणे अवलंबून असते. माझे सासरे निवृत्त झालेले होते व नेत्रदान मंडळ, स्वरूपवर्धिनी, तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांचे पुनर्वसन यासारखे बरेच समाजकार्य करत होते. पण संध्याकाळ त्यांनी खास अदितीकरता राखून ठेवलेली होती. संध्याकाळी अदितीला सांभाळायला जोशी आजी यायच्या. त्या आल्या की मी दोन तास दवाखान्यात जाऊन येत असे. त्यामुळे मलाही जरा बदल व्हायचा. त्यावेळी मला काहीजणांनी सुचविले होते की, प्रॅक्टिस बंद करून पूर्ण वेळ अदितीकडे लक्ष दयावे. पण मला स्वतःला ते फारसे पटले नाही. थोडावेळ स्वतःला आवडणारे काम केल्यामुळे मी अदितीचे जास्त प्रेमाने व जागरूकपणे कर शकेन, असे मला वाटले व तो निर्णय योग्यच होता हे कालांतराने अदितीच्या प्रगतीवरून सिद्धही झाले.
अदिती साडेतीन वर्षांची झाल्यावर तिला घराजवळच असलेल्या ‘बॅबीनो’ या इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घालायचे ठरवले. याचे कारण असे होते की, तेव्हा आमच्या संपर्कामध्ये इंग्लिश बोलणाऱ्या व्यक्ती खूप होत्या. अदितीला ही भाषा समजण्याला अडचण येऊ नये, हा त्या निर्णयामागचा उद्देश. वर्मा मॅडम यांनी सुरु केलेली ही बालवाडी होती. त्या स्वतः खूपच संवेदनशील होत्या. त्या व त्यांचे इतर सहकारी अदितीला छान संभाळून घ्यायचे. शाळेतील सर्व कार्यक्रमात तिचा सहभाग असायचा. सकाळी साडेनऊ ते साडेबारा असे तिचे रुटीन सुरु झाले. इथे ती तीन वर्ष होती. आता अदितीची शाळा बदलायला हवी होती, कारण इतर मुलांच्या मानाने तिचे वयही जास्त होते. वर्मा मॅडम काही म्हणत नव्हत्या, पण आम्हाला ते काही प्रशस्त वाटेना.
मला नेहमी असे वाटते आम्ही दोघे डॉक्टर असल्यामुळे अनेक ठिकाणी फायदा व्हायचा, पण त्याचा गैरफायदा आम्ही घेत नव्हतो. परत शाळेचा शोध सुरु झाला व इनक्लूझिव एज्युकेशन असलेल्या कँपमधील भोजवानी शाळेमध्ये अदितीस घालायचे आम्ही ठरवले. या शाळेमध्ये एका वर्गात मुले कमी असायची व प्रत्येक वर्गात एक व दोन विशेष मुले असायची. या शाळेत ती दोन वर्षे होती. पण आमच्या लक्षात येऊ लागले की, इथे तिची प्रगती न होता आपण इतरांपेक्षा कमी आहोत ही भावना वाढू लागली. एकंदरच शाळेतील वातावरण विशेष मुलांसाठी फारसे पोषक नव्हते. ‘इनक्लूझिव्ह एज्युकेशन’ सरकारची ही योजना कागदावर खूप चांगली वाटते. या योजनेचा उद्देश असा आहे, विशेष मुलांना नॉर्मल मुलांच्याच शाळेत घालावे, त्यामुळे त्यांना सर्व सोयींचा लाभ घेता येईल व चांगला बुद्ध्यांक असलेल्या मुलांबरोबर राहिल्याने, त्यांच्यामध्ये चांगली सुधारणा होईल. माझ्या अनुभवावरून मी सांगू शकते की, प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. एकतर शाळेमध्ये पुरेसे विशेष शिक्षक नसतात. इतर विद्यार्थ्यामध्ये व शिक्षकांमध्ये विशेष मुलांना समजून घ्यायची संवेदनशीलता नसते. त्यामुळे विशेष मुलाला व त्याच्या कुटुंबीयांना या योजनेचा फारसा फायदा होताना दिसत नाही. काही मोजक्या ठिकाणी चांगले काम चालूही असेल. पण बहुतांशी अशा शाळांमध्ये विशेष मुलांना ( विशेषतः मतिमंद ) फायदा होताना दिसत नाही.
अदिती साडेसात वर्षांची झाल्यावर मात्र आम्ही आमच्या आयुष्यातील कठीण, पण योग्य निर्णय घेतला. आदितला प्रिझम फाउंडेशन संचलित, लार्क या घरापासून खूप लांब प्रभात रोडजवळ असलेल्या शाळेत घातले. इथे ती चांगली रमली. शाळेमधील सर्वच शिक्षक मुलांच्या प्रगतीसाठी मनापासून प्रयत्न करायचे.
वयाच्या पाचव्या वर्षी आम्ही अदितीस पोहायला शिकवायचे ठरवले. तिच्या बाबांनी खूप प्रयत्नपूर्वक तिला पोहायला शिकवले. बोटक्लबच्या जलतरण तलावामध्ये अदिती पोहायला शिकली. हा क्लब आमच्या विमानतळाजवळील घरापासून त्यातल्या त्यात जवळ होता व या क्लबचे आम्ही सभासद पण होतो. पोहायला शिकताना पहिला महिना अदिती पाण्यामध्ये असेपर्यंत पूर्ण वेळ रडत असे. आजूबाजूला पोहणाऱ्या लोकांना याचा त्रास व्हायचा, पण आम्ही त्याकडे जरा दुर्लक्षच करायचो. मी तिला नेटाने नेत होते व बाबा नेटाने शिकवत होते. तिला तरंगता यायला लागल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. तो दिवसा मला आजही नीट आठवतोय. तिचा स्टॅमिना जबरदस्त होता. मी तिला रोज सकाळी जवळजवळ आठ ते दहा वर्षे पोहायला नेत होते. तिला रोज पोहायला नेता यावे, म्हणून मी स्वतः चौतिसाव्या वर्षी पोहायला शिकले. अदितीला पोहायला फार आवडायला लागले. तिला पोहताना पाहणे आम्हालाही फार आनंददायी वाटायचे लार्क शाळेमध्ये गेल्यावर तिने पोहण्याच्या स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली. पुण्याबाहेर पण स्पर्धांसाठी जाऊन नॅशनल स्तरावर ब्राँझ मेडल मिळवले. अदितीला बक्षीस देणारा व तो समारंभ बघणारा दोघेही सुखावून जायचे. आमच्या डोंघांच्या डोळ्यांत हमखास आनंदाश्रू हजेरी लावून जायचे. त्या रात्री मग बोटक्लबला पार्टी तर ठरलेलीच असायची. हा काळ आम्हीही फार एन्जॉय केला.
अदितीचे आयुष्य आनंदी व्हावे, म्हणून मी सतत प्रयत्न करत असे. हे करताना मलाही खूप आनंद व्हायचा. साध्या गोष्टी, मी जिना उतरताना दोन पायऱ्या एकदम उतरायची व शेवटच्या पायरीवरून उडी मारायची. हे बघून अदिती एवढी खळखळून हसायची, की तिचे हे हसणे बघण्यासाठी मी हे अनेकदा करत असे. अदितीला सांभाळण्यासाठी काही दिवस आमच्याकडे एक मुलगी राहात होती. कधीकधी ती ताई, मी व अदिती घराजवळ असलेल्या मैदानामध्ये पिकनिकला जायचो. थर्मासमध्ये कॉफी, खायला थोडी भेळ व खेळण्यासाठी चेंडू असे घेऊन आम्ही जायचो. अदितीला पिकनिक खूप आवडायची. पावसाळ्यात मी व अदिती छत्री न घेता मस्त पाऊस अंगावर घेत लोहगाव रस्त्याला फिरायला जायचो. त्या रस्त्याला लागुनच पावसाळ्यात छोटा ओढा तयार होत असे. आम्ही त्या ओढयामध्ये बसायचो. या ओढयामध्ये बसून आम्ही वरून पडणाऱ्या पावसाची मजा घ्यायचो, आकाशात घिरटया घालणारी विमाने बघायचो, रस्त्यावरून जाणारी वाहने व माणसे बघायचो. खूप धमाल यायची. हे असले उदयोग अदितीला फार आवडायचे.
मी, नुपूरला (अदितीची मोठी बहीण ) घेऊन रोहतांग पासला ट्रेकला जायचे ठरविले. नुपूर तेव्हा आठ वर्षाची होती. अदिती तेव्हा पाच वर्षांची होती. आम्ही सर्वजण सिंहगडला ट्रेकिंगच्या प्रॅक्टिसला जायचो. मी व शेखर अदितीला दोन्ही हाताला धरून पूर्ण गड चढवायचो, कारण अदिती तोपर्यंत जेमतेम चालत होती व जरासा जरी चढ-उतार आला, तर ती तोल जाऊन पडत असे. पण पठ्ठी ट्रेक पूर्ण करायची व तो पूर्ण केल्याचे समाधान व अभिमान तिच्या देहबोलीतून जाणवायचा, कारण तोपर्यंत ती बोलत नव्हती. पण पठ्ठी पूर्ण अंतर चालायची व उतरायची अर्थात आमच्या मदतीने, पण तिची जिद्द असल्यामुळेच हे शक्य होते. घरी आलेल्या सगळ्यांना जमेल तसे बोलून सांगायची की, मी चढून गेले. मग आम्ही कोणीतरी त्यांना सविस्तर वृत्तांत दयायचा. ही तिची सवय अजूनही तशीच टिकून आहे. तिच्या दृष्टीने महत्वाचे घडलेले प्रसंग तिला भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगायचे असतात, पण स्पष्ट बोलता येत नाही. मग एखादा शब्द सांगायचा व आजूबाजूला बघून बोलणाऱ्या व्यक्तीला म्हणायचे सांगा ना. आम्ही तिला गमतीने म्हणतो की, अदितीला तिची बाजू मांडायला सारखा वकील लागतो.
साधारण पाचव्या वर्षी तिच्या टॉयलेट ट्रेनिंगसाठी विशेष प्रयत्न सुरु केले. वरचेवर तिला शूला घेऊन जाणे, ठरावीक वेळी शी, शू करायला पाठवणे, केली नाही तरी न कंटाळता संडासाबाहेर बसून राहाणे व तिला समज देणे की, शी केल्याशिवाय व स्वत:ला स्वच्छ केल्याशिवाय बाहेर यायचे नाही. कधी कधी खूप दंगा करायची. एकदा मला माझी आई म्हटलेली आठवतेय ‘अग,पुढे शिकेल ती,आताच कशाला एवढी शिस्त लावतेस?’ पण मला वाटायचे योग्य वयात या गोष्टी शिकवायलाच हव्यात. पुढे नवक्षितिज सुरु केल्यावर तर या गोष्टीचे महत्त्व अजून पटले. कारण अनेक प्रौढ विशेष मुले क्षमता असूनसुद्धा केवळ योग्य वयात त्यांना टॉयलेट ट्रेनिंग न मिळाल्यामुळे पुनर्वसनामध्ये गहन प्रश्न निर्माण करून ठेवतात. विशेष मुले एखादी गोष्ट शिकायला बरीच वर्षे घेतात. चिकाटी, धीर ठेवून व कल्पकता वापरून त्यांना न कंटाळता शिकवत राहायचे असते.
अदिती बरोबर दरआठवडयाला थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघ णे, मग मध्यंतरामध्ये पेप्सी व पॉपकॉर्न खाणे ठरलेले असायचे. दर रविवारी बोटक्लबला संध्याकाळी पोहणे व त्यानंतर जेवण, कित्येक वर्ष नेमाने सुरु होते. बोटक्लबची मेंबरशिप मिळण्याआधी आम्ही अनेकदा तिला बंडगार्डनच्या बागेत घेऊन जात होतो. तिथे मेरी गो राउंडसारख्या चक्रात बसणे, घोडयावर बसणे, घसरगुंडी खेळणे व याबरोबरच भेळ व मक्याचे कणीस खाणे ठरलेलेच. हे असे बदल अदितीला फार आवडायचे. सर्व कौटुंबिक कार्यक्रमांना अदितीला आम्ही आवर्जून न्यायचो. आमचे सर्वच नातेवाईक तिच्याशी फार प्रेमाने वागायचे. ती आठ-नऊ वर्षांची झाल्यावर एखादा-दुसरा दिवस आत्याकडे, मामाकडे राहायला मी तिला पाठवत असे. ती माझ्यावर सतत विसंबून राहू नये, माझ्याशिवाय एकटे राहायची तिला सवय व्हावी व ती स्वावलंबी होण्यास पण यामुळे मदत होईल, असे मला वाटायचे. आत्या व माम्यापण समजून तिचे प्रेमाने करत असत, कारण तोपर्यंत शू, शीचे तिचे नियंत्रण चांगले नव्हते व तिला नीट सांगताही यायचे नाही.
सात-आठ वर्षांनंतर तिचा आत्मविश्वास वाढावा म्हणून तिला नेहमीच्या किराणामालाच्या व भाजीच्या दुकानात पाठवायला लागलो. त्या दुकानदारांशी आधी बोलून ठेवायचो. अदितीकडे एक पिशवी, काय आणायचे आहे हे लिहिलेली चिठ्ठी व पैसे द्यायचो. तीपण खुशीत जात असे. आम्ही कोणीतरी तिच्यामागे तिला दिसणार नाही असे जात असू. सुरुवातीला ती दुकानात लाजून मागे उभी राहात असे, पण हळूहळू आत्मविश्वास वाढल्यावर पुढे जाऊन चिठ्ठी द्यायला लागली व सांभाळून सामान घरी आणू लागली. अजूनही अदिती फारशी बोलत नसे. आमच्याशी एखादया दुसऱ्या शब्दांतून संवाद साधत असे, परंतु बाहेरच्यांशी एक शब्दही बोलत नसे. ती बोलावी म्हणून आम्ही विशेष प्रयत्न करतच होतो. भांडारकर रोडला एके ठिकाणी आठवडयातून दोन दिवस स्पीच थेरपीसाठी नेत होतो. घरी तिला वेगवेगळे शब्द दाखवून तिचे शब्दभांडार वाढवायचा माझा प्रयत्न सुरूच होता. माझी अशी ठाम धारणा होती की, हे शब्द कुठेतरी रजिस्टर होत आहेत. याचा फायदा पुढे नक्की दिसेल. तिने बोलावे म्हणून आम्ही काही वर्ष पोपटसुद्धा पाळला होता. पोपटाची बडबड ऐकून तरी हिला बोलावेसे वाटेल, असे वाटायचे. याचवेळी आम्हाला एकाने सांगितले की, इंदापूरजवळ एक बाबा झाडपाल्याची औषधे देतो. त्यामुळे अनेक विशेष मुलांमध्ये चांगली प्रगती होत आहे. त्यावेळी मानसिकता अशी होती की, अदितीमध्ये फरक व्हावा म्हणून आम्ही सर्वप्रकारे प्रयत्न करायला तयार होतो, इथे आम्ही डॉक्टर नसून पालक या भूमिकेत होतो. मी, अदिती व शेखर रविवारी पहाटे निघायचो. बरोबर सँडविच वा पोळीला तूप-साखर लावून घ्यायचो व थर्मासमध्ये कॉफी. इंदापुरला औषधे घेऊन झाली, की परत येताना साधारण साडेनऊ- दहा वाजलेले असायचे. यावेळेपर्यंत भूक लागलेली असायचीच, मस्त एखादया शेतात बसून नाश्ता करायचो. नंतर परतीचा प्रवास चालू करायचो. अशी आमची छानपैकी पिकनिक पण व्हायची.
अदितीचा स्वभाव मुळातच मिस्किल व अॅडजेस्ट करण्याचा. तिला सारखेच भुर्र जायला हवे असायचे. मला आठवतय अदिती तेव्हा सात-आठ वर्षांची असेल. रात्री झोपत नव्हती व भुर्र जायचे म्हणत होती. रात्रीचे दोन वाजलेले होते. सहज बाबा तिला म्हणाला, ‘चल जायचंय फिरायला ?’ ही पोरगी उत्साहात उठली व बाबाला चल म्हणून हटून बसली. मग काय बाबा व लेक घराजवळच रात्री दोन वाजता चक्कर मारून आले, मग पठ्ठी झोपली. अशी बाबाची फजितीच केली. एकदा डान्स क्लासला जाताना अदिती पाण्याची बाटली कारमधून बाहेर धरून मिस्किलपणे विचारत होती ‘बाटली बाहेर टाकू?’ असे ती बऱ्याचदा विचारायची, पण शेखर नाही म्हणायचा. यावेळी तो म्हणाला ‘टाक’ तर हिने खरंच बाटली बाहेर टाकून दिली व कशी गंमत केली बाबाची म्हणून त्याच्याकडे बघून हसत होती.
कहर म्हणजे बाबाला सिगारेट ओढायला आवडते, हे पण ती जाणून होती. कारमध्ये बसल्यावर लगेच बाबाला काडयापेटी काढून द्यायची व सिगारेट ओढ म्हणायची. हे उदयोग मी बरोबर नसताना करायची, कारण तिला माहित होते बाबाने सिगारेट ओढलेली आईला आवडत नाही. क्लासवरून आली की मला खुणेने सांगायची बाबाने सिगारेट ओढली. मी तिला कधीही स्वतःहून विचारले नव्हते. अदिती म्हणजे अजब रसायन आहे खरे, स्वतःच्या आजूबाजूला चाललेली चर्चा व वातावरण कसे आहे, याची तिला पहिल्यापासूनच चांगली समज आहे. शक्यतो मुलांसमोर वाद होऊ नयेत याची आम्ही काळजी घ्यायचो, पण चुकून कधीतरी झालाच तर ती शांत बसून असायची. पण वाद संपला व वातावरण शांत झाले असे होऊन परत वाद सुरु होईल असे वाटले, तर स्वतःच्या ओठावर बोट ठेवून चुपचूप असे ओरडायची व मग आम्ही सगळेच जोरजोरात हसू लागायचो. तिच्या ताईला जर काही कारणाने आम्ही रागावलेले असलो, तर अदितीला फार वाईट वाटायचे, कारण ताई गंभीर होऊन बसायची. पण जेव्हा ताईचा मूड चांगला व्हायला लागायचा, तेव्हा अदिती घरभर ओरडत फिरायची ‘ताई हसली’,’ताई हसली’ की ताई सकट आम्ही सगळेच हसत सुटायचो. अदिती आजूबाजूला असल्यावर वातावरण गंभीर राहणे शक्यच नाही.
हळूहळू अदिती मोठी होत होती. घरामधील छोटी मोठी कामे मी तिला शिकवू लागले. भांडी धुणे, केर काढणे, कपडे वाळत घालणे, स्वतःचे कपडे, चादरी यांच्या घडया घालणे, भाज्या चिरणे, उकडलेले बटाटे सोलणे, स्वयंपाक करताना फ्रिजमधील भाज्या आणायला सांगणे तसेच लागणाऱ्या वस्तू आणायला सांगणे, यामुळे तिचा हात व डोळे यांचा समन्वय सुधारत होता व ती सूचना पालन करायला शिकत होती. वस्तूंची नावे परत परत कानावर पडून थोडी नावे तिच्या लक्षात राहू लागली होती. अदिती मुळात आळशीच आहे. त्यामुळे तिच्याकडून हे करून घेताना खूप धीर व सहनशीलता ठेवावी लागायची. विशेष मुलांना शिकवताना दिवसांचा हिशोब नसतो. कित्येक महिन्यांचा, वर्षांचा कालावधी दयावा लागतो. मनाची ही तयारी पण ठेवावी लागते की, आपण शिकवत राहायचे, कदाचित ही गोष्ट ते शिकवणार पण नाहीत. पण त्यांच्या जास्तीत जास्त क्षमता बाहेर याव्यात, यासाठी प्रयत्न करत राहायचे असते.
अदिती दहा वर्षांची झाल्यानंतर मी पाळी म्हणजे काय याबद्दल तिला समजेल अशा भाषेत सांगायला सुरुवात केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा तिला पाळी आली तेव्हा या मुलीने मला स्वतःहून सांगितले ‘आई पाळी आली’. म्हणजे मी सांगत होते ते तिच्यापर्यंत पोचत होते व तिच्या मनाची पूर्ण तयारी झालेली होती. तिने मला पूर्ण सहकार्य दिले. इथे हे नमूद करण्याचा उद्देश हाच आहे की, अनेक विशेष मुलींच्या आया तक्रार करत असतात की, पाळी आल्यावर मुलगी त्या दिवसांमध्ये सहकार्य करत नाही. यामध्ये चूक आया व शिक्षकांची असते, कारण याविषयी त्यांना काही सांगितलेलेच नसते.त्यामुळे विशेष मुली भावनिक व शारीरिक स्तरावर या नवीन अनुभवासाठी तयार नसतात, तर त्या सहकार्य करणार कशा?
अदिती बारा वर्षांची झाल्यानंतर तिला घरापासून व घरतील माणसांपासून दूर राहायची सवय लागावी व स्वावलंबी होण्यास मदत व्हावी, या दृष्टीने ‘ साधना व्हिलेज’ या विशेष व्यक्तींसाठी असलेल्या वसतिगृहामध्ये वर्षातून एकदा, दोन तीन दिवस मी ठेवू लागले. तोपर्यंत अदिती शी-शूच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी नव्हती, तरी तिला ठेवून घेतल्याबद्दल देशपांडे सर, मेधाताई व विजयाताई यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. मला नेहमी असे वाटते की, सर्वसाधारणपणे लोक मदतीस तयार असतात. आपली मदत मागण्याबद्दलची प्रामाणिक भूमिका व उद्देश त्यांना पटला, तर सहकार्य हमखास मिळते. कारण दुसऱ्यांना मदत करणे ही प्रत्येक व्यक्तीची आंतरिक इच्छा असते. त्यातून खूप समाधान मिळत असते. या वेगवेगळ्या अनुभवांमुळे अदितीमध्ये चांगला बदल होत होता.
फारशी मदत न घेता तिला कपडे घालायला जमू लागले होते. कपड्यांची उलटसुलट बाजू समजायला लागली होती. बटण लावणे-काढणे जमायला लागले होते. हे शिकवण्यासाठी एक बाहुली आणली होती. बाहुलीसाठी छोटे छोटे कपडे शिवले होते. असे शिकवणे सोपे व इंटरेस्टिंग व्हायचे. कडी घालणे-काढणे जमायला लागले होते. दाराची वरची कडी स्टुलावर उभे राहून कशी काढावी, हे पण तिला शिकवले होते. स्टुलावरून पडून लागेल या भीतीने स्टुलावर चढूच द्यायचे नाही, हे मला पटत नव्हते. स्टुलावर चढून बघितल्याशिवाय भीती जाणार कशी? स्टुलावर चढून कडी काढता आल्यानंतरचा तिचा आनंद बघण्यासारखा असायचा. अशा छोटया छोटया गोष्टींमधून तिचा आत्मविश्वास वाढत होता. हे सर्व प्रयत्नपूर्वक वर्षांनुवर्षे, सातत्याने शिकवले होते. मुलांना वाढवताना आम्ही काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या होत्या. मुलांशी कधीही खोटे बोलायचे नाही. मुले लहान असताना अगदी त्यांना वॅक्सिनेशनच्या इंजेक्शन करता नेताना सुद्धा कशाकरता डॉक्टरांकडे चाललो आहोत हे आम्ही समजावून सांगायचो. थोडावेळ रडारड व्हायची, भीती वाटते ना, खूप दुखेल ना वगैरे थोडावेळ चालायचे पण थोडा वेळाने अगदी अदितीसुद्धा ‘पण हळू द्यायला सांग’ म्हणायची. दवाखान्याची वेळ सोडून अदितीला न घेता जर मला कुठे बाहेर जायचे असेल, तर मी तिला खरे कारण सांगत असे. पेशंट बघायला चालले असे खोटे सांगून वेळ मारून नेत नसे. येथे तुला नेणे शक्य नाही. तुला येथे बोलावले नाही, असे समजावून सांगत असे. तेव्हासुद्धा अदिती बराचवेळ रडारड, भुणभुण चालू ठेवी मग थोडयावेळाने म्हणे ‘जा पण लवकर ये’ व जाताना छान बाय करे. यामुळे काहीवेळा आईला आपल्याशिवाय एकटीला बाहेर जावे लागते, हे तिला कळायला लागले व हट्ट करून फायदा होत नाही, हेही कळायला लागले.
अदिती हळूहळू मोठी होत होती. आमचे रोजचे रुटीन सुरूच होते, परंतु मला जाणवायला लागले की चित्र ओळख, हात व डोळयाच्या समन्वयासाठीचे व्यायाम, लिहिण्याचा प्रयत्न, चित्र रंगवणे हे सर्व बंद करावे, कारण अदितीला हे सर्व खूप बोअर व्हायला लागले होते. ती याहून जास्तही काही शिकू शकणार नाही याची माझ्या मनाचीही तयारी झाली होती. अशाप्रकारे अदिती चौदा वर्षांची असताना अभ्यासामुळे होणारा अदितीचा व माझाही छळ एकदाचा थांबवला. अदितीस याशिवाय काहीतरी वेगळे आयुष्य हवे आहे, हे माझ्या लक्षात येऊ लागले होते. सारखे बोअर होतय, भुर्र जायचे म्हणायची. म्हणजे अगदी रात्री बोटक्लबमध्ये जेवून घरी आल्यानंतर लगेच हिला भुर्र जायचे असायचे. सुट्टीच्या दिवसात तर विचारूच नका, दर मिनिटाला बाहेर जायचे, भुर्र जायचे व भू आयी म्हणजे भूक लागली म्हणायची. रिकामपणी सतत खायला हवे असायचे. एकंदर तिला आयुष्यात काहीतरी वेगळे हवे आहे, हे लक्षात येऊ लागले. तिला सतत लोकांमध्ये राहायला आवडते व सतत बदल हवा असतो तो आमच्यापरीने आम्ही देत होतो, पण ते तिला पुरे पडत नव्हते. या काळात अदितीला पोहण्यामध्ये बरीच बक्षिसे मिळत होती. अगदी पुण्याबाहेर जाऊनसुद्धा ती बक्षिसे मिळवत होती. अशी नुकतीच ती दिल्लीला जाऊन नॅशनल ब्राँझ मेडल मिळवून आली होती. त्यासाठी तिच्याबरोबर गेलेले सर, मॅडम व फडके काकू घरी आलेले होते. यांच्यासाठी घरी पार्टी ठेवली होती. अदिती खुशीत होती कारण तिचे कौतुक चालू होते व तिला एकंदरीत घरी पाहुणे आलेले आवडतातच.
जेवताना आमच्या बऱ्याच गप्पा चालू होत्या. या सगळ्यांना मी नुकतेच माथेरानला आम्ही मैत्रिणी मुलांना घेऊन गेलो होतो, तेव्हा तिथे काय केले व अदितीने कसा सुखद धक्का दिला याबद्दल सांगत होते. माथेरानला पॉइंट बघायला जायचे म्हणून आम्ही घोडयाची सोय होते का बघत होतो. कारण माथेरानला गाडी ठरावीक अंतरापर्यंतच नेता येते व पॉइंट बघायला जायचे तर घोडयावरून जावे लागते किंवा बरेच चालावे लागते. अदिती किती चालू शकेल, याबद्दल मी साशंक होते. कारण अजून तिला चालताना नीट बॅलन्स ठेवता येत नव्हता. थोडी जरी जमीन वरखाली असली तरी ती पडायची. तिला घरातल्या घरातच तीन चार वेळा पडून जखमा झाल्या म्हणून टाके घालून आणलेले होते. डॉक्टर आगरवाल पण गमतीने म्हणायचे, ‘आणले का रफू करायला?’ तर काय आम्हाला काही केल्या घोडे मिळेनात .मग आम्ही म्हणजे मी व माझ्या मैत्रिणींनी अदितीला चालवायचे ठरवले. अर्थात दोन्ही हाताला धरून न्यायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही पॉइंट बघायला निघालो. अदिती, दमले व पाय दुखतात म्हणाली की, आम्ही तिचे खूप कौतुक करायचो व थोडेच राहिलेय, किती छान चालते आहेस म्हणून तिला प्रोत्साहन द्यायचो. असे करून पठ्ठी जवळजवळ सगळे पॉइंट चालली. मला हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. हे पॉइंट चालल्यानंतरची तिची प्रतिक्रिया माझ्या दृष्टीने फार महत्वाची ठरली. अदिती दमली तर होती पण तरी खूप खुश होती. नंतर ती घरी आल्यावरही सगळ्यांना सांगत होती की, मी चालले व कशी मजा आली. म्हणजे ते करताना त्रास झाला तरी, तिला एवढे चालता आले व सगळ्यांनी आपले कसे कौतुक केले, याबद्दल अदितीला खूप अभिमान वाटत होता. छान वाटत होते. मला असे वाटले अदितीला ही संधी मिळाल्यामुळे इतके छान वाटतंय, तर इतर विशेष मुलांनाही अशी संधी मिळाली तर छान वाटेल; म्हणून मी या सगळ्यांसमोर पदयात्रेची कल्पना मांडली.
सुरुवातीला त्यांची प्रतिक्रिया हे कसे शक्य आहे, अशीच होती, पण त्यांना हे कसे करता येईल व अर्धा किलोमीटरपासून सुरुवात करत हळूहळू अंतर कसे वाढवता येईल, हे समजावले. मुख्य म्हणजे हे सर्व करताना मुलांना कसा आनंद मिळेल, हे पटवून देण्यात मला यश आले व हा उपक्रम करायचे ठरले. ही चर्चा होताना अर्थात शेखर तिथे होताच व त्यालाही ही पदयात्रेची कल्पना आवडली.