
२.अनोखी पदयात्रा
खूप बारीकसारीक विचार करून पदयात्रेचे नियोजन केले होते. अशी पदयात्रा, विशेष मुलांबरोबर काढायचे धाडस आम्ही प्रथमच केले होते. पालकांनी विश्वास ठेवून मुलांना आमच्याबरोबर पाठवले होते. त्यामुळे मुलांची जेवायची, राहायची व्यवस्था, किती वेळ चालल्यावर थांबायचे म्हणजे मुले दमणार नाहीत व मुख्य म्हणजे सुरक्षितता, या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून आम्ही या पदयात्रेचे नियोजन केले होते.
सर्वांनी बरेच दिवस विचारमंथन करून पुणे-लोणावळा हा मार्ग पदयात्रेसाठी निश्चित केला. खरी कसोटी आताच होती. बारा वर्षांवरील विशेष मुलांच्या पालकांची, मुलांच्या सहभागाबद्दल परवानगी, चालण्याच्या सरावाचे नियोजन, सराव मार्ग व आर्थिक साहाय्य. पहिली कसोटी फार अवघड होती. आम्ही जेव्हा पालकांसमोर ही कल्पना मांडली, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा आम्हाला वेड्यातच काढले. त्यांचे म्हणणे होते, मुले अर्धा किलोमीटर अंतरपण चालू शकत नाहीत, ही मुले पुणे-लोणावळा ६४ किलोमीटर अंतर कसे चालू शकणार? मी त्यांना समजावून सांगितले की, आपण अर्ध्या किलोमीटर अंतर चालण्यापासून सुरुवात करू, पण मुलांना छान स्पोर्टस शूज, ट्रॅक पँट, पाण्याची बाटली व खाऊ देत जा. मुलांना ही पिकनिक वाटायला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे त्यांना मजा यायला पाहिजे. काही पालकांना पटले. मग चार-पाच मुलांना घेऊन दर रविवारी आमचा सराव सुरु झाला. चालण्याच्या सरावासाठी आम्ही वेगवेगळे मार्ग शोधायचो. कधी पाषाण साईड तर कधी पुणे-मुंबई रस्ता, तर कधी मस्त पुणे विद्यापीठामध्ये. जुलै महिन्यामध्ये आम्ही पदयात्रेसाठी सराव सुरु केला. कधीकधी पाऊस असायचा मग मुले मस्त रेनकोट घालून उत्साहाने यायची. एकंदर घरातून बाहेर पडून हे करायला मुलांना मजा वाटत होती. हळूहळू आम्ही चालायचे अंतर वाढवत होतो. आता मुलांची संख्या वाढत होती. चार-पाच जणांवरून ती संख्या आता सव्वीस-सत्तावीस वर जाऊन पोहोचली व पालकांचा आमच्यावरील विश्वास वाढत गेला. कारण ते मुलांमधील बदल व सराव संपवून घरी गेल्यावर त्यांचा आनंद बघत होते. तर दुसऱ्या बाजूला आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरूच होते. मुले सप्टेंबरपर्यंत दोन तासांमध्ये आठ ते दहा किलोमीटर अंतर सहज चालू लागली.


पदयात्रेची तयारी तर छान सुरु होती पण आर्थिक मदत मिळणे, या बाबतीत चिंता वाटू लागली होती. एवढयात एक छान बातमी कळाली. लायन्स क्लब ऑफ सारसबाग आमच्या पदयात्रेसाठी आर्थिक सहाय्य करण्यास तयार आहेत. आमचे कौटुंबिक मित्र शिरीष देशपांडे व त्यांची पत्नी सुचेता या दोघांच्या प्रयत्नामुळे आर्थिक सहाय्य मिळत होते, कारण ते लायन्स क्लब ऑफ सारसबागेचे सभासद होते.
आता मात्र आम्ही व्यवस्थित टेहळणी करून कुठे कुठे थांबता येईल म्हणजे दर तासाला कुठे थांबता येईल, याचा शोध सुरु केला. नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा-नाष्टा, रात्रीचे जेवण व मुख्य म्हणजे मुक्कामासाठी व्यवस्थित जागा निश्चित करणे हेही काम एका बाजूला चालूच होते. पदयात्रा कुठून सुरु करावी? पदयात्रेचा कालावधी किती असावा? यावरही बरीच चर्चा झाली. पदयात्रा सुरु करण्याचा दिवस व वेळ ठरवायची वेळ जवळ येऊन ठेपली. पदयात्रेच्या निमित्ताने जयश्री फडके, वसुधा दिवेकर, एम.एस.डब्ल्यू. करणारा एकजण, विशेष शिक्षिका असलेली त्याची पत्नी व शेखर असे आम्ही सर्व जण वरचेवर भेटत होतो. जयश्री फडके ‘लार्क’ या मतिमंद मुलांच्या शाळेमधील मुलांबरोबर काम करत होत्या. वसुधा दिवेकर या जयश्री फडके यांना मदत करत होत्या. वसुधा दिवेकर यांचा स्वतःचा दिवेकर ट्रस्ट आहे. या ट्रस्टतर्फे शाळांमध्ये काही स्पर्धांचे आयोजन करून नंबर आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातात. एक तरुण पतीपत्नीही आमच्या सोबत होते, पत्नी एका शाळेत विशेष शिक्षिका म्हणून काम करत होती. पती एका सेवाभावी संस्थेत नोकरी करत होता व जयश्री फडके यांच्या कामात मदत करत होता. तसेच तो विशेष मुलांना पोहायला शिकवत होता. आमचे सर्वांचे विचार जुळत होते. विशेष मुलांना सकारात्मक, छान आयुष्य मिळायला पाहिजे यावर आमचे एकमत होते.
मी व शेखर, अदितीच्या भविष्याचा विचार करून अनेक संस्था बघून आलो होतो. पण माझ्या डोक्यामध्ये अदितीच्या भावी आयुष्याबद्दल जे काही विचार होते, त्याच्याशी या संस्थांमधील वातावरण जुळत नव्हते. अदिती तेव्हा सोळा वर्षांची होती. मी एक दिवशी शेखरला, बरेच दिवस माझ्या मनात घोळत असणारा विचार बोलून दाखवला. ‘ अदितीला जर आपल्या मनासारखे पुनर्वसन द्यायचे असेल, तर आपणच संस्था काढूयात का’? तो चक्क लगेच ‘हो’ म्हणाला. मग त्याला म्हटले पदयात्रेनिमित्त सतत भेटणारे व विशेष मुलांबद्दल सकारात्मक विचार करणारे पती-पत्नी, दिवेकर मावशी व फडके काकुंसमोर हा विषय मांडूयात का? यावर आमचे दोघांचेही एकमत झाले. पुढच्याच मीटिंगमध्ये संस्था काढण्याबद्दलचा आमचा विचार त्या सर्वांना सांगितला व त्यांना सहभागी होण्यास आवडेल का? असे विचारले. मी व शेखर सोडून प्रत्येकजण या क्षेत्रात काही ना काही काम करत होते. त्यांना म्हटले, तुम्ही सध्या वेगवेगळ्या संस्थांना मदत करतच आहात, पण आपण जर एकत्र येऊन संस्था काढली तर आपल्या मनासारखे पुनर्वसन विशेष मुलांना देता येईल. हा विचार सर्वांना दोन-तीन मीटिंगनंतर पटला व माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय झाला. संस्था काढायची असे ठरले.


हा २००३ सालामधील ऑगस्ट महिना होता. आता पदयात्रेबरोबरच संस्था काढण्यासाठी काय काय करायला हवं, यावरही चर्चा सुरु झाली. वयोगट कुठला असावा? जागा कशी मिळवायची? कुणी कुठली जबाबदारी घ्यायची? असे बरेच काही विषय चर्चेमध्ये असायचे. एकदा संस्था काढायची आहे हे नक्की झाल्यावर संस्थेचे नाव काय ठेवावे, यावर बरीच चर्चा झाली व सर्वानुमते ‘ न्यू होरायझन’ म्हणजेच ‘नवक्षितिज’ हे नाव नक्की झाले. यानंतर मात्र सध्या पदयात्रेवरच लक्ष केंद्रित करायचे ठरविले. त्या दृष्टीने मुलांचा चालण्याचा सराव व सांस्कृतिक कार्यक्रम बसवणे सुरु केले.
पुणे लोणावळा रस्त्याचा पूर्ण अभ्यास करून थांबायच्या जागा नक्की केल्या. पदयात्रा कधी व कुठून सुरु करायची, किती दिवसात पूर्ण करायची व कुठे संपवायची हे नक्की केले. पदयात्रा २७ नोव्हेंबरला २००३ रोजी सकाळी सात वाजता काढायची असे सर्वानुमते ठरले. दोन महत्त्वाच्या मुद्यांचा विचार करून हा निर्णय घेतला. एकतर तोपर्यंत दिवाळीची धावपळ संपणार होती व हवेमध्ये गारवा असल्यामुळे मुलांना उन्हाचा त्रास फारसा जाणवणार नव्हता. पदयात्रा साडेतीन दिवसांत पूर्ण करायची, असा निर्णय झाला. म्हणजे ३० नोव्हेंबरला सकाळी लोणावळ्याला अकरा वाजता पोहोचून, दुपारचे जेवण करून पुण्याला बसने येण्याचे ठरवले. पदयात्रा सिओइपी इंजिनिअरींग कॉलेजपासून सुरु करायची, असे आम्ही ठरवले. कारण येथून पुणे-मुंबई रस्ता लगेच सुरु होत होता. जो आमच्या पदयात्रेचा मार्ग होता. लायन्स क्लब सारसबाग यांनी पूर्ण आर्थिक भार उचलला होताच, शिवाय पदयात्रा मार्गावरील गावांमध्ये असणाऱ्या लायन्स क्लबमधील सभासदांनी पण मदतीची तयारी दाखवली. विशेष मुले व आम्ही स्वयंसेवक मिळून चाळीस-पंचेचाळीस जणांचा जथ्था रस्त्यावरून चालणार होता, त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक नियमनासाठी पोलिस पदयात्रेबरोबर असावेत, असा निर्णय झाला. आता पोलिसांची परवानगी मागणे याबाबत पत्र लिहायची वेळ आली. ते कसे लिहावे हेही आम्हाला कोणाला नीट माहिती नव्हते. ओळखीच्या माहितगार मंडळींना विचारून पत्र तयार केले व पाषाण रस्त्यावरील पोलिस कार्यालयात पोहोचलो. पोलिस कार्यालयात जायची पहिलीच वेळ त्यामुळे धाकधुकच वाटत होती. पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक नियमनाचे प्रमुख पोलिस अधिकारी यांना भेटायचे होते. ते एका मीटिंगमध्ये व्यस्त होते. तोपर्यंत इतर पोलिसदादांशी गप्पा झाल्या. त्यांना आम्ही इथे येण्याचे प्रयोजन सांगितल्यावर खूप उत्सुकतेने ते माहिती विचारू लागले. पदयात्रेसंबंधी माहिती समजल्यावर कौतुकाने व आश्चर्याने आमच्याकडे बघू लागले.पोलिस प्रमुखांची मीटिंग संपल्यावर त्यांनी आम्हाला भेटायला आत बोलावले. भल्यामोठ्या टेबलामागे साहेब बसलेले होते. त्यांनी शांतपणे आमचे म्हणणे ऐकून घेतले. पदयात्रा काढण्याचे प्रयोजन, एकंदर व्यवस्था काय असणार वगैरे बरेच प्रश्न विचारले. एकदा त्यांचे पोलिशी प्रश्न संपल्यावर व आमच्या प्रामाणिक प्रयत्नाबद्दल खात्री पटल्यावर, साहेब गप्पांच्या मूडमध्ये आले. चहा घेता घेता मतिमंदत्वाविषयी बरीच माहिती त्यांनी जाणून घेतली व पूर्ण पदयात्रा मार्गावर वाहतूक पोलिस आमच्याबरोबर असतील असे आश्वासन दिलेच व नंतर येऊन लेखी परवानगीचे पत्र घेऊन जायला सांगितले.


पदयात्रेची व संस्था स्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली व बघता बघता पदयात्रेचा दिवस उगवला. आम्ही सर्वजण उत्साहात इंजिनिअरींग कॉलेजवर जमलो. आम्हाला पदयात्रा आयोजनाचा उत्साह वाटतच होता, पण त्याहून महत्वाचे म्हणजे आज नवक्षितिज संस्थेची स्थापना होणार होती. अनु आगा, थरमॅक्स कंपनीच्या एम.डी., यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. त्या अगदी वेळेवर आल्या. अनेक पत्रकार आलेले होते. मुलांचे पालक, लायन्स क्लब सारसबागचे पदाधिकारी तसेच डी.जी. व्दारका जालान मुलांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. या सर्वांसमोर मुलांनी छान सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यानंतर नवक्षितिज संस्था स्थापन केल्याची अधिकृत घोषणा झाली व संस्थेचे उदघाटन अनु आगा यांच्या हस्ते झाले. उदघाटनानंतर मी पदयात्रा काढण्यामागचा उद्देश उपस्थितांना समजावून सांगितला. या उपक्रमामुळे विशेष मुलांच्या आयुष्यात कसे छान अनुभव जोडले जातील, हे सांगितले. इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऑडीटोरियम मध्ये कार्यक्रम होता. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या सभागृहात व इतक्या लोकांसमोर भाषण देताना चांगलेच दडपण आले होते. उदघाटन कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी आमची मैत्रीण मंजिरी धामणकर हिने सांभाळली. हा कार्यक्रम झाल्यावर आम्ही सर्व जण इंजिनीअरींग कॉलेजच्या गेटजवळ जमलो. सर्व जण आम्हाला शुभेच्छा देत होते. पत्रकार मला पदयात्रे बद्दल माहिती विचारत होते, टी.व्ही. चॅनेलवाले शूटिंग घेत होते. या गोंधळातच अनु आगा यांनी झेंडा दाखवला व साधारणपणे आठ वाजता एकदाची आमची पदयात्रा सुरु झाली. चार-पाच वाहतूक पोलिस आमच्याबरोबर होते. सत्तावीस विशेष मुले व पंधरा स्वयंसेवक, माझे सासरे, काही मुलांचे पालक अशी आमची पदयात्रा जुन्या पुणे-मुंबई रस्त्याने मार्गस्थ झाली. सामानाची जीप आमच्या मागेच होती. पहिला स्टॉप नाष्ट्यासाठी खडकी येथे होता. सर्वांनाच येथे पोहोचेपर्यंत भरपूर भूक लागलीच होती. इडली चटणी खाऊन, चहा पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. मुले घोषणा देत मजेत चालली होती. थोडे उन जाणवत होते, पण प्रत्येकाने कॅप घातलेल्या होत्या व मुख्य म्हणजे सगळे उत्साहात चालत होते. दुपारी दोनपर्यंत पिंपरीला पोहोचलो, येथे जेवण घेतले व लगेचच चालायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी रात्री निगडीला पोचायचे होते. येथील कामायनी शाळेमध्ये आमची राहायची सोय केली होती. अंधार होता होता साधारणपणे संध्याकाळी साडेसहापर्यंत आम्ही सर्वजण निगडीला पोहोचलो. लायन्स क्लबचे इतर पदाधिकारी व कामयानी या विशेष शाळेचे मुख्याध्यापक, त्या भागातील सहभागी मुलांचे पालक व आमच्या ओळखीचे या भागात राहाणारे लोक मुद्दाम मुलांना भेटायला व त्यांचे कौतुक करायला आले होते. या सर्वांसमोर मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला, कारण मुले आज सतरा किलोमीटर अंतर चालली होती. कार्यक्रम झाल्यावर मात्र जेवून लगेच आम्ही सर्वजण झोपी गेलो.
२८ नोव्हेंबरला पहाटेच उठून सर्वांनी आंघोळी केल्या. चहा-बिस्किटे घेऊन सामान आवरले व ते जीपमध्ये टाकून चालायला सुरुवात केली. ऊन वर यायच्या आत जास्तीत जास्त अंतर चालून जायचे ठरविले होते. मधे थांबून चहा-नाष्टा केला. आज नाष्ट्याला पुरी – भाजी होती. पॅक्ड नाष्टा बरोबर आणल्यामुळे नाष्टा प्रोग्रॅम लवकर उरकला. चहा – नाष्टा घेऊन झाल्यावर चालायला सुरुवात केली. गाणी म्हणत, घोषणा देत, पदयात्रेचा बोर्ड आळीपाळीने हातात धरत आम्ही जात होतो. उन्हाचा त्रास जरा जाणवू लागला होता. मग एके ठिकाणी थांबलो. तेथे जेवण करून लगेचच चालायला सुरुवात केली कारण अंधार पडायच्या आत वडगाव मावळ गाठायचे होते. वडगाव मावळला सर्वजण अंधाराच्या आत एकदाचे पोहोचलो. आज आम्ही वीस किलोमीटर अंतर चाललो होतो. मधे मधे मुले थोडी कंटाळली होती, पण मुलांच्यापेक्षा आमचे जीपमधून येणारे एक वयस्कर स्वयंसेविका दुपारच्या जेवणानंतर काही मुलांना जीपमध्ये बसायचा आग्रह करू लागल्या. मग मात्र मला जरा आवाज चढवूनच मुलांना पुढे काढावे लागले व आमच्या या सहकारीणीला समज द्यावी लागली की, मुलांना प्रोत्साहन देण्याचे सोडून उलट त्यांना गाडीत बसा म्हणणे चूक आहे. मुलांना पदयात्रा पूर्ण केल्याचे समाधान मिळू द्या. यानंतर मात्र त्यांनी असा आग्रह केला नाही. वडगाव मावळ येथे रात्री मुक्काम केला.येथे एका घराच्या रिकाम्या अंधाऱ्या हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर राहिल्याचे मला आठवतय. आश्चर्य म्हणजे एवढे अंतर चालून आल्यावर पण मुलांनी रात्री जेवण झाल्यावर देवळामध्ये लायन्स क्लबचे सभासद व गावकऱ्यांसमोर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून भरपूर टाळ्या मिळवल्या. मला स्वतःला आजचा दिवस खूप समाधान देऊन गेला व एवढा चालण्याचा सराव घेतल्याच्या प्रयत्नांचे फळ आज दिसले. आजचा टप्पा अवघड होता. सगळ्यात जास्त अंतर चालायचा होता. तरीसुद्धा मुलांची एनर्जी लेव्हल खूपच चांगली होती.
रोजच्या प्रमाणेच उद्याचा पूर्ण कार्यक्रम सर्वांना सांगून व उद्यासाठी पॅक नाष्ट्याची सोय करून मी शांतपणे झोपले. पहाटे उठून आवरताना जरा सगळ्यांची तारांबळच उडाली. संडास-बाथरूम फक्त दोनच होती. आज सगळ्यांनीच आंघोळीला चाट दिली. प्रातर्विधी उरकून चहा-बिस्कीट घेतले व लगेचच सामान जीपमध्ये टाकून आम्ही चालायला सुरुवात केली. आज अंतर कालच्यामानाने बरेच कमी म्हणजे चौदा किलोमीटर होते. सूर्योदय बघत, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत, घोषणा देत आम्ही मजेत चाललो होतो. पोलिसमामा आमच्याबरोबर होतेच. चालत असताना आमच्या बरोबरचा अक्षय एकदम थांबून एका झुडपाकडे बोट दाखवून काहीतरी दाखवत होता. बघितले तर हिरवागार साप त्या झुडपावर पहुडलेला होता. हिरवागार साप मीसुद्धा पहिल्यांदाच बघत होते. मला अक्षयचे खूप कौतुक वाटले. झाडाच्या पानांच्या रंगामध्ये आपला रंग बेमालूमपणे मिसळून पहुडलेला साप अक्षयमुळे आम्हाला पहायला मिळाला. असे एक एक अनुभव घेत आमची पदयात्रा नऊपर्यंत साईसेवाधाम कान्हेफाटा येथील विशेष मुलांच्या शाळेमध्ये पोहोचली. येथे नाष्ट्याची सोय केलेली होती. आता सर्वांनाच पदयात्रा यशस्वी होणार याबद्दल खात्री वाटू लागली व एक आगळा उत्साह सर्वांमध्ये संचारलेला पाहून, मला फार छान वाटत होते. दुपारचे जेवण कामशेत येथे घेऊन संध्याकाळी पाचपर्यंत आम्ही सर्वजण कार्ल्याला पोहोचलोसुद्धा.
आजची राहायची सोय कार्ल्याच्या दाक्षिणात्य लोकांच्या मंदिरात होती. सुंदर परिसर व दोन ते तीन जण राहू शकतील, अशा स्वतंत्र स्वच्छ खोल्या होत्या. आम्हाला सर्वांना ही फाइव्ह स्टार सोयच वाटत होती. खोल्यांचे वाटप झाल्यावर सर्वांनी चहा व बरोबर आणलेला खाऊ खाल्ला. नंतर मस्त गरम पाण्याने सकाळी राहिलेल्या आंघोळी उरकून घेतल्या. मुलांच्या आंघोळी उरकायच्या म्हणजे स्वयंसेवकांना बरेच काम पडते. मुलांचे घालायचे कपडे बॅगमधून काढून घेणे, ते बाथरूममध्ये ठेवणे, आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये गार पाण्याचे विसण घालून बरोबर करून घेणे. अनेक जणांना प्रत्यक्ष आंघोळीला मदत लागते, ती मदत करणे. नंतर कपडे व्यवस्थित घालायला मदत केली आणि काढलेले कपडे प्लॅस्टिकच्या बॅगेत ठेवायचे की, आंघोळ हा विषय संपतो. अनेक विशेष मुलांना शारीरिक स्वच्छतेसाठी मदत लागते. शारीरिक स्वच्छता करता येत नाही हे तर खरच, पण त्याबरोबरच कमालीचा आळशीपणा या मुलांमध्ये असतो. विशेष मुलांचे सामान व्यवस्थित ठेवणे व औषधे वेळच्यावेळी देणे ही जबाबदारी स्वयंसेवकाचीच होती. आज रात्री चविष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन मुले झोपल्यानंतर, मी स्वयंसेवकांबरोबर गप्पा मारायला व उद्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करायला बसले. एकंदर सर्वजण खुश होते. बऱ्याचशा गोष्टी नियोजनानुसार झाल्या होत्या.
उद्या म्हणजे ३० नोव्हेंबरला हा पदयात्रेचा शेवटचा दिवस. पहाटेच उठून पदयात्रा सुरु करण्याचे ठरवले. कार्ला-लोणावळा अंतर अकरा किलोमीटर, पण हे अंतर सकाळी साडेसहा-अकरापर्यंतच पूर्ण करायचे होते. आज सहा वाजताच पदयात्रेला सुरुवात केली. चहासुद्धा न घेता आम्ही बाहेर पडलो. हळूहळू पूर्वेकडील आकाशात लालिमा दिसू लागली व उगवणाऱ्या सूर्याचे मनोहरी दृश्य पुन्हा एकदा अनुभवता आले. चालताना पक्ष्यांचा किलबिलाट सोबतीला होताच. एखादा तास चालल्यावर चहाची टपरी उघडी दिसली. सगळ्यांनी एकच कल्ला करून टपरीवर धाडच घातली. टपरी मालकाने फार प्रेमाने स्पेशल चहा करून दिला. बरोबर आणलेली बिस्किटे व चहा घेतला, टपरी मालकाला धन्यवाद देऊन आम्ही मार्गस्थ झालो.आता अंतर लवकर कापले जात होते. मस्त गाणी म्हणत, घोषणा देत आम्ही जात होतो. पहिल्या दिवसानंतर परत आज व्हिडिओ शूटिंग करणारे आमच्याबरोबर होते व वेगवेगळ्या अँगलने त्यांचे शॉट घेणे सुरु होते. लोणावळ्या अलीकडे मोकळी जागा बघून नाष्टा केला. आज आम्हाला नाष्टा द्यायची जबाबदारी लोणावळा येथील लायन्स क्लबने घेतली होती. इडली चटणी व गरम गरम चहा असा नाष्टा आणला. नाष्टा होता क्षणी, सर्वांनीच न रेंगाळता भराभर चालायला सुरुवात केली. आम्ही मागच्या बाजूने लोणावळ्यामध्ये प्रवेश केला. आमच्या हातातील बोर्डस बघून, आमच्या घोषणा ऐकून अनेकजण आमच्याकडे कुतूहुलाकडे बघत होते. काही लोक थांबून प्रश्न विचारत होते व पदयात्रेबद्दल माहिती कळल्यावर मुलांकडे कौतुकाने बघत होते.
पदयात्रेचा समारोप समारंभ लोणावळ्यामधील एका हॉटेलमध्ये ठरविला होता. आम्ही एक एकजण हॉटेलमध्ये शिरत होतो व प्रत्येक वेळी एकच जल्लोष होत होता. अनेक पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. ते म्हणत होते आमचा विश्वासच बसत नाही, आमची मुले ६४ किलोमीटर चालली आहेत व तरी एवढी फ्रेश दिसतात. मुलांना, आई-वडिलांना बघून खूप आनंद झाला होता. मुले आई-वडिलांना सोडून पहिल्यांदाच इतके दिवस बाहेर राहिली होती. लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या सर्वांचे स्वागत केले. चहापान झाले व समारोप कार्यक्रम सुरु केला. पत्रकार, हितचिंतक, पालक व लायन्स क्लबचे पदाधिकारी मिळून हॉल गच्च भरला होता. मंजिरी धामणकर खास निवेदन करण्यासाठी पुण्याहून आली होती. तिने आता सूत्रे हातात घेतली. सर्वांचे स्वागत करून लायन्स क्लबच्या अध्यक्षांना बोलण्याची विनंती केली. त्यांनी सर्व स्वयंसेवक व विशेषतः मुलांचे फार कौतुक केले व लायन्स क्लबला या उपक्रमासाठी मदत केल्यामुळे खूप समाधान मिळाले, हे आवर्जून सांगितले. माझ्याकडे माईक दिला. आज पहाटे उठल्यावर भाषणाचे मुद्दे काढून ठेवल्यामुळे व पदयात्रा यशस्वीपणे पार पडल्यामुळे मला ताण न येत सुसंबद्ध बोलता आले. विशेष मुलांना संधी दिल्यावर ते काय करू शकतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. तर आपण सर्वजण मिळून त्यांना अशा अनेक संध्या उपलब्ध करून देऊ यात. यातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढेल व अशा उपक्रमातून मुले अनेक गोष्टी शिकतील. असे काहीसे बोलून मी आमच्यावर विश्वास ठेवून पूर्ण आर्थिक साहाय्य देणारे लायन्स क्लब सारसबाग व त्यांचे सर्व पार्टनर क्लब्ज, पत्रकार, पोलिस, माझ्या या अनोख्या पदयात्रेच्या कल्पनेवर विश्वास ठेवून मदत करणारे सर्व स्वयंसेवक व आमच्याबरोबर या पदयात्रेसाठी विश्वासाने मुले पाठवणारे पालक, या सर्वांचे मनापासून आभार मानले. सर्वात महत्त्वाची व्यक्ती माझा नवरा शेखर त्याला पदयात्रेची संकल्पना सांगितल्यापासून ती प्रत्यक्षात आणेपर्यंत त्याने हरप्रकारे मदत केली. त्याचे विशेष आभार मानले. सर्व मुलांना पुढे बोलावून त्यांना फूल देऊन त्यांचे कौतुक केले. हा कौतुक सोहळा बघताना मुलांच्या आईवडिलांना फार समाधान वाटत होते. नंतर मेजवानीवर ताव मारून आम्ही परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये बसलो. गाण्याच्या भेंडया, पदयात्रेमधील अनुभवांच्या गप्पा मारत प्रवास कधी संपत आला कळलेच नाही. मुले खूप आनंदात होती. त्यांना शब्दात व्यक्त करता न येणारे काही तरी मिळाले होते. आई-वडिलांना आपले विशेष मुल हा उपक्रम पूर्ण करू शकले याचे समाधान व आपल्याशिवाय ही मुले एकटी राहू शकतात, हा विश्वास आला. स्वयंसेवक व विशेषतः मी फारच खुश होते, कारण ही पदयात्रा खरंच अनोखी होती आणि मुलांनी खूप आनंद घेत पदयात्रा पूर्ण केली होती. माझा त्यांच्या क्षमतेवर असणारा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला होता. प्रवास संपता संपता मी जाहीर केले की, मुले इतके अंतर चालू शकतात तर डोंगर पण चढू शकतील. आपण मुलांना घेऊन हिमालयात जायचे. हे ऐकून सर्वांनी एकच कल्ला केला व या कल्लोळातच आमचा प्रवास संपला. बसमधून उतरल्यावर आम्ही सर्वांनी मस्त आईस्क्रीम खाऊन पदयात्रेची सांगता केली. पदयात्रा तर यशस्वी पार पडली. आता नवक्षितिज संस्थेचे काम सुरु करण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक होतो.