
११.मुलांचा दिनक्रम
हिवाळ्यामध्ये फिरायला जाताना मुले कधीकधी भाजलेल्या शेंगा नेतात, तर एखाद्यावेळी तेथेच ओला हरभरा शेकोटीमध्ये भाजून खातात. कधी भाजलेले दाणे व गूळ नेतात. उन्हाळ्यामध्ये ओली भेळ तीन-चारदातरी होतेच. याची सर्व तयारी स्वयंपाकघरातील सहकारी प्रेमाने करून देतात. मुले व काळजीवाहक मिळून सर्व साहित्य फिरायच्या ठिकाणी आणतात. मग इथे बसून मस्त ताजी ओली भेळ आम्ही सर्वजण खातो. अनेक वर्ष ओली भेळ मीच बनवून देत असे आता मात्र माझ्या सहकाऱ्यांनी शिकून घेतलंय व तेच ओली भेळ बनवून देतात. अनेक वर्ष आम्ही पाणीपुरी पण फिरायला गेल्यावर तिकडेच बनवून खायचो, पण हल्ली उन्हाळ्याच्या दिवसात महिन्यात दर गुरुवारी रात्री जेवायलाच पाणीपुरी ठेवतो. कोरडी भेळ तर अनेकदा नेतो तसेच दर महिन्याच्या २८ तारखेला चॉकलेट डे असतो. ही संस्थेमध्ये बनविलेली चॉकलेट्स पण मस्त, निसर्गामध्ये बसूनच खातात. द्राक्षांच्या मोसमात द्राक्ष व बोराच्या मोसमात बोरे घेऊन जातात. हवामानानुसार फिरायला जाताना न्यायचे पदार्थ जेवणाच्या वेळापत्रकातच लिहून ठेवलेले आहेत त्यामुळे न विसरता वर्षांनुवर्षे हे नियमितपणे चालू आहे.
२००७ साली विशेष मित्रमैत्रिणींसाठी निवासी कार्यशाळा काढायचे नक्की झाल्यापासूनच यांचा दिनक्रम कसा असावा याचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट होते. दिनक्रमामध्ये शिस्तीबरोबरच मजापण असावी असे वाटत होते. मुलांना सारखे बाहेर जाता येणार नाही. त्यामुळे त्यांना नवक्षितिजमध्येच मजा करता येईल असा कार्यक्रम द्यायला हवा होता. मी व दिवेकर मावशींनी मिळून दिनक्रमाचे नियोजन केले. थोड्याफार फरकाने सुरुवातीपासून नियोजन केलेला दिनक्रमच अजूनही सुरु आहे. मुख्य म्हणजे मुले या दिनक्रमाने खुश आहेत.
दिवसाची सुरुवात सकाळी सात वाजता छान भक्तिगीते ऐकत होते. मुले उठून प्रातर्विधी उरकून थोडावेळ जमेल तसे प्रत्येकाच्या कुवतीनुसार जॉगिंग करून वा चालून वेळापत्रकाप्रमाणे जिम, योगासने वा मैदानावरील व्यायाम करायला जातात. व्यायाम झाल्यावर चहा-नाष्टा व अंघोळ करायला जातात. अंघोळ झाल्यावर थोडावेळ आवारात फिरतात, एकमेकांशी गप्पा मारत बसतात तोपर्यंत कार्यशाळेची वेळ होतेच. अकरा ते एक कार्यशाळा असते. नंतर एक ते दोन जेवण, जेवणानंतर दोन ते चार कार्यशाळा व चार ते साडेचार खेळ. कार्यशाळा संपल्यावर युनिफॉर्म बदलून, हातपाय धुवून झाल्यावर चहा व संध्याकाळचा नाष्टा होतो. यानंतर जवळजवळ सगळेच जवळच्या जंगलात फिरायला जातात. फिरून आल्यावर हातपाय धुवून झाल्यावर मुलांचे आपापल्या घरात प्रार्थना व ध्यान असते. नंतर थोडावेळ गप्पा, आवारामध्ये फिरणे होते. तोपर्यंत जेवायची वेळ होतेच. जेवण झाल्यावर टी.व्ही. बघणे, बागेतल्या झोक्यावर, बाकड्यावर बसून एकमेकांशी गप्पा व चेष्टामस्करी चालू असते. रात्री वाद्यसंगीत ऐकत साधारणपणे साडेनऊ दहाच्या दरम्यान झोपायला जातात. हा दिनक्रम वाचायला चांगला वाटतो ना, पण दिनक्रम प्रत्यक्षात आणणे सोपे नाही. सकाळी मुलांना उठवण्यापासुनच काळजीवाहकांची कसोटी सुरु होते.
सकाळी मुले उठताना भक्तिगीते लावलेली असतात. या पवित्र वातावरणात, छान भक्तिगीते ऐकत मुले उठली की, त्यांचा दिवस चांगला सुरु व्हायला मदत होईल, हे सहकाऱ्यांना पटवून ते नियमितपणाने प्रत्यक्षात आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. काही मुलांना उठायचेच नसते. विशेषतः नवक्षितिजमध्ये नव्यानेच आलेली मुले सुरुवातीला उठायला फार त्रास देतात. घरी सकाळी इतक्या लवकर सात वाजता उठायची सवयच नसते. आमच्याकडे आलेल्या काही मुलांना तर घरी दुपारी बारापर्यंत झोपून रहायची सवय होती. फक्त मुलांना काय म्हणायचे, काळजीवाहक व व्यायाम घेणारे यांनापण लवकर उठायची सवय नसते. काळजीवाहक व शिक्षक तर अनेकदा डोळे चोळतच व्यायाम घ्यायला यायचे. अशा अनेक वाईट सवयी मोडण्यामध्ये बराच वेळ व एनर्जी जाते. विशेष मित्रमैत्रिणींचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारायला व दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने व्हायला सकाळच्या नियमित व्यायामाने मदत होईल, अशी मला खात्री होती.
विशेष मुलांचे व्यायाम घेताना खूप विचारपूर्वक नियोजन करावे लागते. साधारणपणे तीस मिनिटांमध्ये पूर्ण होईल अशाप्रकारे त्यांच्या व्यायामाचे नियोजन केले. सुरुवातीला दोन-तीन महिने रोज योगासने व प्राणायामच घेतले, कारण जिम सुरु करण्यासाठी लागणारे साहित्य व खोली आमच्याकडे नव्हती. या काळात दिवेकर मावशीच काळजीवाहकाच्या मदतीने मुलांची योगासने व प्राणायाम घ्यायच्या. साधारणपणे तीन महिन्यांनी जिमसाठी अनेक प्रकारचे व्यायाम करता येतील असे एकच मशीन आम्हाला राजू धारिया (मोहन धारियांचे सुपुत्र) यांनी सवलतीच्या दरात दिले. मी अनेक वर्षे जिमला जाऊन व्यायाम करत असल्यामुळे मुलांचे जिममधील व्यायामाचे रुटीन बसवणे मला सोपे होते. पण व्यायामाचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी माझे जिमचे सर नितीन ढवळे यांची मदत घेतली.


सुरुवातीला काही दिवस काळजीवाहक व शिक्षकांना योगासने, प्राणायाम व जिमचे व्यायाम शिकवावे लागले. मुलांसाठी रोज सकाळी हे का घ्यायचे याचे महत्त्व सहकाऱ्यांना पटवण्यात एखादे वर्ष सहज गेले. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आज जर तुम्ही सकाळी साडेसातच्या दरम्यान नवक्षितिजमध्ये आलात तर दृश्य असे असते. काही मुले जॉगिंग करत असतात,तर ज्यांना पळता येत नाही ते चालत असतात. हे झाल्यावर सर्वजण आठ वाजता ठरले असेल त्या विभागात व्यायामाला जातात. आता मुलांची संख्या वाढल्यामुळे जिम व योगासने याशिवाय एका गटाचे मैदानावरचे व्यायाम घेतले जातात. अनेक मुले चक्रासनासारखी अवघड आसने, सूर्यनमस्कार व प्राणायाम व्यवस्थित करतात. ज्यांच्या हाता-पायामध्ये, मेंदूला आघात झाल्यामुळे काठिण्य आले आहे, कोऑर्डीनेशन चांगले नाही, तसेच ज्यांचे मतिमंदत्व तीव्र स्वरूपाचे आहे ही मुलेसुद्धा प्रयत्नपूर्वक योगासनांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. जिममध्ये मशिनवर व्यायाम प्रकार करणे मुलांना त्या मानाने सोपे जाते. डंबेल्स व रॉड हातात धरून करायचे व्यायाम मुलांना अवघड जातात. कारण हालचालींवर तेवढे नियंत्रण ठेवता येत नाही. अधूनमधून माझ्या सहकाऱ्यांसाठी व्यायाम नीट समजण्यासाठी वा त्यांना बरोबर समजले आहे ना हे बघण्यासाठी, कार्यशाळेचे नियोजन केले जाते. यामुळे मुलांचे व्यायाम योग्यप्रकारे व्हायला मदत होते. दर शुक्रवारी सकाळी (दर गुरुवारी मी मारुंजीला राहाते) मी तिन्ही विभागांत फिरून मुलांच्या व्यायामाचे निरीक्षण करते, जेथे चुकत असेल तिथे सुधारणा करून घेते व संबंधित सहकाऱ्यांच्या हे लक्षात आणून देते. आता सकाळी सात वाजता गाणी सुरु झाली की, अनेक मुले स्वतःहून उठतात व सकाळचे आन्हिक उरकून उत्साहाने व्यायामाला येतात. दर शुक्रवारी सकाळी मला याची डोळा हे बघताना फार छान वाटते.
व्यायाम झाल्यावर मुले नाष्टा करायला जातात. पूर्वी मुले कमी असताना मुला-मुलींचा डायनिंग हॉल एकच होता. त्यामुळे वेळापत्रकाप्रमाणे ज्या काळजीवाहकांची वाढायची पाळी असेल ते जेवण वाढत असत. पण मुलांची संख्या वाढल्यानंतर डायनिंग रूम स्वतंत्र केली. एकतर जागा अपुरी पडायला लागली व एकदम सगळे जेवताना खूप गोंधळ व्हायचा. स्वयंपाकघर मात्र तेच ठेवले. यामुळे जेवण इतर दोन डायनिंग रुममध्ये न्यावे लागते. यासाठी जेवण गरम राहील असे कॅसॅरॉल्स आणले व प्रत्येक घराची भांडी वेगळी करून त्यावर विशिष्ट रंग लावले. भांडी धुण्याचे टब ठेवण्यासाठी ओटा व बेसिन्स करून घ्यावी लागली. भांडी ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा करावी लागली. हे सर्व बदल सगळ्यांनी उत्साहाने केले, कारण सगळ्यांनाच हा बदल आवडला होता.आता सगळ्यांनाच शांतपणे जेवता येणार होते. तयार झालेले जेवण डायनिंग रुममध्ये नेणे, जेवणाची रिकामी भांडी स्वच्छ करून परत स्वयंपाकघरात नेऊन ठेवणे ही कामे मुले उत्साहाने करतात. आम्ही सर्वजण जेवण झाल्यावर स्वतःचे ताट, वाटी, भांडे स्वतः धुतो. अर्थात, काही मुलामुलींना मदत लागते. मुले भांडी धुताना व पुसून ठेवताना एक काळजीवाहक तेथे उभा असतो. मुले भांडी धुताना व नंतर भांडी कोरडी करून पुसून टबमध्ये ठेवताना त्यांच्यावर लक्ष ठेवूनच हे करून घ्यावे लागते. काळजीवाहक, मुलांच्या मदतीने भांडी जागेवर ठेवून, टेबल, बेसीन, ओटा स्वच्छ करून व राहिलेले अन्न स्वयंपाकघरात नेऊन ठेवतो. नाष्टा झाल्यानंतर मुले अंघोळीला जातात. ही सर्व कामे मुले शिस्तीत करत असतात. सर्वसाधारणपणे सकाळचा चहा, नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण, संध्याकाळचा चहा-नाष्टा याचे नियोजन वर सांगितल्याप्रमाणेच असते. मुलांना मदतीला घ्या हे सहकाऱ्यांना पटवून द्यावे लागते. अनेक मुले आता जबाबदारीने काम करायला लागली आहेत. त्यांना नेमून दिलेले काम ते आवडीने, न विसरता व आनंदाने करतात. नेमून दिलेले काम केल्यानंतर त्याचा रास्त अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर बघून मस्त वाटते.
अंघोळीच्या वेळी मुलांना काळजीवाहकाची जास्तीत जास्त मदत लागते. कारण नव्वद टक्के मुले अंघोळ स्वच्छ करत नाहीत. काही मुलांना कपडे बाथरूममध्ये ठेवण्यापासून सर्व मदत लागते. काहींना अंघोळ करायचीच नसते. मला आठवतय एका मुलाला अंघोळ करायचीच नसायची. काळजीवाहक फारच मागे लागला तर हा पठ्ठ्या घरातून बाहेर पडून पूर्ण आवारामध्ये जोरजोरात ओरडत पळत सुटायचा. बऱ्याच महिन्यांने तो स्वतःहून रोज अंघोळ करू लागला. काही मुलांना काढलेले कपडे धुवायला टाकायचे नसतात अगदी आतले कपडेसुद्धा. काळजीवाहकाने फारच आग्रह केला तर काळजीवाहकाला दणका द्यायलाही मुले मागे-पुढे बघत नाहीत. त्यामुळे काळजीवाहकाला त्यांच्या कलानेच घ्या असे सांगावे लागते व अनुभवाने काळजीवाहकही हे शिकतात. अंघोळीच्या वेळातच मुले काळजीवाहकाच्या मदतीने घर साफ करतात. काळजीवाहक मुलांच्या क्षमतेप्रमाणे कामाची विभागणी करतो. घर झाडणे, पुसणे, बेसीन, बाथरूम व संडास धुणे, बदललेले कपडे वॉशिंग मशिनपाशी नेऊन ठेवणे ही कामे काळजीवाहकांच्या मदतीने मुले करतात. मुलांना सहभागी करून कामे करायचा उद्देशच हा आहे की, मुलांना माझे घर ही भावना यावी. मी काम करू शकतो हा विश्वास त्यांना आल्यावर त्यांचा आत्मसन्मान व आत्मविश्वास वाढीला लागावा. हे झाल्यावर ते स्वतःची मते व्यक्त करू लागतात, संवाद कौशल्य वाढते. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या भावनांवर होऊन ते आनंदी राहू लागतात. त्यांची देहबोली बदलते. हे सर्व बदल वेगवेगळ्या थेरपीज देऊन होत नाहीत. याचे महत्त्व वरचेवर काळजीवाहक व पालकांना समजावून द्यावे लागते. विशेषतः काही पालकांना असे वाटते की माझे मूल नवक्षितिजमध्ये घर झाडते, पुसते, बेसीन- संडास-बाथरूम धुते. हे तर त्याला आम्ही कधीच करायला लावले नाही. आमच्याकडे सर्व कामाला बाई आहे. मग त्यांना यामागची भूमिका पटवून द्यावी लागते. आम्ही सहकारी कमी म्हणून मुलांकडून कामे करून घेत नाही, तर मुलांमध्ये सकारात्मक बदल व्हावेत म्हणून त्यांचा सहभाग घेतो. हा दिनचर्येमधील सहभागामुळे मुलांमध्ये असलेला आळशीपणा जाऊन मुलांमध्ये उत्साह येतो.
नाष्टा, अंघोळ झाली की मुले गणवेश घालुन कार्यशाळेत जातात. एक ते दोन या वेळात मुले जेवायला जातात. यावेळी नाष्ट्याच्या वेळी असते तशीच पद्धत असते. जेवणानंतर परत कार्यशाळा असते. चारनंतर खेळ खेळून साधारणपणे पावणेपाचपर्यंत मुले आपापल्या घराकडे येतात. गणवेश बदलून हातपाय धुतात व संध्याकाळचा हलकासा नाष्टा व चहा घेतात. यानंतर मुलांना जरा वेळ असतो मग कोणी परत कॅरम काढून खेळतात, तर कुणी क्रिकेट खेळतात, तर काही मुले बागेमध्ये झोक्यावर व बाकांवर गप्पा मारत बसतात. नंतर हवामानाप्रमाणे म्हणजे उन्हाळ्यात ऊन कमी झाल्यावर उशिरा, तर थंडीत अंधार लवकर पडतो म्हणून लवकर फिरायला जातात. पावसाळ्यात फिरणे बंद असते. एकतर चिखल खूप असतो. त्यामुळे मुले घसरून पडायची शक्यता वाढते. पावसाळ्यात व रिकाम्या वेळेत मुले-मुली घरामध्ये बसूनच कॅरम, पत्ते, सापशिडी खेळतात. ड्रॉईंगबुकमध्ये रंगवत बसतात. काही मुले टी.व्ही बघत बसतात. रेडिओ ऐकतात. काही मुली दिवेकर मावशींनी शिकवलेले भरतकाम करतात. कधीकधी दिवेकर मावशी व मुली रात्री लॉनवर बसून भरतकाम करत असतात. मी गुरुवारी राहते तेव्हा मी मुलींबरोबरच जेवते. रात्री जेवण झाल्यावर आम्ही एकत्र शतपावली करतो. शतपावली झाल्यावर तासभर एकत्र टी.व्ही. बघतो. गुरुवारी मारुंजीला राहते तेव्हा माझ्या मनात हमखास विचार येतो की, खरच विशेष मुलांना इथे किती छान आयुष्य मिळतंय.
चालताना अडचण येत असलेली व चालायचा आळस असलेली अशी चार-पाच मुले सोडली, तर फिरायला जायला सगळ्यांना फार आवडते. नवक्षितिजपासून जवळच सुरक्षित जंगल व टेकड्या आहेत. शिवाय काम करून सोडून दिलेल्या दगडाच्या खाणी आहेत. या दगडाच्या खाणींमध्ये आता पाणी साठलेले आहे. अशा निसर्गरम्य परिसरात झाडींमधून फिरायला फार छान वाटते. कधीकधी आम्ही या पाणवठ्याच्या काठावर बसतो. मुलांना पाण्याजवळ जाऊ द्यायचे नाही एवढी काळजी घ्यावी लागते. उडताना वा पाण्याच्या काठावर बसलेले बगळे दिसतात, पोहणारी बदके, टिटव्या दिसतात. यांच्या दर्शनाने मुले खूप खुश होतात. कधीकधी मुले गाणी म्हणतात वा गाण्याच्या भेंड्या वा माझ्या आईचे पत्र हरवले सारखे खेळ खेळतात. फिरणे कंटाळवाणे होऊ नये म्हणून असे बदल अधूनमधून केलेले बरे असतात.
मुलांबरोबर रोज संध्याकाळी फिरायला कोण व कधी जाणार याचे वेळापत्रक तयार करताना काळजीवाहकांबरोबरच व्यवस्थापक, समन्वयक तसेच बागकाम करणारे सहकारी यांनाही सहभागी केले आहे. यामुळे काळजीवाहकांना रोजच फिरायला जावे लागत नाही व त्यांना जरा स्वतःसाठी मोकळा वेळ मिळतो. सतत विशेष मित्रमैत्रीणींबरोबर राहून काम करणे सोपे नसते, कारण काही मुले सारखी असंबद्ध बोलत असतात. काहीजण नुसत्या दुसऱ्यांच्या खोड्या काढत असतात तर काही नुसत्या तक्रारीच सांगत असतात. या सगळ्या वातावरणामुळे सहकाऱ्यांचा मानसिक ताण वाढतो. म्हणून सहकाऱ्यांनी सतत मुलांबरोबर काम करणे योग्य नाही. सहसा काळजीवाहकांना कार्यशाळेमध्ये काम देत नाही. त्यामुळे मुले कार्यशाळेत गेली की, त्यांना मोकळा वेळ मिळतो. तसेच नवक्षितिजमध्ये राहाणाऱ्या शिक्षकांना कार्यशाळेव्यतिरिक्त मुलांबरोबर फारसे काम नसते. असे वेळापत्रक केल्यामुळे हसतखेळत तणावरहित काम व्हायला मदत होते.
रोज संध्याकाळी फिरून घरी आल्यावर मुले हातपाय धुवून आपल्या काळजीवाहकांबरोबर आपापल्या घरात प्रार्थना म्हणतात व थोडावेळ ध्यान करतात. हे झाल्यावर थोड्याच वेळात जेवायची वेळ होते. साधारणपणे आठपर्यंत जेवणं होतात. जेवणानंतरची आवराआवरी व ज्या मुलांना औषधे सुरु आहेत, त्यांची औषध देणे उपक्रम असतो. हे होईपर्यंत साडेआठ होतात. जवळजवळ पन्नास टक्के मुलांना औषधे चालू असतात. फीट येणे, मानसिक आजार, थायरॉईड, डायबीटिस, ब्लडप्रेशर, हृदयाचा आजार अशा अनेक आजारांवर मुलांना औषधे सुरू असतात. ही सर्व औषधे आयुष्यभर सकाळ-संध्याकाळ नियमित घ्यायची असतात. मुला-मुलींना स्वतंत्र असे दोन सहकारी औषधे नियमित देण्याचे काम जबाबदारीने करतात. आमची एकच अपेक्षा असते, पालकांनी वेळेवर औषधे पोहोचवावीत पण तिथेही काही मोजके पालक दिरंगाई करतात व औषधे वेळेवर न दिल्यामुळे मुलांवर होणाऱ्या परिणामांना आम्हाला सर्वांना सामोरे जावे लागते. औषधे घेऊन झाली की बरेचजण आवारात फेऱ्या मारतात. फेऱ्या मारून झाल्यांनतर थोडावेळ मस्त अड्डा जमवून गप्पा मारतात. आवारातील झोके व बाकड्यांवर बसून हे उद्योग चालतात. काही मुले रेडिओ हातात घेऊन बाकड्यावर बसून रेडिओ ऐकत असतात. एकमेकांना चिडवणे, एखाद्याला ठरवून त्रास देणे असे अनेक उद्योग चालतात. कोणी घरी जाऊन आले असेल तर घरी काय केले, काय खाल्ले त्या गप्पा. या गप्पांमध्ये लग्न, मैत्रिणी, सुट्टीमध्ये एकमेकांच्या घरी जायचे प्लॅनिंग तर कधीकधी या गप्पा अमेरिकेला जाऊया इथपर्यंत पोहोचतात. काही मुलांचे भाऊ-बहीण अमेरिकेत आहेत. काही मुले-मुली टी.व्ही. बघतात. साधारणपणे साडेनऊ वाजता झोपायला गेल्यावरही एकमेकाला गुदगुल्या करून हसत बसणे वा शेजारच्या कॉटवरील मुलाशी गप्पा मारत बसणे, अर्थात हे बॉर्डरलाईनची मुले करतात. मुली मला आठवड्याच्या मीटिंगमध्ये वा कधीकधी फिरायला गेल्यावर सांगत असतात की, रात्री झोपताना आम्ही कशी मस्ती करतो. काय मस्ती करता हे तरी सांगा असे म्हटल्यावर मग खूप उत्साहाने व एकमेकींकडे बघत हसत हसत सांगतात. आम्ही एकमेकींना टपला मारतो व बाथरूममध्ये लपून बसतो. लपलेली मुलगी सापडेपर्यंत नुसता हसण्याचा कल्लोळ करतात. एकमेकींना गुदगुल्या करतात व कॉटवरून खाली पडेपर्यंत हसत असतात. हे नुसते बघणारी मुले व मुली हसत हसत त्यांना साथ देतात व त्यांच्याबरोबर मजा करण्यात सहभागी होतात. काही मुलांना रेडिओ ऐकत झोपायला आवडते. बऱ्याचदा झोप लागून जाते व रेडिओ सकाळपर्यंत सुरूच असतो. काही मुले रेडिओची मोडतोड करतात. मुलांची आवड लक्षात घेऊन आम्ही वरचेवर झोपताना रेडिओ बंद करण्यासंबंधी व नीट वापरण्यासंबंधी समज देतो.



रात्री मुलांसाठी वाद्यसंगीत लावले जाते, जे ऐकून मुलांच्या मनाला झोपताना शांत वाटावे, हा यामागचा उद्देश. दादा व ताई डासांसाठी गुडनाईट लावून, सीझनप्रमाणे पांघरून देऊन झोपायला जातात. काळजीवाहक हा या मुलांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा घटक असतो. काळजीवाहकाने मुलांना समजून घेणे व स्वतःच्या रागावर ताबा ठेवणे फार जरुरी असते. कारण मुले लवकर अंघोळीला जात नाहीत, संडास-बाथरूम घाण करतात, कपडे खराब करतात. फ्लशचा वापर करीत नाहीत. बघून विशेष मूल वाटणार नाहीत अशी बॉर्डरलाईनची, बुद्ध्यांक बरा असणारी मुलेसुद्धा शारीरिक स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन असतात. अशा मुलांनी घाण केली व याबद्दल काळजीवाहक विचारायला लागला तर एकतर ही मुले खोटे बोलतात किंवा मी घाण केलीच नाही, असा कांगावा करून बुद्ध्यांक कमी असलेल्या मुलाचे नाव सांगून मोकळे होतात. काळजीवाहक फारच मागे लागले तर अशी मुले आक्रमक होतात. त्यामुळे काळजीवाहकांना फारच समजुतदारपणे काम करावे लागते. काळजीवाहकांशी, समन्वयक व व्यवस्थापकांचा सतत संवाद फार आवश्यक असतो. त्यांच्याशी नियमित संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेता याव्यात असेच नियोजन वेळापत्रकात केले आहे. कधीकधी काही मुलांची एकमेकांशी जर सतत भांडणे होऊ लागली वा त्या घरातील मुले मिळून एखाद्याला त्रास देत आहेत असे आढळले, तर अशा मुलाचे घर बदलावे लागते. काही मुलांना कपड्यांची आसक्ती असते त्यामुळे ते इतरांचे कपडे आपल्या बॅगमध्ये वा कपाटात लपवून ठेवतात व काळजीवाहक ते काढून घ्यायला लागला तर युद्धाचा प्रसंग. एक मुलगा असा आहे की तो राग आला तर स्वतःचे कपडे फाडतो, याला राग कशाने येईल याचा भरवसा नाही. त्यामुळे याला राग येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी कळत नाही. तर दुसरा मुलगा कपडे, बॅग, बल्ब, रेडिओ असे काहीही...जुने झाले म्हणून फाडतो, फोडतो किंवा फेकून देतो. जुने झाले याला काही लॉजिक नाही. ते कपडे वा वस्तू थोड्या वेळापूर्वी पण आणलेल्या असू शकतात. या व अशा अनेक अडचणींचा सामना करत मुलांना चांगला दिनक्रम द्यायचा असतो. काळजीवाहक, समन्वयक व व्यवस्थापकाने हे सर्व समजून घेऊन व संवेदनशीलतेने करावे म्हणून माझा यांच्याशी सतत संवाद चालू असतो.
मुलांना बरे नसेल तर काळजीवाहकांच्या लगेच लक्षात यायला पाहिजे. वेळेत मुलांना योग्य ते औषध उपचार मिळाले पाहिजेत व अशा वेळी मुलाची योग्य ती काळजी प्रेमाने घ्यायला पाहिजे, अशा अनेक गोष्टींबद्दल समन्वयक, व्यवस्थापक व काळजीवाहकाचे समुपदेशन सतत करावे लागते. आपण मुलांना चांगले आयुष्य देण्याकरता नवक्षितिज सुरु केले आहे. आई-वडिलांचे मुलांवर खूप प्रेम आहे, पण ही तरुण विशेष मुले दिवसभर घरी करणार काय? व एकटे आई-वडील मुलांना चांगला दिनक्रम कसा देणार? त्यामुळे नवक्षितिजसारख्या संस्थाच तरुण विशेष मुलांना छान आनंदी आयुष्य व त्यांच्या कुटुंबाला तणावरहित आयुष्य देऊ शकतात. हे सतत सांगून माझ्या सहकाऱ्यांना हे हळूहळू पटायला लागते व ते मुलांना चांगले समजून घ्यायला व त्यांच्याशी प्रेमाने वागायला शिकतात. प्रत्यक्षामध्ये हे करणे फार अवघड असते. कारण सर्वसाधारण समज असतो की, विशेष मुले निष्पाप असतात. पण प्रत्यक्षात तसे नसते. ते अनेक प्रकारे माझ्या सहकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण हाही मतिमंदत्वाचाच परिणाम आहे. त्यांची कुचंबणा, कंटाळा येणे, मनातले सांगता न येणे, काहीतरी करावेसे वाटतंय; पण प्रत्यक्षात करता न येणे, तसेच काहीवेळा घरच्यांकडून व समाजाकडून स्वीकारले न जाणे त्यामुळे होणारी अवहेलना व अपमान याचा परिणाम म्हणून मुलांची स्वतःबद्दल हीन भावना तयार होते व मुले आत्मसन्मान व आत्मविश्वास गमावून बसतात. या सर्व कारणांमुळे नकारात्मक भावना वाढीस लागून वर्तणूक समस्या वाढायला लागतात. असा सर्व बाजूने मुलांबद्दल विचार करावा, याकरता माझे सहकाऱ्यांशी सतत बोलणे चालू असते. मला समाधान वाटते की, आता माझ्या सहकाऱ्यांना मुलांना समजून घेणे जमायला लागले आहे.
आठवड्यातून दोनदा बुधवारी व रविवारी संध्याकाळी पाच ते साडेसात मुले सिनेमा बघतात. या दिवशी मुले फिरायला जात नाहीत. आतापर्यंत मुले कार्यशाळेच्या हॉलमध्येच मोठ्या पडद्यावर सिनेमा बघत होती. पण २०१७ साली सांस्कृतिक भवन तयार झाल्यामुळे मुले येथे मस्त खुर्चीवर बसून सिनेमा बघतात. पूर्वी मी कार्टून फिल्मस्, प्राण्यांच्या काही छान इंग्लिश फिल्म, त्याबरोबर मराठी व हिंदी फिल्म आणायची. पण असे लक्षात यायला लागले की मुलांना कार्टून व प्राण्यांच्या इंग्लिश फिल्मस् बघायला फारशा आवडत नाहीत. त्यामुळे आता गाजलेल्या मराठी व हिंदी फिल्मस् आणतो. त्यातल्या त्यात मुलांना समजतील अशा व मारामारी, भडक दृश्ये नसतील अशा फिल्मस् दाखवायचा प्रयत्न असतो. दर महिन्याला दाखवावयाच्या सिनेमांची सीडीज काढून त्यांची यादी केली जाते. ती यादी मी तपासते. यानंतर निवड केलेल्या सिनेमांची यादी कार्यशाळेत लावली जाते. सीडीज बरोबर दिसतात की नाही हे एक सहकारी तपासून ठेवतो. त्यामुळे वेळापत्रकाप्रमाणे ज्या सहकाऱ्यांचे मुलांबरोबर बसून सिनेमा बघायचे नियोजन असेल, त्यांना सिनेमा लावताना अडचण येत नाही. मुलांना सिनेमा लावून दिला की सहकाऱ्याचे काम संपले असे नसते. काही मुलांचे सिनेमा बघताना पण एकमेकाला त्रास देणे, भांडण करणे सुरूच असते. यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सहकाऱ्यांना त्यांच्याबरोबर बसावेच लागते. काही मुलांना सिनेमा बघायला आवडत नाही. ही मुले बागेमध्ये बसतात. काही मुले सायकल चालवतात. सिनेमा बघायची जबरदस्ती मुलांना कोणीही करत नाही.
या दिनक्रमाचे नियोजन करताना मुलांचा सहभाग वाढवला, यामुळे मुलांच्या आहेत त्या क्षमता बाहेर यायला व क्षमता वाढायला मदत झाली. मुले जबाबदारीने काम करायला शिकली. हे प्रत्यक्ष अनुभवताना इतके छान वाटते! उदाहरणार्थ, अनुजाकडे जेवण झाल्यावर साफ केलेले कॅसॅरॉल व इतर काही भांडी स्वयंपाक घरात नेऊन ठेवायची जबाबदारी असेल, तर ती सगळी भांडी साफ व्हायची शांतपणे वाट बघते. ती भांडी योग्य जागी ठेवूनच ती कार्यशाळेत जाते. ज्याची टेबल पुसायची जबाबदारी आहे तो सगळ्यांची जेवणे व्हायची वाट बघतो व नंतर टेबल पुसायचे काम झाल्यावर कार्यशाळेकडे जातो. असे सर्वच कामांच्या बाबतीत आहे. त्यांची ही ठरवून दिलेली कामे इतरांनी केलेली त्यांना अजिबात आवडत नाहीत. ही कामं ते करतात याचा सार्थ अभिमान त्यांना असतो.
घरी काही कार्यक्रम असतील तर व सणांनासुद्धा काही आई-वडील मुलांना घेऊन जातात. आई-वडिलांना आठवड्यातून एकदा मुलांना फोन करायला सांगतो व महिना-दोन महिन्यांतून एक- दोन दिवसांसाठी घरी न्यायला सांगतो. हा बदल त्यांना सुखावून जातो. दिवाळी व मे महिन्यामध्ये बरीचशी मुले काही दिवस सुट्टीकरता घरी जाऊन येतात. सारखे मुलांना घरी नेऊ नका असे काही पालकांना सांगावे लागते, कारण दिनक्रमामध्ये सतत बदल झाला तर मुलांना सुट्टी संपवून नवक्षितिजमध्ये आल्यावर अॅडजेस्ट व्हायला वेळ लागतो. एखादा मुलगा सारखा घरी जायला लागला तर इतर मुले डिस्टर्ब होतात व त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल होऊन चिडचिड करणे व दुसऱ्यांना मारणे यासारख्या समस्या वाढतात.
साधारण असा नेहमीचा दिनक्रम असतो पण यामध्ये सणवार, ट्रेकस् व अशा काही कार्यक्रमांमुळे बदल होतो व असे बदल मुलांना आवडणारे असतात. मुलांची कमी बौद्धिक क्षमता व हैराण करून सोडणाऱ्या वर्तणूक समस्या यामुळे हा दिनक्रम प्रत्यक्षात आणणे फार अवघड असते; पण दिवेकर मावशी व माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीमुळे हे शक्य होते. या सगळ्यांना कितीही धन्यवाद दिले तरी ते कमीच आहेत. या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे मुलांना रोजचा दिवस आनंदाने घालवता येतो. दिनक्रम व्यवस्थित सुरु आहे ना? किंवा हा दिनक्रम देताना काही अडचणी येतात का? यावर सर्व सहकाऱ्यांबरोबरच्या आठवड्याच्या मीटिंगमध्ये अधूनमधून चर्चा होतच असते. काही अडचण येत असेल तर त्यावर चर्चा होऊन सर्वानुमते तोडगा काढला जातो.