
१२. नवक्षितिजचे अनोखे उपक्रम
हे सर्व उपक्रम झाल्यानंतर लगेचच किंवा दुसऱ्या दिवशी मीटिंग होते. नेहमीप्रमाणे सर्वप्रथम मी माझ्या सहकाऱ्यांचे कौतुक करते व नंतर आम्ही काही सुधारणा करणे आवश्यक असेल तर त्यावर चर्चा करतो व त्याची नोंद करून ही मीटिंग संपते. यामुळे पुढच्या वर्षी उपक्रम अजून चांगल्या प्रकारे आयोजन करण्यास मदत होते व वर्षांनुवर्षे हे उपक्रम सुरु राहू शकतात. इतर उपक्रमांप्रमाणेच सुरुवातीला काही वर्षे बरीच जबाबदारी माझ्यावर असायची; परंतु आता फक्त प्रमुख पाहुणे ठरवणे, सर्व नियोजन नीट चाललेय ना यावर लक्ष ठेवणे व जरूर असेल तिथे सूचना करणे, एवढेच काम माझ्याकडे असते.
२७ नोव्हेंबर २००३ हा नवक्षितिज संस्थेच्या स्थापनेचा दिवस व हाच अनोखी पदयात्रेचा पहिला दिवस होता. याबद्दल बरेच सविस्तर मी आधी लिहिले आहे. मुलांसाठी वेगळे, अनोख्या उपक्रमाचे आयोजन करावे असे मला वाटू लागले. यामध्ये एक थ्रिल असते व अशा नवीन गोष्टी करून बघायचा प्रवास फार इंटरेस्टिंग असतो. या प्रवासामध्ये येणारे चांगले वाईट अनुभव आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देतात. असेच अनोखे अनुभव विशेष मुलांना देऊन, त्यांचेही आयुष्य अशा अनुभवांनी समृद्ध करावे, असे मला वाटते. मला हे सगळे उपक्रम करताना परत परत जाणवते की, हे उपक्रम घेण्यामागची तुमची प्रामाणिक इच्छा, सतत प्रयत्न करायची तयारी व व्यवहारामध्ये पारदर्शकता असेल तर सर्व अडचणींतून मार्ग निघतो. अनेक हितचिंतक तुमच्या मदतीला येतात व हे उपक्रम यशस्वी होतात. हे सर्व उपक्रम यशस्वी होण्यामध्ये माझे सहकारी, सहभागी संस्थांचे शिक्षक, वेगवेगळ्या संस्थांचे स्वयंसेवक, अनेक हितचिंतक व मुख्य म्हणजे आमच्यावर विश्वास ठेवून या उपक्रमांसाठी विशेष मुलांना आमच्या बरोबर पाठवणारे पालक, या सर्वांमुळेच हे उपक्रम यशस्वी होऊ शकतात व नुसते होतात असे नाही तर हे प्रत्यक्षात करताना मुलांना खूप मजा येते. हे उपक्रम करायचा मुख्य उद्देशच हा आहे की, मुलांना हे करताना मजा यावी.
वृक्षारोपण-
२००४ सालापासून आम्ही नवक्षितिजच्या मुलांना घेऊन वृक्षारोपण करू लागलो. पहिल्यांदा वेताळ टेकडीवर वृक्षारोपण केले. नंतर पर्वतीला दोनदा वेगवेगळ्या संस्थांबरोबर सहभागी होऊन झाडे लावली होती. २००७ साली मारुंजीला निवासी कार्यशाळा सुरु झाल्यावर, आम्ही तळजाईला पर्यावरण दिनानिमित्त दोनदा वृक्षारोपण केले. एकदा झाडे लावण्याबरोबर मुलांनी पर्यावरणावर पथनाट्य सादर केले. दुसऱ्यांदा डॉ. राजकुमार शहा यांच्या निमंत्रणामुळे रेडक्रॉस संस्थेबरोबर तळजाई येथे वृक्षदिंडी काढून पथनाट्य सादर केले व झाडे लावली. नंतर सलग दोन वर्षे पर्यावरण दिनानिमित्त रेडक्रॉस संस्थेबरोबर मित्रमंडळ चौक ते टिळक रोडच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यालयापर्यंत पदयात्रेमध्ये सहभागी झालो. मुलांनी दोन ठिकाणी पर्यावरणावर पथनाट्ये केली. या पदयात्रेमध्ये अनेक डॉक्टर्स सहभागी झाले होते. त्यांनी मुलांचे मनापासून कौतुक केले व काही मदत लागली तर अवश्य सांगा, असे मला आवर्जून सांगितले.
२००७ साली मारुंजीला आल्यावर पावसाळ्यामध्ये दोन-तीन वर्षे सलग संस्थेच्या आवारातच अनेक झाडे लावली.
दोन वेळा मारुंजी गावातून वृक्षदिंडी काढून नंतर रानात वृक्षारोपण केले. याकरता आम्ही जवळच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. गावातील लोक व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी जागरूकता यावी, हा वृक्षदिंडी काढण्यामागचा उद्देश होता. पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगला गेल्यावर लोहगड, शिवनेरी अशा काही किल्ल्यांच्या परिसरातही आम्ही वृक्षारोपण केले. अजूनही आम्ही पावसाळ्यात वृक्षारोपण करतो. एक-दोनदा तर असे झाले की वृक्षारोपण करण्याआधी, काही लोकांचे कुठल्या प्रकारची झाडे लावावीत हे विचारण्यासाठी मला फोन आले. आहे की नाही गंमत! नवक्षितिज सुरु केल्यापासून माझ्या ज्ञानाच्या कक्षा अशा रुंदावत चालल्या आहेत.


पर्यावरण स्वच्छता-
ट्रेकिंगच्या प्रॅक्टिसची सुरुवात पर्वतीपासून केली. तेव्हा पर्वतीवर फिरताना असे लक्षात आले, पर्वतीच्या मागच्या बाजूला प्लॅस्टिकचा खूप कचरा जमा झालेला आहे. याबद्दल चर्चा करत असताना हा कचरा आपण साफ करूया, असे सर्वांनुमते ठरले. त्यानंतर सलग दोन वर्षे म्हणजे २००५ ते २००६ साली (मारुंजीला जाईपर्यंत), आम्ही हा कचरा साफ केला. दरवेळी ३३ ते ३४ पोती कोरडा कचरा जमा करायचो. एकदा मुठा नदीकिनारी स्वच्छता मोहीम राबवली होती. मुलांच्या दृष्टीने नदीकिनारी स्वच्छता करणे अवघड वाटले, म्हणून आम्ही परत गेलो नाही.
२००६ सालापासून मुलांना घेऊन हिमालयात ट्रेकिंगला जायला लागल्यावर कँपसाईटच्या बाजूने व डोंगरावर पडलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाऊन झाल्यावर फेकलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसू लागल्या. आम्ही ठरवले की प्रत्येक कँपसाईटच्या भोवतीचा कचरा गोळा करायचा. आता आम्ही हिमालयात ट्रेकिंगला गेल्यावर किंवा बांधवगड सारख्या जंगलात गेलो, तरी दोन-तीन तास कचरा गोळा करण्याकरता ठेवतोच. कचरा गोळा करण्याचे काम सर्वजण मिळून करतो.
मारुंजी गावामध्ये अधूनमधून स्वच्छता मोहीम काढतो. याकरता आय.टी. क्षेत्रातील स्वयंसेवक आम्हाला मदत करतात. गावातील दोन चौकांमध्ये मुले पर्यावरणाची काळजी घेण्यासंबंधी पथनाट्ये सादर करतात. नंतर श्रावणी हॉटेलचे मालक नवनाथ भोर प्रायोजित चहा-नाष्टा घेऊन या स्वच्छता मोहिमेची सांगता होते. स्वच्छता मोहीम करताना लक्षात आले प्रत्येक माणसाने स्वच्छतेचे व पर्यावरण संरक्षणाचे नियम पाळल्याशिवाय आपला परिसर व देश स्वच्छ व सुंदर होणे शक्य नाही. अर्थात आम्ही व आपण प्रत्येकाने जमेल तसा हातभार लावून, जबाबदारी स्वीकारून स्वच्छता मोहीम पुढे न्यायची आहे. याकरता प्रचंड प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे.
जलदिंडी-
जलदिंडीमध्ये २००६ ते २००९ असा चार वर्षे सहभाग, तो आमच्या सर्वांसाठीच एक विलक्षण अनुभव होता. डॉ. विश्वास येवले यांनी २००४ साली जलदिंडी सुरु केली. दर वर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जलदिंडी आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी निघते. आळंदी ते पंढरपूर या मार्गावर पाण्यातून म्हणजे या मार्गावरील नद्यांमधून, बोटीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका नेल्या जातात. जलदिंडीचा उद्देश अध्यात्माबरोबरच नदी, जलप्रदूषणाविषयी जनजागृती करणे हा आहे. जलदिंडीमध्ये नवक्षितिजच्या मुलांबरोबर सहभागी व्हावे, असे मला वाटले. मी नवक्षितिजच्या विश्वस्तांशी याविषयी चर्चा केली. त्यांनाही असे वाटले की, जलदिंडीमधील सहभागाने मुलांना अजून वेगळे अनुभव मिळतील. डॉ. विश्वास येवले हे डॉ. देसाईंचे (अदितीचे बाबा) मित्रच असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणे सोपे होते. त्यांना भेटून जेव्हा नवक्षितिजच्या विशेष मुलांच्या जलदिंडीमधील सहभागाबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी लगेचच होकार दिला. जलदिंडीचा मार्ग नदीमधून होता व छोट्या बोटींमधून प्रवास होता. या बोटी चालवणाऱ्या सगळ्यांनी यासाठी अनेक महिने सराव केलेला होता. परंतु बोटीमधून जाणे मुलांसाठी सुरक्षित नव्हते. दुसऱ्या पर्यायांचा विचार करताना मुलांनी रस्त्याने गाडीने हा प्रवास करावा असे ठरले. हा सहभाग उपयुक्त ठरावा असे मला वाटत होते. आमच्या विश्वस्तांच्या मीटिंगमध्ये मुलांचा सहभाग उपयुक्त कसा करता येईल याविषयी चर्चा करताना, आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील गावांमध्ये मुले पर्यावरण जनजागरणाविषयी पथनाट्ये करू शकतील, यावर सगळ्यांचे एकमत झाले. नंतर आम्ही याविषयी डॉ. येवले यांच्याशी चर्चा केली. त्यांनाही ही कल्पना आवडली. यामध्ये अडचण एकच होती की मुलांना नेणाऱ्या वाहनाची व्यवस्था व खर्च आम्हाला करावा लागणार होता. हे वाहन आमच्याबरोबर १२ दिवसाकरता असणार होते. मग वाहनाचा शोध सुरु झाला. नगरचे आमचे मित्र बाळ जहागीरदार आमच्या मदतीला धावून आले. फक्त गाडीच्या डिझेलचा खर्च आम्हाला करायचा होता.असे सगळे जमून येत होते. आम्ही जलदिंडीमध्ये सहभाग घ्यायचा ठरवला. नेहमीप्रमाणे पालकांबरोबर मीटिंग झाली. त्यांनीही होकार भरल्यावर आमच्या बाजूने जलदिंडीची तयारी म्हणजे पथनाट्याची तयारी सुरु झाली. पथनाट्यामधून जलप्रदूषण याबरोबरच ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकचा कमी वापर व पुनर्वापर हे विषयही हाताळायचे ठरवले. हा ऑगस्ट महिना होता. दोन महिने मुलांना पथनाट्य सरावासाठी मिळणार होते. आम्ही या काळात जलदिंडी मार्गातील गावांमधील शाळा, कॉलेजेस, ग्रामपंचायती यांच्याशी संपर्क साधून विशेष मुलांच्या पथनाट्य सादरीकरणाकरता वेळ मागून घेतली होती. काही जणांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यामध्ये आळंदी गावातील एक शाळा व एक कॉलेज होते.
६ ऑक्टोबर २००६या दिवशी भजनाच्या गजरातच डॉ. येवले, ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन बोटीमध्ये बसले. इंद्रायणी नदीमधील जलदिंडीचा प्रवास सुरु झाला. आम्ही मुलांना घेऊन आळंदी गावातील कॉलेजमध्ये गेलो. तेथील प्रिन्सिपल आमची वाटच बघत होते. जवळजवळ अडीचशे विद्यार्थी होते. आमच्या मुलांचे अनोळखी गावामध्ये हे पहिले सादरीकरण होते. आम्हालाही मुलांच्या सादरीकरणाविषयी थोडीशी चिंता होती. मुलांनी पथनाट्य सादरीकरण सुरु केले. मुले विश्वासाने सादरीकरण करत होती व विद्यार्थी त्यांना प्रोत्साहन देत होते. टाळ्यांच्या गजरातच मुलांचे पर्यावरण या विषयाचे पथनाट्य संपले. मुलांनी आमच्या अपेक्षेपेक्षा चांगले सादरीकरण केले व तितकाच चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला.


आता सगळ्यांना भूक लागली होती. आम्ही सगळे गाडीत बसलो व गाडी आळंदीबाहेर आल्यावर, मस्त एका शेतात, झाडाखाली बसून बरोबर आणलेला डबा खाल्ला. आज मुक्काम तुळापूरला होता. वाटेतल्या अजून एका छोट्या शाळेमध्ये पथनाट्य करून आम्ही तुळापूरला आलो. येथे विश्वशांती संस्कृती केंद्रामध्ये आम्हाला एक खोली दिली होती. त्या खोलीत सामान ठेवले व हातपाय धुवून आम्ही फ्रेश झालो. येथे वारकरी संप्रदायाचे बरेच लोक आजूबाजूच्या गावातून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्याकरता आलेले होते. अंधार होत असतानाच जलदिंडी आली व भजनाच्या जल्लोषात ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पालखी मंडपात आणली. दिवसभर बोट चालवून डॉ. येवले व त्यांचे सहकारी दमले होते. पण एवढा जनसमुदाय येथे जमला होता की, सगळेजण तसेच मंडपात आले वारकऱ्यांचे भजन म्हणून झाल्यावर, मुलांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. विशेष मुलांनी पर्यावरण या विषयावर केलेले पथनाट्य बघून अनेकांना कौतुक वाटले. मुद्दाम येऊन लोक संस्थेची माहिती विचारत होते. रात्री सगळ्यांबरोबर पंगतीमध्ये जेवण घेऊन आम्ही झोपायला गेलो.
दुसऱ्या वर्षानंतर जलदिंडीमधील इतर सहभागी लोक, तसेच मुक्काम असायचा त्या गावातील ग्रामस्थ आमची वाट बघत असायचे. मुलांनी शाळा, कॉलेजेस, देवळे, ग्रामपंचायती अशा अनेक ठिकाणी पथनाट्य सादर करून टाळ्या मिळवल्या. २००९ साली राजस्थानातील जलबिरादरी या संस्थेचे मॅगसेसे (Magsaysay) पुरस्कार मिळालेले संस्थापक राजेंद्रसिंहजी यांच्यासमोर मुलांना पथनाट्य करायची संधी मिळाली. त्यांनीही मुलांचे भरभरून कौतुक केले. जलदिंडी बरोबर प्रवास करताना आम्ही देवळात, शाळेत, धर्मशाळेत, कोणाच्यातरी घरी रात्री मुक्काम करायचो. यामुळे मुले कुठल्याही परिस्थितीत अॅडजस्ट करायला शिकली. सर्व ठिकाणी मुलांची फार मायेने काळजी घेतली जायची. जलदिंडीमध्ये मुलांना संपन्न अनुभव मिळाला. डॉ. विश्वास येवले यांच्यामुळे मुलांना मुख्य प्रवाहात मिसळायची संधी मिळाली. हा सुंदर अनुभव घ्यायची मुलांना व आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. २००७ सालानंतर मारुंजीला निवासी कार्यशाळा सुरु केल्यावर आमचे अनेक इतर उपक्रम वाढल्यामुळे चार वर्षे सलग जाऊन २००९ नंतर आम्ही थांबायचा निर्णय घेतला. बघूयात भविष्यामध्ये परत जलदिंडीमध्ये सहभागी व्हायची संधी आमचे नवीन सहकारी व नवीन मुले यांना देता येईल का?
पुणे मॅरेथॉनमध्ये सहभाग-
२००५ ते २००८ या कालावधीमध्ये डिसेंबर महिन्यात होत असलेल्या पुणे मिनीमॅरेथॉनमध्ये मुलांना घेऊन सहभागी होत होतो. मुलांना या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायला आवडायचे. मॅरेथॉनमधील वातावरण फार जादुमयी असायचे. सगळीकडे उत्साह भरलेला असायचा. आय.टी. क्षेत्रातील अनेक स्वयंसेवक आमच्या मदतीला यायचे. मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेली सर्व मुले अंतर थोडे धावत, थोडे चालत पूर्ण करायचे. सहभागी इतर लोक त्यांना प्रेरित करायचे. नेहरू स्टेडियममध्ये पोहोचल्यावर नवक्षितिजचा फ्लेक्स बोर्ड हातात धरुन मस्त फोटो काढायचो. मिनी मॅरेथॉनमध्ये पळतानाचे मुलांचे फोटो अनेक दैनिक वृत्तपत्रामध्ये आलेले आहेत. नेहरू स्टेडियममधून बाहेर येऊन बरोबर आणलेला नाष्टा स्वयंसेवकांबरोबर करून आम्ही परत येत असू. २००८ नंतर सुरक्षिततेच्या कारणावरून मॅरेथॉनमध्ये भाग घेणे बंद केले.
चांदण्या रात्री सफर-
आमच्या सायकलिंग ग्रुपमधील मेहेंदळेकाका त्यांच्या मित्रांबरोबर दर महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या शनिवारी चांदण्या रात्री सिंहगड रस्त्यावरील गणेश मळा ते सिंहगड पायथा चालत जातात, असे एकदा गप्पांच्या ओघात त्यांनी मला सांगितले. मी त्यांच्याबरोबर एकदा जाऊन आले. मला असे वाटले या शांत वातावरणात चालायला मुलांनाही मजा येईल. मी माझा अनुभव विश्वस्त मीटिंगमध्ये सांगितला व मुलांना आपण घेऊन जाऊ शकू असे सांगितले. त्यांना पण असे वाटले की, मुलांना हा अनुभव देऊयात. आमचे नक्की ठरल्यावर पालकांशी बोललो. त्यांनी परवानगी दिली. आम्ही सर्वजण मिळून बाराजण होतो म्हणून अजून एका गाडीची सोय केली होती. आम्ही रात्री अकरा वाजता सिंहगड रोडला गणेश मळ्यापाशी गेलो. तेथे मेहेंदळेकाका व त्यांचे नेहमीचे ग्रुप मेंबर जमले होते. मुलांनी उत्साहात घोषणा देत चालायला सुरुवात केली. कोणालाही झोप आलेली नव्हती. मुले हा नवा अनुभव घ्यायला उत्सुक होती. या ग्रुपमधील इतर लोक मुलांशी संवाद साधत होते. मुलांचा चालायचा वेग बरा होता. पुणे-लोणावळा पदयात्रा करतानाचा चालण्याच्या अनुभवाचा फायदा दिसत होता. इतर लोकांना आश्चर्य वाटत होते की, ही विशेष मुले मजा घेत एवढे अंतर कसे काय चालत आहेत?

मुलांचा इतक्या रात्री चालत जायचा अनुभव नवाच होता. त्यांना चंद्रप्रकाशात चालताना मजा येत होती. आम्हाला वाटले होते त्यापेक्षा मुले चांगली चालत होती. खडकवासला धरणाच्या पाण्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब फार मोहक दिसत होते. पहाटे चार वाजता आम्ही सिंहगड पायथ्याला पोहोचलो. तेथे एका हॉटेलच्या वऱ्हांड्यामध्ये सगळ्यांनी गप्पांची मेहफिल जमविली. मुलांशी अनेकजण गप्पा मारत होते. त्यांची चेष्टा-मस्करी करत होते व मुख्य म्हणजे कौतुक करत होते. मुले पण या कौतुकाने सुखावत होती. साधारण पाच वाजता हॉटेल उघडले. सगळ्यांनी एकच कल्ला केला. मस्त गरमागरम चहा व बिस्किटे घेईपर्यंत पहाटेची पहिली बस आलीच. सगळेजण बसमध्ये चढलो व स्वारगेट येईपर्यंत मस्त झोपून गेलो. आम्ही जवळजवळ चार वर्षे या ग्रुपबरोबर चांदण्या रात्रीची सफर केली. दुसऱ्या वर्षांनंतर आम्ही खडकवासल्यापासून चालायला सुरुवात करायचो. मारुंजीला गेल्यावर पण एक वर्ष आम्ही चांदण्या रात्री चालायला गेलो होतो. नंतर इकडे येणे बंद केले, पण मुळशी जवळच्या लवासा भागात दोन वर्षे पौर्णिमेला चालायला गेलो. मध्ये काही वर्ष पौर्णिमेच्या रात्री चालणे बंद केले होते, कारण अनेक नवीन उपक्रम सुरु झाले होते. एकदा सहकाऱ्यांपैकीच कोणीतरी म्हणाले, परत चांदण्या रात्री चालायला मुलांना न्यायचे का? तेव्हा मला असे वाटले जंगलात चालायला जावे व रात्रीच्या जंगलाचा अनुभव मुलांना द्यावा.
२०१५ साली एप्रिल महिन्यात मारुंजीच्या जंगलात पौर्णिमेनंतरच्या शनिवारी रात्री चालायला मुलांना घेऊन गेलो होतो. चांदण्या रात्रीची ही सफर, रात्री जंगलात फिरणारा बदलापूरचा ऋतुराज जोशी, त्याची बायको नंदिनी व इतर ग्रुप मेंबर्स यांच्याबरोबर केली. ऋतुराज हा आमचा नातेवाईक. बदलापूरला त्याच्या आजीला भेटायला आम्ही गेलो तेव्हा मला भेटला. गप्पा मारत असताना त्याने सांगितले, त्याच्या संस्थेतर्फे तो जंगल ट्रेक व रात्री जंगलात फिरणे असे उपक्रम आयोजित करतो. मला खूप दिवसापासून, रात्रीच्या जंगलाचा अनुभव मुलांना द्यायचा होता. त्याला मी नवक्षितिजबद्दल सांगितले व मुलांना जंगलात न्यायची माझी इच्छा सांगितली. तो लगेच तयार झाला. तो व त्याचा ग्रुप एका शनिवारी संध्याकाळी नवक्षितिजमध्ये हजर झाले. त्यांनी नवक्षितिजच्या आवारातून ही सफर सुरु केली. बागेतील अनेक झाडे व वनस्पतींची आमची नव्याने ओळख झाली. आवारामध्ये बकुळीच्या फुलांचे झाड आहे याचा शोध आम्हाला नव्याने लागला. कारण या झाडाला अजून फुले येत नव्हती. त्यामुळे आम्हीच लावलेले झाड बकुळीच्या फुलाचे आहे हे आम्ही विसरलो होतो. पहिल्यांदाच आम्हाला आमच्या आवारात भेट देणारे घुबड दिसले. जंगलामध्ये प्रवेश करण्याआधी आम्हाला आकाशदर्शन घडविले. जंगलात फिरताना जंगली पाल, बेडूक, फुलपाखरांचा कोष, लायन अँटने शिकारी करता तयार केलेला सापळा, झाडांवरची कोळ्यांची जाळी दाखवली व कोळी शिकार कसा करतो हे सांगितले. सश्याची विष्टा दाखवली. झाडावर बसलेला लांब शेपटीचा श्रीम्प (long tail shrimp) आम्ही सगळ्यांनी बघितला. ऋतुराजने आम्हाला सांगितले हा बावळट पक्षी आहे, कारण शिकारी पक्षी सहज याची शिकार करू शकेल. पक्षी, दिसणार नाही अशा ठिकाणी बसून रात्री आराम करतात. पक्षी रात्री घरट्यात राहात नाहीत. अशा अनेक गोष्टी आम्हाला नव्याने समजत होत्या. जंगलामध्ये पाणवठ्याजवळ गेलो तर दोन डोळे पैलतीरावर चमकत होते. लांडगा, कोल्हा का अजून काही? पौर्णिमेच्या रात्री नीरव शांततेत, चांदण्या रात्री फिरायची मजा काही औरच असते.
ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्रॅम –
२००७मध्ये आम्ही मारुंजीला निवासी कार्यशाळा सुरु केली. मारुंजी हे हिंजवडीजवळ आहे. तेथील रोजचा ट्रॅफिकचा गोंधळ बघून ट्रॅफिक अवेअरनेस कार्यक्रम मुलांना घेऊन सुरु करावासा वाटला. आपल्या सर्वांना माहीत आहे की, पुण्यामध्ये ट्रॅफिकची समस्या किती भयाण आहे. मला असे वाटले की, विशेष मुले ग्रुपने या समस्येसाठी काहीतरी मदत करू शकतील. प्रत्यक्षात हे कसे करता येईल हा विचार करताना वाहतुकीचे नियम पाळण्यासंबंधी बोर्डस् बनवून मुलांच्या हातात द्यावेत व मुलांना उभे राहायला सुरक्षित जागा असलेले चौक शोधून तेथे एखादा तास मुलांना उभे करावे असे वाटले. विशेष मुलांच्या हातातील बोर्डस् वाचून काही लोकांना तरी वाहतुकीचे नियम पाळायची इच्छा होईल, अशी आशा मला वाटली. आपण काहीतरी चांगले करतोय या भावनेमुळे हे करताना मुलांना मजा येईल व विशेष मुलांबद्दल, मतिमंदत्वाबद्दल जनजागृती होण्यासही मदत होईल असे वाटले. माझा हा विचार मी माझ्या सहकाऱ्यांना बोलून दाखवला व त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना पण ही कल्पना आवडली. ट्रॅफिक अवेअरनेस म्हणजे वाहतूक जनजागृती कार्यक्रम महिन्यातून एकदा करायचे ठरविले. आता पोलिस परवानगीचा विषय पुढे आला, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हा उपक्रम करता येणार नव्हता. पहिल्यांदा वाकड चौकात पुणे-मुंबई रस्त्यावर उपक्रम घ्यायचा ठरवला. एकतर मारुंजीपासून जवळ व या चौकात वरचेवर ट्रॅफिक जॅमची समस्या असायची. हा उपक्रम करायची परवानगी मागणारे पत्र तयार केले. यासाठी दिवेकर मावशींची मदत घेतली. हे पत्र घेऊन मी हिंजवडी पोलिस चौकीत गेले. पुणे-लोणावळा पदयात्रेच्या वेळी पोलिस परवानगी काढतानाचा अनुभव चांगला होता त्यामुळे सहकार्य मिळेल, अशी आशा होती. त्यांनी उपक्रम करायला परवानगी दिलीच पण आग्रहाने चहा दिला व सर्वतोपरी सहकार्य करायचे आश्वासनही दिले. चला सुरुवात तर छान झाली. पुढच्याच आठवड्यामध्ये सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये कार्यक्रम घ्यायचे ठरवले. मुलांना नक्की काय करायचे आहे हे समजावून सांगितले. कारण त्यांचे सहकार्य हवे असेल तर त्यांना सर्व समजावून सांगून त्यांची मानसिक व शारीरिक तयारी करून घेणे खूप महत्त्वाचे असते. वाहतुकीच्या नियमासंबंधी बोर्डस् तयार करताना कुठले वाहतुकीचे नियम निवडावेत हे ठरवताना मजा आली. बोर्डस् वर ‘घाई करू नका’, ‘लाल दिवा लागलेला असताना वाहने थांबवा’, ‘तुमचा वेग माझ्यासाठी धोकादायक आहे’, ‘लहान मुले, वृद्ध व अपंग यांना रस्ता ओलांडताना मदत करा’, ‘अपघाताच्या ठिकाणी घोळका करून थांबू नका’ असे अनेक संदेश लिहिले.
वाहतूक जनजागृती कार्यक्रम हा उपक्रम करायचा दिवस उजाडला. सकाळी दहा वाजता वाकड चौकात, हिंजवडी पुलाखाली पोहोचायचे होते. मुलांनी सकाळच्या व्यायामाला सुट्टी दिली व लवकरच अंघोळी व नाष्टा उरकून घेतला. असे कुठे लवकर जायचे असेल तर मुले जराही कुरकूर न करता अगदी उत्साहातच उठतात. मी लवकर आवरून, माझी मारुती ८०० कार घेऊन मारुंजीला गेले. मुलांना बोर्डस् घेऊन कसेबसे दाटीवाटीने गाडीत बसवले. संतोष व निलंगे मोटारसायकलवरुन निघाले. असा आमचा लवाजमा दहा वाजता वाकड चौकात, हिंजवडी पुलाखालील पोलिस चौकीपाशी पोहोचला. आम्हाला बघून पोलिस इन्स्पेक्टर बाहेर आले. त्यांनी दोन पोलिस हवालदारांना आमच्या बरोबर दिले. या पोलिसांनी आम्हाला उभे राहण्यासाठी सुरक्षित जागा बघून दिली. मुले हातामध्ये बोर्ड धरुन आत्मविश्वासाने उभी राहिली. आपण काहीतरी वेगळे व चांगले करतोय याची त्यांना जाणीव होती. जाणारे येणारे कुतूहुलाने व कौतुकाने मुलांकडे बघत होते. सिग्नलला गाड्या थांबल्यावर लोक बोर्डवर लिहिलेले वाचत होते. काहीजण मुलांना हात हलवून थम्सअपची खुण करून शाबासकी देत होते. पोलिस पूर्णवेळ आमच्या बरोबर होतेच. एक तासभर आम्ही वाहतूक जनजागृती उपक्रम केला. उपक्रम झाल्यावर पोलिसांनी आग्रहाने पोलिस चौकीत नेऊन सर्वांना चहा-बिस्किटे दिली. इतक्या वेळ शांतपणे उभे राहिल्याबद्दल त्यांनी मुलांचे कौतुक केले.
आपण काहीतरी छान करून आलोय याचे समाधान व आनंद मुलांच्या देहबोलीतून दिसत होता. संस्थेमध्ये भेटेल त्याला त्यांना जमेल तसे ते काय करून आले आहेत, हे खूप उत्साहाने सांगत होती. विशेष व्यक्ती एकत्र आल्या तर समाजोपयोगी काम करू शकतात हा उपक्रम घेण्यामागचा उद्देशपण पूर्ण होताना दिसत होता. पुण्यातील वाहतूक समस्या कमी झाली का? याचे उत्तर नाही असेच आहे. कारण प्रत्येकजण वाहतुकीचे नियम जोपर्यंत पाळणार नाही, तोपर्यंत पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणे अवघड आहे. स्वयंशिस्तीशिवाय हा प्रश्न सुटणे अशक्य आहे. तरीही आम्ही आमचे प्रयत्न करणे सोडणार नाही, कारण कुठलाही चांगला बदल हा हळूहळूच होतो.
२००७ साली सुरु झालेला उपक्रम अजूनही सुरु आहे. आता तर पोलिसांना मुलांबद्दल विश्वास वाटू लागलाय. त्यामुळे ट्रॅफिक सिग्नलचा लाल दिवा लागल्यावर पोलिस मुलांना थेट रस्त्यावर घेऊन जातात. हा उपक्रम करताना खूप छान अनुभव येत असतात. पोलीसांमधला चांगुलपणा, सहृदयता व संवेदनशीलता या निमित्ताने आम्हाला अनुभवता येते. एकदा या उपक्रमाच्या दिवशीच पल्लवीचा वाढदिवस होता व हे जेव्हा हिंजवडी पोलिस स्टेशनच्या इन्स्पेक्टरांना कळले, तेव्हा त्यांनी आम्ही उपक्रम संपवून येईपर्यंत केक मागवून ठेवला होता. अशाप्रकारे चक्क पोलिस चौकीत सर्व पोलिसांबरोबर पल्लवीचा वाढदिवस साजरा झाला. पल्लवी पोलिसांना म्हणाली की, तिच्या आयुष्यातील हा बेस्ट वाढदिवस साजरा झाला. हे वाक्य ऐकून पोलिसांच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा भास मला झाला. आम्ही हिंजवडी, वाकड चौकाशिवाय डेक्कन, शिवाजीनगर, म्हसोबागेट, पुणे विद्यापीठ, भूमकर चौक, हिंजवडी येथील राजीव गांधी आय.टी.पार्क, कल्याणीनगर अशा अनेक ठिकाणी हा उपक्रम महिन्यातून एकदा घेतो. एकदा कार्यक्रम झाल्यावर जवळच गाडी लावलेल्या केळीवाल्याने मुलांना केळी खायला दिली. कधी कधी तेथून जाणारा एखादा दादा थांबतो, मुलांची विचारपूस करून कौतुक करतो, तर एखादे काका बिस्किटचे पुडे देऊन जातात. या सर्व अनुभवांमुळे दर महिन्याला या उपक्रमाला जायला मुले उत्सुक असतात. एकदा फार गमतीशीर नाही म्हणता येणार, पण आश्चर्यजनक अनुभव आला. पोलिसांना वाहतूक जनजागरण सप्ताह करायचा होता. तर त्यांच्याकडून फोन आला की वाहतूक नियमांचे पालन करण्यासंबंधीचे तुमचे बोर्डस् चांगले आहेत. तर एक आठवड्यासाठी ते आम्हाला द्याल का? नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.
वाहतूक जनजागृती उपक्रमाची नोंद पत्रकार घेतात. अनेकदा हा उपक्रम करतानाचे मुलांचे फोटो पेपरमध्ये आलेले आहेत. पेपरमध्ये आलेला स्वतःचा फोटो बघून मुले खुश होतात. या उपक्रमाला जाताना व उपक्रम करून आल्यावर मुलांची देहबोली फार सकारात्मक असते.
मुलांसाठी काही वेगळ्या स्पर्धा सुरु कराव्या असे वाटू लागले. कारण नाच, पोहणे, धावणे, गायन, क्रिकेट अशा काही खेळांच्या स्पर्धा, विशेष मुलांसाठी काही संस्था आयोजित करत होत्या. आपण काहीतरी वेगळी स्पर्धा सुरु करावी असे जवळ जवळ दोन-तीन वर्षे मनामध्ये येत होते. पण प्रत्यक्षात निर्णयापर्यंत येण्याइतकी सुस्पष्टता माझ्या विचारात तेव्हा नव्हती.
नाट्यमहोत्सव –
विशेष मुले व विशेष शिक्षकांना व्यक्त होण्यासाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असे वाटू लागले. यासाठी छोटी छोटी नाटके बसवून त्याची आंतरशालेय स्पर्धा घ्यावी असे वाटले. हळूहळू विचारांमध्ये सुस्पष्टता येऊ लागली. याच काळात लालन सारंग या प्रसिद्ध रंगकर्मी उपचारासाठी आमच्या दवाखान्यात येत होत्या. त्यांच्यासमोर मी ही कल्पना मांडली. त्यांना ही कल्पना आवडली. या नाट्यांचे विषय काय असावेत? असा विचार करताना मला असे वाटत होते की कॉमेडी-हास्य रस हा विषय असावा. माझे या विषयातील अज्ञान समजून घेऊन लालन ताई म्हणाल्या, कॉमेडी करणे, लोकांना हसवणे फार अवघड आहे. मग आमचे ठरले की, त्यांना चार-पाच विषय देऊयात. त्या विषयांमधील एक विषय त्यांनी नाट्य करण्याकरता निवडावा व तो विषय सात ते दहा मिनिटांमध्ये नाट्यरूपात सादर करावा. या स्पर्धेला नाट्य स्पर्धा न म्हणता नाट्यमहोत्सवच म्हणूया, असे ठरले. हे २००८ साल होते. नाट्यमहोत्सव घ्यायचे तर ठरले पण यासाठी येणाऱ्या खर्चाचे कसे करायचे? अशी चर्चा सुरु असताना प्रसिद्ध रंगकर्मी व दिग्दर्शक कमलाकर सारंग, लालनताईचे यजमान, यांच्या स्मृतिपित्यर्थ या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करूया, असे ठरले. नाट्यमहोत्सवाचा बराचसा खर्च मी देईन असे लालनताईंनी म्हटल्यावर एक मोठी चिंता कमी झाली. रोख बक्षिस व नाट्यगृहाचे भाडे हा खर्च दिवेकर ट्रस्ट मधून देता येईल, असे दिवेकर मावशींने म्हटल्यावर आर्थिक चिंता पूर्णपणे दूर झाली.
आंतरशालेय नाट्यमहोत्सव घ्यायचा म्हणजे शाळांच्या सहभागासाठी एक फॉर्म व स्पर्धेची नियमावली तयार करणे गरजेचे होते. माझा अशा गोष्टींशी कधी दुरान्वयानेही संबंध आलेला नव्हता. मी, दिवेकर मावशी, नवक्षितिजचे शिक्षक आम्ही सर्वांनी मिळून काही मुद्दे तयार केले. दुसऱ्या एका स्पर्धेची प्रवेश पत्रिका सापडली. ती संदर्भासाठी समोर ठेवली व बऱ्याच चर्चेनंतर एकवाक्यता होऊन एकदाची नाट्यमहोत्सवाची प्रवेश पत्रिका व नियमावली तयार केली. नंतर मी काहीं शाळांच्या प्रमुखांशी फोनवर बोलून, तर काहींची प्रत्यक्षात भेट घेऊन या स्पर्धेची संकल्पना सांगितली. स्पर्धा कधी घेतली प्रतिसाद मिळू शकेल, याविषयी त्यांच्याशी चर्चा केली. गणपती विसर्जनानंतर व दिवाळीच्या आधी स्पर्धा घेतली तर चांगला प्रतिसाद मिळेल, असा सर्वसाधारण सूर होता. शनिवार, रविवार न निवडता बुधवार हा दिवस स्पर्धेकरता निवडला. याचे कारण शिक्षकांच्या कामाच्या दिवशीच स्पर्धा ठेवली तर प्रतिसाद चांगला मिळेल असे वाटले.
भरत नाट्यमंदिर या नाट्यगृहाची तारीख नक्की झाल्यावर, स्पर्धेची तारीख नक्की केली. पुण्यातील सर्व विशेष शाळा व कार्यशाळा यांना स्पर्धेच्या महिनाभर आधी प्रवेशिका पाठवून दिल्या. इकडे नवक्षितिजमध्ये नाट्याच्या तालमी सुरु झाल्या. सर्वच मुले तशी नव्याने आलेली व अननुभवी शिक्षक त्यामुळे सगळा आनंदच होता. पण शिक्षकांना उत्साह होता व मुले या तालमींचा आनंद घेत होती. आंतरशालेय स्पर्धा घेण्यासाठी समाजकल्याणची परवानगी लागते. त्यांनी परवानगी दिली म्हणजे या स्पर्धेत भाग घेताना, शिक्षक शाळेत गैरहजर राहिले तरी त्यांची रजा लागत नाही. समाजकल्याणला नाट्यस्पर्धा घेण्यास परवानगी द्यावी असे विनंती पत्र दिले. आता परीक्षक, निवेदक, अध्यक्ष निवडणे व स्मृतीचिन्हे (trophies) तयार करणे ही कामे सुरु झाली. परीक्षक म्हणून नाट्यरंजन संस्थेचे संस्थापक, बालनाट्य चळवळीचे प्रणेते व आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा अनेक वर्ष घेणारे प्रकाश पारखी येऊ शकतील का हे बघावे, असे लालनताईंनी सुचविले. मग मी फोन करून त्यांची भेटायची वेळ मागून घेतली. भेटायला गेल्यावर मी त्यांना नवक्षितिज संस्थेबद्दल व नाट्यमहोत्सव घेण्यामागचा उद्देश थोडक्यात सांगितला. त्यांना या उपक्रमामागची संकल्पना फार आवडली. त्यांनी आनंदाने परीक्षक म्हणून यायची तयारी दाखवली. मग त्यांनाच अजून एक परीक्षक आणण्याची विनंती केली. निवेदनासाठी आमची हक्काची मंजिरी धामणकर येऊ शकेल, हे नक्की केले. आता अध्यक्ष मिळण्याचे महत्त्वाचे काम राहिलेले होते. लालनताईंनी दीपा लागू हे नाव सुचवले. मी त्यांच्याशी फोनवरच बोलून त्यांना थोडक्यात नाट्यमहोत्सवाची संकल्पना समजावून सांगितली. त्यांनी लगेचच अध्यक्षपद स्वीकारते असे सांगितले. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यावर मला हुश्श झाले. कारण माझ्यासकट सगळ्यांचाच हा पहिला प्रयत्न होता. पण सर्वजण दिलेली जबाबदारी मन लावून पार पाडत होते.
स्पर्धेच्या आदल्या दिवशी परत एकदा माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा व ठरल्याप्रमाणे प्रत्येकाच्या कामाची उजळणी झाली. प्रत्येकाला आपल्या कामाचे स्वरूप समजले आहे याची खात्री मला पटल्यावर, मी शांतमनाने घरी गेले. कारण आम्ही आयोजक होतो. त्यामुळे परीक्षक, निवेदक, अध्यक्ष यांची नीट व्यवस्था, तसेच आलेल्या शाळांचे शिक्षक व मुलांची नीट व्यवस्था, त्यांना लागेल तिथे मदत व मार्गदर्शन करणे ही आमची जबाबदारी होती. त्यांना ऐनवेळी लागणारे नेपथ्यासाठीचे सामान भरत नाट्यगृहाकडून मिळवून देणे, माईकची नीट व्यवस्था, त्याचे टेस्टिंग, एका शाळेचे सादरीकरण झाल्यावर दुसरी शाळा सादरीकरणाच्या तयारीत उभी करणे, अशी अनेक कामे आम्हाला या दिवशी पार पाडायची होती. कामांची सविस्तर यादी करून त्याप्रमाणे कामाची विभागणी केली होती. या चांगल्या तयारीमुळे स्पर्धेच्या दिवशी मी फारशी तणावाखाली नव्हते. कुठल्याही उपक्रमाचे आयोजन करताना वरचेवर सहकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांना कार्यक्रमाबद्दल स्पष्ट कल्पना द्यायची,त्यांच्या योग्य त्या सूचना प्रत्यक्षात आणायच्या, यामुळे त्यांचा सहभाग खूप वाढतो व हा उपक्रम वा कार्यक्रम त्यांना आपला वाटायला लागतो. एकदा ही भावना त्यांना आली की, उपक्रमाच्या यशस्वितेची खात्री पटते व तणावरहित राहून आपण त्या उपक्रमाचा आनंद घेऊ शकतो.
स्पर्धेचा दिवस उजाडला. आमची एक टीम बोर्डस्, स्मृतिचिन्हे, समई, हार, काडेपेटी, मेणबत्ती इत्यादी साहित्य घेऊन पूर्वतयारीसाठी पुढे गेली. यांनाच नाष्ट्याची पॅकेटस् ताब्यात घ्यायची होती व आलेल्या शाळांचे रजिस्ट्रेशन करून नाष्टा त्यांच्या शिक्षकांच्या ताब्यात द्यायचा होता. एकेका शाळेमधील मुले शिक्षकांबरोबर येऊ लागली. काही मुले ड्रेपरी घालून आली होती. मुले राजा, भिकारी, गणपती, सेवक, वारकरी अशा वेशात तर मुली नऊवारी, पाचवारी साड्या नेसून व मेकअप करून आलेल्या होत्या. सगळेजणच खूप गोड दिसत होते. नाट्यमहोत्सवामध्ये खरंच उत्सवाचे वातावरण होते. लहान गटाची स्पर्धा सुरुवातीला घेऊन, मध्यंतरानंतर कार्यशाळेचा मोठा गट घेण्याचे ठरवले होते. पर्यावरण, समाजिक समस्या, देशभक्ती व पौराणिक कथा या दिलेल्या विषयातील एक विषय निवडून मुलांचे सादरीकरण चालू होते. अनेक विषय हाताळले जात होते. नाट्य सुरु व्हायच्या आधी शिक्षकांची नेपथ्य लावणे, मुलांना सूचना देणे, अशी अनेक आघाड्यांवर लगबग सुरु होती. सादरीकरण करताना काही चुकले तर मुले एकमेकाला सांभाळून घेत होती. एखाद्याचा डायलॉग विसरला तर त्याला आठवण करून देत होती. हे बघून सर्वांची खूप करमणूक होत होती. परीक्षक व अध्यक्ष मुलांचे सादरीकरण बघून भारावून गेले. काही पत्रकारांनीही नाट्यमहोत्सवामध्ये उपस्थिती लावली होती. छोट्या गटामध्ये सात विशेष शाळा होत्या. मध्यंतरानंतर कार्यशाळांचे म्हणजे मोठ्या गटाचे सादरीकरण सुरु झाले. कार्यशाळांचा सहभाग कमी होता. फक्त चारच कार्यशाळा होत्या. कार्यशाळा सुरु झाली की, अनेक शिक्षक व संस्था चालक मुलांचा स्पर्धेमधील सहभाग कमी करून टाकतात, कारण कार्यशाळेच्या ऑर्डर्स पूर्ण करायच्या असतात. पण मला असे वाटते की, विशेष मुलांना सर्व बाजूने संपन्न आयुष्य मिळाले पाहिजे. साधारणपणे पाचपर्यंत स्पर्धा संपली. परीक्षक निकाल तयार करायला एका रुममध्ये गेले. निकालाची उत्सुकता सगळ्यांना होती. निकाल जाहीर करण्याआधी मी, लालनताई, परीक्षक व अध्यक्षांचे भाषण झाले. मी भाषणामध्ये स्पर्धा घेण्यामागचा उद्देश सांगितला व विशेष शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. कारण शिक्षकांनी खरंच खूप सर्जनशीलता दाखवून नाट्य लिहिलेले होते, त्याचे दिग्दर्शन केले होते. बराच प्रयत्न करून सोशिकपणा दाखवून नाट्याच्या संवादाचे मुलांकडून पाठांतर व अभिनय करून घेतला होता. परीक्षकांनी नाटक सादरीकरणाचे कौतुक केलेच, पण त्याबरोबर त्यातील चुकापण दाखवून दिल्या. एक महत्त्वाची चूक होती. मुले सादरीकरण करताना प्रेक्षकांकडे पाठ करत होती. सादरीकरण करताना कधीही प्रेक्षकांकडे पाठ करून अभिनय करायचा नसतो. यानंतर अध्यक्ष दीपा लागू यांनी भाषणामध्ये नाट्यमहोत्सवाचे आयोजन करून विशेष शिक्षक व मुले यांना सादरीकरणाची संधी दिल्याबद्दल, नवक्षितिजचे आभार मानले.
निवेदक असणाऱ्या मंजिरीने माईक हातात घेतल्याबरोबर मुलांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. छोट्या गटापासून बक्षिसे देण्यास सुरुवात केली. बक्षिसे मिळालेल्या शाळेचे वा कार्यशाळेचे नाव घेताच मुले एकच जल्लोष करून ट्रॉफी घेण्यास स्टेजकडे घावत होती. ट्रॉफी मिळाल्यावर स्टेजवरील सर्वांबरोबर फोटो काढून घेतानाचा अभिमान मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांचा आनंद व जल्लोष बघून माझ्यासकट सगळ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. परत पुढच्या वर्षी याच उत्साहात भेटूयात असे सांगून मंजिरीने स्पर्धा संपल्याचे जाहीर केले. शिक्षकांनी मुद्दाम थांबून स्पर्धेचे नियोजन छान झाले असे सांगितले. आम्हालाही नाट्यमहोत्सव निर्विघ्नपणे पार पडला म्हणून बरे वाटले.
दुसऱ्या दिवशी जवळजवळ सर्व पेपरमध्ये नाट्यमहोत्सवाची मोठी बातमी फोटोसकट आली होती. विशेष मुलांच्या अभिनयाचे बातम्यांमध्ये कौतुक केलेले होते. मुलांचे पेपरमध्ये आलेले फोटो बघून फार छान वाटत होते. ही स्पर्धा झाल्यावर प्रकाश पारखी या परीक्षकांशी चर्चा झाली, या चर्चेमध्ये त्यांनी असे सुचवले की आपण नाट्यमहोत्सवाआधी दोन महिने शिक्षकांसाठी कार्यशाळा घेऊयात. या कार्यशाळेमध्ये दिग्दर्शन, नेपथ्य, स्टेजवरचा मुलांचा वावर कसा असावा, मुलांकडून अभिनय कसा करून घ्यावा याचे मार्गदर्शन शिक्षकांना करता येईल. मार्गदर्शन करायला अनुभवी रंगकर्मी येऊ शकतील असेही त्यांनी सांगितले. मलापण ही सूचना आवडली.
नाट्यमहोत्सवामुळे लालन सारंग, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आत्तापर्यंत आलेले दीपा लागू, दिलीप प्रभावळकर, श्रीकांत मोघे, आशा काळे अशा सिनेमा व नाट्यक्षेत्रात प्रसिध्द असलेल्या अनेक व्यक्तींशी परिचय झाला. निमंत्रण देण्याच्या निमित्ताने यांच्या घरी जाण्याचा योग आला. परीक्षक व कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक म्हणून प्रकाश पारखींबरोबरच अमृता व अजित सातभाई अशा नाट्यक्षेत्रातल्या व्यक्तींशी परिचय झाला. सुरुवातीला मंजिरी धामणकर व आता अनेक वर्ष बिपीन सांगळे निवेदनाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. हळूहळू स्पर्धेचे स्वरूप बदलत गेले, तसा खर्च वाढू लागला. गेली पाच वर्षे ‘एमक्यूअर फार्मा’ यांचे प्रायोजकत्व आहे. लालन सारंग व प्रकाश पारखी अजूनही नाट्यमहोत्सवाशी तितक्याच आत्मीयतेने जोडले गेलेले आहेत.
सहभागी होणाऱ्या शाळा व कार्यशाळांच्या शिक्षकांसाठी कार्यशाळा घ्यायला लागल्यापासून मुलांचा अभिनय, नाट्याचे नेपथ्य व दिग्दर्शन या सर्व अंगाने सुधारणा झाली आहे. मुलेही आता जास्त आत्मविश्वासाने रंगमंचावर वावरतात. आम्हीही नाट्यमहोत्सवाच्या नियोजनात काही बदल केले. प्रत्येक शाळेला सहभागाची व शिक्षकांना दिग्दर्शनासाठी ट्रॉफीज देणे सुरु केले. स्टेजवर येऊन ट्रॉफी घ्यायला सगळ्यांनाच आवडते, हे लक्षात घेऊन ट्रॉफीजची संख्या वाढवली. विषयाचे बंधन ठेवले नाही. त्यांना कुठलाही विषय निवडून नाट्य सादरीकरणाला परवानगी दिली. बक्षीस समारंभानंतर एका शिक्षक प्रतिनिधीला रंगमंचावर येऊन बोलायला वेळ देऊ लागलो. या सर्व बदलांमुळे नाट्यमहोत्सव एक समृद्ध अनुभव होऊ लागला. मुख्य म्हणजे नाट्यमहोत्सवाआधी जवळजवळ दोन महिने नाट्य सादरीकरणासाठी सराव सुरु होतो. हा सराव मुलांसाठी फार आनंद देणारा असतो. शेवटी हे सर्व मुलांच्या आनंदासाठीच तर आहे! त्यांचा आनंद बघून नाट्यमहोत्सव सुरु करण्यामागचा उद्देश यशस्वी झाला याचे समाधान वाटते.
पर्वती चढणे स्पर्धा –
इतर शाळांमधील विशेष मुलांनी आमच्याबरोबर ट्रेकिंगला यावे, म्हणून मी बरेच प्रयत्न केले. अनेक शाळांमध्ये जाऊन नवक्षितिजची ट्रेकिंगची फिल्म दाखवली. त्यावेळी शिक्षकांशी तसेच मुख्याध्यापकांशी, हे कसे करता येईल याबद्दल पण चर्चा झाली. यानंतर काही शाळांमधील मुले २००७पासून आमच्याबरोबर दर महिन्याचा सह्याद्री ट्रेक व हिमालयातील वार्षिक ट्रेकला येऊ लागली. पण ही संख्या खूप कमी होती. दर महिन्याला ट्रेकिंगसाठी आमच्याबरोबर नवक्षितिजशिवाय बाहेरून येणारी मुले ही त्यांच्या पालकांची इच्छाशक्ती व आपल्या विशेष मुलाला आनंद देण्याची आंतरिक तळमळ, यामुळेच ट्रेकिंगला येऊ शकत होती.
विशेष मुले शाळा, कार्यशाळा व घराच्या चार भिंतींमधून बाहेरच्या जगात येतील अशी एखादी खेळाची स्पर्धा सुरु करावी, असे वाटू लागले. ‘एनड्युरो थ्री’ या प्रकारची एखादी धाडसी खेळाची स्पर्धा घ्यावी, असे पण माझ्या मनात येत होते. यामध्ये मुलांना झेपेल इतपत डोंगर चढणे, नंतर लगेच सायकलिंग व पोहणे असा एकामागोमाग एक खेळाचा समावेश करावा असे वाटत होते. पण विचार करताना असे लक्षात आले की, हे सर्व करू शकणारी विशेष मुले संख्येने खूपच कमी असणार. अजून विचारांमध्ये सुस्पष्टता आल्यावर फक्त डोंगर चढणे स्पर्धा घ्यावी असे वाटले. शिक्षकांना व पालकांना मुलांना स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन यायला शहराजवळचे ठिकाण असावे म्हणजे जास्त मुले सहभागी होतील असे वाटले. अॅडव्हेंचर क्लब मेंबर व सहकारी यांच्याशी तळजाई किंवा पर्वती या दोन ठिकाणांपैकी कुठे स्पर्धा घ्यावी यावर चर्चा करून ऐतिहासिक पर्वती हे ठिकाण स्पर्धा घेण्यास नक्की केले.
एकदा स्पर्धेचे ठिकाण नक्की झाल्यावर शाळांमध्ये जाऊन शिक्षक व काही संस्थाचालकांना स्पर्धेच्या आयोजनामागची संकल्पना समजावून सांगितली. मुले पर्वती चढतील का? मुले पडली तर काय? अशा अनेक शंका या शाळांमधील शिक्षकांना, संस्था चालक व काही मुलांच्या पालकांना होत्या. मुले पर्वती चढतील हा आत्मविश्वास मला पुणे-लोणावळा पदयात्रा, सह्याद्री व हिमालयातील ट्रेकिंग या उपक्रमांमुळे आला होता. मुलांच्या क्षमता असतात पण त्या अजमावयाला त्यांना संधी हवी असते. अशी संधी आम्ही नवक्षितिजमध्ये नसणाऱ्या, इतर शाळा कार्यशाळेच्या मुलांना देऊ इच्छित होतो. हे मी शिक्षक, संस्थाचालक व पालकांना पटवू शकले. अनेक शाळांनी पर्वती चढणे स्पर्धेमध्ये भाग घेण्याची तयारी दाखवली. रोटरी क्लब ऑफ रिव्हर साईडने स्पर्धेला आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली.
स्पर्धा फेब्रुवारीच्या पहिल्या बुधवारी घ्यायचे ठरविले. कारण थंडी संपत आलेली असते व उन्हाचा ताप वाढलेला नसतो. स्पर्धेची वेळ सकाळी ८ ते १० अशी ठरवली म्हणजे मुलांना उन्हाचा त्रास होणार नाही. पोलिसांची परवानगी व समाजकल्याणची परवानगी बरेच हेलपाटे घातल्यावर मिळाली. समाजकल्याणमध्ये अशा धाडसी स्पर्धा कशाला घेता असा शालजोडीतला मारला गेला, पण परवानगी मिळाली. मुख्य म्हणजे स्पर्धा घेण्यासाठी पर्वती संस्थानची परवानगी हवी होती. ती त्यांनी लगेच दिली. मुलांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी व स्पर्धा सुरु होईपर्यंत एखादा तास मुलांना बसवण्यासाठी, पर्वतीच्या पायथ्यालाच मारुती मंदिरची जागा अगदी योग्य होती. या मंदिराच्या विश्वस्तांची परवानगी घेतली. या स्पर्धेसाठी प्रवेशपत्रिका व नियमावली नाट्यमहोत्सवापेक्षा वेगळी लागणार होती. ती बराच विचार करून तयार करावी लागली. स्पर्धेदरम्यान काही अपघात घडला तर नवक्षितिजला कायदेशीरदृष्ट्या काही अडचण येऊ नये, म्हणून प्रत्येक शाळेकडून हमीपत्र (Indemnity bond) भरून घेणे जरुरी होते. ते तयार केले. मुलांना द्यायची सर्टिफिकेट्स तयार करताना त्यावर पार्श्वभागी टाकायचे चित्र व लिहायचा मजकूर दिवेकर मावशी व मी, चर्चा करून नक्की केला. नाट्यमहोत्सवाप्रमाणेच स्पर्धेच्या दिवशी कोणी कोणी काय काम करायचे याचे व्यवस्थित नियोजन केले. स्पर्धेच्या मार्गावर दोन ठिकाणी प्रथमोपचार पेट्या, एक स्ट्रेचर ठेवला. जरूर पडलीच तर असावेत म्हणून डॉक्टरांची उपस्थिती नक्की केली. पाण्याच्या बाटल्या व नाष्ट्याची पाकिटे प्रत्येक शाळेप्रमाणे किती लागतील याचे नियोजन झाले. प्रमुख पाहुणे बाबासाहेब पुरंदरे यांना फोन करून परत एकदा येण्याची आठवण व विनंती केली. हिमालयीन ट्रेक संघटनेच्या महाजन सरांनी, अनेक ज्येष्ठ नागरिक स्वयंसेवक म्हणून आणण्याची जबाबदारी घेतली. प्रसन्न गोखले हे आमचे हितचिंतक मदतीला होतेच. बक्षीस वितरणाच्या वेळचे निवेदन करण्याची जबाबदारीपण त्यांनीच घेतली. पूर्वतयारी व्यवस्थित पूर्ण झाली. आता आम्ही पहिल्या ‘पर्वती चढणे’ या स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी सज्ज होतो.
स्पर्धेच्या दिवशी अॅडव्हेंचर क्लबचे सदस्य अॅड. सुदेश हाडके व अॅड. सुनील कदम, मी व नवक्षितिजचे माझे तीन-चार सहकारी, आम्ही साडेसहा वाजताच पर्वती पायथ्याला पोहोचलो. नवक्षितिजचे सहकारी प्राथमिक तयारी करण्यासाठी पुढे आले होते. पुढे आलेल्यातील दोघेजण बक्षिस समारंभाच्या वेळी ट्रॉफीज ठेवण्यासाठी लागणारे टेबल व हे सर्व सामान पर्वती संस्थानच्या ऑफिसमधून ताब्यात घेण्यासाठी पर्वतीवर गेले. पर्वती पायथ्याला थांबलेल्या लोकांनी पर्वती चढणे स्पर्धेचे बोर्डस्, स्पर्धा सुरु होणार तेथे व शनीमारुती मंदिरापाशी लावून घेतले. त्यामुळे येणाऱ्या शाळांना कुठे जायचे हे कळायला सोपे जाणार होते. शनीमारुती मंदिरामध्ये रजिस्ट्रेशनसाठी लागणारे टेबल व मुलांना बसायला लागणाऱ्या सतरंज्या घालून घेतल्या. ही तयारी होतच होती. एवढ्यात स्वयंसेवकांचा ग्रुप आला व त्यांच्या मागोमाग एकएक शाळा येऊ लागल्या. स्पोर्टचा युनिफॉर्म व स्पोर्ट शूज घालून आलेली मुले स्मार्ट दिसत होती. एक शाळा साडेआठला आली, पण आम्ही ती शाळा येईपर्यंत थांबून राहिलो, कारण व्यवस्थापनेच्या चुकीसाठी मुलांना नाराज करायचे नव्हते. एकंदर १४ शाळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. शेवटची शाळा आल्यावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी फीत कापून स्पर्धेचे उदघाटन केले. स्पर्धेचे होताच मुलांनी एकच जल्लोष केला. जय जय महादेव व शिवाजी महाराजांचा जयजयकार अशा घोषणा मोठ्या उत्साहाने सुरु झाल्या. आलेल्या पत्रकारांची हा जल्लोष कॅमेरात टिपण्याची घाई सुरु होती. आम्ही मुलांना शांत करत, स्पर्धा सुरु होत आहे हे सांगितले. प्रमुख पाहुण्यांनी एक-दोन-तीन म्हणत फ्लॅग खाली करताच सुसाट वेगाने मुले पळत सुटली. आम्ही आश्चर्याने बघतच राहिलो. थोड्या थोड्या अंतरावर स्वयंसेवक उभे होते. स्वयंसेवक मुलांना प्रोत्साहन देत होते. स्पर्धेच्या मार्गावर साधारण मध्यावर डॉक्टर थांबलेले होते. जरूर पडली तर असावे म्हणून येथे स्ट्रेचरची सोय ठेवलेली होतीच. याच ठिकाणी पाण्याच्या बाटल्याही ठेवल्या होत्या.
प्रत्येक वयोगटातील मुलांचा व मुलींचा असे स्वतंत्र गट केले होते. दोन स्पर्धांमध्ये आम्ही अर्ध्या तासाचे अंतर ठेवले होते. पहिल्या व शेवटच्या मुलाने स्पर्धा पूर्ण केली की, वर थांबलेला सहकारी फोन करून सांगणार, असे ठरलेले होते. स्पर्धा सुरु होऊन शेवटचा मुलगा आम्हाला दिसेनासा होईपर्यंतच वरून पहिला मुलगा पोहोचल्याचा फोन आला. त्याने दोन मिनिटांत स्पर्धा पूर्ण केली होती. आम्ही सगळेजण आश्चर्याने एकमेकांकडे बघायला लागलो. आम्ही कोणी अपेक्षाच केली नव्हती की ६ ते १२ या गटातील विशेष मुलगा (खरं म्हणजे कुठल्याही गटातील) दोन मिनिटात पर्वती चढणे स्पर्धा पूर्ण करेल. या वयोगटातील स्पर्धा पंधरा मिनिटांत संपली. वयानुसार ६ ते १२, १३ ते १८, १९ ते ३० व ३० वर्षांवरील खुला गट असे मुला-मुलींचे मिळून आठ गट होते. विश्वस्त व अॅडव्हेंचर क्लबचे मेंबर अॅड. सुदेश हाडके व अॅडव्हेंचर क्लबचे मेंबर अॅड. सुनील कदम, रोटरी क्लब ऑफ रिव्हर साईडचे सभासद, एक एक गट सोडत होते. मुले अतिशय चुरशीने स्पर्धा जिंकायच्या जिद्दीने पळत होती. स्वयंसेवकांसकट स्पर्धा बघणाऱ्या सगळ्यांना हा अनुभव नवा होता. कारण विशेष मुलांना जिंकण्याची जिद्द, चुरस असू शकते याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. हे अनुभवताना त्यांनाही खूप आनंद होताना दिसत होता. शेवटचा गट, मुलींचा खुला गट म्हणजे तीस वर्षांवरील विशेष मुलींचा गट सोडला. हा गट सोडल्यानंतर आम्हीही पर्वतीवर जाण्यासाठी निघालो. बक्षीस वितरण सोहळा पर्वतीवर प्रवेशद्वाराजवळच असलेल्या देवळाच्या मंडपात होता. काहीही अडचण न येता, स्पर्धेदरम्यान कोणीही न पडता स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे, माझ्यासकट सगळे सहकारी खुश होते.
स्पर्धा संपवून आम्ही वर पोहोचेपर्यंत मुलांना नाष्टा व पाण्याच्या बाटल्या देऊन झालेल्या होत्या. प्रत्येक शाळेतील मुले व शिक्षक गटागटाने बसून नाष्ट्याचा आस्वाद घेत होते. नाष्टा झाल्यावर सर्वजण मंडपात आले व बक्षीस समारंभ सुरु झाला. निवेदकाने मला थोडक्यात पर्वती चढणे स्पर्धेची संकल्पना सांगण्याची विनंती केली. मी भाषणात पर्वती चढणे सारख्या उपक्रमांमध्ये भाग घेतल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढीस लागायला मदत होईल व मुलांची समाजामध्ये वावरायची भीती कमी होईल, मुख्य म्हणजे रोजच्या कंटाळवाण्या दिनक्रमात बदल झाल्यामुळे मन प्रसन्न व्हायला मदत होईल, हे सांगितले. तसेच अशा उपक्रमात सहभागी झाल्यामुळे मुलांना वर्तणूक समस्या सुरु होणार नाहीत वा आहेत त्या वर्तणूक समस्या कमी व्हायला मदत होईल, असेही सांगितले. हे बदल मी ट्रेकिंग करणाऱ्या नवक्षितिजच्या व आमच्याबरोबर येणाऱ्या इतर शाळांमधील मुलांमध्ये अनेक वर्षे बघत आहे, याचा मुद्दाम उल्लेख केला. मुलांना निसर्गामध्ये न्यायला लागा व पुढच्या वर्षी या स्पर्धेसाठी जास्त संख्येने सहभागी व्हा असे आवाहन करून मी माझे भाषण संपवले. प्रमुख पाहुणे, पुणे सायकल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा यांनी मुलांच्या जिद्दीचे खूप कौतुक केले. बक्षीस मिळालेल्या सर्व मुलांना ‘फोटोसाठी एकत्र या’ असे आवाहन करत निवेदकाने बक्षीस समारंभ संपल्याचे जाहीर केले. पत्रकारांनी स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या मुलांची व शाळांची नावे घेतली. मान्यवर व विजयी मुले यांचा ग्रुप फोटो घेण्यासाठी सर्व पत्रकार सरसावले. मुले हे सर्व अटेन्शन एन्जॉय करत होती. मला विशेष मुलांच्या करता अशी धाडसी स्पर्धा घेऊ शकतो हे इतरांना पटवून देऊन, ती स्पर्धा प्रत्यक्षात आणल्याबद्दल फार आनंद झाला होता. विशेष मुलांचे असे मुक्त बागडणे व जोश बघून अतीव आनंदाने गदगदून आले होते.
शेवटची आवराआवर व स्वच्छता करून आम्ही निघालो. माझ्या दृष्टीने ही स्वच्छता फार महत्त्वाची असते. अशी स्वच्छता करून गेल्यावर भविष्यात परत अशी जागा उपक्रमाकरता मिळणे सोपे जाते. दुसऱ्या दिवशी ‘हम भी कुछ कम नही’ अशाप्रकारे शीर्षक देऊन पर्वती चढणे स्पर्धेमध्ये पळतानाचे व बक्षीस मिळालेल्या मुलांचे ग्रुप फोटो अनेक पेपर्समध्ये आले होते.
२००९मध्ये सुरु झालेला पर्वती चढणे स्पर्धा हा उपक्रम अजूनही यशस्वीपणे सुरु आहे. आता अनेक लोक या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. ९४ वर्षांचे महाजन सर पहिल्यापासून, २०१६ मध्ये निधन होईपर्यंत या उपक्रमाशी जोडले गेले होते. अॅडव्हेंचर क्लबमध्ये मनोज भागवत व राजाभाऊ पाटणकर हे नवीन मेंबर दाखल झाले आहेत. इंदिरा कॉलेज, ताथवडे येथील एम.बी.ए. चे विद्यार्थी व प्रोफेसर दांडे गेल्या दोन वर्षांपासून मदतीस येत आहेत. झेप संस्थेचे स्वयंसेवक, इतर अनेक संस्थांचे स्वयंसेवक, माझे सहकारी व सर्व विश्वस्त या सर्वांच्या सहकार्यामुळे स्पर्धेचे आयोजन करणे शक्य होते. सुरुवातीला काही वर्षे प्रसन्न गोखल्यांनी निवेदनाची जबाबदारी सांभाळली पण गेल्या पाच वर्षांपासून बिपीन सांगळे ही जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. डॉ. राजकुमार शहा व डॉ. आनंद दीक्षित स्पर्धेच्या वेळी मुलांना काही दुखापत झालीच तर काळजी घेण्यासाठी हजर असतात. पहिली काही वर्षे रोटरी क्लब रिव्हर साईडने स्पर्धेला काही अशी प्रायोजकत्व दिले होते, परंतु गेली चार वर्षे ‘निटॉर’ ही कंपनी पूर्ण प्रायोजकत्व देत आहे. पहिल्यापासून वर्तमानपत्रातील प्रसिद्धीसाठी ‘मार्ग रिलेशन’ ही संस्था मदत करत आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्याच्या निमित्ताने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, हिंदकेसरी अमोल बुचडे, दुर्गप्रेमी प्र. के. घाणेकर, इतिहासकार निनाद बेडेकर, ट्रेकर आनंद पाळंदे, झेपचे अध्यक्ष चिंतामणी जोशी, गिरिप्रेमीचे अध्यक्ष उमेश झिरपे ज्यांनी एव्हरेस्ट व हिमालयातील अनेक मोहिमांचे यशस्वी नेतृत्व केलेले आहे, अशा अनेक मान्यवर लोकांच्या ओळखी झाल्या. आता माझे सहकारी अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात. त्यामुळे भविष्यात मी या स्पर्धेकरता हजर नसले तरी यशस्वीपणे स्पर्धेचे नियोजन होईल, याची मला खात्री आहे.
मुख्य म्हणजे या स्पर्धेमध्ये भाग घेण्याच्या निमित्ताने अनेक शाळांमधील शिक्षक मुलांना टेकड्यांवर घेऊन जायला लागले आहेत. जानेवारी महिन्यामध्ये काही शाळा पर्वती चढणे स्पर्धेच्या प्रॅक्टिससाठी मुलांना पर्वतीवर घेऊन जायला लागल्या आहेत. ज्या उद्देशाने स्पर्धा सुरु केली होती, तो उद्देश पूर्ण होताना दिसतोय. मागच्या वर्षी स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालेल्या ६ ते १२ या वयोगटांतल्या एका चिमुरडीला पत्रकाराने विचारले, ‘काय ताई बक्षीस मिळाल्यावर कसे वाटले?’ तिने मोठया ठसक्यात उत्तर दिले, ‘मला बक्षीस मिळणारच होते कारण मी शाळेजवळील टेकडीवर खूप प्रॅक्टिस केली होती.’ या उत्तराने तो पत्रकार उडालाच. अशा अनुभवांमुळेच दर वर्षी पर्वती चढणे स्पर्धेचे आयोजन करताना, येणाऱ्या अडचणी सोडवताना आम्हाला मानसिक बळ मिळते व मुख्य म्हणजे समाधान मिळते.
पदयात्रा व पथनाट्य –
२००७पासून ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्रॅम दर महिन्याला करतच होतो. मला असे वाटते होते की अजूनही समाजातील अनेक असे ज्वलंत विषय आहेत की, ते घेऊन आपण विशेष मित्रमैत्रिणींकडून पथनाट्य करून घेऊ शकतो. या सादरीकरणामुळे अनेक फायदे होणार होते. पथनाट्याची तयारी करताना मुलांचा वेळ छान जाणार होता. रस्त्यावर सादरीकरण करायचे असल्यामुळे मुलांना मुख्य प्रवाहात यायला मिळणार होते. सादरीकरणामुळे व नंतर मिळणाऱ्या टाळ्यांमुळे मुलांचा आत्मविश्वास व स्वतःबद्दलचा आदर वाढणार होता. विशेष मित्रमैत्रिणींनी केलेले असे सादरीकरण बघून विशेष (मतिमंद) मुले पण असे सादरीकरण करू शकतात, हे समजल्यावर मतिमंदत्वाबद्दल जनजागृती व्हायलाही मदत होणार होती. हे सर्व विचार मला स्वतःला पटत होते. असा उपक्रम करता येईल याची मला खात्री पटली. मग विश्वस्त, माझे सहकारी यांच्याशी याबद्दल चर्चा केली. या चर्चेमधून विचार अधिक स्पष्ट होताना असे ठरले की, शहरात छोटीशी पदयात्रा काढावी व पदयात्रेच्या मार्गावर दोन तीन ठिकाणी मुलांनी पथनाट्याचे सादरीकरण करावे. पदयात्रा पथनाट्यासाठी मार्ग कुठला असावा यावर चर्चा होऊन फर्ग्युसन रोड ते संभाजी उद्यान असा मार्ग नक्की झाला. फर्ग्युसन रोडवरील वाडेश्वरसमोर पदयात्रा व पथनाट्याचे उद्घाटन करावे असे ठरले. हा उपक्रम कधी करावा? असा विचार करताना २ ऑक्टोबरला गांधी जयंती असते. त्यादिवशी हा उपक्रम करावा असे ठरले. पथनाट्य व पदयात्रेसाठी पोलिस परवानगी आवश्यक होती. कारण, मुले माझे सहकारी व स्वयंसेवक धरून पन्नासहून जास्त संख्येने आम्ही रस्त्यावर असणार होतो. पोलिसांनी सगळी माहिती उत्सुकतेने विचारली व यामागची संकल्पना व उद्देश याची खात्री पटल्यावर सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांना विशेष मुलांना घेऊन हा उपक्रम करतोय याचे खूप कौतुक वाटत होते.
२०१० साली २ ऑक्टोबरला पहिले पथनाट्य व त्याचबरोबर पदयात्रेचे नियोजन करायचे ठरवले. पथनाट्यासाठी पर्यावरणाचा विषय निवडला. त्याकरता दहा मिनिटांचे नाट्य नागरगोजे या विशेष शिक्षकांनी लिहिले. त्यामध्ये थोडेफार बदल मी सुचवले. नंतर या नाट्याचे संवाद व संगीत अशी सीडी आम्ही कल्पेश या व्यवसायिकाकडून करून घेतली. याचे कारण मुलांच्या अस्पष्ट उच्चारामध्ये म्हटलेले संवाद रस्त्यावरची वाहने व इतर आवाजांमध्ये लोकांना समजले नसते. सर्वांना लांबपर्यंत व्यवस्थित ऐकू जावे, म्हणून ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपकाचा उपयोग करायचे ठरवले. प्रेक्षकांना पथनाट्यातले संवाद नीट ऐकू गेले नसते, तर पथनाट्याचा जनजागरणाचा मुख्य हेतू साध्य झाला नसता. पथनाट्याचे सादरीकरण आकर्षक व्हावे म्हणून मुलांना भूमिकेनुसार ड्रेपरी घालायला द्यायचे ठरवले. साधारणपणे दोन महिने मुले पथनाट्यासाठी तयारी करत होती. पथनाट्यासाठी मुले निवडताना वर्तणूक समस्या कमीत कमी असणारी व व्यवस्थित चालू शकणारी मुलेच निवडली. कारण आम्ही जवळ जवळ दोन तास रस्त्यावर असणार होतो. पथनाट्य व पदयात्रेचे नियोजन करताना मुलांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची होती. पोलिस मदत करणार होते, तरी काही स्वयंसेवक हवेच होते. ‘फायजर व्ही’ व ‘कॅपजेमिनी’ या आय.टी. कंपन्यांमधील स्वयंसेवकांनी मदतीला यायची तयारी दाखवली. २ ऑक्टोबरला सगळ्यांनाच सुट्टी असल्यामुळे स्वयंसेवकांना येणे शक्य होते. सी.डी. बनवणे, मुलांना लागणारी ड्रेपरी व प्रवास खर्च असे अनेक खर्च होते. पथनाट्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी काही प्रमाणात मदत मिळाली.
पथनाट्याची पूर्वतयारी चांगली होत होती. मुले, माझे सहकारी व विश्वस्त आम्ही सगळेच हा अनुभव घेण्यासाठी उत्सुक होतो.
पथनाट्याचा व पदयात्रेचा दिवस उजाडला. आम्ही साडेनऊ वाजता फर्ग्युसन रोडवरील वाडेश्वर हॉटेलपाशी पोहोचलो. सकाळची वेळ असल्यामुळे गाडी पार्किंगला जागा मिळाली व त्याला लागूनच पथनाट्याची जागा नक्की केली. हे होत असतानाच दोन पोलिस आलेच व ते ट्रॅफिकचे नियोजन करू लागले. गाडीमध्ये इनव्हर्टर ठेवला होता. त्यावर चालणाऱ्या टेपरेकॉर्डमधून मुलांच्या पथनाट्याच्या सीडी व माईक चालणार होता. त्याचे वायरिंग वगैरे सेट होईपर्यंत स्वयंसेवक, पत्रकार व प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई आलेच. मी त्यांचे स्वागत केले. उपस्थित प्रेक्षक व लांबून काय चालले आहे हे उत्सुकतेने बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी पथनाट्य व पदयात्रेची संकल्पना थोडक्यात सांगितली. माईकवरून येणारा माझा मोठा आवाज व रस्त्यावर ड्रेपरी घातलेली मुले बघून अनेकजण आमच्या भोवती जमा झाले. रस्त्याच्या बाजूला पोलिस व स्वयंसेवक थांबून वाहतुकीचे नियोजन करत होते. प्रमुख पाहुण्यांनी औपचारिक उद्घाटन करून पथनाट्य सादर करावे, असे सांगितले. विशेष शिक्षकांनी मुलांना सूचना देऊन पर्यावरण हा विषय असलेल्या पथनाट्याची सीडी सुरु केली. मुलांनी न घाबरता पथनाट्याचे सादरीकरण सुरु केले व बघता बघता ठरल्याप्रमाणे सर्व व्यवस्थित पार पडत पथनाट्य संपले. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात मुलांचे कौतुक केले. पत्रकारांबरोबरच अनेक लोक मुलांचे फोटो काढत होते. आता येथील आवराआवर करून आम्ही पदयात्रेला सुरुवात केली. मतिमंदत्वाबद्दल जागरुकता समाजामध्ये यावी, यादृष्टीने तयार केलेले बोर्डस् हातात धरुन मुले चालू लागली. ‘आमच्याशी मैत्री करा’, ‘आम्हाला सहानुभूती नको, प्रेम द्या’, ‘मतिमंदत्व हे वेड नव्हे’ असे अनेक संदेश या बोर्डस् वर लिहिलेले होते. ड्रेपरी घातलेली मुले पदयात्रेमध्ये चालताना बघून लोकांना फार गंमत वाटत होती व आजूबाजूने जाणारे लोक आवर्जून बोर्डस् वाचत होते. पदयात्रा फर्ग्युसन कॉलेजच्या प्रवेशद्वारापाशी आली. येथेही छान पथनाट्य झाले. प्रेक्षकांचा प्रतिसाद माईक सुरु झाल्यावर वाढला. येथील पथनाट्य झाल्यावर आम्ही संभाजी पार्कच्या प्रवेशद्वारापर्यंत चालत गेलो व येथे पथनाट्य सादर करून पदयात्रेचा शेवट केला.
यानंतर दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन पथनाट्य करत आहोत. स्त्री जन्माचे स्वागत, भारताची स्वातंत्र्यानंतरची वाटचाल, दहशतवाद, अवयवदानाचे महत्त्व असे अनेक विषय घेऊन समाजप्रबोधनाचे काम विशेष मुलांमार्फत चालू आहे. २०१६ सालचे पथनाट्य विशेष लक्षात राहिले, कारण विषय दहशतवाद होता व ज्याच्या घरातील काही लोक दहशतवादामुळे बळी पडले आहेत असा काश्मिरी युवक व ‘सरहद्द’ संस्थेचा कार्यकर्ता ‘जाहीद भट’ प्रमुख पाहुणा म्हणून आले होते. याच्याबरोबर सरहद्द संस्थेचे जोगिंदरसिंग हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याच्या कुटुंबातील १५ लोक कारगील युद्धात मारले गेले आहेत. हे दोन्ही युवक भारतभर दहशतवादाविरुद्ध जागृती व्हावी म्हणून काम करत असतात. गेली दोन वर्षे इंदिरा कॉलेजचे एम.बी.ए.चे विद्यार्थी व प्रोफेसर दांडे मदतीला येतात.
आत्तापर्यंत अनेक नामांकित लोक पथनाट्य व पदयात्रेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले. एका वर्षी माजी केंद्रीयमंत्री मोहन धारियाजी प्रमुख पाहुणे म्हणून आणण्याचे भाग्य आम्हाला मिळाले.
शाळा, कॉलेज, कॉर्पोरेट हाऊसेस व नवक्षितिजला भेट देणाऱ्या लोकांसमोर मुले वर्षभर ही पथनाट्ये सादर करत असतात. माझ्या सहकाऱ्यांची सर्जनशीलताही या उपक्रमामुळे वाढीस लागली आहे. पथनाट्यासाठी विषय निवडणे, त्यावर लिहिणे व मुख्य म्हणजे मुलांना सादरीकरणाकरता तयार करणे, हे सर्व करताना सहकाऱ्यांना मजा येते व त्यांचाही आत्मविश्वास वाढतो. अशा वेगवेगळ्या उपक्रमांमुळे त्यांच्याही आयुष्यातील मरगळ निघून जाते. पथनाट्य सादरीकरणामुळे मुले सभाधीट झाली आहेत. कितीही गर्दीसमोर व कुठेही मुले आत्मविश्वासाने सादरीकरण करू शकतात. मुले दरवेळी सादरीकरणाला उत्सुक असतात. पथनाट्य व पदयात्रा या उपक्रमामुळे विशेष मुलांकडून समाजाचे अनेक सामाजिक प्रश्नांबद्दल प्रबोधन होते. मुले समाजाला उपयोगी असे काहीतरी करू शकतात, याचे मोठे समाधान आम्हाला व मुलांना मिळते.
मॉलमध्ये खरेदी –
कार्यशाळेची घडी नीट बसायला लागल्यावर मुलांना कार्यशाळेत काम करायला प्रोत्साहित करण्यासाठी काय करता येईल, असा विचार सुरु झाला. त्यांना दर महिना पगार दिला तर ते न कंटाळता कार्यशाळेत येतील असा विचार करून त्यांना २००९पासून दर महिन्याचा पगार सुरु केला. पगाराची रक्कम खूप कमी आहे. सुरुवातीला सहा वर्ष ५० रुपये दर महिना द्यायचो. २०१५ पासून १०० रुपये महिना सुरु केले. कार्यशाळा तोट्यामध्ये असूनसुद्धा केवळ मुलांना आपणही आपल्या भाऊ-बहिणीसारखे दर महिना काहीतरी पैसे कमावतो अशी चांगली भावना यावी, हाही त्यामागचा एक उद्देश होता. विशेषतः बॉर्डरलाईनच्या मुलांची ही मानसिक गरज असते.
दर महिन्याच्या १ ते ५ या तारखेमध्ये एक दिवशी मुलांचा पगार केला जातो. त्यासाठी स्वतंत्र रजिस्टर केले आहे की काही मुले सही करून तर काही मुले अंगठा करून पगार घेतात. घेतलेला पगार स्वहस्ताने त्याचे नाव असलेल्या पिग्मी बँकेत टाकला जातो. याचे कारण असे आहे मुलांना पैसे सांभाळता येत नाहीत. वर्षाच्या शेवटी पैसे काढून मुलांना मॉलमध्ये खरेदीला घेऊन जातो. प्रत्येकाचे वर्षभरात १२०० रुपये साठतात. मुलांना या १२०० रुपयात बसेल तेवढीच खरेदी करायची आहे, हे समजावून सांगतो. या पैशामध्ये स्वतःसाठी खरेदी करून काहीतरी घरच्यांसाठी घ्या, असे मी आवर्जून मुलांना सांगते. कारण स्वकमाईतून दुसऱ्यांना देण्यामधील आनंद त्यांना मिळावा, हा यामागचा उद्देश. खरेदी करायला मॉलमध्ये जाण्यासाठी मुले फार उत्सुक असतात. मॉलमध्ये खरेदी करताना शांतपणे करायची, आरडाओरडा करायचा नाही व मुख्य म्हणजे हट्टीपणा करुन जास्त वस्तूंची खरेदी करायची नाही, हेही वरचेवर सांगावे लागते.
खरेदी कार्यक्रमासाठी आय.टी. फील्डमधील स्वयंसेवकांना मदतीसाठी बोलावतो. एकतर त्यांना अशा खरेदीची सवय असते व मुलांना स्वतःहून वस्तू किंवा कपड्यांची निवड करता येत नाही. एका स्वयंसेवकाकडे दोन मुले देतो.
मुलांसाठी काय खरेदी करायची आहे व १२०० रुपयात ही खरेदी बसली पाहिजे, हे त्यांना सांगितले जाते. मुलांसाठी घेतलेले कपडे किंवा बूट याची ट्रायल घेऊन ते बरोबर बसतात की नाही हे बघून मगच खरेदी करावी, ही सूचना स्वयंसेवकांना दिलेली असते. मुलांना बरीच वर्षे पुणे विद्यापीठ मार्गावरील काकडे मॉलमधील वेस्टसाईड या दुकानात आम्ही खरेदीला नेत असू. मुलांना टी शर्ट, शर्ट, पँट, बूट, कॅप्स तर मुलींना पंजाबी ड्रेस, पँट, त्यावरचा टॉप, कानातले अशा गोष्टी घ्यायच्या असतात. आई-वडील-भाऊ-बहीण यांना चहाचे मग, शोभेची वस्तू तर बहिणीसाठी कानातले, भाच्यांसाठी खेळणी, पाण्याची बाटली, कंपास, शाळेत नेण्यासाठी डबा, असे काही खरेदी करायचे असते. मुले, स्वयंसेवक ताई-दादांबरोबर खरेदीचा आनंद घेतात. खरेदी झाली की, आईस्क्रिम ठरलेलेच. फायझरव्हीच्या स्वयंसेवकांनी अनेक वर्षे मुलांना आईस्क्रिम दिले. दोन वर्षे काकडे मॉलमधील मॅकडोनाल्डवाल्यांनी बर्गर व आईस्क्रिम देऊन मुलांचा खरेदीचा आनंद द्विगुणित केला.
या वर्षी हिंजवडी परिसरात बिग बाजार एका मॉलमध्ये सुरु झालेले बघितले. त्यांचा कपड्यांचा ब्रँड fbb आहे. या ब्रँडचे कपडे त्या मानाने स्वस्त असतात. मी जनसंपर्क अधिकारी रामेश्वर यांना fbb च्या व्यवस्थापकांना भेटून नवक्षितिजबद्दलची फिल्म दाखवून माहिती द्यावी व या उपक्रमाचा उद्देश सांगा, असे सांगितले. याचा खूप चांगला परिणाम दिसून आला. बिग बाजारमध्ये प्रवेश करताना तेथील कर्मचाऱ्यांनी ओळीत उभे राहून आमचे सर्वांचे नमस्काराने स्वागत केले. खरेदी करताना पूर्ण सहकार्य केले व नंतर मुले, स्वयंसेवक व आम्हा सर्वांना स्नॅक्स, कोल्डड्रिंक्स दिले व निघताना मुलांना गिफ्ट दिल्या. यावर्षी खरेदी कार्यक्रम लक्षात राहाण्यासारखा झाला. मुले फार खुश झाली. यावर्षी खरेदीचे अजून एक वैशिष्टय म्हणजे काही पालक व भावंडे मदतीला आली होती. त्यांना मुलांची ही खरेदीची मजा बघून खूप छान वाटले.
मुलांना घरच्यांसाठी खरेदी करायला फार आवडते व ही खरेदी मी माझ्या पैशातून करतोय, याचा सार्थ अभिमान असतो. येथे नमूद करण्यासारखा अनुभव आहे. दरवर्षी खरेदीला गेल्यावर अदितीला विचारले काय घ्यायचे तर पहिल्यांदा ताईसाठी काहीतरी घ्यायचे असते नंतर बाबा, शार्दुल व आईसाठी घ्यायचे असते. तिला स्वतःला या खरेदीमध्ये काहीच घ्यायचे नसते. आग्रहाने तिला घ्यायला लावावे लागते व राहिलेल्या पैशातून इतरांना घे असे सांगावे लागते. एका वर्षी स्वयंसेवक ताईला अदितीने सांगितले, मला बाबासाठी घ्यायचंय म्हणून दोन टी शर्ट घेतले; पण ती स्वयंसेवक नाराज झाली. ती मला म्हणाली, ‘हे बरोबर नाही. अदितीने स्वतःकरता खरेदी केली पाहिजे.’ तिने अदितीला पँटवर घालायला कुडता व टी शर्ट घ्यायला लावला. काउंटरवर पैसे द्यायच्या वेळी अदिती म्हणाली, ‘बाबाचे टी शर्ट कुठे आहेत?’ तिला कल्पना नव्हती की बाबासाठी टी शर्ट न घेता त्याच पैशात तिच्यासाठी खरेदी केली आहे. मी तिला समजावून सांगितले की, ‘बाबासाठी दोन टी शर्ट घेतले तर पैसे संपतील त्यामुळे तुझी सर्व खरेदी परत करायला लागेल.’ तिने मला ठामपणे सांगितले, ‘हो मला चालेल.’ तिने त्या स्वयंसेविकेला बाबासाठीचे टी शर्ट आणायला लावले व स्वतःची सर्व खरेदी परत केली. त्या स्वयंसेविकेचा विश्वास बसेना की, विशेष मुलीला एवढी समज व विचारांची सुस्पष्टता असू शकते.
मुले दर महिन्याला पगार साठवून खरेदी कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत असतात. आम्हालाही मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित करायला व त्यामध्ये सहभागी व्हायला मनापासून आवडते.
सेतू –
या क्षेत्रात पूर्णवेळ काम करायला लागल्यावर लक्षात यायला लागले की, विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांची एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण फारशी होत नाही. प्रत्येक संस्थेत काही चांगले उपक्रम सुरु असतात, त्याबद्दल विशेष शिक्षक, व्यवस्थापक व संस्थाचालक यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण झाली, तर विशेष मुलांचे आयुष्य अजून छान होऊ शकेल. हा विचार करुन २०११ मध्ये आम्ही सेतू हा उपक्रम सुरू केला. या अंतर्गत मी, दिवेकर मावशी व आमचे काही विशेष शिक्षक व व्यवस्थापक पूर्वनियोजित वेळ घेऊन या संस्थांमध्ये जातो. ती संस्था बघून झाल्यावर त्या संस्थेचे काम समजून घेतो. यानंतर चर्चेदरम्यान त्यांना नवक्षितिजच्या कामाची पद्धत व वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल माहिती देतो. या चर्चेसाठी त्या संस्थेचे संस्थाचालक व प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी असावेत, अशी इच्छा त्यांना आधी कळवलेली असते. कारण तरच त्या भेटीला व चर्चेला काही अर्थ असतो. काही संस्थाचालक प्रत्यक्ष काम करत नाहीत व प्रत्यक्ष काम करणारे यांच्या परवानगीशिवाय काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे हे दोघेही हजर असतील तर त्या चर्चेतून दोन्ही संस्थांना मार्गदर्शक असे काही विचार पुढे येऊन, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकते. काही संस्था पालकांनाही आमच्याबरोबरच्या चर्चेसाठी बोलावतात.
आम्ही वर्षातून एकदा एका संस्थेला भेट द्यायचे ठरवले व त्याप्रमाणे अनेक संस्थांना भेट देत आहोत. पुण्यातील व पुण्याबाहेरील संस्थांना भेट देतो. या भेटींचा अनुभव छान असतो. आमची ही फक्त सद्भावना भेट असल्यामुळे अगदी मोकळेपणाने चर्चा होऊ लागल्या. या चर्चेमधून संस्थेसमोरील अडचणी व त्यावर काय उपाय शोधता येईल, यावर बराच ऊहापोह करता येतो. काही ठिकाणी संस्थेमधील मुले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. मुलांनापण आपल्या संस्थेला भेट द्यायला पाहुणे आले आहेत, याची मजा वाटते. शहरांपेक्षा खेड्यामधील संस्थांचा प्रतिसाद फारच उत्साहवर्धक असतो. या संस्थांसमोर आर्थिक प्रश्न फार मोठा असतो व त्यांची अशी ठाम समजूत असते की, शहरातील संस्थांना आर्थिक अडचणी कमी असतात. काही प्रमाणात हे खरे आहे. पण शहरामध्ये खर्चही बरेच जास्त असतात. शहरात राहाणाऱ्या विशेष मुलांच्या पालकांच्या संस्थांकडून अपेक्षाही खूप जास्त असतात. अशावेळी खेड्यांमधील संस्थाचालक व तेथे काम करणारे कर्मचारी यांना मला सांगावे लागते की, मुलांना आनंद देतील असे उपक्रम करायला दरवेळी पैसेच लागतात, असे नाही. यासाठी आपली संवेदनशीलता, सर्जनशीलता व बुद्धी यांची सांगड घातली, तर नाविन्यपूर्ण उपक्रम सुचतात व मदत करायला अनेक हात पुढे येतात. मुलांना रोज संध्याकाळी संस्थेमधून बाहेर फिरायला न्यायचे, याला पैसे लागत नाहीत. फक्त कर्मचाऱ्यांच्या कामाचे व्यवस्थित नियोजन व संस्थाचालक व कर्मचाऱ्यांची मुलांना आनंदी आयुष्य दयायची इच्छा आवश्यक आहे. खेडेगावामध्ये संस्था असलेल्या संस्थाचालकांनी किंवा व्यवस्थापकाने गावातील एखादया हॉटेल मालकाला जर समजावून सांगितले की, मुलांना संस्थेमधून बाहेर निसर्गामध्ये व मुख्यप्रवाहात नेणे कसे गरजेचे आहे, असे केल्यामुळे मुलांमध्ये कसा सकारात्मक बदल होणार आहे, याकरता संध्याकाळी फिरायला जाताना महिन्यातून दोनदा जर मुलांना भेळ किंवा कुंदा मिळाला तर मुलांना कशी अजून मजा येईल वगैरे. मला वाटते हे समजून घेतल्यावर गावातील हॉटेल मालक नक्की मदत करतील. तसेच जवळपासच्या शेतकऱ्यांना जर विनंती केली की, शेंगा, हरभरा व ज्वारी शेतामध्ये असताना आम्ही मुलांना शेतामध्ये आणू का? तर मला खात्री आहे, शेतकरीदादा शेंगा, हरभरा व ज्वारीची कणसे भाजून मुलांना प्रेमाने खाऊ घालेल. या व अशा अनेक विषयांवर चर्चा होऊन विचारांची देवाणघेवाण होते. अशा संस्थांच्या आजूबाजूच्या शाळा, कॉलेजेसला आम्ही भेट देतो. या भेटीमध्ये या संस्थेमधील मुख्याध्यापकांनी, शाळेतील वा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील विशेष संस्थांना नियमित भेट द्यावी, असे सुचवतो. या भेटींमुळे शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांची संवेदनशीलता तर वाढेलच, शिवाय विशेष मुलांना मुख्यप्रवाहात वावरायची सवय लागून त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागेल, हे त्यांना पटवून दयायचा प्रयत्न करतो. हे सर्व समजून घेतल्यावर त्यांचा प्रतिसाद सकारात्मक असतो.
हा आमचा एक प्रयत्न आहे की, या क्षेत्रातील संस्थांनी एकमेकांशी मोकळेपणाने संवाद वाढवून आपापल्या संस्थेतील विशेष मुलांपर्यंत चांगले उपक्रम पोहोचवून त्यांचे आयुष्य आनंदी करावे.
एक्सचेंज प्रोग्रॅम –
सेतू उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या संस्थांना भेट देताना, निवासी संस्थांमधील मुलांनी एकमेकांकडे राहायला जायला हवे असा विचार मी मांडत होते व याला सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. या एक्सचेंज प्रोग्रॅममागची संकल्पना अशी होती की, मुलांच्या रोजच्या आयुष्यामध्ये बदल होईल. मुलांना गावाला जायचा आनंद मिळेल. ज्या संस्थेमध्ये मुले राहायला येतील तेथील वातावरण बदलेल. पाहुणे आल्याचा आनंद संस्थेमधील मुलांना मिळेल. याशिवाय ज्या मुलांचे आई-वडील आता या जगात नाहीत, अशा मुलांना सुट्टीत घरी जाता येत नाही. अशा मुलांना ४-८ दिवस का होईना दुसऱ्या संस्थेत जाता येईल. घरी जाऊ न शकलेल्या मुलांची नातेवाईकांकडे पण सोय होऊ शकत नाही. कारण नातेवाईकांना यांच्या सवयी, या मुलांना कुठे व कशाप्रकारे मदत लागते हे माहिती नसते. याशिवाय दिवसभर यांना रमवावे कसे, हेही समजत नाही. हल्ली घरातील दोघे म्हणजे स्त्री व पुरुष नोकरी करणारे असतात. त्यामुळे नातेवाईकांनी म्हणजे अगदी सख्खे भाऊ- बहीण दुसऱ्या देशात असतील. तर यांनीसुद्धा जास्ती दिवस वा एकही दिवस विशेष मुलांना सुट्टीत घरी न नेणे, हे मी समजू शकते. परंतु संस्था चालक व संस्थेमधील कर्मचाऱ्यांना विशेष मुलांची मानसिकता व त्यांना दिनचर्येत कुठे व कशाप्रकारे मदत लागते, हे चांगले माहिती असते. त्यामुळे दुसऱ्या संस्थेमधील विशेष मुले राहायला आली, तरी ते त्यांची चांगल्या प्रकारे देखभाल करू शकतात.
२०१३ साली आम्ही ‘साधना व्हिलेज’ या संस्थेबरोबर पहिला एक्सचेंज प्रोग्रॅम केला. दोन्ही संस्थांमधील कर्मचारी व मुले आपल्याकडे पाहुणे येणार म्हणून खुश होती. आमच्याकडील पाच मुले व एक काळजीवाहक दादा असे साधना व्हिलेजमध्ये गेले व त्यांच्याकडील पाच मुले व एक स्वयंसेवक आमच्याकडे आले. दोन्ही संस्थांमध्ये दिनक्रमांमधील सहभागाशिवाय, पाहुण्यांसाठी क्रिकेट मॅच, गाण्याच्या भेंडया, नाट्याचे सादरीकरण, याशिवाय जेवणामध्ये गोडधोड अशा अनेक कार्यक्रमांनी धमाल उडवून दिली. दोन्ही संस्थांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर वर्षातून एकदा हा उपक्रम आम्ही दोन्ही संस्थांमध्ये चालू ठेवला आहे. २०१४ मध्ये नाशिकमधील घरकुल या फक्त विशेष मुलींकरता असणाऱ्या संस्थेबरोबर एक्सचेंज प्रोग्रॅम केला होता. मुलींनी एकत्र डान्स केले, गाणी म्हटली, काही खेळ खेळले व मुलींचा आवडता मेंदी प्रोग्रॅम केला. गोडधोड जेवण व नाष्ट्याला छान छान पदार्थ खाल्ले. एकंदर भरपूर मजा केली व शिवाय येताना कानातले, गळ्यातले व रुमाल यासारख्या मिळालेल्या भेट वस्तूंनी मुलींच्या आनंदात अजून भर पडली. आमच्याकडे पण घरकुल संस्थेमधील मुली आल्या तेव्हा अशीच धमाल केली.
या उपक्रमामुळे काळजीवाहक दादा, ताईच्यासुद्धा दिनक्रमामध्ये चांगला बदल होतो. इतर संस्थांमधील काही चांगल्या गोष्टी शिकता येतात. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विशेष मुलांच्या व काळजीवाहकांच्या दिनक्रमातील कंटाळा जाऊन त्यांचे मन प्रसन्न व्हावे, हाच आहे.
या उपक्रमाला हवा तसा प्रतिसाद इतर संस्थांकडून अजून तरी मिळत नाही. ‘हो हो या वर्षी नक्की करूया’ असे आश्वासन अनेक संस्थाचालक देतात; पण ते प्रत्यक्षात येत नाही. मला असे वाटते संस्थाचालकांनी मरगळ झटकून, मुलांना आनंद देणारे नवीन उपक्रम स्वीकारून, ते प्रत्यक्षात आणायला पाहिजेत. मी जेव्हा अमेरिका व इंग्लंडमधील या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना भेट दिली, तेव्हा त्यांच्याशी एक्सचेंज प्रोग्रॅमबद्दल बोललेली आहे व त्यांनी असे प्रोग्रॅम भारताबरोबर सुरु करावेत, असेही सूचित केलेले आहे. त्यांच्याकडेही विशेष मुलांकरता एक्सचेंज प्रोग्रॅम सुरु झालेले नाहीत. त्यांनीही या उपक्रमाबद्दल उत्सुकतेने ऐकले परंतु, पुढे काही झालेले नाही. मला आशा आहे भविष्यात अनेक संस्थाचालक पुढे येतील व पूर्ण भारतभर व भारताबाहेरही हा उपक्रम चालू होईल. यातूनच सर्व संस्थांमध्ये सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होईल व मुलांना आनंदी आयुष्य मिळेल.
असे वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा उद्देश हा आहे की, विशेष व्यक्तींना आनंद मिळवण्याची संधी उपलब्ध करून देणे. सामान्य व्यक्ती, सामान्य तरुण आपला आनंद आपणच मिळवण्यात सक्षम असतात, परंतु विशेष व्यक्ती तो आनंद स्वतः मिळवू शकत नाही. आई-वडिलांना व भावंडांनाही हा आनंद त्यांना मिळवून देणे शक्य नसते. म्हणून नवक्षितिजसारख्या सामाजिक संस्थांनी वेगवेगळे उपक्रम राबवून अशा विशेष व्यक्तींना आनंद मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. कायमस्वरूपी म्हणजे शेवटपर्यंत अशा व्यक्तींची जबाबदारी स्वीकारणाऱ्या नवक्षितिजसारख्या संस्थांनी तर हे व्रत म्हणूनच स्वीकारावे, असे मला वाटते.
आई-वडिलांना व सामान्य भावंडाला आपल्या विशेष पाल्याला, विशेष भावंडाला संस्थेमध्ये अशा तऱ्हेने आनंदाने जगताना पाहून समाधान वाटते व ते निश्चित होतात. तेही आपले आयुष्य तणावरहित व आनंदाने व्यतीत करू शकतात.