
८. नुपूर अदितीची ताई
आता नुपूर व अदिती या दोघींच्या नात्याबद्दल. लहान असताना दोघीही छानपैकी भांडायच्या. अर्थात अदितीच नुपूरला बराच त्रास दयायची. ती अभ्यासाला बसली की तिची वही ओढ, पेन ओढ, तिला जीभ दाखव असेच उदयोग सतत चालायचे. एक दोनदा नुपूरने तिला वैतागून मारलेले पण आठवतेय. याकरता नुपूरला थोडेसे रागावलेही होते. पण आम्ही अदितीचे चुकले असेल तर अदितीला रागवायचो वा छोटीशी शिक्षा करायचो. हिला काय कळतेय, म्हणून चूक केली तरी सोडून द्यायचे व नुपूरलाच सारखे सांगायचे की तू सोडून दे, तू शहाणी आहेस ना वगैरे समजवायचे असे केले नाही. त्यामुळे नुपूरला आई-बाबा आपल्यावर अन्याय करत आहेत, अशी भावना निर्माण झाली नाही व दोघींचे नाते प्रेमाचे राहायला मदत झाली.
नुपूरचा जन्म १९८४ सालचा. नुपूर अदितीपेक्षा तीन वर्षांनी मोठी व तिच्यापेक्षा खूपच वेगळी. हे वेगळेपण फक्त बुद्धिपुरते मर्यादित नाही तर अनेक बाबतीत. जसे अदिती मुळातच खोडकर, मिस्किल व आळशी तर नुपूर थोडीशी गंभीर, कष्टाळू, कमालीची प्रामाणिक. नुपूरचे पाचव्या वर्षांपासूनचे ते अगदी लग्न होईपर्यंतचे आयुष्य भरगच्च दिनक्रमातच गेले. ती पाचव्या वर्षी तायकोंदो हा कोरियन मार्शल आर्टचा प्रकार शिकू लागली. सकाळी साडेसहा ते सात हा क्लास असायचा. तिचा बाबा तिला या क्लासला घेऊन जायचा. या क्लासहून आली की आंघोळ व नाष्टा झाला की शाळेत जायची. मी स्वतः खेड्यात वाढल्यामुळे मला खेळ खेळायला फारसे मिळाले नाहीत. यामुळे मला नुपूरने वेगवेगळे खेळ शिकावे असे वाटायचे. नुपूरने पाच ते सात या वयोगटात पोहायच्या काही स्पर्धांमध्ये भाग घेतलेला मला आठवतोय. पोहणे तिला फारसे आवडले नाही त्यामुळे ते लवकरच थांबले. बोट क्लबमध्ये साधारणपणे सात वर्षे पूर्ण झाल्यावर नुपूर टेनिस खेळायला लागली. पहिल्या दिवसापासूनच तिला हा खेळ खूप आवडला. एका वर्षातच ती स्पर्धात्मक टेनिस खेळू लागली व या खेळात चांगली प्रगती करू लागली. दोन वर्षे बोट क्लबमध्येच प्रशिक्षण घेतले. मग मात्र अजून चांगल्या प्रशिक्षणाची गरज भासू लागली व ती डेक्कनला पीवायसी येथे जाऊ लागली. आतापर्यंत तिला क्लासला अनेकदा शेखर सोडायचा. डेक्कनला मात्र ती रिक्षाने जाऊ लागली. नुपूर पहिल्यापासूनच धीट होती व आम्ही दोघांनीही तिला प्रोत्साहन दिले. दुसरीत असल्यापासून ती एकटी सायकलने शाळेत जाऊ लागली. इथे एक आठवण सांगण्यासारखी आहे. ती पाचवीत असताना तायकोंदू क्लासमधील एस.वाय.बीकॉमला असलेल्या ताईने विचारले, नुपूर आपण सायकलने सिंहगडला जायचे का? तर ही एवढीशी चिमुरडी ‘हो’ म्हणाली. तिच्या मैत्रिणीचे पण कौतुक वाटले, तिला तिच्या लहान मैत्रिणीबद्दल इतका आत्मविश्वास वाटला की, ती हे धाडस करू शकेल. आम्हालाही असे वाटले, नुपूरला स्वतःबद्दल इतका आत्मविश्वास वाटतोय तर आपण अडवू नये. खरंच एका रविवारी भल्या पहाटे मैत्रीण बोलवायला आली. नुपूरला खाऊ, पाण्याची बाटली व थोडे पैसे बरोबर दिले. आम्ही असे ठरवले, शेखरने थोडे उशिरा निघून स्कूटरवरून त्यांच्यामागे जायचे म्हणजे काही अडचण आलीच तर मदत करता येईल. शेखर जेव्हा सिंहगडावर पोहोचला तेव्हा नुपूर व तिची मैत्रीण सिंहगड चढून परतीच्या मार्गाला लागल्या होत्या. नुपूरने बाबाला बघितल्यावर फक्त ‘हाय बाबा’ केले व ती सिंहगड उतरायला लागलीसुद्धा. कारण पायथ्याशी ठेवलेल्या सायकली घेऊन त्यांना परत सायकल चालवत पुण्याला जायचे होते तर असे हे यशस्वी धाडस तिने पाचवीत असताना केले.
नुपूर अगदी लहान असल्यापासून मी तिला झोपताना गोष्ट सांगायची. थोडी मोठी झाल्यावर चाईल्ड क्राफ्ट, वर्ल्ड बुक्स व पंचतंत्र सारखी पुस्तके आणली. ती पाचवीमध्ये जाईपर्यंत मी तिला या पुस्तकांमधील गोष्टी वाचून दाखवायची, अशावेळी अदिती माझ्या मांडीवर वा कुशीमध्ये असायची, कारण सगळे झोपल्याशिवाय अदिती झोपत नाही. तिची अजूनही अशीच सवय आहे. नुपूर गोष्ट ऐकता ऐकता पेंगायला लागायची मग तिची एक गोड पापी घेऊन मी तिला झोपू दयायची. या काळात माझा दिवस कधी सुरू व्हायचा व कधी संपायचा हे कळायचे नाही. अदितीचे सर्व करणे, घरातील सर्व बघणे व माझे क्लिनिक यामध्ये दिवस व्यस्त असायचा. पण नुपूरला आपल्याकडे दुर्लक्ष होतंय ही भावना येऊ नये, याबाबतीत मी जागरुक असायची. नुपूर स्वतःहून वाचायला शिकली व त्यानंतर तिला वाचनाची चांगली आवड निर्माण झाली. अजूनही ती भरपूर वाचते. नुपूरला रात्री गोष्ट सांगणे थांबवले आणि अदितीला गोष्ट सांगणे सुरु झाले. तिला समजेल अशा भाषेत तिला काही संकल्पना समजावण्याच्या दृष्टीने तिच्यासाठी गोष्टी तयार करुन तिला सांगत असे. ती पण खूप आवडीने गोष्ट ऐकायची. यातून अदितीचे भाषेचे ज्ञान व शब्द भांडार वाढत होते.
नुपूरचा मी चौथीपर्यंत अभ्यास घेतला व तेव्हा तिला सांगत होते की, पुढच्या वर्षापासून मी तुझा अभ्यास घेणार नाही. पाचवीला पहिल्या चाचणी परीक्षेला तिचे सुरु झाले की आई तू या परीक्षेकरता माझा अभ्यास घे, मला भीती वाटते पुढच्या परीक्षेपासून माझा मी अभ्यास करेन. तिला समजावून सांगितले की, कमी मार्क पडले तरी चालतील, पण तुला एकटीने अभ्यास करायची सवय लागेल, तेव्हा याही वेळी तू एकटीनेच अभ्यास कर. तिने तसे केले. त्या परीक्षेत तिला मार्क कमी मिळाले, पण तिला आपण एकटीने अभ्यास करुन परीक्षा देऊ शकतो हा आत्मविश्वास आला. त्यानंतर नुपूरचा मी कधीही अभ्यास घेतला नाही. ती अभ्यास करते की नाही इकडे लक्ष असायचे, पण बसून अभ्यास घ्यावा लागला नाही. मला वाटते आपले आई-वडिलांचे हेच काम असते की मुलांना सुरक्षित भावना देणे, आत्मविश्वास देणे, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, आम्हाला तुझ्याबद्दल आदर आहे व आमचा तुझ्यावर विश्वास आहे या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. या भावना मुलांपर्यंत पोहोचल्या, की ते यश-अपयशाचा सामना समर्थपणे करू शकतात. यश-अपयश चांगल्या प्रकारे घ्यायला शिकतात व मुख्य म्हणजे चांगली माणसे होतात. नुपूर, अदितीच्या बाबतीत मी एक पथ्य पाळले होते, काहीही तक्रार झालेली असली तरी त्या घरातून बाहेर जाताना व झोपण्यापूर्वी त्या तक्रारीवर तोडगा काढायचा. एक छान पापी घेऊन टाकायची म्हणजे तो वाईट मूड वा दुःखी भावना निघून जायला मदत व्हायची व घरातून बाहेर जाताना वा झोपण्यापूर्वी मूड चांगला होऊन जायचा.
नुपूर टेनिस चांगले खेळू लागल्यामुळे पुण्याबाहेरील स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली व तायकोंदू चालू ठेवणे अवघड होऊ लागले. मग बल्यू बेल्टपर्यंत आल्यावर काही काळाकरता तायकोंदू थांबवले पण पुढे जाऊन त्या पठ्ठीने तायकोंदूमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलाच. आता ती शाळा सुटल्यावर परस्पर रिक्षाने पीवायसीला जाऊ लागली, कारण आता टेनिस बरोबर स्टॅमिना वाढवण्याकरता व्यायामाची वेळही वाढवली होती. मला आठवतय रात्री आठला घरी यायची व कसेबसे जेवून झोपून जायची. बराचसा गृहपाठ शाळेमध्येच करायची. त्यामुळे शाळेतून कधी तक्रार आली नाही. आता माझीपण जबाबदारी वाढली होती, कारण सकाळी घरून निघताना नाष्ट्याला ताजा पदार्थ, दुपारच्या जेवणाचा पोळी भाजीचा डबा व संध्याकाळसाठी वेगळा डबा. सकाळी माझी फार घाई व्हायची व मध्ये मध्ये लुडबूड करायला अदिती असायचीच. नुपूरला या काळात समतोल आहार मिळणे फार आवश्यक होते. पुण्याबाहेर स्पर्धेसाठी जाताना कधी कधी आजी जायची तर कधी कधी मी व शेखर असे आळीपाळीने जायचो. क्लिनिक बंद ठेवून दरवेळी तिच्याबरोबर जाणे दोघांनाही परवडायचे नाही, कारण नुपूरची दर महिन्याची टेनिसची फी, रिक्षाचा खर्च, रॅकेट व बुटांचा खर्च सुरूच असायचा. या सर्वाचे चीज नुपूर करत होती. एकतर ती हे सर्व एन्जॉय करत होती. या काळात ती खूप स्पर्धा जिंकत होती. म्हणजे एक वेळ अशी होती की पुण्यामध्ये तिच्या वयोगटात ती अजिंक्य असायची. तिचे खुपदा पेपरमध्ये नाव व फोटो येऊ लागले. आम्ही दोघेही दवाखाने सांभाळून पुण्यातील प्रत्येक स्पर्धेला हजर असायचो. या काळात तिला दोन नॅशनल गोल्ड मेडल्स मिळाली.
आठवीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत नुपूर व तिचे बाबा एक महिन्याची फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम, हॉलंड व जर्मनी अशी यशस्वी सायकल टूर करुन आले. नुपूरला सायकलिंगची फारशी प्रॅक्टिस नव्हती, पण एकंदर स्टॅमिना चांगला होता व ठरवले की ते पूर्ण करायचे असा स्वभाव असल्यामुळे ती हे करू शकेल असा विश्वास मला व शेखरला होता. या टूरमध्ये तिने सायकलिंग छान केले पण जेवायला गरम पाहिजे यावरून बाबाला जरा त्रास दिला. ती गरमच जेवण पाहिजे म्हणायची नाही, पण जेवायचीच नाही. एकंदर विचार करता जेवणावर जास्त खर्च झाला तरी चालेल असा विचार करून शक्य असेल तेथे ते हॉटेलमध्ये गरम अन्न जेवू लागले. एकदा गरम जेवण मिळायला लागल्यावर नुपूरने सायकल टूर सहज पूर्ण केली. इतक्या लहान वयात तिला अनेक संस्मरणीय अनुभव घेता आले. या सायकल टूरवरून आल्यानंतर तिचे अनेक ठिकाणी सत्कार झाले. अनेक पेपर व मासिकांमध्ये या सायकल टूरबद्दल लेख आले. कारण अशी टूर फारच कमी लोकांनी इतक्या लहान वयात केलेली होती व ती पण बाबा व लेक अशी दोघांनीच. या पूर्ण सायकल टूरचे नियोजन शेखरने एकट्याने केले होते.
नववी व दहावी अशीच व्यस्त दिनक्रमात गेली. दहावीत असताना तिने परीक्षेच्या आधी फक्त एक महिना खेळ थांबवला व तेवढया अभ्यासावर दहावीत ८० टक्के मार्क मिळवले. तिला लहानपणापासून प्राण्यांची फार आवड, आमच्या घरी कायम रस्त्यात सापडलेली जखमी कुत्री व मांजरी असायची. आम्ही दोघेही माणसांचे डॉक्टर असलो तरी तिला प्राण्यांचे डॉक्टर व्हायचे होते व हे तिचे पक्के होते. त्यामुळे सायन्सला जाण्यावाचून पर्याय नव्हता. तिने वाडिया कॉलेजला अॅडमिशन घेऊन टेनिस चालूच ठेवले. नववीनंतर ती एकटी टूरला जाऊ लागली होती. आम्ही येथून हॉटेल व ट्रेन बुकिंग करून ठेवायचो. बऱ्याचदा इतर मुलींच्या आया बरोबर असायच्या, पण जसे जिंकू वा हारू त्यावर पुढचा प्रवास ठरायचा. त्यामुळे तिला एकटीने प्रवास वा हॉटेलमध्ये राहाणे करावे लागायचे पण आम्हाला तिची काळजी वाटायची नाही. त्या लहान वयातसुद्धा ती जबाबदारीने वागणारी, समंजस व धीट मुलगी होती. बारावीमधे बोर्डाच्या परीक्षेच्या प्रॅक्टिकलच्या वेळी अहमदाबादला स्पर्धा होत्या. आम्हाला असे वाटत होते या स्पर्धेला तिने जाऊ नये, कारण परीक्षेच्या तारखा क्लॅश होत होत्या, पण ही पठ्ठी सरांना भेटून तारखा बदलून घेऊन स्पर्धेला जाऊन नॅशनल सिल्व्हर मेडल घेऊन आली.
बारावीचा रिझल्ट लागला. फार काही चांगले मार्क्स मिळाले नाहीत, पण एन्ट्रन्स परीक्षेत मार्क बरे होते. त्यामुळे व्हेटरनरी मेडिसिनला अॅडमिशन मिळेल असे वाटत होते. पण रिअॅलिटी वेगळी होती. पुणे जिल्ह्यामध्ये ओपन सीट्स फक्त नऊ होत्या व त्यासाठी एमबीबीएस सारखी चुरस होती. प्रत्येक राउंडला नागपूरला जावे लागायचे. कधी शेखर तर कधी मी जात असे. शेवटच्या राउंडपर्यंत आशा होती पण सप्टेंबरमध्ये शेवटच्या राउंडला अॅडमिशन मिळणार नाही हे नक्की झाले. हे जरा अनपेक्षितच झाले होते. पण त्यातून आम्ही सावरलो. मी या बाबतीत आग्रही होते की तिने बी.एस्सीला अॅडमिशन घेऊ नये व परत व्हेटरनरी मेडिसीनच्या एन्ट्रन्स परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे. अनेकांनी सल्ला दिला ती रिकामी बसून काय करणार त्यापेक्षा तिला कॉलेजला जाऊ दे, व बरोबरीने परीक्षेचा अभ्यास करू देत. पण मला असे वाटत होते तिने बी.एस्सीला अॅडमिशन घेतली व ग्रुप चांगला जमला तर कदाचित एन्ट्रन्स परीक्षा दयावीशी वाटणार नाही, कारण लहान वयात असे घडू शकते व पुढे आयुष्यात पश्चाताप होऊ शकतो. या काळात नुपूरची मानसिकता जपून तिला उभारी दयायची होती. त्यामुळे अजून अभ्यास करायला हवा होतास, म्हणजे ही वेळ आली नसती, असे एकदाही म्हटलेले आठवत नाही. असे बोलण्याने काहीही साध्य होणार नव्हते. तिला अपराधी भावना देण्याने तिचा आत्मविश्वास डळमळीत झाला असता. माझा भाऊ आनंद मला म्हटलेला आठवतोय की, मी पहिले असे घर बघतोय की मुलीला अॅडमिशन मिळालेली नसताना व एक वर्ष वाया गेलेले असूनसुद्धा घरामध्ये आनंदी वातावरण आहे. तिचा अठरावा वाढदिवससुद्धा छान साजरा केला. तिला छोटासा हिऱ्याचा सेट घेतल्याचे मला आठवतेय. कारण तिचा अठरावा वाढदिवस परत येणार नव्हता. यश-अपयश हा आयुष्याचा एक भाग आहे. आपण या दोन्ही वेळा आपल्या मुलांबरोबर असणे आवश्यक आहे. अपयशात पण त्यांच्या बरोबर राहून त्यांना त्याच प्रेमाने व आदराने वागवणे जास्त जरुरीचे असते.
नुपूरने परत एन्ट्रन्स परीक्षा दिली. यावेळी पहिल्यापेक्षा चांगले मार्क्स मिळाले. याही वेळी पहिल्या राऊंडला अॅडमिशन मिळाली नाही. त्यामुळे नुपूर चांगलीच नाराज झाली. मीपण निराश झाले होते पण दाखवत नव्हते. पुण्याला परतल्यावर आम्ही इतर पर्यायाचा विचार करू लागलो. एवढयात जबलपूरच्या व्हेटरनरी मेडिकल कॉलेजची माहिती कळली. इथे डोनेशन घेऊन अॅडमिशन देत होते. कारण व्हेटरनरी मेडिसिनची बाकी सर्व कॉलेजेस सरकारी आहेत व या कॉलेजमध्ये मेरीटनुसारच अॅडमिशन मिळते. शेखर व नुपूर चौकशीसाठी जबलपूरला जाऊन आले. कॉलेज व प्रोफेसर्सपण खूप चांगले होते पण अॅडमिशन लगेच घ्या नाहीतर प्रवेश मिळणार नाही, असे प्रेशर टाकत होते. दुसऱ्या राउंडला अजून अवकाश होता व ओपनला इतक्या सीट्स कमी होत्या की, याही वेळी अॅडमिशन मिळेल याची खात्री नव्हती. यावेळी आम्हाला चान्स घ्यायचा नव्हता, कारण हा नुपूरच्या भविष्याचा प्रश्न होता त्यामुळे आम्ही पैसे भरुन अॅडमिशन घ्यायची ठरवले. एकतर जबलपूर खूप लांब व नाही म्हटले तरी डोनेशन भरुन अॅडमिशन घ्यायला लागल्यामुळे बरे वाटत नव्हते. नुपूर तिकडे रुळू लागली व दुसऱ्या राउंडची तारीख डिक्लेअर झाली. नुपूरने जबलपूरहून परस्पर नागपूरला जावे असे आम्ही ठरवले. कारण जबलपूरला अॅडमिशन करता जावे लागल्यामुळे आमची क्लिनिक्स फार दिवस बंद राहिली होती. मला आजही लख्ख आठवतय, मी क्लिनिकवरून परत येत असताना फोन वाजला. मी लगेच स्कूटर बाजूला घेतली. फोन नुपूरचाच होता व खूप खुशीत ती अॅडमिशन मिळाली म्हणून सांगत होती. आता ती जवळ हवी होती असे खूप प्रकर्षाने वाटले. डोळ्यांत आनंदाश्रूंनी गर्दी केली. लगेचच ही आनंदाची बातमी शेखरला कळवली. नुपूरला तिच्या मेरीटवर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिरवळला जावे लागले. इथले वातावरण अगदी खेडेगावी, बरोबरची बहुतांश मुले-मुली खेड्यातून आलेली. पण नुपूरने छान अॅडजस्ट केले. शनिवार, रविवार पुण्याला यायची व सोमवारी भल्या पहाटे उठून एस.टी. ने शिरवळला जायची. आता टेनिस मागे पडले. शनिवार, रविवार घरी आल्यावर खेळायची तेवढेच. स्पर्धात्मक टेनिस बंद झाले. पण हवे होते ते क्षेत्र मिळाल्यामुळे ती खुश होती.
व्हेटरनरी मेडिसिनला गेल्यापासून नुपूरला चांगले मार्क्स मिळू लागले. ही पाच वर्षे फार पटकन गेली. पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे म्हणून हिने चौथ्या वर्षाला असताना ‘जीआरई’ ही परीक्षा दिली होती. त्यावर्षात अभ्यास जरा कमी असतो म्हणून तिने ही परीक्षा द्यायचे ठरवले. तिला या परीक्षेत मार्कही चांगले मिळाले. पाचव्या वर्षाला असतानाच नुपूरने ठरवले होते की, ग्रॅज्युएशन झाल्यावर काही काळ गॅप घेऊन मग अमेरिकेतल्या विद्यापिठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करायचे. आम्हाला दोघांनाही यात काही वावगे वाटले नाही. गॅप घेतल्या वर्षी काय करायचे याचे नियोजन तिने पाचव्या म्हणजे शेवटच्या वर्षाला असतानाच केले होते. सिक्कीम येथे एक ऑस्ट्रेलियन स्वयंसेवी संस्था भटक्या कुत्र्यासंबंधित काम करते अशी माहिती हिला कळाली. तिने पूर्ण चौकशी करून अर्ज पाठवला. अर्थातच तो स्वीकारला गेला, कारण एक व्हेटरनरी डॉक्टर त्यांना पूर्ण वेळ स्वयंसेवक म्हणून मिळणार होता. नुपूरची परीक्षा संपल्यावर ती येथे जॉईन होणार होती. हा सहा महिन्यांचा प्रोजेक्ट होता व तो संपल्यावर तिला अमेरिकेत प्रवेश अर्ज पाठवायला वेळ मिळणार होता. असे सर्व नुपूरने जमवून आणले होते.
शिरवळला शिकत असताना नुपूर टेबल टेनिस खेळू लागली. कॉलेजतर्फे आंतरविद्यालयीन स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बक्षिसे मिळवल्याचे आठवतंय चौथ्या वर्षांत असताना कॉलेजकडून ओव्हरऑल चांगला परफॉर्मन्ससाठी मानाचा ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ पुरस्कार नुपूरला मिळाला. शेवटच्या वर्षात मेडिसिन व सर्जरी या दोन विषयांत ती कॉलेजमध्ये पहिली आली.
शेवटच्या वर्षाची परीक्षा संपल्यावर थोडे दिवस आमच्याबरोबर व मित्रमैत्रिणींबरोबर मजा करून नुपूर सिक्कीमला गेली. ती दोन महिने तिथे होती. कंपनी फारशी नसायचीच पण ती काम एन्जॉय करत होती. शिरवळ कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन चालू झालेले नव्हते व नुपूरला पुढील शिक्षण भारतात करायचे नव्हते. त्यामुळे आम्ही मुंबईला प्रवेशाकरता अर्ज भरलेलाच नव्हता. नुपूरच्या एका मित्राला असे वाटले नुपूरला सर्जरीला अॅडमिशन मिळायची दाट शक्यता आहे, त्यामुळे तिने फॉर्म भरावा. त्याने आम्हाला फोन करून ही परिस्थिती सांगितली कारण त्याला नुपूरला अमेरिकेला शिकायला जायचे आहे, हे माहीत होते. त्याचा असा फोन आल्यावर आम्हीपण विचारात पडलो कारण नुपूरला सर्जरीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे होते व ती संधी आता चालून आली होती. तिला जेव्हा हे कळवले तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया अशी होती- मला इथे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचेच नाही तर फॉर्म कशाला भरता? पण आम्ही तिला समजावले, जास्त तिच्या बाबाने. अमेरिकेत सर्जरीलाच अॅडमिशन मिळेल याची खात्री नाही कारण तिकडेही हवी ती शाखा मिळणे अवघड आहे. तिने सर्जरी इथे करून दुसऱ्या शाखेतील पोस्ट ग्रॅज्युएशन अमेरिकेत जाऊन करावे. बऱ्याच प्रयत्नानंतर नुपूरला हे पटले व तिचा फॉर्म भरला. तिचा चक्क सर्जरीला अॅडमिशन मिळाली. आम्ही सगळेच खुश झालो. शिक्षण संपल्यावर मात्र तिने पुण्यामध्ये नोकरी घ्यावी याबाबत मी आग्रही होते. एकतर तिचा सहवास आम्हाला मिळणार होता व आतापर्यंतच्या व्यस्त आयुष्यात तिचा स्वयंपाक शिकायचा राहून गेला होता. भाजी, किराणा आणणे या गोष्टीसुद्धा तिने शिकणे हे शिक्षणाइतकेच महत्त्वाचे आहे, असे मला वाटत होते. तिला पण ते पटले व ती पुण्याला आली. नंदिनी सैगल या हॉटेल व्यावसायिक महिलेस रस्त्यावर भटकणाऱ्या प्राण्यांसाठी पुण्यामध्ये शेल्टर होम काढायचे होते. पगार पण ठीक दयायला तयार होती व नुपूरच्या एक वर्ष कमिटमेंटला ती तयार होती.
नोकरी लागल्यावर पहिली गोष्ट शांतपणे नुपूरला सांगितली, तुला राग आला तरी चालेल पण सकाळी उठून तुझा डबा तू करून घ्यायचा व तो पण भाजी- पोळीचा त्याशिवाय तू स्वयंपाक शिकणार नाहीस. तिलापण हे पटले. पुढे वर्षभर लवकर उठून डबा तयार करून, हडपसरच्या पुढे मांजरी गावाजवळ असलेल्या शेल्टर होममध्ये नुपूर स्कूटरने जात असे.
ती पुण्यामध्ये आल्यापासून तिच्या लग्नाचा विषय सुरु झाला होता. तिने लग्नानंतर पुढचे शिक्षण अमेरिकेत जाऊन करावे, असे आम्हाला वाटत होते. योग्य वयात लग्न व्हावे ही आमची इच्छा होती. तिला पण हे पटले. तिने अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश अर्ज पाठवावेत व एका बाजूला वर संशोधन चालू ठेवावे, असे आम्ही ठरवले. २०११ साली हा योग जुळून आला. पुण्यामधील पण मूळचा नागपूरचा व तेव्हा अमेरिकेत ह्युस्टन येथे राहणाऱ्या शार्दूल फडणवीस या मुलाशी नुपूरचे लग्न ठरले. मुख्य म्हणजे अदितीचे मतिमंदत्व लग्न ठरवताना मध्ये आले नाही. पण मी एक केले होते. नुपूरच्या लग्नाचा विषय सुरु झाल्यावर अदितीची पूर्ण तपासणी जेनेटिसिस्टकडून करून घेतली होती. या तपासण्या जरा त्रासदायक होत्या. एका तपासणीसाठी अदितीला भूल द्यावी लागणार होती पण ही तपासणी करणे नुपूरच्या भविष्यासाठी आवश्यक होते. तिचा होणारा नवरा व त्यांच्या कुटुंबियांना आम्हाला कुठल्याच बाबतीत अंधारात ठेवायचे नव्हते. शार्दूल व त्याचे कुटुंबीय समजूतदार आहेत व त्यांनी अदितीला छान स्वीकारले आहे. नुपूरचे लग्न ठरले आणि तिला मिशिगन विद्यापीठात अॅडमिशन मिळाल्याची ईमेल आली. योग छानच जुळून आला कारण अॅडमिशन मिळाली नसती तर लग्नानंतर नुपूरने अमेरिकेला जाऊन करायचे काय, हा मोठा प्रश्नच होता. वर्क परमिट असल्याशिवाय तेथे काम करता येत नाही व आपली मेडिकलची पदवी तिकडे चालत नाही. त्यामुळे डॉक्टरांना नोकरी मिळणे अवघड असते.
लग्नानंतर अकरा महिन्यांची ऑन्कॉलॉजीमधील फेलोशिप मिशिगन विद्यापीठातून तिने यशस्वीपणे पूर्ण केली. लानसिंग(Lansing) या गावामध्ये ती फ्लॅट घेऊन राहात होती. कारण तिथून कॉलेज जवळ होते. शार्दुलची नोकरी त्यावेळी कोस्टारिकाला होती. आठ तासांचा विमान प्रवास करून तो दर गुरुवारी यायचा व त्याला रविवारी दुपारीच निघावे लागायचे. आम्हाला त्याचे खूप कौतुक वाटायचे. दोघेही आपापल्या परीने अॅडजस्ट करून रहात होते. तिला हव्या असलेल्या कोर्सला अॅडमिशन मिळण्यासाठी या शिक्षणाचा फायदा झाला. पुढे तिला मॅडिसन गावातील विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीमध्ये रेडिएशन ऑकॉलॉजीमध्ये दोन वर्षांच्या रेसिडेन्सीला अॅडमिशन मिळाली. इथे अॅडमिशन मिळणे अवघड असते पण तिचा एकंदर बायोडेटा व मिशिगनच्या प्रोफेसरांनी छान रेकमेंडेशन्स दिलेली होती. शिवाय तिने मिशिगनमध्ये असताना एक-दोन पेपर्सपण कॉन्फरन्समध्ये वाचले होते व ते महत्वाच्या मासिकांमध्ये छापून आले होते. या सगळ्याचा फायदा अॅडमिशन मिळताना झाला.
नुपूर अमेरिकेला गेल्यावर आम्हाला दोन वर्षे तिच्याकडे जाताच आले नाही, कारण अमेरिकन व्हिसा दोनदा मिळालाच नाही. एकदाचा व्हिसा मिळाल्यावर २०१३ साली ती राहात असलेल्या ‘वुरहिस’ या गावी मी जाऊन आले. २०१४मध्ये एकदाचा शेखरला पण व्हिसा मिळाला मग आम्ही दोघे वीस दिवसांसाठी नुपूरकडे मॅडिसनला जाऊन आलो. हे छोटे शहर शिकागोपासून कारने दोन तास अंतरावर होते. यावेळच्या भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे मिशिगन विद्यापीठाला भेट. लानसिंग हे शहर मॅडिसनपासून कारने आठ तास लागले, एवढे लांब होते. पण नुपूरला माहिती होते की आम्हाला हे विद्यापीठ बघायची फार इच्छा आहे. त्यामुळे तिने एक शनिवार-रविवार मिशिगन विद्यापीठ व शिकागो दर्शन असा बेत आखला. ती जेथे शिकली ते मिशिगन येथील हॉस्पिटल बघून असे वाटले, आपल्याकडे माणसांकरता पण एवढी अद्ययावत हॉस्पिटल्स नाहीयेत.
काही दिवसाने मॅडिसन या शहरामध्ये नुपूर तेव्हा (२०१४) शिक्षण घेत असलेल्या विस्कॉसिन विद्यापीठ व हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. हे मिशिगनपेक्षा मोठे व जास्त अद्ययावत यंत्रसामग्री असलेले हॉस्पिटल होते. येथे सिस्टीम चांगल्या बसलेल्या होत्या. येथील प्रोफेसर्स विद्यार्थ्यांना मदत करायला सतत तत्पर असतात. नुपूरने शिक्षण घेतलेली दोन्ही विद्यापीठ बघून व जावई व मुलीबरोबर मनसोक्त राहून आम्ही तृप्त मनाने भारतात आलो.
नुपूरने विस्कॉसिनमध्येही अगदी प्रामाणिकपणे व सिन्सिअरली काम केले. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला प्रोफेसर्सकडून छान रेकमेंडेशन्स मिळाली. याचा परिणाम असा झाला की तिचा सशक्त बायो डेटा व ही रेकमेंडेशन्स यामुळे इंटरव्ह्यू दिला त्या प्रत्येक ठिकाणी तिला प्लेसमेंट मिळत होती. यामध्ये मिशिगन विद्यापीठाचाही समावेश होता. पण नुपूरने कोलंबस शहराला पसंती दिली. नुपूर सध्या ओहायो स्टेट हॉस्पिटल मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. नुपूर व्हेटरनरी मेडिसिनमधील भारतातील पहिली रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आहे.
अदिती व नुपूरच्या बौद्धिक क्षमतेमध्ये खूप फरक असला तरी आम्ही दोघींना एकाच स्तरावर वागवत होतो.
मी विशेष मुलांच्या बाबतीत अशी उदाहरणे बघितली आहेत की, विशेष मुलाने काहीही खोड्या केल्या वा चुका केल्या तरी आई-वडील त्याला रागावत नाहीत, कारण त्याला काय कळतय म्हणून सोडून देतात. चांगली बुद्धी असलेल्या मुलालाच रागावतात वा समजावतात की, ‘ तुला कळत नाही का तो विशेष आहे’,’तू समजून घ्यायलाच पाहिजेस’. आई-वडिलांच्या अशा पक्षपाती वागण्याने या भावंडांमध्ये विशेष भावंडांबद्दल नकारार्थी भावना तयार होते. आई-वडील माझ्यापेक्षा विशेष भावंडांवरच जास्त प्रेम करतात या भावनेने विशेष भावंडांचा राग राग करायला लागतात. ही नकारार्थी भावना चांगली बुद्धी असणाऱ्या मुलाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मारक ठरते. त्यांचे व आई-वडिलांचे नाते सुदृढ राहात नाही. यामुळे घरातील वातावरणच असंतुष्ट राहाते. म्हणून आई-वडिलांनी दोन्ही मुलांना एकाच प्रकारची वागणूक दयायला पाहिजे.
नुपूरचा दिनक्रम अगदी लहान असल्यापासून व्यस्त असायचा. त्यामुळे दोघींना एकमेकींबरोबर भांडायला वेळ कमी मिळायचा. जरा मोठी झाल्यावर नुपूर मैत्रिणींकडे राहायला जायची. नुपूर व तिच्या मैत्रिणी हॉटेलमध्ये जायच्या तेव्हा अदिती ताईच्या मागे लागायची. पण आम्ही अदितीला समजवायचो व नुपूरला अदितीमध्ये फार न अडकवता तिला तिचे आयुष्य जगू देत होतो. पुढे जरा मोठी झाल्यावर नुपूर स्वतःहून अधूनमधून अदितीला तिच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपबरोबर बाहेर नेऊ लागली. नुपूरला तिचे आयुष्य कुठल्याही तरुण मुलीसारखे, विशेष बहिणीचे टेन्शन न घेता जगता यावे याकरता आम्ही विशेष प्रयत्न करायचो. अदितीला ताई फार आवडते. ताईचे लग्न ठरवताना शार्दुलची आई व बहीण आमच्याकडे आले असताना, लग्न कशाप्रकारे करुयात वगैरे गप्पा चालू होत्या, अदिती अगदी शांत होती. मी तिला म्हटलं अदया(अदिती) आज इतका शांत का? तर अदिती आत पळत गेली. हमसाहमशी रडायला लागली. तिला आम्ही काय बोलत होतो ते सगळे समजत होते व लग्न ठरले म्हणजे ताई आता आपल्यापासून लांब जाणार यास भावनेने ती इतकी रडत होती. अदितीला संभाषणाचा अर्थ व्यवस्थित समजतो.
नुपूरचे जेव्हा व्हेटरनरी मेडिसिनला जायचे नक्की ठरले, त्याच्याआधी बरेच महिने आम्ही अदितीची मानसिक तयारी करत होतो की, ताई आता दुसऱ्या गावाला शिकायला जाणार व आपल्याला अधूनमधूनच भेटणार. अदिती पंधरा वर्षांची असताना नुपूर व्हेटरनरी मेडिसिन करण्यासाठी वसतिगृहामध्ये राहण्यास गेली. नुपूरचे लग्न ठरल्यावर पण खूप आधीपासून आम्ही अदितीला सांगत होतो की, ताई विमानाने खूप लांब जाणार आहे व खूप दिवस भेटणार नाही. त्यामुळे दोन्ही वेळा प्रत्यक्षात जेव्हा नुपूर लांब राहायला गेली तेव्हा अदिती रडली, पण नंतर लगेचच हे सत्य तिने छान स्वीकारले. आताही ताईचा फोन आला की तिला जमेल त्या भाषेत नवक्षितिजच्या घडामोडी सांगत असते. या दोघीही कुठल्याही परिस्थितीशी अॅडजस्ट व अॅडॅप्ट करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल फारशी काळजी वाटत नाही. शार्दुलसुद्धा अदितीशी फोनवर व प्रत्यक्षात पण चांगल्यापैकी संवाद साधतो.
शार्दुल व नुपूर दोघेही त्यांना जमेल तशी मदत करत असतात. नवक्षितिजमध्ये काय चाललय याची दोघांनाही उत्सुकता असते. दरवेळी अमेरिकेहून येताना नवक्षितिजमधील सर्व मुलांसाठी आवर्जून चॉकलेट्स आणतात व अदिती अगदी अभिमानाने सगळ्यांना ही चॉकलेट्स वाटते. नुपूर पुण्यामध्ये असताना पथनाट्य, नाट्यमहोत्सव व वर्धापनदिन या नवक्षितिजच्या कार्यक्रमांना आवर्जून यायची. नवक्षितिज सुरु करताना आपण अशी संस्था का सुरु करतोय याबद्दल तिच्याशी सविस्तर चर्चा व्हायची. आपल्या आई-बाबांनी नवक्षितिजसारखी संस्था सुरु केली याचा सार्थ अभिमान तिला आहे.
२०१७ मध्ये अदितीचा अमेरिकन व्हिसा झाला. आता तिला तिच्या आवडत्या ताईच्या घरी लवकरच जाता येणार आहे.
नुपूरबद्दल जरा जास्तच विस्ताराने लिहिले गेलंय, पण त्याचा उद्देश असा आहे की विशेष मूल घरात असले तरी आई-वडिलांनी योग्य ती खबरदारी घेतली तर विशेष व नॉर्मल (सामान्य) बुद्धीचे मूल या दोघांनापण आपण छान आयुष्य देऊ शकतो. मुलांचे छान आयुष्य बघून आपणही समाधानाने राहू शकतो.