
९.सह्याद्रीमधील ट्रेकिंग
ट्रेकिंग करताना अवघड चढण आल्यावर काही मुले पुढे यायचेच नाही म्हणून अडून बसायची, अशावेळी त्यांना प्रेरित (मोटीवेट) करून शेवटपर्यंत गडावर नेताना आमचीपण दमछाक व्हायची, पण गडावर पोहोचल्यावर टाळ्यांच्या गजरात स्वागत झाल्यावर मुलांचा थकवा पळून जात असे. उशिरा पोहोचणाऱ्या मुलांचे स्वागत अजूनही आम्ही याच प्रकारे करतो. अशा स्वागताने मुलांचा थकवा जाऊन मग उल्हसित होते. याचा फायदा गड उतरतानाही होतो. गडावरचे वारे,वरून दिसणाऱ्या नद्या, धरणे, शेती, झाडे, घरे हे बघताना, अनुभवताना मुलांचा थकवा निघून जात असे.
विशेष मुलांबरोबर कोणताही नवीन उपक्रम सुरु करताना काय करायचे आहे हे त्यांना समजेल अशा भाषेत शांतपणे सांगून, त्यांची मानसिक तयारी करून घ्यावी लागते. ट्रेकिंग मुलांबरोबरच माझ्या सहकाऱ्यांनीही केलेले नव्हते. शिवाय विशेष मुलांच्या पालकांना ट्रेकिंग या उपक्रमाची माहिती समजावून सांगून त्यांची परवानगी मिळवायची होती. एकंदर अवघडच काम होते. पहिल्यांदा सहकाऱ्यांना आपण का करतोय हे समजावले. पुणे-लोणावळा पदयात्रेमुळे मुलांच्या क्षमतेवर पालक व सहकाऱ्यांचा विश्वास बसला होता. मुलांनी पदयात्रा किती आनंदाने पूर्ण केली होती हे त्यांनी अनुभवल्यामुळे त्यांचे सहकार्य मिळेल याचा मला विश्वास होता. २००४ साली डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही पर्वतीपासून ट्रेकिंगची प्रॅक्टिस सुरु केली. मोठया उत्साहाने मुले सकाळी सात वाजताच पर्वती पायथ्याला जमली. अर्थात बऱ्याच मुलांना पालकांनी सोडले. काही मुलांनी मदत घेत व काही मुलांनी स्वतंत्रपणे, पण सर्वांनी पर्वती चढली. नुसती चढली नाही तर मजा घेत चढली व उतरली. हे माझ्या दृष्टीने फारच उत्साहवर्धक होते. नंतर वडापाव व चहाचा आवडता नाष्टा घेऊन मुले आनंदात आई-वडिलांबरोबर परत गेली. पुढचे एक दोन महिने महिन्यातून एकदा अशी पर्वती चढाईच केली. मुलांच्या क्षमतांचा अंदाज आल्यावर अंतर वाढवून पर्वती चढून गेल्यावर पर्वती ते तळजाई असे चालत गेलो. मुले जरा दमली तर थोडेसे मध्ये थांबत थांबत गेलो. पण सर्वांनी अंतर पूर्ण केले. पालकांना पर्वतीला मुलांना सोडायला सांगितले व घ्यायला तळजाई पायथ्याला बोलावले. तळजाई टेकडीवरच आम्ही पोहे व चहा नाष्टा घेतल्यामुळे मुलांना विश्रांती मिळून मुले तळजाई पायथ्यापर्यंत चांगली चालली. पालकांच्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक होत्या. त्यांच्यामते मुले ट्रेक करून आली की बरेच दिवस आनंदी व उत्साहात असतात व नातेवाईकांना, शेजाऱ्यांना ट्रेकमध्ये काय काय मजा केली ते सांगत असतात. आता लांब अंतराचा ट्रेक ठरवायला हरकत नाही असे मला वाटले.


सहकाऱ्यांशी बोलून पुण्याच्या आजूबाजूला मुलांना कुठे ट्रेकिंगला नेता येईल याचा अभ्यास केला. अभ्यास अशाकरता की, ट्रेकिंगच्या ठिकाणी पोहोचायचे कसे, पुण्याहून निघाल्यावर तेथे पोचायला वेळ किती लागतो, आम्ही एस.टी.ने जाणार होतो, पण एस.टी. कुठपर्यंत जाते?तेथून पुढे कसे पोचायचे?पायथ्यापासून गडावर वा डोंगर चढाईला वेळ किती लागतो? मुलांच्या दृष्टीने चढाई किती अवघड? सर्वात महत्वाचे चढाई व उतरतानाची धोकादायक वळणे, या सर्व गोष्टींचा विचार करूनच पुढचे निर्णय घ्यायचे होते.
पानशेतपासून जवळ असलेल्या डोंगरावर निलकंठेश्वर नावाचे देवस्थान आहे, असे समजले. आमच्यातील काहीजण जाऊन आधी टेहळणी करून आले व या टेहळणीमध्ये तेथपर्यंत पोहोचायचे कसे? नाष्ट्याची सोय आहे का? व मुलांच्या दृष्टीने चढाई कितपत अवघड आहे, याचा अंदाज घेतला. आम्हाला पहिल्यांदाच मुलांना ट्रेकिंगला न्यायला हे ठिकाण योग्य वाटले. यावेळी पालकांची मीटिंग घेऊन त्यांना ट्रेकिंगच्या पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. मागचा अनुभव व मुलांचा उत्साह बघता त्यांनी लगेच परवानगी दिली.
ठरल्याप्रमाणे रविवारी भल्या पहाटे उठून, तयार होऊन सकाळी सहा वाजता स्वारगेट स्थानकावर आली, म्हणजे आई-बाबांनी सोडले. ट्रॅकपँट, शूज, पाठीवर रकसॅक आणि उत्साही आनंदी चेहरे, मुले मस्त दिसत होती. सर्व मिळून आठ ते दहा मुले आली होती व त्यांना मदत करायला आम्ही चारजण होतो. बसला यायला वेळ लागत होता पण मुलांची काही कुरकूर नव्हती. हा नवा अनुभव सर्व प्रकारे घेण्याची त्यांची तयारी दिसत होती. एकदाची बस आली. मुले दंगा करतच आत जाऊन बसली. आजूबाजूचे लोक उत्सुकतेने मुलांची ही लगबग बघत होते. गाडीमध्ये सगळे चढले आहेत ना हे चेक करून झाले व लगेचच बस सुटली. बसमध्ये बसल्यावर मुले थोडीशी गोंधळलेली होती कारण आजूबाजूला, शेजारी बरेचसे अनोळखी चेहरे होते. साधारणपणे एका तासाभरात पानशेत आले. तिथे आम्ही खाली उतरलो व शेतामधून अर्धाकिलोमीटर चालत जाऊन नदी पलीकडे जाणाऱ्या बोटीमध्ये जाऊन बसलो. ही बोट छोटी होती. जेमतेम दहा-बारा लोक एकावेळी बोटीमध्ये मावत होते. बोटीतून जायला मिळतंय म्हणून मुले खुश होती. मलाच थोडेसे टेन्शन आले होते कारण बोट सुरक्षित वाटत नव्हती. नदीपात्र फारच छोटे होते. त्यामुळे आम्ही लवकरच पलीकडे पोहोचलो. सर्व मुलांना सुरक्षित उतरून घेऊन आम्ही निलकंठेश्वराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अदिती आणि दोन मुलांना प्रत्येक पावलाला मदत लागणार होती. त्या मुलांना आम्ही जोडीला घेतले. बाकी मुलांच्या जोड्या लावून देऊन आम्ही चालायला सुरुवात केली. लगेचच चढ सुरु झाला व आमच्या अपेक्षेपेक्षा मुले न दमता चांगली चालत होती. अदिती व इतर दोन मुले ताईदादांच्या मदतीने पण न कंटाळता उत्साहाने चढत होती. मध्येच थांबून मी त्यांना उंचावरून खाली दिसणारी दरी, नदी, हिरव्या रंगाच्या अनेक छटा दाखविणारी शेतं, झाडे मुद्दाम बघायला लावत होते. वेगाने चालणाऱ्या ग्रुपलाही सूचना देऊन ठेवल्या होत्या की, पुढे गेले तरी ठरावीक अंतर चालून गेल्यावर थांबायचे. मागचा हळू चालणारा ग्रुप त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतरच पुढे चालायला सुरुवात करायची. त्यामुळे रस्ता समजायला व हळू चालणाऱ्या मुलांचे मनोबल चांगले राहायला मदत होते.
निलकंठेश्वरावर पोहोचल्यावर थोडी विश्रांती घेतली व नाष्ट्याची ऑर्डर दिली. नाष्टा तयार होईपर्यंत आम्ही अनेक कलाकारांनी भव्य मूर्तीद्वारे उभे केलेले पौराणिक प्रसंग बघायला व मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो. मुलांना गळ्यामध्ये साप घातलेला शंकर वा कमळातून बाहेर आलेली सरस्वती यासारख्या देवांच्या भव्य मूर्ती बघून मजा वाटत होती. गडावर फिरून आल्यावर पोह्याचा मस्त नाष्टा व चहा घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. थोडयाच वेळात लक्षात आले की, उतार व बारीक खडी असल्यामुळे अनेक मुलांना उतरताना मदत लागणार आहे. वेळीच मदत केली नाही तर मुले घसरून पडून त्यांना इजा व्हायची भीती होती. ही जोखीम मला अजिबातच घ्यायची नव्हती कारण यामुळे शारीरिक इजेबरोबरच मनात भीती बसली असती व असे झाले तर विशेष मुले, त्यांचे पालक व त्याहून माझ्या टीमचे मानसिक खच्चीकरण झाले असते. मला तुरंत निर्णय घ्यायचा होता, कारण माझ्या टीममधील मंडळीपण अननुभवी होती. मी माझ्याबरोबरच्या मंडळींना एकाने दोन विशेष मित्र- मैत्रिणीला घेऊन अगदी हळूहळू खाली उतरायला सुरुवात करण्यास सांगितले. चढायला लागला त्याहून थोडा जास्तच वेळ उतरायला लागला, पण कोणीही न पडता आम्ही एकदाचे पायथ्याला आलो. एकदाचे हुश्श झाले कारण हा पहिलाच ट्रेक होता. सर्वांचा विश्वास व सहकार्य मिळण्यासाठी कोणालाही पडून इजा होऊ नये, असे मला वाटत होते. पायथ्याला सर्वजण पोहोचल्यावर, पाणी पिऊन आम्ही बोटीमध्ये बसण्यासाठी नदीच्या दिशेने निघालो. सगळेच दमले होते पण खुश होते. गाणी म्हणत चेष्टामस्करी करतच आम्ही नदी किनारी पोहोचलो. थोडयाच वेळात बोटीमध्ये बसण्यासाठी आमचा नंबर लागला. जातानाचा अनुभव असल्यामुळे टेन्शन न घेता बोटीतून जायचा आनंद घेत आम्ही पैलतिरी पोहोचलो. शेतातून चालत जाऊन बसच्या थांब्यापर्यंत आलो. नशिबाने बसची फार वाट बघावी लागली नाही. पहिलाच थांबा असल्यामुळे सर्वांना बसायला जागा मिळाली. दमल्यामुळे बरेचजण झोपून गेले. मी मात्र जागी होते. मुलांना ट्रेकिंगला न्यायचे स्वप्न प्रत्यक्षात आल्यामुळे खुश होते. सकाळपासूनच्या सर्व घटना डोळ्यांसमोरून जात असताना, स्वारगेट स्टेशन कधी आले कळलेच नाही. मुलांचे पालक बसस्टँडवर हजर होतेच. मुले पळतच जाऊन आई-बाबांना बिलगली व हातीपायी धड मुलांना बघून आई-बाबांनीपण सुटकेचा निःश्वास टाकला.
यानंतर पुढच्या महिन्यात शिवनेरी ट्रेक केला. त्यानंतर पुरंदर, सिंहगड, लोहगड, तिकोना गड, वज्रगड, रायगड, दत्तगड, विचित्रगड व राजगड अशा अनेक गडांवर मुलांना घेऊन ट्रेकिंगची प्रॅक्टिस केली. हळूहळू मुलांची संख्या व त्याबरोबर स्वयंसेवकांचीही संख्या वाढत होती. मुले फार खुशीत भल्या पहाटे उठून कधी स्वारगेट, कधी शिवाजीनगर, तर कधी रेल्वे स्टेशनवर येत होती. फारच थोडी मुले एकटी यायची. बाकीच्या मुलांना आई-बाबा वा भाऊ-बहीण कोणीतरी सोडायला व न्यायला यायचे. पण मुलांचा उत्साह व त्यांच्यामध्ये होणारा बदल बघून ते न कंटाळता महिन्यातून एकदा मुलांना सोडायला व न्यायला येत होते.

प्रत्येक ट्रेक एक आव्हान असायचे. कारण बस, एस.टी. वा ट्रेनने जायचे तर सर्व मुलांना यामध्ये चढवणे सोपे नव्हते. चढल्यावर बसायला जागा मिळेल याची खात्री नसायची. त्यामुळे सर्वांवर नीट लक्ष ठेवायला लागायचे. उतरतानासुद्धा स्टॉप आल्यावर सर्वजण उतरले आहेत ही खात्री करून म्हणजे अक्षरशः मुलांना मोजून नंतरच शेवटचा स्वयंसेवक गाडीतून उतरायचा. मगच आम्ही पुढचा प्रवास वा चालणे सुरु करायचो. अनेक ठिकाणी, जसे पुरंदरला जायचे असेल तर सासवडपर्यंत बस व पुढे पुरंदरला पायथ्यापर्यंत जाण्यासाठी स्थानिक जीपमधून प्रवास करावा लागतो. शिवनेरी गडावर जाताना नारायणगावपर्यंत एस.टी.ने, पुढे शिवनेरी पायथ्यापर्यंत जीपने जावे लागायचे. येथे जीपपण सहज मिळत नाहीत. त्यामुळे जीप ड्रायव्हर व प्रवासीपण एका ट्रीपमध्ये जास्तीत जास्त जायचा प्रयत्न करतात. मला आठवतेय एका शिवनेरी ट्रेकला आम्ही एकवीस जण एकाच वेळी जीपमधून गेलो होतो. खूप दाटीवाटीत अक्षरशः एकमेकांच्या मांडीवर बसलो होतो, पण या प्रवासाची मजा वाटायची. एकतर अंतर कमी असायचे व प्रवास संपल्यावर ट्रेकिंग करायची उत्सुकता, ओढ सगळ्यांना असायची. सर्वजण न्याहरी व दुपारच्या जेवणाचा डबा, पाण्याची बाटली आणत असत. साधारण सर्व गडावर पिण्याचे पाणी असते. गड चढताना लिंबू सरबत व उतरताना चहा विकत घेत असू. प्रत्येक ट्रेकसाठी प्रत्यक्षात येईल तो प्रवासखर्च व काही खायला-प्यायला घेतले तर तो खर्च माफक होत असे. त्यामुळे पालकांवर खर्चाचा फार ताण पण येत नव्हता.
एखादया झाडाखाली वा देवळाबाहेरच्या मंडपात बसून आम्ही आपापले डबे उघडून अंगतपंगत करत असू. मग थोडावेळ थांबून परतीचा प्रवास सुरु होत असे. उतरताना जास्त काळजी घेऊन उतरत असू. पोहोचताना केली तशीच परत मजलदरमजल करत आम्ही संध्याकाळी स्टेशनवर पोहोचायचो. तेथे बऱ्याच जणांचे आई-बाबा वा भाऊ-बहीण त्यांना घ्यायला आलेले असायचे, पण कधी कधी बराच वेळ थांबावे लागायचे. काहीतरी कारणाने त्यांना यायला उशीर व्हायचा. अशावेळी मात्र जरा वैताग यायचा. अशी दोन वर्षे ट्रेकिंगची प्रॅक्टिस झाल्यावर माझी खात्री पटली की मुले आता हिमालयात जायला तयार झाली आहेत.
मी स्वतः अनेक वर्षे हिमालयात जात होते. रोहतांग पास, कफनी पिंढारी, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, केदारनाथ, हेमकुंड सारखे ट्रेक तर एव्हरेस्ट बेस कॅप, काळापठार, गोकियो, कैलास-मानस सारखे अवघड ट्रेक मी केले होते. हिमालयामध्ये ट्रेकिंग करतानाची मजा, थरार, हवेची अनिश्चितता, बर्फामध्ये खेळणे, तंबूमध्ये राहाणे, स्लिपींग बॅगमध्ये झोपणे, नवे पक्षी, प्राणी, झाडे, फुले बघणे; परप्रांतातल्या लोकांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारणे, वेगवेगळ्या ग्रुप्सबरोबर जाऊन त्यांच्याशी मैत्री जमवणे, हे सर्व मी वर्षानुवर्षे अनुभवले होते. रात्री थंडीमध्ये कँपफायरची मजा, बेसुऱ्या आवाजात बिनधास्त म्हटलेली गाणी, नंतरचे गरमागरम सूप व जेवण याची मजा. मुख्य म्हणजे ट्रेकिंगला आल्यावर सर्वजण आपला हुद्दा, सांपत्तिक स्थिती, वय विसरून एकाच पातळीवर एकमेकांशी वागतात, हे मला फार भावले. हिमालयातील उंच शिखरांमध्ये आपला मीपणा गळून पडतो. सतत बदलणारे हवामान आपल्याला आयुष्यामधील अनित्यतेचे महत्त्व पटवून देते. प्रत्येक क्षण फक्त आपला असतो व त्या क्षणाचा आनंद घ्यायला हवा, याचे भान आपल्याला येते. या सर्व अनुभवांनी मला खूप शिकवले व माझे आयुष्य समृद्ध केले. हे सर्व अनुभव मला विशेष मित्रमैत्रिणींना देऊन त्यांचेही आयुष्य समृद्ध व आनंदी करावेसे वाटले. आम्ही हिमालय ट्रेकच्या तयारीला लागलो.