
The Spirit of Navkshitij - Hindi
करोना व्हायरस सध्या सर्व जगभर धुमाकूळ घालत आहे . भारतामध्ये सुध्दा सध्या करोना व्हायरस पसरत आहे. नवक्षितिज सारख्या मतिमंद प्रौढ व्यक्तींचे जन्मभरासाठी पुनर्वसन करणाऱ्या संस्थांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागतंय. नवक्षितिज मधील विशेष मित्रमैत्रिणींना घरी पाठवणे हा एक पर्याय उपलब्ध होता पण तो पर्याय घेणे मी व माझ्या सहकाऱ्यांच्या सदसदविवेकबुद्धीला पटण्यासारखा नव्हता. त्यामुळे आम्ही त्या पर्यायाचा विचारच केला नाही. अनेक विशेष मित्रमैत्रिणींचे आईवडिल वयस्कर आहेत तर काहींचे आई वा वडील मृत्यू पावलेले आहेत तर काही विशेष मित्रमैत्रिणींचे आईवडील दोघेही मृत्यू पावलेले आहेत. दिवसभर विशेष मित्रमैत्रिणीं घरी करणार काय? कंटाळा येऊन त्यामुळे अनेक वर्तुणूक समस्या सुरू व्हायची भीती असते. ही परिस्थिती हाताळणे पालकांना फार अवघड जाते.
नवक्षितिज मधील कार्यशाळेची सुरुवात प्रार्थनेपासून होतो
सध्या नवक्षितिज मध्ये मारुंजी येथे ५० मित्रमैत्रिणीं तर आसवली येथे ८ विशेष मित्र रहात आहेत. दोन्ही शाखा मिळून ५ जण काही कारणाने घरी गेलेले आहेत. नाईलाजाने त्यांना १५ एप्रिल पर्यंत घरीच थांबायला सांगितले आहे. शाळा, स्वमग्न विभाग व कार्यशाळेसाठी दिवस भरासाठी येणारे २४ विशेष मित्रमैत्रिणींना १५ एप्रिल पर्यंत घरीच थांबायला सांगितले आहे. शाळा, स्वमग्न विभाग बंदच ठेवला आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना १५ एप्रिल नंतरच परत कामावर येण्यास सांगितले आहे. ही काळजी नवक्षितिज मध्ये राहणारे विशेष मित्रमैत्रिणी, निवासी कर्मचारी व त्यांची मुले यांना करोना व्हायरसची लागण होऊ नये याच साठी घेतलेली आहे. यामुळे मुख्य आव्हान उभे राहिले मारुंजी येथील निवासी कर्मचारी यांच्या समोर कारण स्वयंपाघरात काम करणारी फक्त एकच निवासी कर्मचारी आहे बाकी तीन जणी जवळच्या गावांमधून येणाऱ्या होत्या. इतर विभागामधील गंगा, मंजुळा व आशा यांनी स्वयंपाकाची जबाबदारी घेतली आहे त्यामुळे विशेष मित्रमैत्रिणींना नेहमीच्या वेळापत्रकानुसार जेवण मिळत आहे.
नवक्षितिज मधील निवासी सहकारी स्वयंपाकघरात स्वादिष्ट आणि रुचकर जेवण बनवताना
कार्यशाळेमध्ये आठ कर्मचाऱ्यांच्या ऐवजी कार्यशाळा व्यवस्थापक मुंडे, कार्यशाळा सहाय्यक अनुराधा व मोरे मावशी मिळुन सकाळी ११ ते संध्याकाळी ४.३० असे नेहमी प्रमाणे कार्यशाळेचे कामकाज चालू ठेवले आहे. यामुळे विशेष मित्रमैत्रिणींना सकारात्मक दिनक्रम मिळतो व त्याची उर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते व याचा फायदा त्यांना मानसिक स्थिरता येण्यात होतो.


विशेष मित्र मैत्रिणी कार्यशाळेत आपल्या विभागात बसून काम करताना (सोबत अनुराधाताई मुंडे आणि संतोष मुंडे सर)
काळजीवाहक समन्वयक साईनाथ, सुविधा समन्वयक तिरुपती व दत्ता हे तिघे ३५ विशेष मित्रांची तर सखुताई एकट्या १५ विशेष मैत्रिणींची काळजी घेत आहेत. कारण दुसरी काळजीवाहक गंगा स्वयंपाकघरात मदत करत आहे. विशेष मित्रमैत्रिणींचा सकाळचा व्यायाम, त्यांना अंघोळीच्या वेळी लागणारी मदत, त्यांचे कपडे धुऊन ते व्यवस्तीत ठेवणे,सकाळ व संध्याकाळचा नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण. याशिवाय येणारी आजारपणे, जरुर असेल तर दवाखान्यात नेणे, नेहमी चालू असणारी औषधे वेळेवर देणे, त्यांचा वेळ जाण्यासाठी कॅरम, सापशिडी, रंगवायला पुस्तके देणे, टी व्ही लावून देणे ही व अशी अनेक कामे काळजीवाहक रोजच्यारोज न कंटाळता करत असतात. याच बरोबर त्यांना विशेष मित्रमैत्रिणींच्या वर्तवणूक समस्यापण हाताळाव्या लागतात.


काळजीवाहक सखुताई आपल्या मुलींसोबत ; दत्ता दादा, साईनाथ दादा आणि तिरुपती दादा विशेष मित्रांसोबत
बागकामासाठी पूर्णवेळ तीन कर्मचारी असतात सद्यस्थितीत एकटा ओंकार विशेष मित्रांच्या मदतीने बागेला पाणी घालणे, बाग झाडणे व इतर स्वच्छता करतो.

कार्यालयीन कामासाठी कार्यालयात ४ कर्मचारी असतात सध्या फक्त व्यवस्थापक वायाळ हे काम करत आहेत. ८१ वर्षांच्या वसुधा दिवेकर या संस्थापक विश्वस्त तिथेच राहून या सर्वाना प्रोत्साहन देत आहेत.
जनरल मॅनेजर आपरेशन्स व्यवस्थापक रामेश्वर, सुविधा व्यवस्थापक सूर्यवंशी व मी आम्ही सतत निवासी सहकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना तिथे जाऊन मदत करायच्या इच्छेला आवर घालून त्यांना करोना व्हायरस पासुन सुरक्षित रहाण्याच्या दृष्टीने आमची जबाबदारीची भूमिका पार पाडत आहोत. त्यांना काहीही अडचण आली तरी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हा विश्वास त्या सर्वांना आहे.
आसवली येथील कार्यशाळा व्यवस्थापक मव्हाळे, राम , संतोष, राणी, साधना व अश्विनी मिळून तेथील विशेष मित्रमैत्रिणींची खूप चांगल्या प्रकारे प्रेमाने काळजी घेत आहेत.

नवक्षितिजचे मारुंजी येथील १४ निवासी कर्मचारी विशेष मित्रमैत्रिणींची खूप प्रेमाने व संवेदनशीलतेने काळजी घेत आहेत. खूप जास्तीची जबाबदारी घेऊन प्रयत्नपूर्वक ते हे सर्व करत आहेत हे बघून त्यांचे खूप कौतुक वाटते. ज्या ज्या वेळी नवक्षितिज मध्ये काही अडचणीची परिस्थिती निर्माण होते त्या त्या वेळी माझे सर्व सहकारी पुढे येऊन जबाबदारी घेऊन त्यातून मार्ग काढतात. विशेष म्महणजे नवक्लाषितिज मधील विशेष मित्र-मैत्रिणीसुद्धा परिस्थितीशी सामंजस्यानेघेत जबाबदारीने काम करत आहेत. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा अभिमान वाटतो. अशावेळी आम्ही सर्वजण एकमताने व एकसंघपणे अडचणीच्या परिस्थितीतुन यशस्वीपणे मार्ग काढतो. या सकारात्मक भावनेमुळेच नवक्षितिजमध्ये विशेष मित्रमैत्रिणींना आनंदी व उत्साहाने भरलेले आयुष्य देण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. याहून जास्त आमची सगळ्यांची लाडकी दिवेकर माऊशी वयाच्या ८१ व्या वर्षी सुद्धा जोमाने काम करत आहेत. This is the spirit of Navkshitij.
